बायकांची साडी खरेदी
पावसाळा म्हणलं की आठवण होते कांदा भजी, चहा आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॉन्सून सेलची. 15, 20, 25, 50 टक्के डिस्काऊंट वगैरे गोष्टी तर मनाला भुरळ घालतात. खरेदी आणि स्त्रिया हे असच एक अजब समीकरण आहे. हल्ली नेहमीच बाजारपेठांचे रस्ते अक्षरशः फुलून येतात. पूर्वीसारखं खरेदीचं नाविन्य आता राहीलं नाही म्हणा. आता काय बाराही महिने खरेदी. पण तरीही मॉन्सून सेलची गंमतच वेगळी नाही का? पिनेवालो को .........असं काहीतरी म्हणतात ना, तसं आम्हा बायकांच होतं. खरेदीला का कोणतं कारण लागतं? पण पावसाळी सेल म्हणलं की कोणतही कारण न देता पतीराजांना यथेच्छ लुटण्याची संधी मिळते.
सारं जगणंच महागलं असलं तरी आम्हा बायकांचा खरेदीचा उत्साह जराही कमी झालेला नाही. हल्ली आपण वर्षभर सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची खरेदी करत असलो तरीही पावसाळ्यातलं शॉपिंग जरा वेगळचं असतं . प्रचंड पाऊस पडत असतानाही छत्र्या, रेनकोट यांच्यासह खरेदी करण्यातली मजा काही वेगळीच असते. एरवी चिकचिक, घाण, चिखल त्रासदायक वाटतो. पण खरेदी करताना काय होतं कळतच नाही. हे सगळ कुठे दिसतच नाही बाई.
आता कपड्यांमध्ये कितीही आधुनिकता आली असली तरीही पारंपरिक साडीला पर्याय नाही. म्हणूनच उत्तम साडीची निवड केल्यास वेगळी फॅशन काही करण्याची गरज उरत नाही. पण ही साडी खरेदी करताना यजमानांना ''कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो'' हे गाणं गुणगुणावसं वाटतं. पण बायकोच्या उत्साहाच्या झ-याला बांध घालण्याचं सामर्थ्य पतीराजांकडे कुठे असतं.
नेमक्या कोणत्या दुकानात साडी घ्यायला जायचं हा ही एक यक्षप्रश्नच असतो. जाहिरातींना भुलून, एकावर एक फ्रीच्या नादात अनेक दुकानांना भेट दिली जाते. मग काय ह्या दुकानातून त्या दुकानात अशी वारी निघते. पुढे यजमानीण बाई आणि मागे मागे यजमान आणि पिल्लू. असा तांडा त्या प्रचंड गर्दीतून चाललेला असतो. बर बाईसाहेबांचा उत्साह इतका असतो की. एरवी पायी चालण्याचा कंटाळा असणा-या त्या अगदी उत्साहात तरातरा चालतात. (पावसाची पर्वा न करता) यजमान त्यांच्या ओढीनी ओढग्रस्तपणे मार्ग कंठत असतात.
बर नवरा नुसता बरोबर असून आम्हाला चालत नाही. त्यानी आमच्या निवडीवर, ती साडी कशी दिसेल यावर कमेंट पास केलीच पाहिजे असा आग्रह असतो. बर तो बिचारा म्हणाला ना की, ''मस्त आहे साडी.'' की म्हणायचं, ''तुम्हाला ना काही चॉईसच नाहीये.'' जर तो म्हणाला, ''जरा दुसरा रंग बघ ना.'' तर म्हणायचं, ''अय्या, काय तुम्ही वेंधळे आहात. कित्ती युनिक रंग आहे हा.''
या खेरदी प्रकरणात आणखी गंमत येते सेल्समन जेव्हा यजमानीण बाईंना फुगवून सांगतो की तुम्हाला ही साडी कशी चांगली दिसेल तेव्हा. मनातून सुखावलेली यजमानीण बाई लगेच ट्रायल वगैरे घेते. पलिकडच्या बाजुला मुलाला, पिशवीला सांभाळणारा आणि अन्य गि-हाईकांमध्ये रमलेल्या
नव-याला हाका मारून मारून विचारते. तोही बिचारा केविलवाणेपणानी हो हो करतो. सगळ काही फिक्स होतं. तेव्हाच मॅडमना शेजारच्या गि-हाईकाच्या समोरील ढिगा-यातील एक साडी आवडते. रंग, पोत, कापड सगळ मनात भरतं. पण ती साडी त्या बाईंनी घेतलेली असते. अर्थात ती तिला आवडलेली असतेच असं नाही. तिला या बाईंच्या हातातली साडी आवडलेली असते. अखेर परस्पर संवादातून आणि सामंजस्यातून दोघीही सुखावतात. दोघींच्या
चेहे-यावर जिंकल्याचे भाव. बिल वगैरे देऊन बाहेर आल्यावर पिशवीतून साडी काढून यजमानीण बाई म्हणतात, खरं तर तीच साडी मला जास्त चांगली दिसेल असं वाटतय नाही? या प्रश्नावर मात्र पतीराज हतबल होतात. या प्रचंड जनसागरात मी हरवून का जात नाही असा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारून चेहे-यावर जमेल तितकं हसू ठेवून मला जाऊद्या ना घरी....... हे गाणं गुणगुणतात (मनातल्या मनात).
No comments:
Post a Comment