Saturday 20 December 2014

हे बंध रेशमाचे...


आपण सगळेच प्रेम मिळवण्यासाठी धडपडत असतो . सगळी नाती जोडतो ती प्रेम मिळवण्यासाठीच. त्यातून आनंद मिळावा यासाठी. पण प्रत्येक वेळी आनंद मिळतोच असं नाही. काही वेळा प्रेम आणि आनंद मिळवण्यासाठी समाजाचा विरोध पत्करायची आपली तयारी नसते. प्रेम, आनंद आणि  स्वच्छ, मोकळ जगणं हे सगळ किती छान आहे.  आज मी दोन अप्रतिम कलाकृतींचा आनंद घेतला. तेव्हा मला प्रकर्षानी हे जाणवलं.
 एक म्हणजे उमा त्रिलोक यांचं अमृता आणि इमरोझ हे पुस्तकं. ज्ञानपीठ पुरस्कार विजेती लेखिका आणि एक चित्रकार यांची प्रेमकहाणी. प्रतिभा आणि प्रतिमा, मैत्री आणि प्रेम यांचा विलक्षण अविष्कार म्हणजे हे नातं. चाळीस वर्ष एकमेकांच्या सहवासात घालवलेले दोन जीव. म्हणायला दोन पण खरं तर एकच. ज्यांना प्रेम ही एक भ्रामक कल्पना वाटते, त्यांनी हे पुस्तक नक्की वाचा.  समाजाच्या सो कॉल्ड चौकटीत बसणारं त्यांच हे प्रेम नव्हतं. पण अमृता आणि इमरोझ मोकळ्या मनानी जगले. प्रेमाची खात्री असली की अडथऴे जाणवत नाहीत. हे सगळ अमृता यांनी  नुसतं लिहून ठेवलं नाही तर त्या तसं जगल्या. इमरोझदेखील अमृतांच्या आजारपणात  सावलीसारखे त्यांच्याबरोबर राहिले. एक विलक्षण नातं. शब्दात बांधता न येणारं
शांता गोखले यांचं रीटा वेलिंगकर या पुस्तकानी आणि सिनेमानी  एका वेगळ्या मोकळ्या जगण्याविषयी सांगितलं. जगायचं पण आनंदानी ही थिअरी उषीरा का होईना कऴलेल्या एका स्त्रीची गोष्ट आहे यामध्ये. अमृता आणि इमरोझच्या निखळ आणि सुंदर प्रेमापेक्षा एकदम वेगळी कथा. जे मोकळ नातं त्या दोघांमध्ये होतं आणि समाजाचा रोष पत्करून त्यांनी स्वीकारलं होतं त्याला छेद देणारी ही गोष्ट. समाजाची चौकट न मोडता, गुडी गुडी संबंध जपणा-या साळवीची आणि रीटाची गोष्ट. रीटाला हवय मोकळ नातं आणि साळवी जपतोय चौकट. यातून झालेला संघर्ष. रीटाला मिळालेलं शहाणपण. सुंदर आहे सगळ. 
स्वच्छ आणि मोकळ जगण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. तसं जगलो तरच आनंदी रहाता येईल. एक तर आपण करत असलेल्या गोष्टी मोकळेपणानी स्वीकारायचं धैर्य हवं,  नाही तर असं काहीही करू नये ज्यामुळे आपल्या आयुष्यातला मोकळेपणाच संपून जाईल. निर्मळ , मोकळं, स्वच्छ असं जगता यायला हवं. हे सगळ अवलंबून आहे आपल्या  नात्यांमध्ये असलेल्या प्रामाणिकपणावर. हा प्रामाणिकपणा तेव्हाच ठेवता येईल जेव्हा आपुलकीनी आणि प्रेमानी एकमेकांना समजून घेतलं जाईल. विधात्यानी माणसं निर्माण केली, माणसानी निर्माण केली नाती, नातं कोणतही असो, हे बंध जोपासण्यासाठी आणि ते घट्ट करण्यासाठी धडपड करायला हवी...... 

Saturday 13 December 2014


नाती जपूया..........


आज एका वेगळ्याच विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे. अलिकडे मुलांना त्यांच्या आई बाबांबरोबर फारस कुठे जायला आवडत नाही. हा विषय डोक्यात येण्याचं कारण अगदी कालच एका लग्न समारंभात माझ्या काही मैत्रिणी खुप मोठेपणानी सांगत होत्या की, ''माझी मुलगी मला म्हणाली, मम्मा प्लीज तू जा बाई त्या बोअर लग्नात. मी त्यापेक्षा घरीच एन्जॉय करते.'' मी मात्र माझ्या मुलाला थोडं रागवूनच लग्नाला नेलं होतं. तो सुध्दा म्हणत होता , ''आई प्लीज मी येत नाही. कारण तिथे माझ्या वयाचं कोणीच नसत.'' त्यावर मी माझं ज्ञान पाजळून त्याला सांगितलं , ''अरे असं कसं करून चालेल? या निमित्तानी ओळखी होतात. हल्ली एरवी कोण कोणाकडे जातय.'' तिथे गेल्यावर त्याचचं म्हणणं खरं झालं. अगदी जवळची नात्यातली मुलं सोडली तर कोणीही तिथे आलेलं नव्हतं. 
थोडं वाईट वाटलं. पिढीच्या अंतरानी परिस्थिती बदलणार आहे . हे मला मान्य आहे. पण एकमेकांना भेटण्याच्या प्रसंगातदेखील असं घडू लागलं तर कसं होणार ? एकमेकांकडे कारणाशिवाय जाणं  दुर्मिळ झालयं. हल्लीच्या बिझी शेड्युल्डमुळे विनाकारण कोणाकडेही जाणं शक्य नाही. पण निदान लग्ना कार्याच्या निमित्तानी तरी मुलांना आपल्या नातेवाईकांशी ओळख झाली पाहिजे. फार लांब कशाला अगदी माझ्या सगळ्या आत्ये, चुलत भावंडांना माझा मुलगा ओळखत नाही. वाईट वाटतं. नाती जपायचं विसरतोय का आपण ?
 तुम्ही इतक्या लांबून कसे येणार ? म्हणून मी बोलवलच नाही लांबच्या कोणाला. असं म्हणतात लोक. काही अंशी बरोबर पण आहे. लांबच्या कार्याला जातच नाहीत. घरातून कोणीतरी एकच जातो. मग यजमानांच ताटाचं गणित कोलमडत असावं. सगळच अवघड असतं. स्पष्ट विचाराव लागत किती लोक येणार तुमच्याकडून ?  हे व्यवहार्य असेलही. पण का कोणास ठाऊक या परिस्थितीची मी  माझ्या लहानपणाशी तुलना करू लागते. आम्ही आईबरोबर सगळीकडे जायचो. अगदी दहावी बारावीत सुध्दा. हा काळ फार आदिम जमान्यातला नाही. त्यामुळे आमच्या आई वडीलांच्या माघारीसुध्दा आम्हाला आवर्जून बोलवणारे नातेवाईक आहेत. पण आमची पिढी कमी पडतीय नाती जपायला. सोशल मिडियाशी सोशल झालेली ही पिढी ख-या आयुष्यात सोशल व्हायला हवी. आत्ताची पिढी सोशल आहे, त्यांना कनेक्ट व्हायला आवडतं. नाहीतर फेसबुक आणि अन्य माध्यमात इतक्या ग्रुप्समधून ही मंडळी चॅटली असती का ?  फक्त त्यांना बरोबर घेऊन चालायला हवं. त्यांच्या कलानी घ्यायला हवं. नातेसंबंध जपायला शिकवायला हवं . त्यासाठी आधी आपण नाती जपायला शिकायला हवं. वेळ नाही हे कारण थोडं बाजुला ठेवायला हवं. असं नाही केलं तर परिस्थिती कठीण होईल . मुळात हल्ली एक एक अपत्य. त्यामुळे तसही कुटुंब लहान झालय. त्यातून कुठे गेलोच नाही तर कसं होणार ? 
''आम्ही ना सुट्टीत नातेवाईकांकडे जातच नाही. त्यापेक्षा बाहेर गेलेलं बरं ''  असं म्हणत नातेवाईकांकडे जाण कमी झालय. पर्यटन करायला हवच. पण नात्यांच विघटन थांबवायला हवं. जिथे असं विघटन होत नसेल त्यांना मनापासून सलाम. पण जिथे होत असेल त्यांनी हे विघटन थांबवून नात्यांच संघटन करायला हवं. काय वाटतं तुम्हाला ? 

Thursday 11 December 2014

बंद करा प्लीज..........


परवा  पेपरमध्ये एक बातमी वाचली. एका मॉलमध्ये चाललेल्या कार्यक्रमात कर्कश्श आवाजात लावलेल्या डीजेवर रसिकांनी बंदी आणली.  आणि हे सुध्दा आवडलं की त्या कार्यक्रमाला जवळपास हजार प्रेक्षक होते. बरं वाटलं वाचून.... म्हणजे एक लक्षात आलं की आपण ठरवलं तर चुकीच्या गोष्टी बंद करू शकतो. नुसतं भाषणबाजी आणि परिसंवाद घेऊन उपयोग नाहीये. विशेष करून आपल्या आजुबाजुला घडणा-या चुकीच्या गोष्टी आपण एकत्र आलो तर बंद करू शकतो. 
मागे एकदा मी डीजे या एका कर्णकर्कश्श आणि प्रचंड छळवादी गोष्टीबद्दल लिहिलं होतं. मला तर हा डीजे नामक प्रकार मागील कित्येक जन्मांचा वैरी वाटतो. तीच तीच गाणी, नुसता कहर आहे डीजे म्हणजे. याचे वाईट परिणाम, त्याचा होणारा त्रास याविषयी पुन्हा पुन्हा कितीही सांगितलं तरी त्याचा काहीच उपयोग होत नाहीये. कारण आपण सगळे एक होऊन विरोध करत  नाही. सध्या लग्नाचा सिझन जोरात आहे. पण  ''लग्न''  हा  त्रास ज्याचा त्यानी भोगावा. त्याचा दुस-यांना का त्रास ? म्हणजे नंतर    होणा-या  ढॅंड ढॅंडचा आधीच इतका गजर का करायचा ? एक तर त्या नवरा नवरीला या सगळ्यात अजिबात रस नसतो. उगाच , ''बेगानी शादीमे अब्दुल्ला दीवाना'' याप्रमाणे बाकीचे सगळेच नाचत असतात. कोणी मुलींना इंप्रेस करायला, कोणी मुलांना  इंप्रेस करायला, कोणी उगाच, कोणी घेतलेली जिरवायला. काय काय विचित्र प्रकार आहेत हे. निदान आजुबाजुच्या लोकांचा तरी विचार करा. डीजे जितका जोरात तितकं लग्न जोरात , अशी काही भोळी समजूत आहे का ? 
कोणी निवडून आलं डीजे, कोणाचं लग्न असल डीजे, कोणाकडे कसलाही आनंदाचा प्रसंग असला डीजे, कोणाची मिरवणूक असली डीजे, गणेशोत्सव किंवा गोकुळाष्टमी या दिवसांमध्ये डीजे वाजवणं तर जन्मसिध्द हक्कच आहे. बर गमंत ही आहे की, त्रास सगळ्यांना होतो. पण पुढे जाऊन बोलणार कोण? हा प्रश्न आहे. मी असं ऐकलय की हे डीजे प्रचंड महागडे असतात. अरे मग का , का पैसे उधळता असे ? ध्वनीपातळीचा विचार तरी करा. हौसेला मोल नाही हे मान्य. पण आपल्या हौसेमुळे कित्येकांना त्रास होतोय, हे लक्षात घ्या. नेतेमंडळी म्हणतात, ''कार्यकर्ते ऐकत नाहीत.'' कार्यकर्ते म्हणतात, ''मग,  निवडणूकीच्या काळात इतकं काम केलं. काही मागितलं का ? आता डीजे हवाच. ''डीजे आणि आनंद याचं काय कनेक्शन? डीजे आणि त्याचा ढणढणाट नसेल तर आनंद व्यक्त करता येत नाही का ? डीजे या यंत्राला विरोध नाहीये. पण त्याच्या आवाजाच्या पातळीला विरोध आहे. कायमच कर्णबधिर होणं परवडेल का ? त्यापेक्षा, आनंद व्यक्त करण्याचा मार्ग बदलुया का ? हे गाणं पीजे म्हणून डीजेवर लावायला हरकत नाही.... 
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई.........
तरी देवा सरं ना ह्यो भोग कशापायी.............. खेळ मांडला......  मांडला (डी..........जे......)

नॉट आऊट 100 ..............


काल एका खुप मस्त कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. आमच्या तळेगावला एक वृध्दाश्रम आहे ''वानप्रस्थाश्रम'',  तिथे मोहोळकर आजींचा शंभरावा वाढदिवस साजरा केला होता. त्या वृध्दाश्रमाला वेगळाच साज चढवला होता. एरवी डोळ्यात दुःखाची किनार असणा-या सगळ्या आजी आजोबांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक जाणवली. त्या वृध्दाश्रमाला लाईटच्या माळा लावल्या होत्या. फुगे, फुलांच्या माळा आणि रोषणाईनी सगळा परिसर सजला होता. छोट्याश्या स्टेजवर छान फ्लेक्स लावले होते. एरवी स्वतःला मान्यवर म्हणवणारे समोरच्या खुर्चीवर बसले होते. स्टेजवर काही मान्यवर होते. पण इतर वेळी असतो तसा त्यांचा बडेजाव नव्हता. आजींचा सत्कार करायला 105 वर्षांचे अंबोरे आजोबा आले होते. आजही शेतात खुरपं घेऊन काम करणारे ते आजोबा पाहिले आणि थक्क झाले. डोक्यावर पागोट, धोतर, पैरण असा साधा वेश घातलेले आजोबा सॉलिड होते. स्माईलिंग हार्टस नावाच्या तरूणांच्या एका ग्रुपनी आणि आमच्या उर्मिला ताईंनी सगळा कार्यक्रम आखला होता. अर्थात आश्रमातल्या सगळ्या सदस्यांची त्यांना साथ होतीच. 
या कार्यक्रमाला आल्यानी शंभरीतल्या एका युवतीचं दर्शन घडलं. वयाच्या 14 व्या वर्षी लग्न झालेल्या आजींना खूप लवकर म्हणजे तिशीच्या आतच वैधव्य आलं. किती भयंकर आहे हे सगळं. आजकाल तिशीत मुली लग्न सुध्दा करत नाहीत. तारूण्यात कोसळलेल्या या संकटाला आजींनी झुंज दिली. मशिनवर कपडे शिवून संसार केला. मुलांना शिकवून आपल्या पायावर उभं केलं. 
इतकं सगळ सोसून त्या गेली 15 वर्ष वृध्दाश्रमात आहेत. आता ते का ? कसं ? या वादात आपण न पडलेलं बरं. तो एक स्वतंत्र विषय आहे. पण वृध्दाश्रमातदेखील त्या आनंदानी रहातायत. तिथल्या सगळ्या उपक्रमात सहभागी होतायत. आपला आहार, व्यायाम हे सगळ अगदी योग्य पध्दतीनी पाळतायत. सत्काराला उत्तर देताना त्यांनी अगदी थोडक्यात आपल्या मनातले भाव व्यक्त केले. तिथे त्यांच्यासाठी आणलेले सगळे हार, पुष्पगुच्छ त्या आनंदानी स्विकारत होत्या. मस्तपैकी ऐटीत केक सुध्दा कापला. कुठेही आपल्या वार्धक्याच्या खुणा त्यांच्या वर्तनातून दिसत नव्हत्या. आहे त्या परिस्थितीत आनंदानी रहायचं इतका साधा सोपा मंत्र त्यांनी जपला आहे. 
मोहोळकर आजींसारख जगता आलं तर आयुष्यात निराशा कधीच जाणवणार नाही. कोणत्याही काउन्सिलरकडे जाण्याची गरज भासणार नाही. जीवन आपल्याला कसं जगायचं हे शिकवत. फक्त आपली ते शिकण्याची तयारी नसते. कोणी तरी आधार द्यायला असावं असं वाटण चूक नाही. पण कोणी नाही म्हणून थांबण हे चूक आहे. आपल्याला आधार देणारे अनेक जण भेटतात. आपल्याला हवा तोच आधार मिळत नाहीये म्हणून आकांडतांडव करण्यात काय अर्थ आहे. त्यापेक्षा आत्ता जे आहे त्यामध्ये आनंदी रहाता आलं पाहिजे. प्रेम मिळवण्यासाठी आधी ते द्यावं लागतं. अशा अनेक संस्थांमध्ये कितीतरी जण आपली वाट बघतायत. तिथे आपल्या मनातल्या आनंदाची उधळण करूयात. दोन दोन तास व्हॉटस अॅपवर आणि फेसबुकवर घालवा. पण आठवड्यातला एक तास अशा संस्थांना देता आला तर. आपण नॉट आऊट 100 इतकं जगू का नाही माहिती नाही. पण जितकं आयुष्य आहे त्यात दुस-यांच्या       चेहे-यावर आनंद, हसु आणण्याचा प्रयत्न करायचा. इतकं आज ठरवुयात का  ? 

Wednesday 3 December 2014


प्रामाणिकपणा.........



परवा एका कार्यक्रमाच्या निमित्तानी भंडारा डोंगरावर जायचा योग आला. तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होतोय, खरं तर मी शब्दांकन केलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. पण मला तुमच्याशी त्याबद्दल नाही बोलायचं. पुन्हा केव्हा तरी त्या पुस्तकाविषयी सांगेन. पण आज वेगळच काहीतरी सांगायचं आहे. त्या दिवशी वारकरी संप्रदायातले सगळे महाराज, कीर्तनकार, विणेकरी, टाळकरी, वारकरी आलेले होते. जवळपास दीड हजार लोक होते. तिथे पंढरपूरचे अतिशय विद्वान ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलुरकर प्रमुख वक्ते म्हणून होते. त्यांनी बोलता बोलता एक मार्मिक मुद्दा मांडला. ते  कीर्तनकारांना उद्देशून म्हणाले, ''कीर्तनकारांनी पाकीटाच्या मागे न लागता, अध्यात्मिक विचारांचा प्रसार करण्यासाठी वचनबध्द असलं पाहिजे. प्रामाणिकपणे आपलं काम केलं पाहिजे. ''
फारच महत्त्वाचा मुद्दा वाटतो हा. प्रामाणिकपणा हा गुण आपल्याला आयुष्यात खूप काही मिळवून देतो. लहान मुलांना या गुणाचं महत्त्व पटवून देताना, आपणच या गुणापासून दूर चाललोय की काय असं वाटतं कधी कधी. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत हा प्रामाणिकपणा जपला जात नाही. पैसा मिळवणं महत्त्वाचं आहेच. पण त्या पैशापायी आपण काय काय गमवतोय हे लक्षात घेतलं पाहिजे. ''आत्ताच्या काळात इतकं प्रामाणिकपणे वागून चालत नाही हो.'' असं म्हणणारे खूप भेटतात. पण मला वाटतं , आपल्या मनाचं ऐकाव. ते आपल्याला कधीच चुकीचा सल्ला देत नाही. मग ते बुध्दिशी ताडून बघावं. त्यानंतर जो काही निर्णय होईल तो प्रामाणिकच असेल. 
प्रामाणिकपणे काही गोष्टी कबूल केल्यानी मनावरचा कितीतरी भार हलका होतो. मग ती चूक असो की एखादी चांगली गोष्ट. अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये अकारण खोटं बोलून उगाच संकटं वाढतात. त्यापेक्षा प्रामाणिकपणे कबुल केलेलं काय वाईट ?  मूल्यशिक्षण देताना प्रामाणिकपणा हे महत्त्वाचं मूल्य सांगितलं जातं. मूल्यशिक्षण शिकवणा-या शिक्षकांनी आणि पालकांनी लहान वयातच या मूल्याचं महत्त्व सांगितलं तर ब-याच मोठ्या चुका घडणार नाहीत. ट्रेनमधून स्टेशनवर उतरल्यावर टी सी ला तिकीट न काढणारी अप्रामाणिक माणसं लगेच दिसतात. मी आणि माझी मैत्रीण कायम असा विचार करायचो, ''इतकं प्रामाणिकपणे तिकीट काढलय पण हा टीसी कधी बघतच नाही. साला प्रामाणिकपणाचं काही चीजच नाही.'' बसमध्ये, बॅंकेत, दुकानात , रिक्षावाल्याला  उरलेले पैसे प्रामाणिकपणे देऊन टाकले की किती बरं वाटतं. तो कंडक्टर, दुकानदार, रिक्षावाला आपले उरलेले पैसे कुठे देतो ? मग आपण तरी का उगाच इतकं अति करायचं ? असा विचार मनात येणं स्वाभाविक आहे. पण  माझी आई तर  नेहमी म्हणायची , '' हा असा चुकून मिळालेला पैसा कधीच लाभत नाही.''
एका वेगळ्या मूल्यावर बोलताना नात्यातला प्रामाणिकपणा जपलाच पाहिजे. हे वेगळं सांगायला नको. जे वाटतं ते बोललं की मनावरचा ताण कमी होतो. काही वेळा प्रामाणिकपणे कबूल केल्यानी समोरच्याला राग येऊ शकतो. पण तो एकदाच. पुन्हा विचार केल्यानंतर त्या व्यक्तिला सुध्दा हे पटत. 
अरे हो........ प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगते हा. आज ब्लॉगवरचा हा 50 वा लेख आहे. खरं तर मला ब्लॉगवर 50 पोस्ट दिसत होत्या. पण लेख 49 होते. मग म्हणलं पन्नासावा लेख लिहावा. पण मनीमानसी काही येतच नव्हतं. उगाच ओढून ताणून कशाला लिहायचं ना ? विषय पण असा असावा ज्यातून हाफ सेंच्युरी झळकेल. काय ? आता तुम्ही सगळ्यांना प्रामाणिकपणे पोस्टला कमेंट करा बर........

Friday 21 November 2014


नेहमी आनंदी रहा.....




आपलं आयुष्य क्षणभंगुर आहे असं म्हणतात. सुख सुध्दा  क्षणभंगुर  आणि दुःख सुध्दा. म्हणजे काय झालं... काल एका पुस्तकात मी वाचलं की, सुख मिळवण्याच्या आपल्या सगळ्या कल्पना खोट्या ठरतात. म्हणजे एकच वस्तू एकाला  सुखस्वरूप तर,     दुस-याला दुःखस्वरूप वाटते. हे वाचून मी एकदम विचार करायला लागले. म्हणजे, सगळा गोंधऴच आहे म्हणायचा.पण नीट विचार केल्यावर जाणवलं,  हे सगळ अगदी खरं आहे. कारण असे अनुभव आपण सगळे सुध्दा घेतोच की. पण हे सगळ मान्य करणं थोड जड जातं. कारण आपल्याला आपलं दुःख मोठ वाटत. पण आपल्याला दुःख मिळाल्याने कोणाला तरी आनंद झालाय, किंवा सुख मिळालय अशी कल्पना आपण कधी करतो का ?
 अगदी साधी गोष्ट .... बसमध्ये बसायला जागा मिळाली नाही तर आपली किती चिडचिड होते. पण जेव्हा आपण निवांत हेडफोन कानात घालून , गाणी ऐकत बसलेले असतो, तेव्हा उभ्या असणा-या माणसांकडे आपण बघून न बघितल्यासारख करतोच ना. हे सगळं खूप नॅचरल आहे. कारण प्रत्येक वेळी उठून जागा देणं शक्य नसत. दर वेळी मीच का ?  असे प्रश्न पडू शकतात. पण हाच प्रश्न जेव्हा आपण उभे असतो, तेव्हा बसलेल्याला पडत असेल ना ? आपल्याला मिळणा-या सुख दुःखाला एका वेगळ्या पातळीवर जाऊन बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण सामान्य माणसं आहोत. त्यामुळे सुख मिळाल्यावर आनंद होणं आणि दुःख  झाल्यावर वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण फक्त त्या सगळ्याचा किती त्रास करून घ्यायचा हे ठरवायला हवं. नाहीतर एखाद्याने ठरवल्याप्रमाणे फोन न केल्यानी किंवा भेटायला न आल्यानी प्रचंड डिप्रेशन यायचं कारण नाही. थोडसं लेट गो करायला शिकलं पाहिजे. कल्पना करून त्याचं सुख, दुःख बाळगणं चूक आहे. कारण कल्पनेचं खरे खोटेपण अनुभवांती कळतं. एखादी आनंद देणारी वस्तू, व्यक्ति कायम तशीच रहाते का ? तर नाही. कारण अमुक एक वस्तू किंवा व्यक्ति आपल्याजवळ आहे , म्हणून आपण सुखी आहोत. ही संकल्पना बदलायला हवी. शाश्वत आणि स्थिर असं काहीच नसलं तरी जीवनातला आनंद शोधला पाहिजे. कारण आपण इथे आनंदी रहायलाच आलोत. हो ना ? 

Wednesday 19 November 2014

आवडते मज माझी शाळा...........



काल एक खूप धमाल अनुभव घेतला. मी काल माझ्या शाळेत गेले होते. माझी शाळा भोरला आहे. '' राजा रघुनाथराव विद्यालय '' खरं सांगू, माझा वीकपॉईंट आहे ही शाळा. या शाळेनी जे भरभरून दिलं आहे, तेच आत्ता उपयोगी पडतय. 
भोरमध्ये जातानाच विलक्षण आनंद होत होता. नदीवरचा तो पूल. तिथे घडलेल्या गमती जमती सगळं आठवत होतं. शाळेत गेले तेव्हा तर मला कसं रिअॅक्ट व्हावं तेच कळत नव्हतं. तो नोटीस बोर्ड, ती बाकं, ते ग्राऊंड. सगळे बोलत होते माझ्याशी. मी माझ्या शाळेशी खूप गप्पा मारल्या. तिथल्या बेंचवरून हात फिरवला. माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. तिथे मी म्हणलेली गाणी, नाट्यवाचनातला भाग, महाराष्ट्राची लोकधारा, वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा सगळ आठवलं. माझ्या वर्गातल्या मित्र मैत्रिणींना, त्या वेळच्या शिक्षकांना, शिपाई काकांना खूप मिस केलं. पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटलं.
आमच्या आत्ताच्या मुख्याध्यापकांनी बावीकर सरांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं. शाळेसाठी एक चांगलं काम करण्याची संधी मला मिळतीय. ती मी कशी सोडेन? सर म्हणाले, '' ये विनया.....''  धडधडायलाच लागलं मला. खरं तर मी घाबरायचं काही कारण नव्हतं. पण मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये काहीतरी उद्योग केल्याशिवाय जायला मिळायचं नाही. आज तर मी सो कॉल्ड मार्गदर्शन करायला जाणार होते. सरांसमोर काहीच बोलता येईना मला. शेवटी तेच म्हणाले, ''अगं, तू काही विद्यार्थिनी नाहीयेस आता. आज तू आमची पाहुणी आहेस.'' पोटात गोळाच आला. मी कसली पाहुणी ? तुम्ही सगळ्यांनी भरभरून दिलय आम्हाला. तेच पेरतोय आता. त्यानंतर आमच्या ढवळे सरांनी, ' ए विने' अशी हाक मारली. एक नंबर वाटलं मला. तिथले शिपाई काका मला मॅडम म्हणत होते. हसूच आलं मला. 
त्यानंतर माझ्या सगळ्या शिक्षकांना नाट्य अभिवाचनाविषयी काही सांगायला मला बोलवलं होतं. ही एक मोठी गंमत होती. मला ज्या शिक्षकांनी शिकवलं त्यांना मी काय सांगणार ? पण तरीही मनाचा निर्धार करून उठले. बोलायला सुरूवात केली. नॉन स्टॉप एक तास बोलत होते मी. तेही माझ्या शिक्षकांसमोर. नंतर एक वर्कशॉप घेण्याचं ठरवलं आम्ही. मुलांना हे सगळ सांगायला मिळणार, या कल्पनेनी मी खुष झाले होते. तेव्हा तर पूर्ण दिवसभर मी शाळेत थांबणारे........... यस्स........ त्यानंतर आमच्या एका सरांनी माझं कौतुक केलं. सगळ्याच शिक्षकांनी माझ्या शाळेत असताना केलेल्या गमती जमतींचा उल्लेख केला.  छान वाटलं. कोणी कितीही कौतुक केलं तरी शाळेत कौतुक होण्यासारखं भाग्य नाही. खरचं मी खूप भाग्यवान आहे. हा अनुभव मला मिळावा यासाठी मला शाळेत बोलवण्याची कल्पना ज्यांच्या मनात आली, त्या विनोद वाघ सरांना मनापासून धन्यवाद..........

Thursday 13 November 2014


नातं........



नातं म्हणजे काय हो ? दोन माणसांचे , दोन मनांचे  संबंध . नातं निर्माण करायचं , ते टिकवायचं हे कोण ठरवतं ? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न ? अर्थात ती दोन माणसं. पण कित्येकदा असं होतं की कोणतही नातं डेव्हलप होण्याआधी समोरची व्यक्तिच ठरवून टाकते की हे शक्य नाही बाबा. इतकं सोप कसं वाटतं लोकांना... 
अहो अगदी रोज संपर्कात येणा-या निर्जीव वस्तूंवर सुध्दा आपला जीव जडतो. आपलं पेन, आपलं घर, घराच्या भिंती, आपली गाडी. आम्हा बायकांचा जीव तर चमचा , वाटीवर सुध्दा जडतो. अशा  स्वभावाच्या लोकांचा ख-या खु-या जिवंत माणसांवर किती जीव जडत असेल ? नाही सांगता येणार शब्दांत. मला मान्य आहे प्रॅक्टिकली वागणा-या लोकांना हे सगळ फार बालिश वाटेल. 
प्रत्येक जण आपल्याला हवं असलेलं काहीतरी  मिळवण्यासाठी आयुष्यात येतो. तो भाग मिळाला की आपसुक निघून जातो. हे कितीही खरं असलं तरी, एक वेगळा विचार मला मिळाला , तो तुमच्याशी शेअर करते. कदाचित या  शेअरिंगमुळे आपलं नात घट्ट होईल. आपल्या आयुष्याला प्रवासाची उपमा दिली तर आपल्याला भेटणारे सगळे सहप्रवासी. प्रत्येक सहप्रवासी किती काळ आपल्या सोबत असेल सांगता येत नाही. फक्त इच्छित स्थळ एक असणारे सहप्रवासीच शेवटपर्यंत आपल्याबरोबर रहातात. मग इच्छित स्थळ एक नसणा-यांनी प्रवास करायचा नाही का ? हो करायचा ना.  एक तर आपलं इच्छित स्थळ बदलायचं. किंवा त्या इच्छित स्थळानंतरचा प्रवास पुन्हा नव्याने सुरू करायचा. फक्त अट एकच,  त्या काळापुरते आपले रस्ते बदलत आहेत हे त्या दोघांनाही माहिती हवं. ते कुणा एकानीच ठरवून प्रवास अर्धवट सोडणं योग्य नाही. 
यापुढे जाऊन अजून एक गोष्ट जी अगदी अध्यात्मिक पातळीवर सुध्दा सांगितली जाते. शांत राहून या प्रवासाची मजा लुटता यायला हवी. जे आपलं असतं ते आपल्यापासून कधीच दूर जात नाही. जे आपलं नाही ते आपल्याजवळ रहात नाही. हा नियम अगदी वस्तूंपासून व्यक्तिंपर्यंत सगळ्यांना लागू होतो.  आपल्या मनाला हे सांगणं थोड कठीण जातं. कारण मनाची कृती आपल्या कृतीच्या शंभर पट पुढची असावी. फार वेगानी धावत ते. प्रवीण दवणे या माझ्या आवडत्या लेखकाचे हे विचार  यावेळी पटकन आठवले. अनेकदा व्यक्तिंची सोबत अधूरी वाटते. मन मोकळ करण्यासाठी मनाचीच सोबत होते. उत्कट सुखाचा एखादा वेडा क्षण असो की हुरहुरत्या सांजवेळेची सल. मनच जिवलग होतं. मनाचे सूर मनाच्या मैफुलीत दरवळू लागतात आणि इथेच कुठेतरी जगण्याचं कारण सापडत. 

Wednesday 5 November 2014


अपेक्षा......


आज ना मी ठरवून  टाकलय बरं का.... कोणाकडूनही कसलीही अपेक्षा नाही ठेवायची. अगदी खरं सांगु.... असं मी रोज ठरवते. पण या बाबतीत मला कधीच यश मिळत नाही. कारण आपल्या सहवासात येणा-या प्रत्येक माणसाकडून आपण काही ना काही अपेक्षा ठेवतोच. निदान मी तरी ठेवते. चुकत असेलही कदाचित. पण उगाच खोटं कशाला बोलू ? फार मोठ्या नसतात हो माझ्या अपेक्षा. पण काय करणार ?  कळतच नाहीत समोरच्याला.... काय सांगणार हो...
म्हणजे अगदी साधी अपेक्षा. आपल्या मैत्रिणींनी आपल्याला समजून घ्यावं. अगदी जरी आपलं चुकलं तरी. पण छे हो. इथे सगळे तलवारी घेऊन तयारच. व्हॉटस अॅप वर एखाद्या दिवशी, एखाद्या मुद्यावरून जरा जास्त बोललं गेलं , लगेच ग्रुपमधल्या इतरांना म्हणे डिस्टर्ब होतं. एरवी तुम्ही कितीतरी वेळा उगाच गप्पा मारत असता , तेव्हा आम्हाला पण होतं डिस्टर्ब. पण ग्रुप म्हणलं की असं होणारच ना.... बरं सगळ्या माझ्याच आहेत. हा उगाच माझा गैरसमज.. त्यामुळे नंतर कोणीतरी थोडा मस्का मारावा.....  हीच ती साधी अपेक्षा

एखाद्या वेळी एखादी सिरिअल अगदी मनापासून पहावीशी वाटते. पण नेमकं तेव्हाच कोणीतरी येत तरी. मला तरी कुठेतरी इच्छा नसताना जावं लागत. भरीत भर म्हणजे टाटा स्कायचे पैसे भरायची लास्ट डेट उलटून गेलेली असते. म्हणजे काय ? झालं........ गेलीच की हो सिरियल.... सिरियल शांतपणे बघायला मिळावी .....  हीच ती साधी अपेक्षा.

दुकानात साडी घ्यायला गेलं की तर असा अपेक्षा भंग होतो म्हणून सांगु.... नेमका जो रंग आवडतो, त्यात पॅटर्न पटत नाही. पॅटर्न पटला तर रंग आवडत नाही. दोन्ही जमलं तर बजेटमध्ये बसत नाही. अरे काय चाललय ? मला जेव्हा साडी घ्यायची तीव्र इच्छा आहे,  तेव्हाच नेमक्या इतक्या अडचणी ? 

आपल्या जवळच्या माणसांनी आपल्याला हवं तेव्हा फोन न करणं. हा तर खूप मोठा अपेक्षाभंग. एरवी अगदी प्रेम उतू जात असत. पण जेव्हा मला गरज आहे, तेव्हा... इस लाईन की सभी लाईने व्यस्त है.... एखादा दिवसच असा उजाडतो ना की काही विचारू नका....

आश्चर्य म्हणजे मी बिझी आहे. म्हणून माझ्यावर चिडलेले असंख्य लोक. मला वाटलं तुला वेळ नसेल म्हणून नाही निरोप दिला. असं म्हणणारे. पण मला कोणी विचारलच नाही.... मला वेळ नाहीये ना. ठीक आहे. मग तुम्ही करा ना फोन... काय हरकत आहे... हा काय गोंधळ आहे ? दया,  कुछ तो गडबड है...
निरपेक्ष का काय ते कठीण आहे बाबा.... आता तुमचच बघा ना... तुम्हाला मी नेहमी सांगते की, कमेंटस टाका , पण तुम्ही नुसतं लाईक करता... किती हो माझी साधी अपेक्षा....अपेक्षा ठेवणं म्हणजे दुःखाला आमंत्रण... हे कळतं हो पण वळत नाही ना... आज मी माझ्याकडूनच ही अपेक्षा ठेवते की, मी यापुढे कमी अपेक्षा ठेवीन.... 

Saturday 1 November 2014


संस्कार.........


आपल्यापैकी सगळ्यांनाच असं नेहमी वाटतं  की काय हे .... आता जगात फार काही अर्थ राहीला नाहीये. सगळीकडे निराशा आहे.... कोणाला कोणाच्या सुख- दुःखाशी काहीही देणं - घेणं नाहीये...... संस्कारांचा अभाव आहे....... असं बरच काही. सगळ्यांबद्दल प्रेम , करूणा मनात असावी हे शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे. पण या परिस्थितीतदेखील आशेचे बरेच किरण आहेत. आजच एका कार्यक्रमाला गेले होते. स्वरूपवर्धिनीचं शिबीर होतं. तिथे आनंद सराफ सरांच व्याख्यान होतं. 
समोर बसलेली मुलं पाचवी ते दहावी वयोगटातली होती. सर जे काही सांगत होते ते समजण्याची त्यांची मानसिकता होती असं नाही. पण मुलं शांतपणे ऐकत होती. सरांनी आपल्या आजुबाजुला रहाणा-या संवेदना टिपायला शिकवलं. आपल्या भोवताली अशी कितीतरी माणसं असतात जी समाजासाठी खूप काही तरी करत असतात. विदाऊट जाहिरातबाजी... यामध्ये पुण्यातल्या आणि पुण्याबाहेरच्या अनेकांची उदाहरणं त्यांनी सांगितली. विलक्षण आहेत ही माणसं. आपलं सुख  - सुविधा सोडून समाजासाठी काहीतरी करणारे देवदूतच आहेत हे सगळे. आपण उगाच फार रडतो याची जाणीवदेखील झाली. 
 ठराविक काळानंतर चुळबुळ सुरू झाली.  सहाजिकच होतं म्हणा. त्यांची जेवायची वेळ झाली होती. अशा वेळी कोणी कितीही चांगल बोलत असलं तरी ते चुळबुळ न करता ऐकणं जरा कठीणच.  त्या मुलांपैकी एक दोघांनी नंतर येऊन  शंका विचारल्या. मला खूप बरं वाटलं. हाच तो आशेचा किरण..... रेणू गावस्कर कोण आहेत ? रिमांड होम म्हणजे काय ? त्या मुलांचे आई बाबा कुठे रहातात मग ? असे प्रश्न त्या वयात पडले हेच खूप. त्या मुलाने आणखी एक चांगला प्रश्न विचारला . आम्हाला पण असंच काम करायच आहे. तर आम्ही काय करू ? त्यावर सरांनी सांगितलेलं उत्तर फार छान आहे. ते म्हणाले, ''शाऴेमध्ये जर एखाद्या मुलाने डबा आणला नसेल आणि तुझ्या आईनी गोडाचा शिरा डब्यात दिला असेल तर काय करशील ?''  तो मुलगा पटकन म्हणाला, ''मी शेअर करीन.''     वा वा मिळाला आशेचा किरण. ५० मुलांपैकी एकाला हा विचार पटला... त्याच्या मनात रूजला.... मस्त वाटलं मला. 
यावरून एक जाणवलं . आपणच आपल्या मुलांच्या मनात संवेदना जागृत ठेवायला कमी पडतोय. रस्त्यावर, ट्रेनमध्ये फिरणारी अनाथ मुलं पाहून आपल्या डोळ्यातली करूणा संपल्यासारखी झालीय. मला मान्य आहे की काळ बदलला आहे. काही वेळा अशा लोकांकडून धोका हेईल की काय असे दिवस आलेत. पण तरीही मला वाटतं आपण संवेदवा जागृत ठेवायला हव्यात. फार मोठं समाजकार्य शक्य नसेल तर निदान आपल्या मुलांमध्ये तरी करूणेचा, मायेचा झरा जिवंत ठेवूयात. कारण हीच मुलं पुढची पिढी घडवणार आहेत. 
समाजात प्रचंड विषमता आहे. अति गरीबी आणि अति श्रीमंती अशी टोकं आहेत. तरीही आपल्या परीने समाजाचं देणं देण्याचा प्रयत्न करूयात. मुलांवर वेगळे संस्कार करण्याची गरज नसते. आपलं पाहूनच मुलं शिकत असतात. त्यामुळे संस्कार करायचे असतील तर ते स्वतःच्या मनावर करायला हवेत. 

Thursday 30 October 2014

मन का बुध्दि.......



आत्ता खरं तर अजिबात वेळ घालवू नये इतकं काम आहे. पण काय करणार .... काही गोष्टी तुमच्याशी शेअर केल्याशिवाय बर वाटत नाही. गेले दोन दिवस एक विचार डोक्यात घोळतो आहे. तुम्ही पण विचार कराल असाच विषय आहे तो. ''मनाला बुध्दिचा लगाम घालायला हवा'' हाच तो विचार. कारण मनात येईल तसं वागल्यानी ब-याचदा वाट चुकण्याची भीती असते. पण मनातल्या विचारांना बुध्दिच्या तराजूत तोलल्याने बरेच प्रॉब्लेम टळू शकतात. 
आपल्या आयुष्यात कधीही न घडणा-या गोष्टींचं हवेपण आपल्याला असतच. मनही याच गोष्टींकडे धाव घेतं. पण प्रॅक्टिकली , सद्य परिस्थितीमध्ये हे हवेपण आपण कसं मिळवू शकू हे आपल्याला बुध्दिच सांगु शकते. कारण मनाचं तंतर लईच न्यार असतय हो. त्याला काय काहीही हवं असतं. पण आपल्या बुध्दिला विचारायला हवं एकदा तरी, की काय गं बाई , हे सगळ शक्य आहे का ? कदाचित बुध्दि जे उत्तर देईल ते आपल्या मनाविरूध्द असेलही. पण भावना, विचार, संवेदना ताडून बघायला हवं. कारण एखादी गोष्ट केल्यानंतर त्याचा कितीही विचार केला तरी उपयोग होत नाही. त्यापेक्षा निदान आयुष्यातले अति महत्त्वाचे निर्णय घेताना तरी मन आणि बुध्दि दोन्हीचा विचार करायला हवा. काही जण म्हणतील, आपलं मन आपल्याला कधीच फसवू शकत नाही. पण मित्र मेत्रिणींनो या मनाचं काही सांगता येत नाही बर का ..... त्याला हवी असणारी गोष्ट मिळवण्यासाठी ते आपल्याला बिनधास्त सांगत, अरे जा पुढे .... काही नाही होत... जास्तीत जास्त काय होईल? मग काय आपल्याला तेच हवं असत. काही वेळा भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता असते. मन आपल्याला चुकीचा निर्णय देतं असं नाही. पण मनाला जरा दोन मिनीट होल्ड करून बुध्दिशी कॉन्टॅक्ट करून  निर्णय घ्यावा. तिनी हिरवा कंदिल दाखवला ना की मग गाडी सोडायला हरकत नाही. त्यानी होणा-या दुर्घटना टळतातच असं नाही . पण निदान आपण नीट विचार करून निर्णय घेतला आहे याचं समाधान तरी मिळत. संत तुकाराम या प्रॅक्टिकली अध्यात्म सांगणा-या संतानी आपल्या अभंगातून हाच विचार मस्त मांडला आहे... 
शुध्‍द करा मन देहातित व्‍हावे । वस्‍तु ती ओळखावें तुका म्‍हणे ॥

Tuesday 28 October 2014

आधार......




कित्येक वेळा आपल्याला आधाराची गरज वाटते. म्हणजे कोणी कितीही स्ट्रॉंग , सक्षम असलं तरीही. म्हणजे भावनिक आधार ही महत्त्वाची गोष्ट आहे. पण कित्येक वेळा नेमक्या अशा वेळीच कोणी नसतं. असं का होतं ? या प्रश्नाचं उत्तरदेखील मिळत नाही. एरवी बोलायला , भेटायला अगदी व्याकूळ असणारी माणसं अचानक गायबच होतात. त्यांच्या जागी त्यांच्या अडचणी कितीही बरोबर असल्या तरी...... वरातीमागून घोडं काय कामाचं ? ......असंच होत खूपदा.
मन मनास उमगत नाही.... आधार कसा शोधावा ...... हे गाणं ... हो....... हीच ती भावना....... स्वप्नातील पदर धुक्याचा..... हातात कसा हो यावा....... आधार कसा शोधावा ...... पण काय करणार ? मनातल्या अनेक भावनांची, प्रश्नांची उत्तरं आपली आपल्यालाच शोधायला लागतात. 
मला ना खूपदा असं वाटतं. जेव्हा जे हवं तेव्हा ते न  मिळणं यालाच जीवन म्हणतात. कारण हवं तेव्हाहवं ते  मिळालं तर कदाचित त्याची मजा निधून जाईल. पण प्रत्येक वेळी नाही बॉस. कधी तरी,  दे साद दे हृदया...... असं होऊ दे की राव. 
आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं असतं , अरे आमच्या बाबतीत सुध्दा असच होतं. हवं तेव्हा हवं ते मिळतच नाही. हे ऐकून फार बरं वाटलं . म्हणलं चला आपल्याच घरात लाईट नाहीत असं नाहीये. सगळ्या गावाचीच वीज बंद आहे. मग हरकत नाही. कारण माणसाची ही सहज प्रवृत्ती आहे. नगरपालिकेचं पाणी फक्त आपल्याच घरात नसेल तर त्रास होतो. पण आख्ख्या बिल्डींगला पाणी नाही म्हणलं की मग बरं वाटतं.... म्हणजे अहो, टॅंकर वगैरे आणता येतो. तुम्हाला काय वाटतं , 
दुस-याचं दुःख पाहून मला आनंद होतो. नाही हो....तसं नाही. पण निदान काही दुःख तरी कॉमन असावीत म्हणून बोलले. 
आत्ता हे सगळ लिहितानाच एका मैत्रिणीचा अनपेक्षित फोन आला. चक्क आधार वाटला. ती मला खूप मिस करतीय असं ती म्हणाली. अगं काय हे कुठे आहेस तू ? असं म्हणाली. तुझा आवाज ऐकावासा वाटतोय गं... असं म्हणाली. कंटाळा आला असेल तर माझ्याकडे ये गं, असं सुध्दा म्हणाली. 
म्हणजे हे सुध्दा खरं आहे की आधार असतो. फक्त आपल्याला हव्या त्या व्यक्तिने दिला नाही म्हणून आपण उगाच रडतो.  असं वाटत असत की , समोरच्या माणसाला आपली किंमत नाहीये. या विचारानी मन  अस्वस्थ  असतं. पण त्याच वेळी दुसरं कोणीतरी स्ट्रॉंगली आपली आठवण काढत असतं. किंबहुना आपल्याशी बोलायला आतुर असतं. वा ..... हे छान आहे. मग मी मनाला समजावलं.......जो है वो पल जी ले..... 

Wednesday 22 October 2014

मनाचिये गुंती..........



मला माहिती आहे आज दिवाळी आहे. आज वेगळं, फ्रेश काहीतरी लिहावं असं मलासुध्दा वाटत होतं. पण आज पुन्हा एकदा मनातल्या भावनांमध्येच गुरफटून होते दिवसभर. माणसाचं मन अनाकलनीय आहे. एकाच वेळी हजारो विचार करणारं हे मन मला भेटलं पाहिजे. खरं तर मानवी मनाचा अभ्यास करावासा वाटू लागला आहे मला.
एखादा दिवस असा असावा असं मनात आपण डिझाईन आखतो. मात्र फारच वेगळं काहीतरी घडतं. तुम्ही म्हणाल , त्यात काय? आपल्या मनासारखं सगळच कधीच घडत नाही. यस्स ..... अगदी बरोबर. उलट कधी कधी मनात ठरवलेलं असतं त्याच्यापेक्षा खूप सुंदर काहीतरी आयुष्यात घडतं. 
पण एक प्रश्न कायम रहातो. आपलं काहीही चुकत नसताना लोक असे विचित्र का वागतात ? असं सांगतात की जी गोष्ट या निसर्गात फिट बसत नाही ती आपोआप नष्ट होते. ज्याअर्थी हा देह या पृथ्वीतलावर आहे, त्याअर्थी यस बॉस आपण फिट बसतो निसर्गात. मी पुन्हा एकदा मानवी स्वभावाकडेच येते. आपण जे बोलतो तसच वागण्याची क्षमता फार कमी लोकांच्यामध्ये आहे. पण हे मान्य करा ना राव. काय प्रॉब्लेम आहे ? उगाच मीच कसा शहाणा..... मीच किती भारी..... माझं मन कसं मोठं. कशाला उगाच ? माझं एक म्हणणं असत नेहमी. आहात तसेच प्रेझेंट व्हा ना. आपण जसे आहोत तसे आवडू शकतो काहींना.  या जगात परिपूर्ण असं काहीच नाहीये तर मग असं वाटण्याची गरज काय ? 
ठराविक वेळी समोरच्या माणसाला एकदम छान म्हणायचं, दुस-या वेळी तो माणूस एकदम निरूपयोगी होतो. बाय बाय म्हणण्याइतका ? असं नसत ना... बर परत लगेच काही दिवसांनी पुन्हा तोच माणूस लई भारी असतो. एकदा काय ते ठरवा यार.
अगदी घरातल्या लोकांचे सुध्दा असे गमतीदार अनुभव येतात. उगाच त्रागा, चिडचिड. त्यापेक्षा स्पष्टपणे सांगून का टाकत नाहीत लोक ? आपण एकदा आपलं मानलं की संपल. जे आहे ते बोलून प्रश्न मिटवता येतात ना. बरं समोरचा माणूसच आहे. परग्रहावरचा कोणी नाही. 
या सगळ्याचं उत्तर गोंदवलेकर महाराज फार छान देतात. ते म्हणतात, प्रारब्ध म्हणजे न समजणा-या गोष्टींचे कारण. आपलं ध्येय ठरवण्याची बुध्दि माणसाला आहे. पण आपण जे मिळवले आहे ते आपल्या प्रयत्नानी मिळवले नसून प्रारब्धानीच मिळाले आहे. असं मानण्याची क्षमता निर्माण करणं हाच मुद्दा आपल्याला आनंदी  ठेवू शकतो. रस्त्यावर शंभराची नोट पडली आहे. अशा परिस्थितीत ती उचलून घ्यावी असा मोह होणं स्वाभाविक आहे. पण ती उचलून घ्यावी का नाही हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे. ते प्रारब्धावर अवलंबून नाही. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचं ध्येय आनंदी रहाणं हे आहे. मिळणं आणि जाणं या दोन्ही गोष्टी जर आपल्या हातात नाहीत तर नाही त्याचा शोक का करायचा ? 
यस्स...... मिळालं आनंदी रहाण्याचं उत्तर........ सुटला गुंता..........

Wednesday 15 October 2014

मतदार राणी........


आज सगळीकडे लोकशाहीचा उत्सव साजरा होतोय. छान वातावरण आहे सगळीकडे. टी. व्हि चॅनेल्सवर बातम्यांचा भडिमार चालू आहे. सकाळी सकाळी पहिल्यांदा वोटिंग कोणी केलं हे सांगणारे फोटो व्हॉटस अॅपवर पडतायत. एकदंरच सोशल मिडियामुळे निवडणूकसुध्दा इव्हेंट झालीय. 
कोण निवडून येईल, कोणाची सत्ता येईल हे लवकरच कळेल. पण मला आज खूप वेगळा अनुभव आला. आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच घडणा-या कोणत्याही वेळी जी भावना मनात असते ना तीच आज होती. म्हणजे हे माझं पहिलं मतदान नव्हतं , तरीही..........
म्हणजे कॉलेजमधला पहिला दिवस, जत्रेतल्या चक्रात बसतानाचा क्षण, गाडी शिकल्यानंतर पहिल्यांदा घेतलेली राईड, दाखवण्याचे म्हणजे चहा पोह्याचे कार्यक्रम, माझ्या पिल्लाचा जन्म, आकाशवाणीमध्ये पहिल्यांदा केलेली उद्घोषणा, कलापिनीच्या स्टेजवर केलेलं पहिलं निवेदन , अनुपम खेर यांच्यासारख्या दिग्गजानी केलेलं कौतुक ...... या आणि अशा ब-याच प्रसंगी पोटात येणारा गोळा आज सुध्दा आला. हे सगळे प्रसंग चांगलेच होते. त्यामुळे आज पोटात आलेला गोळा भीतीचा नाही तर उत्सुकतेचा होता. 
आज मतदान करायला गेल्यावर मी आजच्या सिनेमाची म्हणजे १५ ऑक्टोबर या दिवसाच्या सिनेमाची हिरॉईन आहे की काय असं फिलींग येत होतं. खरं म्हणजे आपल्याकडे कोणी बघत नसत. पण उगाच असं वाटत होतं की यस्स... सगळे आपल्याकडेच बघतायत. म्हणजे मतदाराला मतदार राजा म्हणतात ना, तशी मी आज मतदार राणी झाले होते. एखादा सिनेमा पाहून बाहेर पडलं की त्या सिनेमाची हिरॉईन मीच आहे की काय असं उगाच वाटत. तुम्हाला वाटत का नाही मला माहिती नाही. किंवा मुलांना मीच हिरो आहे असं वाटतं. तस आज वाटत होतं. मतदान केंद्रात जाताना अगदी गर्वानी मान ताठ झाली होती. बोटावर असलेली शाई पुसली जाऊ नये म्हणून नंतर कितीतरी वेळ बोट अगाच उभं राहिलं होतं. मी तर अगदी फुंकर मारून मारून शाई सुकवली.
निवडणूक आणि मतदान हे काही नवीन नाहीये खरं तर. पण का कोणास ठाऊक गेल्या काही महिन्यांमध्ये मतदान करण्याचा खरा उद्देश समजलाय असं वाटतं. आपल्या मताला किती किंमत आहे हे समजल्यासारखं वाटतयं. मतदान केंद्रावर लागलेल्या रांगा हेच तर सांगतात. सत्ता कोणाची येईल माहिती नाही. पण एक जागरूक नागरिक म्हणून आपण आपलं कर्तव्य करण्याचा प्रयत्न करूया. जर ही लोकांनी, लोकांसाठी, आणि लोकांकरवी निवडलेली कार्यपध्दती आहे तर ती तशी जाणवूदे. सरकार करेल काय ते, आपल्याला काय करायचय ? अशी बघ्याची भूमिका सोडायला हवी. सक्रियपणे आपापल्या परीने काय करता येईल ते केलं पाहिजे. कोणताही एक माणूस चमत्कार घडवून सगळ बदलू शकणार नाही. आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं तर उन्नतीकडे वाटचाल अशक्य नाही. 
मतदार राजा किंवा राणी म्हणून आलेला हा फील कायम टिकवूया.... आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी एक आदर्श लोकशाही प्रणाली जिवंत ठेवण्याची जबाबदारी घेऊया.... 

Monday 13 October 2014

प्रकाशवाट.........




गेल्या काही दिवसात मनी मानसी काही आलच नाही. म्हणजे बरच काही घडतय आजुबाजुला. पण त्याबद्दल काही लिहावं, काही बोलावं असं नाही वाटलं. अगदी मनाला आनंद देणा-या , त्रास देणा-या अनेक घटना घडल्या. निवडणूका, प्रचार याबद्दल तर काहीच नको बोलायला. निदान आत्ता तरी. या सगळ्याबददल खूप लिहिता येईल.... पण तरीही........... नाही वाटलं लिहावं. 
पण आज नाही थांबवू शकले स्वतःला. खरं तर काल रात्री १२ वाजताच लिहिणार होते. पण नेमका नेट प्रॉब्लेम आला. असो.... माझ्या मनावर प्रचंड कोरला गेलेला एक सिनेमा काल पाहिला. डॉ. प्रकाश बाबा आमटे.... द रियल हिरो. खरच, He is real hero. सिनेमा पाहिल्यापासून आत्तापर्यंत डोकं बधिर झालयं. मला माहिती नाही ही अवस्था अजून किती काळ राहील. काळाच्या ओघात ब-याच गोष्टी casually घेतो आपण. पण हा सिनेमा , म्हणजे डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा यांचं काम डोक्यातून जाईल असं वाटत नाही. या सिनेमातल्या कलाकारांविषयी आणि तंत्राविषयी मी काहीच बोलू इच्छित नाही. कारण हे काही सिनेमाचं परीक्षण नाहीये. कलाकृती छान आहेच. प्रश्नच नाही. पण आमटे दांपंत्याचं काम मनात तळ ठोकून राहिलय. 
उच्चशिक्षित अशा या जोडप्यानी हेमलकसाला केलेलं काम प्रेरणादायी आहेच. पण अंगावर काटा आणणारं आहे. दोन वर्ष हेमलकसाला ते नुसते राहिले. एकही पेशंट नाही, लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही. अशा अवस्थेत चिकाटीनं त्यांनी काम केलं. लोकांचा राग झेलून त्यांच्यासाठी सेवेचं व्रत घेतलं. किती पेशन्स ठेवले असतील या दोघांनी. कोणत्याही चांगल्या कामात अडचणी येतातच. हे काम तर अशक्य होतं. पिढ्यानपिढ्या आदिवासींच्या मनावर बिंबलेले विचार पुसून, त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवणं काही सोप्प आहे ? बरं हा सगळा थॅंकलेस जॉब. यातून काही मिळवायचं आहे ही भावनाच नाही. पेशंटसना बरं वाटतय हेच समाधान. गरजा इतक्या कमी की फक्त दीड हजार रुपये मासिक उत्पन्नात कुटुंबाचा खर्च भागत होता. 
सिनेमातले सगळे प्रसंग जसेच्या तसे अजून डोळ्यासमोर आहेत. गरीबी, दारिदद्य्र, अज्ञान यांचं साम्राज्य असलेल्या हेमलकसाला या उभयतांनी दुसरं आनंदवन उभं केलं. मला या सिनेमातली सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे, मंदाताई आणि डॉ. प्रकाश यांचं सहजीवन. संसार म्हणजे काय ? हे अगदी परफेक्ट कळलेलं हे जोडपं आहे. एकमेकांवर प्रेम करणं म्हणजे काय ? हे यांच्याकडे पाहिल्यावर कळतं. अग्निसमक्ष फेरे घेताना दिलेलं वचन पाळणं म्हणजे काय ? तर ही जोडी. नाहीतर मनाविरूध्द समाजासाठी आपल्या संसाराचं गाडं खेचणारी बरीचशी जोडपी आपण बघतोच की. आपल्या नव-याच्या स्वप्नासाठी त्याच्या मागे सावलीसारखी उभी रहाणारी मंदा मन हेलावून टाकते. अर्थात तिच्या त्यागाची किंमत असणारा आणि तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा प्रकाश मनाला भावतोच. 
हा सिनेमा पाहून अनेक जण भारावले जाणार आहेत. माझं इतकच म्हणणं आहे की, नुसते भारावून जाऊ नका. आपण डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा होऊ शकणार नाही. पण आपल्या परीनी काय करू शकू याचा शोध घेऊया. नाहीतर नुसतं भारावून जाऊन काय उपयोग ? सिनेमा पाहिल्यावर हेमलकसा आणि आनंदनवला जाणा-यांची संख्या सुध्दा वाढेल. पण ते काही पर्यटन स्थळ नाही. तिथे त्यांच काम छान चालू आहेच. उगाच त्यांचं कौतुक करायला आणि काम बघायला जाण्याची गरज नाही. तिथे जाऊन गर्दी वाढवण्यापेक्षा , आपण काय करू शकतो हे बघुया. तिथे जायला हरकत नाही. पण एकदा जाऊन आलो, मुलांना सगळं दाखवलं, चला आता आपण मोकळे .... असं नको व्हायला. प्रत्येकाची प्रकाश वाट असतेच. रोजच्या जगण्यापलिकडची.... चला ती शोधूया........ 

Wednesday 1 October 2014



मन मनास उमगत नाही...........



माणसाच्या मनाचा थांग लागणं फार अवघड असतं नाही का ? मन, प्रेम, पाऊस हे माझे आवडते विषय. कारण हे तीनही विषय आपल्या आतल्या भावनांना जागृत करतात. त्यातल्या त्यात 'मन' हा विषय खूप गुंतागुंतीचा. आपल्याच मनात चाललेल्या विचारांचा थांग लागत नाही. कित्येक वेळा आपण आनंदी असल्यासारख वाटतं पण तसं नसतच ते. मनातल्या या सगळ्या भावना क्षणभंगुर असतात. एखाद्याचा आपल्याला प्रचंड राग आला असेल तर तो तसाच टिकून रहात नाही. निदान माझ्या मनात तरी रहात नाही. तेवढ्यापुरता मात्र ज्वालामुखीच असतो तो. 
कित्येक वेळा आदल्या दिवशी झालेलं कडाक्याचं भांडण का झालं ? हेच आठवत नाही. देवाने ही चांगली सिस्टिम बनवली आहे. सगळच लक्षात राहिलं तर जगण अवघड होईल. वाईट आठवणींमध्ये सुध्दा चांगलं शोधण्याचा प्रयत्न केला तरच  जीवन सोप होईल. कारण ते वाईट आठवून मनस्तापाखेरीज काहीच मिळत नाही. आपल्यातली नकारात्मकता वाढते. बरं ज्या व्यक्तिशी हे सगळं जोडलेलं असतं, ती मजेत असते, सगळ्या चुकांचं खापर आपल्या माथी फोडून. ज्यानी त्यानी फक्त चूक कबुल केली तरी बरेच प्रश्न सुटतील. पण माझं काहीच चुकलं नाही . असा दावा करणा-यांबद्दल काय बोलणार ?
काहीही कारण नसताना मन उदास होतं. कित्येकदा हा अनुभव येतो. उगाच मन हळवं होतं. कातर होतं. आजुबाजुच्या सगळ्या गोष्टी भकास वाटू लागतात. काहीही केलं तरी मन रमत नाही. त्यातून जर अशा वेळी एकटेपणा वाट्याला आला तर काही खरं नाही. आपल्या आजुबाजुची लोकं तितकी सुज्ञ नसतात. त्यांना काहीच कळत नाही. अशा वेळी एरवी कधीही न चिडणारे आपण का चिडलो असू हेच त्यांना कळत नाही. अशा वेळी फार बडबड करणा-यांचाही त्रास होतो आणि गप्प रहाणा-यांचा तर खूप राग येतो. आपल्या मूडचा विचार कोणीतरी करावा असं वाटतं. पण माणसांवर असलेलं अवलंबन निराशा  देतं. 
काय बरं कराव? ध्येय ठरवावं . प्रत्येकाच्या आयुष्याला ते असतच. आपल्या मनाला पटेल तेच करावं. मायेचा ओलावा मिळाला तर मनापासून त्याचा आस्वाद घ्यावा. मनातली निराशा दूर करण्यासाठी बाहरेच्या कोणाचीही मदत घेण्यात अर्थ नाही. आपलं मनच आपल्याला आधार देतं. स्वच्छ , मोकळं जीवन जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यामुळे निराशेच्या क्षणी मनाचे फाजील लाड न करता, जीवनाच्या ध्येयाचा विचार करावा. कारण ते ध्येयच पुन्हा उभं रहाण्याची उमेद देतं. 

Saturday 20 September 2014


मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसाला.........




मला माणसाच्या मनाचं नेहमी कुतूहल वाटतं. एकाच वेळी असंख्य विचारांची गर्दी मनात असते. अगदी आत्ता सुध्दा मी हे लिहिताना आणि तुम्ही हे वाचताना आपल्या मनात कितीतरी विचार आहेत. आहेत ना ? त्यातल्या त्यात मनस्वी लोकांच्या बाबतीत हे आणखीन कठीण होऊन बसतं. कारण मनात आलय तसच वागणं शक्य नसतं. जगाच्या नियमावलीप्रमाणे वागायला गेलं तर घुसमट होते. अर्थात खरे मनस्वी लोक या घुसमटीचा विचार न करता मनाप्रमाणेच वागतात. पंचाईत होते ती माझ्यासारख्या लोकांची आणि मला वाटतं तुमच्यापैकी काही लोक पण यामध्ये असतील. आपलं काय होतं ... आपल्याला मनासारखं वागायचं असत पण आपण समाजाचा फार विचार करतो.
मला नाही आवडत असं कृत्रिम वागायला. पण अगदी खरं सांगु का ? खरं वागलेलं लोकांना चालत नाही. मग उगाच कृत्रिम वागायला लागतं. मॅनर्सचा भाग म्हणे. नुकतीच एका पुस्तकाच्या निमित्ताने डोंगरकपारीत वसलेल्या एका गावात जाण्याचा योग आला. आश्चर्य म्हणजे, तिथे सगऴी माणसं मनस्वी होती. कारण त्यांची मनं निर्मळ होती. एकदम स्वच्छ..... जे मनात आलं ते बोलून रिकामे. किती छान. जगण्याच्या गरजा थोड्या, त्यामुळे मनाचे चोचले नाहीतच. जे आहे त्यात आनंद मानून आयुष्य जगायची कला या लोकांमध्ये मी अनुभवली. खूप हेवा वाटला. आपण नाही असं जगू शकत. कारण आपणच आपल्या जगण्यातला नैसर्गिकपणा हरवलाय. त्या गावात 95 वर्षांच्या आजीला सुध्दा जगण्याची जिद्द होती. जीवावर बेतलेल्या दुखण्यातून ही आजी वाचली आहे. पण तिचा पाठीचा ताठ कणा पाहून मला लाज वाटली. त्या आजीची करडी तरीही प्रेमळ नजर खूप काही शिकवून गेली. तिच्या  घरातला दूध न घातलेला कोरा चहा पिऊन फ्रेश वाटलं. 
शहरात राहून आपण आपली मनं फार कमकुवत करून घेतोय असं प्रकर्षानी जाणवलं. रिफ्रेश होण्यासाठी हजारो, लाखो रूपये घालवून ट्रीप करण्यापेक्षा अशा खेड्यांमध्ये जाऊन राहिलं पाहिजे. क्षणार्धात जन्मोजन्मीची नाती जोडणारी आणि तरीही विलक्षण अलिप्तता जपणारी ही मंडळी मनाचे डॉक्टर आहेत. नुसत्या एका हाकेवर एकमेकांसाठी धावणारे हे लोक मला फार आवडले. कोणाच्या घरात काय चाललय? कोण गावाला गेलय ? इथपासून कोणाच्या घरात काय भाजी केलीय ? हे सगळ मोकळेपणानी शेअर करणारी ही माणसं मला खूप आवडली. हल्ली आपण सारखं म्हणतो, मनातले विचार शेअर करावेत, त्यानी दुःख हलकं होतं, सुख वाढतं. पण इथे शेअरिंग करा असं वेगळं सांगायची गरजच नाही. सगळ जीवन म्हणजे खुली किताब. किती छान ना ? मोकळा श्वास, मोकळं जगणं. नो लपवा छपवी. काहींना वाटेल की असं एकमेकांच प्रायव्हेट लाईफ कसं शेअर करतात हे लोक? पण त्यापेक्षाअसं म्हणूया की एखाद्याच्या आयुष्यात असं काही असलं आणि त्यानी मनस्वीपणे ते सांगितलं तरी त्याचा बाऊ करून घेत नाहीत हे लोक. 
मोकळं जगायला आवडणा-या लोकांसाठी अशी गावं म्हणजे सुखाचं आगर. पण आपल्याला कृत्रिम वागायची इतकी सवय झालीय की अशा गावात आपलं मन फार काळ रमणार नाही. सोयीसुविधांचा अभाव असला तरी मोकळ्या मनानी जगण्यासाठी म्हणावसं वाटतं....... खेड्याकडे चला............या मनस्वी लोकांमध्ये घालवलेला हा दिवस मी विसरूच शकत नाही. पुढे सुध्दा माझं मन मला या दिवसाची साद घालून म्हणेल, मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसाला.........

Friday 19 September 2014


आजारपण........



नमस्कार, बरेच दिवस झाले आपल्याला भेटून. मला तुमची आठवण येत होती. तुम्हाला येत होती का नाही माहिती नाही. कोणत्याही अभिव्यक्तिच्या कलेमध्ये कलाकार किंवा सादर करणा-याला आपल्या कलेच्या चाहत्यांची आठवण होतेच.  नाही का ? म्हणजे मी हे गृहित धरते, की तुम्ही माझ्या लेखाची वाट पहात होतात. काही विचार, मुद्दे , मतं तुमच्याशी शेअर केलं की मन हलकं होतं. आज पण एका मस्त अनुभवाचं शेअरिंग तुमच्याशी करायचं आहे. 
गेल्या २३ तारखेपासून म्हणजे ऑगस्टच्या हं मी एका वेगळ्या अनुभवातून जातीय. तुम्हा - आम्हा सर्वांना आलेला हा अनुभव आहे. फार काही वेगळं नाहीये. पण तरीही सांगतेच तुम्हाला.... व्हायरल इन्फेक्शन नावाच्या एका किरकोळ आजाराने मी मस्त आजारी पडले होते. हो.... मस्तच म्हणते . कारण यामुळेच मला माझ्यावर माया 
करणा-या लोकांचं प्रेम अनुभवता आलं. कारण कितीही आजारी असलं तरी झोपून न रहाण्याची वाईट सवय मला आहे. पण यावेळच्या व्हायरलनी मज्जा आणली. 
एका गाण्याच्या कार्यक्रमाचे निवेदन करत असतानाच व्हायरलनी आपले हात पाय पसरले. भर तापात आणि भर पावसात कशीबशी दवाखान्यात पोहोचले. मला बरं नाहीये यावर डॉक्टरसुध्दा विश्वास ठेवेनात. मग काय झाल्या तपासण्या वगैरे.... रोजच्या सकाळ संध्याकाळ बारा गोळ्यांचा पाऊस आजपर्यंत माझ्यावर बरसतो आहे. पण खरं सांगते फार मजा आली या अनुभवातून. सासुबाईंकडून सेवा करून घेता आली. इतकंच काय नव-यानी सुध्दा नारळ पाणी वगैरे आणून दिलं. मुलगा घाबरला होता. वा वा वा.........  सगळे काम करतायत आणि आपण मस्त झोपून रहायचं. एरवी ते पोलपाट लाटणं आणि फोडणी यातून सुटकाच नव्हती. आजारपणामुळे चक्क दोन दिवस मी स्वयपाकघराचं तोंड पाहिलं नाही.  घरी येणा-या सगळ्यांनाचआश्चर्य वाटतं होतं. अरे विनया आजारी आहे ? चेहे-यावरून तर वाटतं नाही. काय मेलं दुर्देव मी आजारी आहे हे सांगावं लागत होतं. तीच गोष्ट डॉक्टरांच्या दवाखान्यात गेल्यावर झाली. तिथे ओळखीचे सगळे लोक म्हणत होते, 'काय मग आज इकडे कुठे ? ' अरे बाबांनो , बरं नाहीये. म्हणून आलीय. पण कोणी विश्वास ठेवत नव्हतं. प्रसन्न चेहे-याचे तोटे हो दुसरं काय .... 
असो..... आता मी बरी आहे. कामं करायला सुरूवात केलीय. त्यामुळे मस्त मस्त विषय घेऊन पुन्हा भेटूच....

Saturday 30 August 2014


        जपूया संस्कृती....




माऊली, माऊली, माऊली , माऊली....... प्लीज या हो माऊली. तुम्हाला पण असच वाटतय ना ? अहो गणेशोत्सव सुरू झाल्यापासून मला पण हेच वाटतय. आता तुम्ही म्हणाल, गणेशोत्सव आणि माऊली काय संबंध ? अहो आहे. नीट कान देऊन ऐका म्हणजे कळेल तुम्हाला पण. अर्थात हे ऐकण्यासाठी कान देऊन ऐकायची गरज नाहीये. कानावर आदळणा-या  गोष्टी ऐकण्यासाठी कान देऊन ऐकण्याची काय गरज, नाही
 का ? 
आता तरी कळलं का तुम्हाला मी काय म्हणतीय ते ? नाही....... हं........नाहीतर मला राग येतो.... अरे बापरे , हे काय झालय मला? पण काय करू सारखं जे ऐकायला मिळत तसाच रिअॅक्ट होतो ना माणूस. आता तरी कळलं का तुम्हाला? यस्स... बरोबर ओळखलतं. गणपती बाप्पाला सुध्दा त्रास होत असेल हो या मोठ्या आवाजाचा. गणेशोत्सव असो की कोणताही सण हे लाऊड स्पीकर इतके लाऊड का असतात ? 
चांगल्या गाण्यांची वाटोळी करणारी रिमिक्स गाणी, भसाड्या आवाजातली अर्थहीन गाणी, लांबून तर नुसतच ढाक चीक ढाक चीक इतकच ऐकू येतील अशी गाणी वाजवणं म्हणजे गणेशोत्सव का ? आनंद व्यक्त करण्यासाठी अशा लाऊड गोष्टींचा आधार का घेतोय आपण ?  आपली संस्कृती विकृतीमध्ये बदलण्याआधी आपण जागं होणं गरजेचं आहे. 
मागच्याच्या मागच्या वर्षी आमच्या तळेगावच्या सर्व गणेश मंडळांनी आणि चक्क राजकारण्यांनी सुध्दा डीजेविना गणेशोत्सव पार पाडला. प्रचंड अभिमान आणि आनंद  वाटला आम्हाला. पण हा आनंद फार काळ टिकला नाही.  कार्यकर्त्यांना सांभाळण्याच्या नावाखाली राजकारणी आणि पर्यायानी पोलिस यंत्रणेनी डीजेला छुपी परवानगी दिली. परिणामी गणशोत्सवाची मिरवणूक चांगलीच गाजली. इतकच कशाला गणेशोत्सवात इतर दिवशीदेखील डीजे ढाकचीकला.....
ध्वनीप्रदूषणावर काम करणा-या अनेक कार्यकर्त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ हे सारेच टाहो .... असंच काहीसं झालं. या डीजेच्या भिंती आपल्या आरोग्याला हानिकारक आहेत हे समजायला हवं. त्या आवाजाच्या नशेत बेधुंद होऊन नाचताना कदाचित काहीही जाणवणार नाही. पण याचे दूरगामी परिणाम होणार हे नक्की. ठराविक डेसिबलच्या आत आवाजाची पातळी ठेवणं हेच हिताचं आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, गर्भवती महिला यांच्यासाठी तर हा मोठा आवाज जीवघेणा ठरू शकतो. अहो कशाला, अगदी नॉर्मल माणसाला सुध्दा त्रास होऊ शकतो. जी गोष्ट शास्त्राच्या आधाराने सिध्द झाली आहे. ती आपल्यासारख्या एकविसाव्या शतकातल्या लोकांनी ऐकायलाच हवी. नाही का ? परदेशात विनाकारण गाडीचा हॉर्न वाजवला तरी दंड आहे. मग या अकारण वाजणा-या भोंग्यांना किती दंड पडेल परदेशात ? आपण पाश्चात्यांच अंधानुकरण करतो असं म्हणलं जात. पण नाही, आपण आपल्याला हवं ते करण्यासाठी प्रसंगी असं तर प्रसंगी तसं असं दुटप्पी वागतो. 
सण समारंभ साजरे करताना त्यातून आपल्याबरोबर सगळ्यांना आनंद मिळावा ही आपली संस्कृती आहे. ध्वनीप्रदूषण ही समस्या प्रचंड मोठी आहे. यावर प्रत्येकानी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. आपण आपल्या आनंदासाठी स्वतःसकट अनेकांचे जीव धोक्यात घालत नाही आहोत ना ? इतका विचार करू शकलो तरी खूप झालं. 

Thursday 21 August 2014


बायकांची साडी खरेदी

पावसाळा म्हणलं की आठवण होते कांदा भजी, चहा आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॉन्सून सेलची. 15, 20, 25, 50 टक्के डिस्काऊंट वगैरे गोष्टी तर मनाला भुरळ घालतात.  खरेदी आणि स्त्रिया हे असच एक अजब समीकरण आहे. हल्ली नेहमीच बाजारपेठांचे रस्ते अक्षरशः फुलून येतात.  पूर्वीसारखं खरेदीचं नाविन्य आता राहीलं नाही म्हणा. आता काय बाराही महिने खरेदी. पण तरीही मॉन्सून सेलची गंमतच वेगळी नाही का?  पिनेवालो को .........असं काहीतरी म्हणतात ना, तसं आम्हा बायकांच होतं. खरेदीला का कोणतं कारण लागतं? पण पावसाळी सेल म्हणलं की कोणतही कारण न देता पतीराजांना यथेच्छ लुटण्याची संधी मिळते. 
सारं जगणंच महागलं असलं तरी आम्हा बायकांचा खरेदीचा उत्साह जराही कमी झालेला नाही. हल्ली आपण वर्षभर सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची खरेदी करत असलो तरीही पावसाळ्यातलं शॉपिंग जरा वेगळचं 
असतं . प्रचंड पाऊस पडत असतानाही छत्र्या, रेनकोट यांच्यासह खरेदी करण्यातली  मजा काही वेगळीच असते. एरवी चिकचिक, घाण, चिखल त्रासदायक वाटतो. पण खरेदी करताना काय होतं कळतच नाही. हे सगळ कुठे दिसतच नाही बाई. 
 आता कपड्यांमध्ये कितीही आधुनिकता आली असली तरीही पारंपरिक साडीला पर्याय नाही. म्हणूनच उत्तम साडीची निवड केल्यास वेगळी फॅशन काही करण्याची गरज उरत नाही. पण ही साडी खरेदी करताना यजमानांना ''कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो'' हे गाणं गुणगुणावसं वाटतं. पण बायकोच्या उत्साहाच्या झ-याला बांध घालण्याचं सामर्थ्य पतीराजांकडे कुठे असतं. 
नेमक्या कोणत्या दुकानात साडी घ्यायला जायचं हा ही एक यक्षप्रश्नच असतो. जाहिरातींना भुलून, एकावर एक फ्रीच्या नादात अनेक दुकानांना भेट दिली जाते. मग काय ह्या दुकानातून त्या दुकानात अशी वारी निघते. पुढे यजमानीण बाई आणि मागे मागे यजमान आणि पिल्लू. असा तांडा त्या प्रचंड गर्दीतून चाललेला असतो. बर बाईसाहेबांचा उत्साह इतका असतो की. एरवी पायी चालण्याचा कंटाळा असणा-या त्या अगदी उत्साहात तरातरा चालतात. (पावसाची पर्वा न करता) यजमान त्यांच्या ओढीनी ओढग्रस्तपणे मार्ग कंठत असतात. 
बर नवरा नुसता बरोबर असून आम्हाला चालत नाही. त्यानी आमच्या निवडीवर, ती साडी कशी दिसेल यावर कमेंट पास केलीच पाहिजे असा आग्रह असतो. बर तो बिचारा म्हणाला ना की, ''मस्त आहे साडी.'' की म्हणायचं, ''तुम्हाला ना काही चॉईसच नाहीये.'' जर तो म्हणाला, ''जरा दुसरा रंग बघ ना.'' तर म्हणायचं, ''अय्या, काय तुम्ही वेंधळे आहात. कित्ती युनिक रंग आहे हा.''
या खेरदी प्रकरणात आणखी गंमत येते सेल्समन जेव्हा यजमानीण बाईंना फुगवून सांगतो की तुम्हाला ही साडी कशी चांगली दिसेल तेव्हा. मनातून सुखावलेली यजमानीण बाई लगेच ट्रायल वगैरे घेते. पलिकडच्या बाजुला मुलाला, पिशवीला सांभाळणारा आणि अन्य गि-हाईकांमध्ये रमलेल्या 
नव-याला हाका मारून मारून विचारते. तोही बिचारा केविलवाणेपणानी हो हो करतो. सगळ काही फिक्स होतं. तेव्हाच मॅडमना शेजारच्या गि-हाईकाच्या समोरील ढिगा-यातील एक साडी आवडते. रंग, पोत, कापड सगळ मनात भरतं. पण ती साडी त्या बाईंनी घेतलेली असते. अर्थात ती तिला आवडलेली असतेच असं नाही. तिला या बाईंच्या हातातली साडी आवडलेली असते. अखेर परस्पर संवादातून आणि सामंजस्यातून दोघीही सुखावतात. दोघींच्या 
चेहे-यावर जिंकल्याचे भाव. बिल वगैरे देऊन बाहेर आल्यावर पिशवीतून साडी काढून यजमानीण बाई म्हणतात, खरं तर तीच साडी मला जास्त चांगली दिसेल असं वाटतय नाही?  या प्रश्नावर मात्र पतीराज हतबल होतात.  या प्रचंड जनसागरात मी हरवून का जात नाही असा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारून चेहे-यावर जमेल तितकं हसू ठेवून मला जाऊद्या ना घरी....... हे गाणं गुणगुणतात (मनातल्या मनात).


Tuesday 19 August 2014


जपुया कोवळ्या कळ्यांना आणि  मनांना...........

मित्र, मैत्रिणींनो, एका वेगळ्या विषयावरचा लेख  ...........



सरिता एक उच्चशिक्षित, सुंदर , हुशार तरूणी. तिचं लग्न अजयशी झालं. अगदी दृष्ट लागावा असा जोडा. पण का कुणास ठाऊक लवकरच या दोघांच्यात खटके उडायला लागले. भांडणं होऊ लागली. अगदी मानसोपचारतज्ज्ञाकडे जायची वेळ आली. तेव्हा कळलं, सरितावर तिच्या अजाणत्या वयात अगदी तिच्या घरातल्या कोणीतरी अत्याचार केला होता. त्यामुळे नवरा बायकोमधल्या नाजुक, तरल संबंधांविषयी तिच्या मनात तिडिक बसली होती. सगळे पुरूष वाईट असतात अशी तिची भावना झाली होती. मात्र अजयच्या  मदतीने ती या भयंकर मनोवस्थेतून बाहेर आली. 
अशा अनेक सरिता आपलं आयुष्य घालवत असतील. पण सगळयांनाच असे अजय भेटतात का ? नाहीतर लग्नानंतरही पुरूषार्थ गाजवून बायकोच्या मनाविरूध्द संबंध ठेवणारे पुरूष आहेतच की. तो एक वेगळाच विषय आहे.  या विचारांबरोबरच मनात आलं, 
''बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा.''   ही हवीहवीशी मागणी करणा-या या काव्यपंक्ति आता तितक्याशा हव्याशा वाटत नाहीत. रोज वर्तमानपत्र उघडल्यानंतर अल्पवयीन मुलींवर, बालिकांवर होणारे अत्याचार मन सुन्न करतात. काही वेळा असा सुर सुध्दा ऐकू येतो, ''आमच्या वेळी नव्हतं हे असं.''  पण खरच असं आहे का? पूर्वीपासून हे अत्याचार होत असणार. फक्त आता प्रसिध्दी माध्यमांमुळे या घटना प्रकाशात येऊ लागल्या आहेत. ज्या वयात मुलींना चांगल काय वाईट काय याची पुसटशी सुध्दा कल्पना नसते,  त्यावेळी त्यांच्या कोवळ्या मनावर ओरखडे उठतात. काही वेळा हे ओरखडे इतके भयंकर असतात, की त्या मुलींचं आयुष्य पणाला लागतं. भावनाविरहित असं जिवंत प्रेतासारख आयुष्य तिच्या वाट्याला येऊ शकतं. या सगळ्या भयानक परिस्थितीचा विचार केला तर अनेक पालकांना आपल्या लहानग्यांना शाळेत सोडायला सुध्दा भीती वाटते आहे, असं चित्र दिसत. महिलांवर, युवतींवर होणा-या अत्याचारांचा प्रतिकार करणं अवघड आहे. पण अशक्य नाही. मात्र लहान वयातल्या मुलींवर होणारे अत्याचार कसे थांबणार? 
या अत्याचारांमध्ये घडणा-या घटनांचा मागोवा घेतला तर हे लक्षात येतं की, ब-याच वेळा हे अत्याचार घरातल्या किंवा ओळखीच्या लोकांकडून केले जातात. काही बातम्या तर इतक्या शॉकिंग असतात की त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाही. ''वडिलांनी मुलीवर अत्याचार केला'' ही अशीच एक बातमी. कुंपणानीच शेत खाल्लं तर राखण कोण करणार?  प्रत्येक मुलीसाठी वडिल म्हणजे आनंदाचा ठेवा असतो. मुलीचं रक्षण करणं हे तर वडिलांच पहिलं कर्तव्य. आपल्या आयुष्यात कोणतीही अडचण आली तर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणारे आपले वडिल नराधमासारखे वागायला लागल्यावर त्या मुलीच्या मनात कोणत्या भावना येत असतील हे शब्दात सांगणे अशक्य आहे. 
खाऊमधून गुंगीचं ओषध देऊन त्या मुलीवर अत्याचार करणं ही अशीच एक लाच्छंनास्पद घटना. अंध आणि विशेष मुलींच्या बाबतीत किंवा शारिरीक व्यंग असणा-या अल्पवयीन मुलींच्या बाबतीत तर हा प्रश्न बिकट आहे. रोजच्या व्यवहारातल्या भावना समजून घेण्यासाठी सक्षम नसणा-या या मुलींना या रानटी आणि पाशवी भावना कशा समजणार? बरं, या मुलींच्या बाबतीत दुर्दैव म्हणजे, त्यांना प्रेमानी जवळ करणारी माणसंच फार थोडी असतात. त्यामुळे अशा कोणत्याही माणसाला अडवणं त्यांना शक्य नसतं आणि जे होईल ते प्रेमानी केलेला स्पर्श आहे अशी त्यांची समजुत होत असेल का?  
अल्पवयीन, निरागस मुलींच्या बाबतीत पाशवी कृत्य करणा-या या राक्षसांना या मुलींचे निष्पाप, गोंडस चेहेरे दिसत नाहीत का? ज्या मुलींची मानसिक आणि शारिरीक वाढ अपूर्ण आहे अशा मुलींवर अत्याचार करून त्यांना नेमकं कोणतं राक्षसी समाधान मिळत असेल? 
या सगळ्या कृतीमागे विकृती, असमाधान आणि मनावर ताबा नसणे या गोष्टी आहेत. स्त्रियांकडे भोगाची वस्तू म्हणून बघण्याचा पुरूषांचा दृष्टिकोन हे अजून एक कारण. महिला किंवा युवतींवर होणा-या अत्याचाराच्या बाबतीत त्या महिलासुध्दा तितक्याच जबाबदार असतात असा सूर ऐकायला येतो. आपलं रहाणीमान, पोशाख यावर ब-याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे तोकड्या कपड्यातल्या एखाद्या युवतीला पाहून सो कॉल्ड पुरूषार्थ जागा होतो असं म्हटलं जातं. अर्थात पुरूषांच्या या मानसिकतेमुळे त्याच्या कृत्यांना माफी मिळू शकत नाही. तसंच रात्री उशीरा कशाला बाहेर पडायचं ? आपण स्त्री आहोत हे विसरता कामा नये.  क्षणभर हे जरी खरं आहे असं धरलं तरी अल्पवयीन मुलींच्या बाबतीत हे निकष गैरलागू आहेत. त्यांची काहीही चूक नसताना त्यांना हे भोगावं लागत. स्त्रीभ्रूणहत्येचं प्रमाण आधीच वाढतं आहे. त्यात अशा घटनांची भर पडली तर मुलगी हवी असं म्हणणा-यांची संख्या कमी होईल की काय अशी भीती वाटते. 
हा असंस्कृतपणा दूर होण्यासाठी बालपणापासून घरातून व शिक्षणातून चांगले संस्कार होण्याची गरज आहे. लहानपणी रूजलेल्या विचारांचा प्रभाव खूप जास्त असतो. त्यामुळे पालक व शिक्षक दोघांनीही समांतर पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत. घरामध्ये मुलींना good touch आणि bad touch याविषयी मोकळेपणानी पण त्यांना समजेल अशा भाषेत सांगितलं पाहिजे. आपल्या गुप्तांगांना कोणी हात लावत असेल अशा माणसाकडे जायचं नाही. त्याला हात लावू द्यायचा नाही. इतकं मोकळ आणि स्पष्ट सांगितलं पाहिजे. कारण मायेनी , प्रेमानी स्पर्श करणारे सुध्दा असतात ना? चुकीच्या शिकवणुकीमुळे अशा प्रेमळ माणसांचं प्रेम या मुलींना मिळणार नाही. त्यामुळे या नाजुक विषयावर अतिशय नाजुकपणे मुलांशी संवाद साधला पाहिजे. फक्त मुलींनाच नाही तर मुलांनादेखील हे सांगणं गरजेचं आहे. थोड्या जाणत्या मुलांना, मुलीला कुठे स्पर्श करायचा आणि कुठे नाही हे अगदी स्वच्छपणे सांगितलं पाहिजे. तसंच आपल्या स्वतःच्या बाबतीत काय काळजी घेतली पाहिजे हेदेखील सांगितलं गेलं पाहिजे. हे सगळ लिहित असताना एक जाणवलं अगदी आमच्या पिढीतल्या आई वडिलांनी तरी कुठे हा मोकळेपणा जपला होता? पण आता तरी हे बोललं पाहिजे. 
महिलांच्या बाबतीत स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण उपयोगी ठरेल. मात्र या लहानग्यांच्या बाबतीत पाशवी वृत्तीच्या मनांना प्रशिक्षण आणि त्यांची उत्तम प्रकारे मशागत करणं गरजेचं आहे. कारण शिक्षा देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत. कारण जुलमाचा राम राम किती दिवस टिकतो?  बलात्का-यांना कायदा काय करू शकतो हे माहिती आहे. त्यामुळे कायद्याच्या बडग्यानी फरक पडेल का ? एखादी गोष्ट करणं किंवा न करणं हे एकदा मनानी घेतलं की कोणत्याही कायद्याची आणि शिक्षेची गरज उरणार नाही. 
 अजून एका गोष्टीवर नियंत्रण ठेवल पाहिजे, ते म्हणजे टी.व्ही.वर दाखविल्या जाणा-या कार्यक्रमांवर. एखादी कौटुंबिक सिरियल बघत असताना मध्येच एखाद्या पॉर्नस्टारची विचित्र जाहिरात दाखवण्यात येते. ही जनजागृती आहे. पण भलतीच जागृती होते या सगळ्यानी. या सगळया साधनांची गरज आहे हे मान्य. पण ते दाखवण्याची जागा किती चुकीची आहे. एवढचं काय वर्तमानपत्रात सुध्दा या जाहिराती मुख्य पानावर दिल्या जातात. काही गोष्टी कितीही ख-या आणि आवश्यक असल्या तरी त्या कोणत्या माध्यमातून आणि कशा दाखवल्या जातात हे महत्त्वाचं आहे. यातच भर म्हणून की काय गुगलवर काहीही टाईप केलं तरी धडाधड सगळी माहिती दिसते, व्हिडिओ दिसतात. या सगळ्याचा परिणाम मनावर होणारच. ज्या गोष्टी हळुवारपणे करण्याची गरज आहे. किंबहुना असं म्हणता येईल की, ज्या गोष्टी करून समाधान मिळणार आहे. त्या गोष्टी अशा ओरबाडणं चूक आहे हे पटवून देता आलं पाहिजे. हा विषय अतिशय नाजुक आहे. अत्यंत सावधानतेनी तो हाताळला पाहिजे. माणसानी प्रगती केली आहे पण त्यामुळे तो आपलं समाधान हरवून बसला आहे. असं म्हणण्याची वेळ येऊ नये. कारण प्रगती झालीच पाहिजे. पण त्याचबरोबर आपलं माणूसपण टिकवता आलं पाहिजे. ज्या देशात स्त्रीचा अपमान होतो तो देश कधीच प्रगती करू शकत नाही असं म्हणतात. आपला देश तर महासत्ता होऊ पहातो आहे. मग अशा या विकसित देशात भावनांच्या विकासाचे वारे कधी आणि कसे वहाणार?

Friday 15 August 2014

मुख्य आकर्षण............



आज मी दोन शब्द वाचून हैराण झाले खूप. रस्त्यावर चौकाचौकात फ्लेक्स लावले होते. त्यामध्ये लिहिलं होतं, ''मुख्य आकर्षण'' हेच हेच ते दोन शब्द. गोकुळाष्टमी, दहीहंडीचे फ्लेक्स हो. बरं मुख्य आकर्षण म्हणून काय ते बघायला जावं तर असं वाटतं होतं की गोपालकृष्णाचं मोहक, खोडकर, लोभस रूप म्हणजे मुख्य आकर्षण. पण साफ नाराजी होत होती. सगळीकडे अमुक फेम, तमुक फेम तारकांचे एक से एक शॉलिड फोटो. 
मी म्हणलं दहीहंडीमध्ये मुख्य आकर्षण हे फेम तारकांचे फोटो का बरं ? म्हणजे आमचे गोविंदा मेहेनत करून दहीहंडी फोडणार. संयोजक अण्णा, आप्पा, दादा, तात्या, साहेब वगैरे जे कोणी असतील ते पैसे लावणार. मध्येच या बाया बापड्यांना का बरं आणतात ? या नसल्या तर दहीहंडी फुटणार नाही की काय ? बरं दहीहंडी फुटेपर्यंत या थांबतात का तरी? मोठ्या कर्णकर्शश्श आवाजातले डीजे, बेधुंद बेताल नृत्य आणि या फेम तारका म्हणजे दहीहंडी का ? 
बरं परवा एक चांगली बातमी कळली होती. गोविंदांच्या वयाच्या आणि दहीहंडीच्या उंचच्या उंच थराबद्दल.  तेव्हा मनात आलं चला बरं झालं.... निदान लहान मुलांना आणि पर्यायाने त्यांच्या पालकांना होणारा मनस्ताप कमी होईल. हे थरच्या थर वर जाताना थरथराट होतो. पण काऴजाचा ठोका चुकवणारा हा थरथराट, डीजेचा ठणठणाट अंगावर येतो. पण हे सगळ नसेल तर या फेम तारकांची मागणी आणि पुरवठा आपोआप कमी होईल. म्हणजे अण्णा, तात्या , आप्पा वगैरेंचे पैसे वाचणार. पण कसलं काय  परत वयाची अट १२ वर्ष केली. थराची अट शिथिल केली. त्यामुळे पुन्हा एकदा फेम तारका फॉर्मात. मला या फेम शब्दाची गंमत वाटते. आपल्या अभिनयानी परिचय व्हावा असं नसत का काही ? एखादी सिरियल, किंवा सिनेमाचं नाव लिहिल्याशिवाय या ओळखू सुध्दा येत नाहीत. मग हे कसलं मुख्य आकर्षण ? 
'हा दहीहंडी उत्सव आपल्या संस्कृतीचा भाग आहे'   चॅनेलवरून अशी भाषणबाजी करणा-यांना या सगळ्याचं गांभीर्य नाहीये का ? आपलं म्हणणं खरं करण्यासाठी कुणाच्याही जीवाशी खेळ होऊ नये. दहीहंडी झाली की गणेशोत्सव, नवरात्र आहेच. पैशाचा विनियोग चांगल्या कामासाठी होणं गरजेचं आहे. खरा आनंद काय हे समजलं ना तर फार बरं होईल. आनंदाचे सण आहेत हे मित्रांनो . आनंदानी साजरे करूया..... 

Wednesday 13 August 2014

मला राग येतो......


आता अगदी एक लई भारी गाणं हिट होतय मित्रांनो.  राग येतो, मला राग येतो असं काहीतरी आहे. मला पण राग येतो. कशाचा? माणसांचा नाही येत. माणसांच्या वृत्तीचा येतो. तुम्ही म्हणाल हे काय नवीन ? पण खरच माणसाचा दोष नसतो. कारण कित्येक वेळा माणसं परिस्थितीप्रमाणे वागतात. म्हणजे त्या त्या परिस्थितीमध्ये जे योग्य वाटत तशीच वागतात, प्रत्येकाच्या बुध्दिनुसार, आवाक्यानुसार . फक्त मला राग याचा येतो की. तशीच परिस्थिती पुन्हा येते तेव्हा तरी आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे. 
माझ्या परिचयात अशी किती तरी मोठी, विद्वान माणसं आहेत ज्यांना आपल्या मोठेपणाचं दुस-यावर ओझं टाकण्याची सवय आहे. खर तर  सगळ्यांना त्यांच्या मोठेपणाविषयी आदर असतो. पण सारखं मी , माझं , मला असं करून ही माणसं आपलं मोठेपण घालवून बसतात. मोठेपणा ही दाखवायची गोष्ट नसून दुस-यांनी अनुभवायची आहे.
अजून एक गोष्ट म्हणजे दुस-याला सतत नावं ठेवणा-यांची मोठी पलटणच आहे आयुष्यात. काय मिळवतात ही माणसं असं वागून ? आपली नजर आणि मन स्वच्छ ठेवून जगाकडे कधी बघणार आपण ? मराठीत त्याला गॉसिपिंग  की काय ते म्हणतात. नका आपला वेळ वाया घालवू या सगळ्यात. कोण कसं वाईट आहे? कुणाचं काय चुकतय ?  कोण कोणाशी बोलतयं ? कोण कोणाच्या घरी जातय ? आज काय मग अगदी नट्टा पट्टा, काय आज अगदी लंकेची पार्वती ? एक ना अनेक प्रश्न असतात यांच्या मनात. बरं हे सगळ प्रांजळ हेतूनी विचारलं तर काही वाटत नाही. पण मनात सतत एक जबरदस्त संशय, असूया, हेवा असतो. या सगळ्यानी आपलं स्वतः चं मन कलूषित होतं. बाकी काही नाही. बरं हे सगळ जिच्याबद्दल किंवा ज्याच्याबदद्ल बोलायचं ना त्याच्या माघारी बोललं जातं. त्याचा काहीच उपयोग होत नाही. वेळ मात्र वाया जातो. 
मुलांना आणि नव्या पिढीला समजून न घेता त्यांना सतत उपदेश करणा-यांचा पण मला राग येतो. त्यांच्या भावविश्वात गेल्यावरच त्यांचे ताण कळू शकतील. जे लोक आमच्या वेळी असं नव्हतं, तसं नव्हतं असं म्हणतात ना, त्यांनी एक दिवसभर मुलांच्या शाळेत जाऊन बसावं. एवढी छोटी पिल्लं ती, पण त्यांना किती ताण असतो. इंग्लिश मिडियम असो की मराठी. किती पसारा झालाय शिक्षणाचा. आता काही प्रश्न मला या लोकांना विचारावासे वाटतात, तुमच्या वेळी होती का स्कूल बस ? शाळा घरापासून  एक किंवा दोन तासांच्या अंतरावर आहे हा अनुभव तुम्ही घेतलाय ? तुमच्या शाळेत  सारखे सारखे प्रोजेक्टस होते का ? तुमची आई कामावर जायची का ? घराच कुलुप उघडून घरी एकटं बसण्याची वेळ तुमच्यावर आलीय ? आपली बक्षीस पहायला सुध्दा घरी कोणी नाही हा अनुभव घेतलाय ? शाळेला सुट्टी असूनही शिबीरांमध्ये तुमचा जीव घुसमटलाय ? खूप प्रलोभनं आहेत आजुबाजुला. ही तर वरवर जाणवणारी टेन्शन्स आहेत. तरूणांच्या बाबतीत सुध्दा तसच काहीसं आहे. न रागवता, जरा विचार करायला हवा या सगळ्याचा. 
या निमित्ताने अजून एक  राग व्यक्त करावासा वाटतो , निराश होणं योग्य नाही. अनेक वेऴा आपल्या मनाविरूध्द घटना घडतात. काही माणसं आपल्याशी अनाकलनीय विचित्र वागतात. अपयश येतं. आजारपण येतं. आपल्या जवळची माणसं आपल्याला सोडून जातात. पण पुन्हा एकदा ईश्वरावर श्रध्दा आणि सकारात्मक विचार असतील तर या निराशेतला फोलपणा जाणवतो. कारण सुखाचा काय किंवा दुःखाचा काय कुठलाच काळ रहात नाही. मग काळजी कशाला करायची ? 
मित्र मैत्रिणींनो, तुम्ही सगळे जिवलग आहात म्हणून माझा राग व्यक्त केला... नाही तर,  मला  राग येतो ? अजिबात नाही..........

Thursday 7 August 2014

तरूण आहे......




काल माझ्या बॅचमेटस मैत्रिणींनी एक भन्नाट विषय डोक्यात घुसवला. सहज बोलता बोलता एक जण स्वतः अगदी आजीबाईच्या जमान्यात असल्यासारखी बोलली. माझं थोड ऑबजेक्शन होतं. मी म्हणलं, काय गं म्हातारी झालीस का ? तर म्हणे, स्वीकारायलाचं हवं ना  , वगैरे , वगैरे. मी म्हणलं कशाला म्हातारं व्हायचं उगाच ? वय होईनाकी कितीही... मन तरूण हवं. 
या सगळया विषयातून एक गोष्ट जाणवली, खूप वेळा आपण उगाच मोठ्ठं होऊन ब-याच गोष्टींचा आनंद घेतच नाही. आपलं वय खूप झालय असं वाटून अनेक गोष्टी मनमोकळेपाणानी करतच नाही. हो लिहिताना अजून एक गोष्ट आठवली. आमच्या कलापिनी संस्थेत आमचे डॉ. परांजपे जेव्हा सुजाण पालक मंचाच्या कार्यक्रमात पालकांना मोकळ हसायला सांगतात, तेव्हा बरेच जण कसनुसं हसतात. वर हात करून  टाळ्या वाजवायला सांगितल्या, तर टाळी वाजवल्याचा उगाच अभिनय करतात. काही गोष्टी मनाला तरूण करत असतील तर त्यातला आनंद घ्यायला लोक का कचरतात ?
माझं असं म्हणणं नाही की, आपल्याला न शोभणा-या गोष्टी करा. काय ते वासरात पाय मोडून घुसणे का काय ते. तसं नका करू. मोठ्यांनी मोठ्यांसारखच वागलं पाहिजे. पण निदान प्रौढ झाल्यासारखं नका वागू. हसावसं वाटलं हसा. बोलावस वाटलं बोला. त्याला वयाचा काय संबंध ? 
आपल्यापेक्षा लहान असणा-यांच्या सहवासात रहायला हवं. मग हे मोठेपण गळून पडतं. त्यांच्यात त्यांच्यासारखं होऊन गेलात ना तर खूप मज्जा येते. मी मोठा आहे मग काय हा बालिशपणा ? असा विचार नका करू. त्यानी काय होतं माहितीय का ?  आपण 
ब-याचदा आपली नवीन स्वीकारण्याची क्षमता हरवतो. काय ही हल्लीची गाणी, काय हे सिनेमे, काय या हिरॉईन असे 'कुरकुरे' नका होऊ. त्यापेक्षा कधीतरी 'कुरकुरे' खा . आत्ताची गाणीसुध्दा चांगली आहेत . मुलांच्या दृष्टिकोनातून बघायला हवं. आत्ताच्या मुलांना ताल, ठेका, लाऊड म्युझिक आवडतं. कारण ती प्रचंड हायपर आहेत. त्यांना त्यांच्या या क्षमतेला साजेसच ऐकावसं  वाटतं. पण आत्ताच्या काऴात  सुध्दा अर्जित सिंगची गाणी ऐकायला मस्त वाटतच की. राधा मंगेशकर आत्ताच्या पिढीतली असूनही 'मीरा सूर कबीरा' सारखे दर्जेदार कार्यक्रम करतेच की. स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते, संदीप खरे, डॉ. सलिल कुलकर्णी, संजीव अभ्यंकर, सावनी शेंडे, कवयित्री स्पृहा जोशी, अजय - अतुल, शंकर महादेवन, भाग मिल्खा भाग मधला फरहान अख्तर, सारेगमपची सगळी  वादक टीम, धृपद गायक उदय भवाळकर, चेतन भगत, तरूण पॉलिटिशियन्स अरे बापरे ... अहो ही यादी संपणारच नाही. हे सगळे कल्पक आणि महान आहेतच ना ? पण हे सगळं तरूण वयापेक्षा तरूण मनानी बघायला हवं ना.  'अनवट' सिनेमातलं जुनं 'तरूण आहे रात्र अजून' हे गाणं शंकर महादेवननी चिरतरूण केलयं. उगाच नावं ठेवण्यात काय अर्थ आहे. 
आत्ताच्या पिढीला समजून घेण्यासाठी स्वीकारार्हता वाढवायला हवी. आपली मतं त्यांना पटवून देण्यासाठी त्यांची मत ऐकायला हवीत. नव्या जुन्याचा संगम झाला तरच नवीन काहीतरी चांगलं घडेल. आपल्या आधीची पिढीसुध्दा आशिकी, दिल, दिवाना, कयामत से कयामत तक या सिनेमांना कुठे 'लाईक' करायची ? कधी तरी आपणही आपले मोठेपणाचे मुखवटे उतरवायला हवेत. जी माणसं येणा-या काळाशी आनंदानी जुळवून घेऊन पुढे जातात त्यांना' कुरकुरे'  व्हावं लागत नाही. असा कुरकुरेपणा सोडा .... नाही तर मुलं म्हणतील.... आता माझी सटकली.... त्यापेक्षा अनवट चालीत आपण म्हणूया... तरूण आहे मन अजूनी....... 

Monday 4 August 2014

मैत्री............




काल 3 ऑगस्टच्या दिवशी मैत्रीदिनाच्या निमित्तानी तुम्ही तत्वज्ञानाच्या अनेक मेसेजेसचं प्राशन केलं असेलच. बघा, माझी भाषा सुध्दा किती जड झालीय या सगळ्या तमाम मेसेजेसमुऴे. काही मेसेज तर मला कळलेच नाहीत. तुमचंही तसच झालं का
 हो ? मैत्री हे नातं किती सहज, सोपं आहे. अगदी प्रेमापेक्षा श्रेष्ठ. हो थोड धाडस करतीय आज. कारण एखाद्या व्यक्तिवर भरभरून केलेलं प्रेम काही वेळा निराशा पदरी घालतं. पण मैत्रीमध्ये असं कधीच होत नाही. 
अगदी बालवाडीपासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या जीवाभावाच्या मित्र मैत्रिणींना आठवून बघा. प्रत्येक वळणावर त्यांनी दिलेली मोलाची साथ किती महत्त्वाची असते. कधी आपण चुकलो तर जो आपल्याला डोस देतो, तो खरा मित्र. आपलं भलं चिंतणारा, आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारा, आपली सुख - दुःखात साथ देणारा मित्र भेटणं हे भाग्याचं लक्षण आहे. 
मैत्री दिनाच्या निमित्ताने माझ्या शाळेतले सगळे मित्र मैत्रीणी झरझर डोळ्यासमोर आले. आमच्या वर्गात कधीही विचित्र स्पर्धा नव्हती. आमच्या वर्गातला एक मुलगा खूप हुशार होता. तो दहावीत बोर्डात आला. पण आम्हाला कधीच असूया वाटली नाही. मला आठवतय, आम्ही मुली त्याचं अभिनंदन करायला त्याच्या घरी गेलो, तेव्हा लाजून तो आत पळून गेला होता. असाच अजून एक मित्र ऑफ तासाला प्रभू तू दयाळू गाणं म्हणणारा. आम्ही मुली तर अभ्यासापेक्षा नाट्यवाचन, स्पर्धा, गॅदरिंग, गाणं यामध्ये रमायचो. आमच्यातही हुशार मुली होत्याच. प्रत्येक  मित्र मैत्रिणीची एक वेगळी आठवण आहे. ते सगळ सांगत बसले तर वेळ पुरणार नाही. या सगळ्यांची आज खूप आठवण येतीय. अगदी त्यावेळी बोललो नव्हतो इतकं भरभरून बोलावस वाटतय. कारण आमच्या भोरला मुलामुलींनी मोकळेपणानी बोलण्याची सोय निदान त्यावेळी तरी नव्हती. आज व्हॉटस अप वर आम्ही सगळे गप्पा मारतो. पण त्यावेळी फार बोलायचो नाही. आता आठवलं तरी हसू येतं. 
नंतर कॉलेजमध्ये फार मोठा ग्रुप नाही होऊ शकला. आम्ही चारचौघी गटून असायचो. महिन्यातून एकदा मिळणा-या दहा रूपयांचा चहा प्यायचो. खूप गप्पा मारायचो. नाटकाचा एक ग्रुप होता. पण ते सिनिअर होते सगळे.  कॉलेजपेक्षा माझं मन शाळेत जास्त रमत. आजही भोरच्या एसटीतून जाताना, ''हे आमचं राजा रघुनाथराव विद्यालय'' असं पालूपद दर वेळी माझ्या मुलाला ऐकायला लागतं. 
मैत्री म्हणजे नेमकं काय हो ? पुन्हा संदीप खरेच या भावना व्यक्त करण्यासाठी धावून येतो. खर तर ही कविता प्रेमी जन आपल्या अॅंगलनी घेतील. पण मला ही निरपेक्ष, निखळ मैत्रीच वाटते. संदीप म्हणतो, ''नात्याला या नकोच नाव. दोघांचाही एकच गाव. वेगवेगळे प्रवास तरीही, समान दोघांमधले काही, ठेच लागते एकाला, का ?  रक्ताळे दुस-याचा पाय.'' ही एकरूपता इतकी होते, की काही सांगायची गरज उरत नाही. अशी नाती बनवायला हवीत मित्रांनो. तरच ख-या अर्थानी आपण जगायला शिकू. फेसबुकवर श्री श्री रविशंकरांचं मैत्रीबद्लचं हे विधान मनाला एकदम भावलं. ''तुम अपने मित्र से क्या चाहते हो, केवल मित्रता और कुछ 
नही. '' चला तर,  दोस्तहो जपूया अशी निरपेक्ष मैत्री ? 

Tuesday 29 July 2014


ओळख .......




आज एक वेगळाच विषय डोक्यात घोळतोय. आपण कित्येकदा असं म्हणतो नाही की, मी तिला किंवा त्याला चांगलीच ओळखून आहे. किती बिनधास्त, केवढं मोठ्ठ धाडसं करतो आपण. खर तर, नाही ओळखत आपण इतकं कोणालाच. किंवा आपले अंदाज चुकतात. का आपण ओळखायलाच चुकतो माणसांना ? संदीप खरेच्या कवितेत मस्त ओळी आहेत, ''भेट जरी ना या जन्मातून ओळख झाली इतकी आतून. पश्न मला जो पडला नाही त्याचेही तिज सुचते उत्तर.'' अशी इतकी आतून ओळख झाली तर...... कोणाला काही प्रकटपणे सांगावच लागणार नाही. एकमेकांच्या सहवासात राहून  अशी ओळख होत असावी. पण तसंही नसतं. मग काय हवं असतं अशी ओळख व्हायला ? त्याला सहवासाची नाही तर मनांची नाळ जोडली जाण्याची गरज असते. या ओळखीतून ब-याच गोष्टी घडतात. काळजी, प्रेम, आपुलकी , आस्था, आधार या मानसिक गरजा अशा ओळखीतून घडतात , वाढतात. 
रोज दिसणारी अनेक माणसं , ज्यांच नावसुध्दा माहिती नसत त्यांची तोंडओळख एक वेगळ नातं निर्माण करते. सकाऴी फिरायला जाताना ठराविक कट्ट्यावर बसलेले ज्येष्ठ नागरिक एखाद्या दिवशी नसले तरी जीव उगाच कासावीस होतो. रोज ठराविक वेळी येणा-या फेरीवाल्याचा आवाज आला नाही, तर मन त्या आवाजाच्या दिशेनी शोध घेतं. देवळात रोज येणारी माणसं एकमेकांना नावानी ओळखत नसतीलही. पण कोणी एखाद्या दिवशी दिसलं नाही तर बेचैन व्हायला होतं. ट्रेनमध्ये  किंवा बसमध्ये तर अशा तोंडओळखी कितीतरी असतात.  नुसत स्माईल पुरतं  ओळखींना. आता अशा ओळखींना काय लागतं हो ? पण लोक तितकं मोकळसुध्दा वागत नाहीत.असो.... तो एका वेगळ्या लेखाचा विषय आहे.
एखाद्या व्यक्तिला आपण नुसतच बघत असतो. पण ओळखत नसतो. त्याच्या किंवा तिच्याबद्दल अंदाज - आडाखे बांधतो. पण ते अगदीच चूक ठरतात. रागीट वाटणारी एखादी व्यक्ति एकदम प्रेमळ असते. प्रेमळ वाटणारी एखादी व्यक्ति तुसडी असते. म्हणजे हे वरवरचं ओळखणं किती फोल ठरतं. 
फार कशाला अगदी रस्त्यावर दिसणारी कुत्री सुध्दा अशी ओळख ठेवतात. माझ्या ओळखीचे एक आहेत. ते कॉलनीत  जाण्याची चाहूल लागताच रस्त्यावरची कुत्री लगेच शेपट्या वर करून त्यांच्या मागे जातात. असं म्हणतात की,  प्राणीजगत निसर्गाच्या जास्त जवळ असतं. त्यामुळे त्यांना शुध्द मनाची माणसं लगेच कळतात किंवा ते लगेच ओळखतात.  ही आतली ओळख  आहे नाही का ? 
सुसंवाद वाढून मनांची विण घट्ट व्हायला हवी. एकमेकांना मदतीची, प्रेमाची, आपुलकीची गरज असते.  शुध्द मनानी मैत्री करायला हवी..... अगदी कोणाशीही... अशा ओळखी माणसाचं खरं दर्शन घडवतात. नाती निर्माण करतात. सगळ विश्वच माझं घर आहे हे संतवचन अशा ओळखीतून सत्यात उतरेल. आता तर फेसबुक, व्हॉटस अप आणि अशी कितीतरी माध्यमं  आहेत, ज्यातून ओळखी वाढतात. आपली ओऴख अशीच झालीय नाही का ?  तर, मित्र मैत्रिणींनो अशीच ओळख राहूदे.... किंबहुना वाढूदे.....  

Monday 28 July 2014






पुन्हा एकदा....स्वरचित कवितेसह
वेडं मन..........






आजकाल हे काय झालय मला?

अगदी लहान आवाजाचाही कोलाहल वाटतोय

तुझ्याशी बोलता याव म्हणून,

स्वतःच्याच मनाला कोंडलय एकांतात 

पण प्रत्यक्षात काही शब्दच फुटत नाहीत.

याला काय म्हणतात माहित नाही

आणि हे जाणून घ्यायची इच्छाही नाही

कारण अशा या गो़ड अवस्थेत 

तत्वज्ञान ऐकून हे क्षण  गमवायचे नाहीयेत मला

या अवस्थेचा अंत मनाप्रमाणे झाला तर......

ईश्वरा मी शतशः ऋणी राहीन....

Sunday 27 July 2014


जरा जपून.......

सकाळची वेळ होती.... मॉर्निंग वॉकसाठी एक आजोबा रस्ता क्रॉस करत होते. अचानक रॉंग साईडनी एका मुलानी गाडी घातली. ते आजोबा बिचारे घाबरून गेले. बरं त्या मुलाला आपण काही चुकलोय याची जाणीवसुध्दा नव्हती. पुढे जाऊन निर्लज्जपणे हसत तो निघून गेला......
आज एका वेगळ्याच विषयावर तुमच्याशी बोलावस वाटतय. निदान तळेगावमध्ये फार मोठ्या प्रमाणात जाणवणारी ही समस्या आहे.कदाचित तुम्हालाही जाणवत असेल. गेले काही दिवस मी बघतीय, टू व्हीलरवर अगदी लहान मुलं भरधाव वेगानी जातायत. वेळ सकाळची असो की संध्याकाळची,  हल्ली ट्रॅफिकची समस्या गंभीर बनते आहे. त्यातच ही मुलं फारसा विचार न करता गाड्या हाणत असतात. पावसाळ्याच्या दिवसात किती घसरडे रस्ते झाले आहेत. त्यातच अशा पध्दतीनी गाडी चालवणं म्हणजे ''आ बैल मुझे मार'' असं आहे. बरं याबद्दल या मुलांना काही सांगायला जावं तर त्यांना ते पटत नाही. ''आमच्या आई बाबांना काही प्रॉब्लेम नाहीये. मग तुम्ही का टेन्शन घेताय उगाच'' असली उत्तर ऐकावी लागतात. एकदा शहाणपणा करून एका मुलाच्या पालकांशी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्या महाशयांनीदेखील असच उत्तर दिलं, ''अहो  ठीक आहे ना वय आहे मुलांच. काही प्रॉब्लेम होत नाहीये ना , मग उगाच कशाला घाबरता
तुम्ही ? ''तो मुलगा  सुरुवातीला सांगितल्यावर असं का बोलला असेल ते आत्ता लक्षात आलं. आडातच नाही तर पोहो-यात कुठून येणार.
याच गंभीर विषयावर एकदा माझ्या ओळखीच्या काकू बोलल्या होत्या. त्यांनी एका मुलाला असच ज्ञानामृत पाजण्याचा प्रयत्न केला. एक अगदी शाळकरी मुलगा भरधाव वेगात चारचाकी चालवत होता. त्याला त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यानी उलट काकूंनाच समजावलं, ''तुम्ही जुन्या पिढीतले लोक फार घाबरट आहात. आता जग बदललं आहे.  कुठल्या जमान्यात आहात तुम्ही.''  काकूंनी हार मानली नाही. त्या बिचा-या त्याच्या वडिलांकडे गेल्या. त्यांना म्हणाल्या, '' अहो तुम्ही तरी समजावून सांगा तुमच्या मुलाला. '' तर त्याचे वडिल म्हणाले, '' अहो काकू , गाडी आमची, मुलगा आमचा, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ? आणि आमचं लक्ष आहे ना आमच्या मुलाकडे. तुम्ही कशाला उगाच काळजी करताय ? ''
या दोन्ही उदारणावरून  त्या मुलांइतकाच त्यांच्या आई वडिलांचा पण दोष आहे असं मला वाटतं. शाळकरी मुलांना गाडी हातात देणं चूक आहे. एक तर त्यांच वय आणि मन दोन्ही विचित्र असतं. या वयात फास्ट गाडी चालवण्याची उर्मी त्यांच्या मनात असली तर ते चूक नाही. धूम १, २, ३ आणि येणारे सगळे तसचं इतर सिनेमांमध्येदेखील गाड्या उडवणं हा प्रकार ही मुलं आणि मुलीसुध्दा पहात असतातच. त्यात पालकांचा पाठिंबा मिळाला तर काय विचारायलाच नको.  या सगळयामुळे आपल्या मुलाचा जीव धोक्यात येईलच. पण चालणा-यांनासुध्दा धोका आहे. हे लक्षात घ्यायला हवं. गाडी चालवण्याची क्रेझ असणं स्वाभाविक आहे. पण प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. नाही का ? लायसन्सवर वय टाकण्यामागे नक्कीच खूप मोठा विचार केला गेला असणार. आपण नेहमी कायद्यांच्या बाबतीत उलट सुलट बोलतो. पण हे कायदे  आपण आणि आपल्या आसपासचे लोक पाळतात की नाही ही जबाबदारी पण आपलीच आहे
ना ?
 कोवळ्या वयाच्या या सळसळत्या तरूणाईला जपण्याचं आणि त्यांना योग्य दिशा दाखवण्याचं काम आपलच आहे. आपला जीव इतका स्वस्त नाही की तो अशा रीतीने गमवायला लागावा. नंतर दुःख करत बसण्यात काहीही अर्थ नाही. खूप मनापासून विनंती आहे की, चुकीच्या वयात मुलांच्या हातात अशा कोणत्याही गोष्टी पडू देऊ नका, की ज्यामुळे नंतर पश्चाताप करावा लागेल.
एका कवीच्या सुंदर ओळी आठवतात,
उसळत्या रक्तात मला ज्वालामुखीचा दाह दे,
वादळाची दे गती , पण भान ध्येयाचे असूदे. 

Tuesday 22 July 2014



स्कूल चले हम..........

शाऴा आणि शाळेच्या आठवणी आपल्या सगळ्यांच्याच मनाच्या आतल्या कप्प्यातल्या असतात. मला जर देवानी असं विचारलं की, ''बोल तुला तुझ्या आयुष्यातला कोणता काळ पुन्हा एकदा जगायला आवडेल?'' तर मी म्हणेन, ''देवा, मला माझ्या शाळेच्या दिवसांमध्ये पुन्हा एकदा जायचय.''
त्याला कारणही तसच आहे हो. माझी शाळा आहेच तशी अगदी आत्ताच्या फुलऑन भाषेत बोलायचं तर '' लय भारी  ''.  भोरला राजा रघुनाथराव विद्यालयात आम्ही शाळेमध्ये खूप मजा लुटली आहे. आनंददायी शिक्षण म्हणजे काय ते मनसोक्त अनुभवलं आहे. भरपूर स्पर्धा, खूप खेळणं, प्रार्थना म्हणणं, कविता म्हणण्यासाठी (कविता चालीत शिकवण्यासाठी) सगळ्या वर्गामधून जाणं, पावसाळ्यात ग्राऊंडवर स्केटिंग करताना पडणं, शाळेबाहेर बसणा-या  गोळया बिस्किटवाल्या काकांकडून कधीतरीच  खाऊ घेणं, नाटकात काम करणं, खूप पुस्तकं वाचणं , गॅदरिंगमध्ये तर काय विचारूच नका........
शाळेचा विषय निघाला ना की माझं असच होत. खूप बोलावस वाटतं भरभरून. पण आज काही वेगळच सांगायचय मला.  परवा मी पुन्हा एकदा विद्यार्थिनी होण्याचा आनंद लुटला. पुण्याच्या मा.स. गोळवलकर शाळेत माझ्या भाच्याच्या शाळेत मला ही संधी मिळाली. त्या शाळेत ''पालक शाळा'' नावाचा अभिनव आणि प्रचंड आनंददायी उपक्रम राबवला जातो. दर वर्षी एक दिवस पालक मुलांऐवजी शाळेत येतात आणि विद्यार्थी बनतात.
मी अशी संधी सोडणं शक्यच नव्हतं. शाळेत जायचं म्हणून लवकर उठून पहिल्या लोकलनी पुण्यात गेले. एक सांगायचच राहीलं. मी दुसरीत होते बरं का........ताई वर्गात आल्या होत्याच. मग आम्ही सगळ्यांनी प्रार्थना म्हटली. मग प्रतिज्ञा झाली. भारत माझा देश आहे..... सारे भारतीय माझे बांघव आहेत.... आश्चर्य म्हणजे प्रतिज्ञा मला आठवत होती. खूप मस्त वाटलं. मग भाषेचा तास सुरू झाला. कविता, धडे, चित्रवर्णन असं सगळ शिकवलं. मग हस्तकलेमध्ये खराट्याच्या काडीचा मस्त शो पीस बनवायला शिकवलं. मग माझा नावडता तास सुरू झाला. गणित..... पण सुदैवानी लगेच मधली सुट्टी झाली. मग काय सगळ्या पालक विद्यार्थ्यांनी डबे खाल्ले. एरवी मुलांना बळेच पोळी भाजी खायला घालणा-या चीटर पालकांनी डब्यात खाऊ आणला होता. मध्येच संगीताच्या ताई आल्या. वा..... किती छान. ''आम्ही गड्या डोंगरचे रहाणार, चाकर शिवबाचे होणार... '' हे झकास गाणं आम्ही अगदी तालासुरात म्हणलं . पुन्हा गणिताचा तास........ मूल्यवाचक आणि क्रमवाचक संख्या..... बापरे..... डोक्यावरून गेलं. पण त्या ताई इतक्या छान शिकवत होत्या की त्या वर्गातल्या मुलांचा हेवा वाटला. सोप्या पध्दतीनी केलेली वजाबाकी माझ्यासारख्या अगणिती (अमराठी सारख हं) विद्यार्थिनीला सुध्दा जमली.
असा सुंदर दिवस खूप दिवसांनी अनुभवायला मिळाला. त्यासाठी माझी वहिनी सोनाली, भाच्चा निषाद आणि अर्थात  गोळवलकर शाऴेचे मनापासून आभार. असे उपक्रम सगळ्या शाळांनी राबवले पाहिजेत. अर्थातच पालकांनीदेखील उत्साहानी त्यात सहभागी झालं पाहिजे. पालक सभेपुरतं शाळेशी कनेक्ट न रहाता, शाळेशी
ख-या अर्थानी जोडलं जाण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आहे. आता मी वाट पहातीय पालक शाऴा परत कधी भरेल याची.........

Wednesday 16 July 2014




मी एकटीच माझी असते कधी कधी .....



रेडिओवर एक मस्त गाणं लागलं होतं. मी एकटीच माझी असते कधी कधी ..... गर्दीत भोवतीच्या नसते कधी कधी....वा वा.... काय सुरेख शब्द आहेत. या गाण्यावरून मनात विचार आला. खरच आपण एकटेच असतो नाही ? कोणी कितीही जवळच असलं तरी आयुष्यभरआपली आपल्यालाच  साथ असते. समाजात मिसळणा-या माणसाला एकटेपणा नको वाटतो. पण काही वेळा सभोवताली असलेल्या गर्दीच्या जाणीवेपलिकडे असणारा एकटेपणा कधी अनुभवलाय का ?
यावरून माझे आवडते लेखक प्रविण दवणे यांच्या पुस्तकातल्या काही ओळी आठवल्या........  
गगनभरल्या आठवणींचे, गर्द झाडीत शिरती थवे
ओला काळोख आळत येतो, उकत्या झाकत्या काजव्यांसवे
ही गर्द झाडी मनातलीच. आठवणींच एक आभाळ होतं. या आठवणी दंश करतात. त्यामुळेच न दिसणा-या दरवाज्यांच्या कड्या आपण न दिसणा-या हातांनी लावून घेतो. आणि गर्दीत न दिसणारे आपण त्या गर्दीतच एकाकी ठरतो. जगाला वाटतं अरे हा इतका सुखी माणूस असा दुःखात का ? पण ब-याचदा या का ? चं उत्तर आपल्यालाच माहिती नसतं.
आपण आलोत एकटे आणि जाणारही एकटे असं कितीही म्हणलं ना तरीही ''विरह'' हा एकटेपणा वाढवतो . अस्तित्वाची किंमत दूर गेल्याशिवाय कळत नाही. पण ही किंमत मोजताना अस्तित्वच हरवून बसतं. काही वेळा हा विरह परिस्थितीमुळे येतो. पण काही वेळा माणसं ठरवून लांब रहातात. अगदी आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो त्याच्यापासून लांब रहातात. का करतात लोक असं? कोणती तत्व बाळगतात
उराशी ? अगदी एका घरात राहून सुध्दा एकाकी रहातात. हल्ली त्याला अभिमानानी TTMM असं म्हणतात. तुझं तू माझं मी. अरे ठीक आहे.... द्या स्पेस एकमेकांना. पण एकमेकांमध्ये हरवून जाऊन, एकमेकांच्या सोबतीनं वाट चालली तर .... रस्ता लवकर संपेल. इच्छित स्थळी लवकर पोहोचता येईल.
एकटेपणा घालवण्यासाठी किंवा एकाकीपणावर मात करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. आपल्याला एकाकी सोडून गेलेल्यांसाठी हळहळ करत बसण्यापेक्षा, जिथे आपली खरच गरज आहे अशा ठिकाणी गेललं बर नाही का ? जगात अनेकांना फक्त मायेची नितांत गरज असते. आपला एकटेपणा अशा लोकांसाठी वरदान ठरू शकतो. मित्र मैत्रिणींनो आपण मात्र एकमेकांना कधीच एकटं सोडायचं नाही बरं का......