नातं........
नातं म्हणजे काय हो ? दोन माणसांचे , दोन मनांचे संबंध . नातं निर्माण करायचं , ते टिकवायचं हे कोण ठरवतं ? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न ? अर्थात ती दोन माणसं. पण कित्येकदा असं होतं की कोणतही नातं डेव्हलप होण्याआधी समोरची व्यक्तिच ठरवून टाकते की हे शक्य नाही बाबा. इतकं सोप कसं वाटतं लोकांना...
अहो अगदी रोज संपर्कात येणा-या निर्जीव वस्तूंवर सुध्दा आपला जीव जडतो. आपलं पेन, आपलं घर, घराच्या भिंती, आपली गाडी. आम्हा बायकांचा जीव तर चमचा , वाटीवर सुध्दा जडतो. अशा स्वभावाच्या लोकांचा ख-या खु-या जिवंत माणसांवर किती जीव जडत असेल ? नाही सांगता येणार शब्दांत. मला मान्य आहे प्रॅक्टिकली वागणा-या लोकांना हे सगळ फार बालिश वाटेल.
प्रत्येक जण आपल्याला हवं असलेलं काहीतरी मिळवण्यासाठी आयुष्यात येतो. तो भाग मिळाला की आपसुक निघून जातो. हे कितीही खरं असलं तरी, एक वेगळा विचार मला मिळाला , तो तुमच्याशी शेअर करते. कदाचित या शेअरिंगमुळे आपलं नात घट्ट होईल. आपल्या आयुष्याला प्रवासाची उपमा दिली तर आपल्याला भेटणारे सगळे सहप्रवासी. प्रत्येक सहप्रवासी किती काळ आपल्या सोबत असेल सांगता येत नाही. फक्त इच्छित स्थळ एक असणारे सहप्रवासीच शेवटपर्यंत आपल्याबरोबर रहातात. मग इच्छित स्थळ एक नसणा-यांनी प्रवास करायचा नाही का ? हो करायचा ना. एक तर आपलं इच्छित स्थळ बदलायचं. किंवा त्या इच्छित स्थळानंतरचा प्रवास पुन्हा नव्याने सुरू करायचा. फक्त अट एकच, त्या काळापुरते आपले रस्ते बदलत आहेत हे त्या दोघांनाही माहिती हवं. ते कुणा एकानीच ठरवून प्रवास अर्धवट सोडणं योग्य नाही.
यापुढे जाऊन अजून एक गोष्ट जी अगदी अध्यात्मिक पातळीवर सुध्दा सांगितली जाते. शांत राहून या प्रवासाची मजा लुटता यायला हवी. जे आपलं असतं ते आपल्यापासून कधीच दूर जात नाही. जे आपलं नाही ते आपल्याजवळ रहात नाही. हा नियम अगदी वस्तूंपासून व्यक्तिंपर्यंत सगळ्यांना लागू होतो. आपल्या मनाला हे सांगणं थोड कठीण जातं. कारण मनाची कृती आपल्या कृतीच्या शंभर पट पुढची असावी. फार वेगानी धावत ते. प्रवीण दवणे या माझ्या आवडत्या लेखकाचे हे विचार यावेळी पटकन आठवले. अनेकदा व्यक्तिंची सोबत अधूरी वाटते. मन मोकळ करण्यासाठी मनाचीच सोबत होते. उत्कट सुखाचा एखादा वेडा क्षण असो की हुरहुरत्या सांजवेळेची सल. मनच जिवलग होतं. मनाचे सूर मनाच्या मैफुलीत दरवळू लागतात आणि इथेच कुठेतरी जगण्याचं कारण सापडत.
No comments:
Post a Comment