जपुया कोवळ्या कळ्यांना आणि मनांना...........
मित्र, मैत्रिणींनो, एका वेगळ्या विषयावरचा लेख ...........
सरिता एक उच्चशिक्षित, सुंदर , हुशार तरूणी. तिचं लग्न अजयशी झालं. अगदी दृष्ट लागावा असा जोडा. पण का कुणास ठाऊक लवकरच या दोघांच्यात खटके उडायला लागले. भांडणं होऊ लागली. अगदी मानसोपचारतज्ज्ञाकडे जायची वेळ आली. तेव्हा कळलं, सरितावर तिच्या अजाणत्या वयात अगदी तिच्या घरातल्या कोणीतरी अत्याचार केला होता. त्यामुळे नवरा बायकोमधल्या नाजुक, तरल संबंधांविषयी तिच्या मनात तिडिक बसली होती. सगळे पुरूष वाईट असतात अशी तिची भावना झाली होती. मात्र अजयच्या मदतीने ती या भयंकर मनोवस्थेतून बाहेर आली.
अशा अनेक सरिता आपलं आयुष्य घालवत असतील. पण सगळयांनाच असे अजय भेटतात का ? नाहीतर लग्नानंतरही पुरूषार्थ गाजवून बायकोच्या मनाविरूध्द संबंध ठेवणारे पुरूष आहेतच की. तो एक वेगळाच विषय आहे. या विचारांबरोबरच मनात आलं,
''बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा.'' ही हवीहवीशी मागणी करणा-या या काव्यपंक्ति आता तितक्याशा हव्याशा वाटत नाहीत. रोज वर्तमानपत्र उघडल्यानंतर अल्पवयीन मुलींवर, बालिकांवर होणारे अत्याचार मन सुन्न करतात. काही वेळा असा सुर सुध्दा ऐकू येतो, ''आमच्या वेळी नव्हतं हे असं.'' पण खरच असं आहे का? पूर्वीपासून हे अत्याचार होत असणार. फक्त आता प्रसिध्दी माध्यमांमुळे या घटना प्रकाशात येऊ लागल्या आहेत. ज्या वयात मुलींना चांगल काय वाईट काय याची पुसटशी सुध्दा कल्पना नसते, त्यावेळी त्यांच्या कोवळ्या मनावर ओरखडे उठतात. काही वेळा हे ओरखडे इतके भयंकर असतात, की त्या मुलींचं आयुष्य पणाला लागतं. भावनाविरहित असं जिवंत प्रेतासारख आयुष्य तिच्या वाट्याला येऊ शकतं. या सगळ्या भयानक परिस्थितीचा विचार केला तर अनेक पालकांना आपल्या लहानग्यांना शाळेत सोडायला सुध्दा भीती वाटते आहे, असं चित्र दिसत. महिलांवर, युवतींवर होणा-या अत्याचारांचा प्रतिकार करणं अवघड आहे. पण अशक्य नाही. मात्र लहान वयातल्या मुलींवर होणारे अत्याचार कसे थांबणार?
या अत्याचारांमध्ये घडणा-या घटनांचा मागोवा घेतला तर हे लक्षात येतं की, ब-याच वेळा हे अत्याचार घरातल्या किंवा ओळखीच्या लोकांकडून केले जातात. काही बातम्या तर इतक्या शॉकिंग असतात की त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाही. ''वडिलांनी मुलीवर अत्याचार केला'' ही अशीच एक बातमी. कुंपणानीच शेत खाल्लं तर राखण कोण करणार? प्रत्येक मुलीसाठी वडिल म्हणजे आनंदाचा ठेवा असतो. मुलीचं रक्षण करणं हे तर वडिलांच पहिलं कर्तव्य. आपल्या आयुष्यात कोणतीही अडचण आली तर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणारे आपले वडिल नराधमासारखे वागायला लागल्यावर त्या मुलीच्या मनात कोणत्या भावना येत असतील हे शब्दात सांगणे अशक्य आहे.
खाऊमधून गुंगीचं ओषध देऊन त्या मुलीवर अत्याचार करणं ही अशीच एक लाच्छंनास्पद घटना. अंध आणि विशेष मुलींच्या बाबतीत किंवा शारिरीक व्यंग असणा-या अल्पवयीन मुलींच्या बाबतीत तर हा प्रश्न बिकट आहे. रोजच्या व्यवहारातल्या भावना समजून घेण्यासाठी सक्षम नसणा-या या मुलींना या रानटी आणि पाशवी भावना कशा समजणार? बरं, या मुलींच्या बाबतीत दुर्दैव म्हणजे, त्यांना प्रेमानी जवळ करणारी माणसंच फार थोडी असतात. त्यामुळे अशा कोणत्याही माणसाला अडवणं त्यांना शक्य नसतं आणि जे होईल ते प्रेमानी केलेला स्पर्श आहे अशी त्यांची समजुत होत असेल का?
अल्पवयीन, निरागस मुलींच्या बाबतीत पाशवी कृत्य करणा-या या राक्षसांना या मुलींचे निष्पाप, गोंडस चेहेरे दिसत नाहीत का? ज्या मुलींची मानसिक आणि शारिरीक वाढ अपूर्ण आहे अशा मुलींवर अत्याचार करून त्यांना नेमकं कोणतं राक्षसी समाधान मिळत असेल?
या सगळ्या कृतीमागे विकृती, असमाधान आणि मनावर ताबा नसणे या गोष्टी आहेत. स्त्रियांकडे भोगाची वस्तू म्हणून बघण्याचा पुरूषांचा दृष्टिकोन हे अजून एक कारण. महिला किंवा युवतींवर होणा-या अत्याचाराच्या बाबतीत त्या महिलासुध्दा तितक्याच जबाबदार असतात असा सूर ऐकायला येतो. आपलं रहाणीमान, पोशाख यावर ब-याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे तोकड्या कपड्यातल्या एखाद्या युवतीला पाहून सो कॉल्ड पुरूषार्थ जागा होतो असं म्हटलं जातं. अर्थात पुरूषांच्या या मानसिकतेमुळे त्याच्या कृत्यांना माफी मिळू शकत नाही. तसंच रात्री उशीरा कशाला बाहेर पडायचं ? आपण स्त्री आहोत हे विसरता कामा नये. क्षणभर हे जरी खरं आहे असं धरलं तरी अल्पवयीन मुलींच्या बाबतीत हे निकष गैरलागू आहेत. त्यांची काहीही चूक नसताना त्यांना हे भोगावं लागत. स्त्रीभ्रूणहत्येचं प्रमाण आधीच वाढतं आहे. त्यात अशा घटनांची भर पडली तर मुलगी हवी असं म्हणणा-यांची संख्या कमी होईल की काय अशी भीती वाटते.
हा असंस्कृतपणा दूर होण्यासाठी बालपणापासून घरातून व शिक्षणातून चांगले संस्कार होण्याची गरज आहे. लहानपणी रूजलेल्या विचारांचा प्रभाव खूप जास्त असतो. त्यामुळे पालक व शिक्षक दोघांनीही समांतर पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत. घरामध्ये मुलींना good touch आणि bad touch याविषयी मोकळेपणानी पण त्यांना समजेल अशा भाषेत सांगितलं पाहिजे. आपल्या गुप्तांगांना कोणी हात लावत असेल अशा माणसाकडे जायचं नाही. त्याला हात लावू द्यायचा नाही. इतकं मोकळ आणि स्पष्ट सांगितलं पाहिजे. कारण मायेनी , प्रेमानी स्पर्श करणारे सुध्दा असतात ना? चुकीच्या शिकवणुकीमुळे अशा प्रेमळ माणसांचं प्रेम या मुलींना मिळणार नाही. त्यामुळे या नाजुक विषयावर अतिशय नाजुकपणे मुलांशी संवाद साधला पाहिजे. फक्त मुलींनाच नाही तर मुलांनादेखील हे सांगणं गरजेचं आहे. थोड्या जाणत्या मुलांना, मुलीला कुठे स्पर्श करायचा आणि कुठे नाही हे अगदी स्वच्छपणे सांगितलं पाहिजे. तसंच आपल्या स्वतःच्या बाबतीत काय काळजी घेतली पाहिजे हेदेखील सांगितलं गेलं पाहिजे. हे सगळ लिहित असताना एक जाणवलं अगदी आमच्या पिढीतल्या आई वडिलांनी तरी कुठे हा मोकळेपणा जपला होता? पण आता तरी हे बोललं पाहिजे.
महिलांच्या बाबतीत स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण उपयोगी ठरेल. मात्र या लहानग्यांच्या बाबतीत पाशवी वृत्तीच्या मनांना प्रशिक्षण आणि त्यांची उत्तम प्रकारे मशागत करणं गरजेचं आहे. कारण शिक्षा देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत. कारण जुलमाचा राम राम किती दिवस टिकतो? बलात्का-यांना कायदा काय करू शकतो हे माहिती आहे. त्यामुळे कायद्याच्या बडग्यानी फरक पडेल का ? एखादी गोष्ट करणं किंवा न करणं हे एकदा मनानी घेतलं की कोणत्याही कायद्याची आणि शिक्षेची गरज उरणार नाही.
अजून एका गोष्टीवर नियंत्रण ठेवल पाहिजे, ते म्हणजे टी.व्ही.वर दाखविल्या जाणा-या कार्यक्रमांवर. एखादी कौटुंबिक सिरियल बघत असताना मध्येच एखाद्या पॉर्नस्टारची विचित्र जाहिरात दाखवण्यात येते. ही जनजागृती आहे. पण भलतीच जागृती होते या सगळ्यानी. या सगळया साधनांची गरज आहे हे मान्य. पण ते दाखवण्याची जागा किती चुकीची आहे. एवढचं काय वर्तमानपत्रात सुध्दा या जाहिराती मुख्य पानावर दिल्या जातात. काही गोष्टी कितीही ख-या आणि आवश्यक असल्या तरी त्या कोणत्या माध्यमातून आणि कशा दाखवल्या जातात हे महत्त्वाचं आहे. यातच भर म्हणून की काय गुगलवर काहीही टाईप केलं तरी धडाधड सगळी माहिती दिसते, व्हिडिओ दिसतात. या सगळ्याचा परिणाम मनावर होणारच. ज्या गोष्टी हळुवारपणे करण्याची गरज आहे. किंबहुना असं म्हणता येईल की, ज्या गोष्टी करून समाधान मिळणार आहे. त्या गोष्टी अशा ओरबाडणं चूक आहे हे पटवून देता आलं पाहिजे. हा विषय अतिशय नाजुक आहे. अत्यंत सावधानतेनी तो हाताळला पाहिजे. माणसानी प्रगती केली आहे पण त्यामुळे तो आपलं समाधान हरवून बसला आहे. असं म्हणण्याची वेळ येऊ नये. कारण प्रगती झालीच पाहिजे. पण त्याचबरोबर आपलं माणूसपण टिकवता आलं पाहिजे. ज्या देशात स्त्रीचा अपमान होतो तो देश कधीच प्रगती करू शकत नाही असं म्हणतात. आपला देश तर महासत्ता होऊ पहातो आहे. मग अशा या विकसित देशात भावनांच्या विकासाचे वारे कधी आणि कसे वहाणार?
अतिशय महत्त्वाच्या विषयावर अत्यंत संवेदनशीलपणे व्यक्त केलेली मनस्वी चीड... अभिनंदन...
ReplyDeleteKhup marmik ani samajik bhavna jagrut karnara vishay.....keep it up mam
ReplyDelete