संस्कार.........
आपल्यापैकी सगळ्यांनाच असं नेहमी वाटतं की काय हे .... आता जगात फार काही अर्थ राहीला नाहीये. सगळीकडे निराशा आहे.... कोणाला कोणाच्या सुख- दुःखाशी काहीही देणं - घेणं नाहीये...... संस्कारांचा अभाव आहे....... असं बरच काही. सगळ्यांबद्दल प्रेम , करूणा मनात असावी हे शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे. पण या परिस्थितीतदेखील आशेचे बरेच किरण आहेत. आजच एका कार्यक्रमाला गेले होते. स्वरूपवर्धिनीचं शिबीर होतं. तिथे आनंद सराफ सरांच व्याख्यान होतं.
समोर बसलेली मुलं पाचवी ते दहावी वयोगटातली होती. सर जे काही सांगत होते ते समजण्याची त्यांची मानसिकता होती असं नाही. पण मुलं शांतपणे ऐकत होती. सरांनी आपल्या आजुबाजुला रहाणा-या संवेदना टिपायला शिकवलं. आपल्या भोवताली अशी कितीतरी माणसं असतात जी समाजासाठी खूप काही तरी करत असतात. विदाऊट जाहिरातबाजी... यामध्ये पुण्यातल्या आणि पुण्याबाहेरच्या अनेकांची उदाहरणं त्यांनी सांगितली. विलक्षण आहेत ही माणसं. आपलं सुख - सुविधा सोडून समाजासाठी काहीतरी करणारे देवदूतच आहेत हे सगळे. आपण उगाच फार रडतो याची जाणीवदेखील झाली.
ठराविक काळानंतर चुळबुळ सुरू झाली. सहाजिकच होतं म्हणा. त्यांची जेवायची वेळ झाली होती. अशा वेळी कोणी कितीही चांगल बोलत असलं तरी ते चुळबुळ न करता ऐकणं जरा कठीणच. त्या मुलांपैकी एक दोघांनी नंतर येऊन शंका विचारल्या. मला खूप बरं वाटलं. हाच तो आशेचा किरण..... रेणू गावस्कर कोण आहेत ? रिमांड होम म्हणजे काय ? त्या मुलांचे आई बाबा कुठे रहातात मग ? असे प्रश्न त्या वयात पडले हेच खूप. त्या मुलाने आणखी एक चांगला प्रश्न विचारला . आम्हाला पण असंच काम करायच आहे. तर आम्ही काय करू ? त्यावर सरांनी सांगितलेलं उत्तर फार छान आहे. ते म्हणाले, ''शाऴेमध्ये जर एखाद्या मुलाने डबा आणला नसेल आणि तुझ्या आईनी गोडाचा शिरा डब्यात दिला असेल तर काय करशील ?'' तो मुलगा पटकन म्हणाला, ''मी शेअर करीन.'' वा वा मिळाला आशेचा किरण. ५० मुलांपैकी एकाला हा विचार पटला... त्याच्या मनात रूजला.... मस्त वाटलं मला.
यावरून एक जाणवलं . आपणच आपल्या मुलांच्या मनात संवेदना जागृत ठेवायला कमी पडतोय. रस्त्यावर, ट्रेनमध्ये फिरणारी अनाथ मुलं पाहून आपल्या डोळ्यातली करूणा संपल्यासारखी झालीय. मला मान्य आहे की काळ बदलला आहे. काही वेळा अशा लोकांकडून धोका हेईल की काय असे दिवस आलेत. पण तरीही मला वाटतं आपण संवेदवा जागृत ठेवायला हव्यात. फार मोठं समाजकार्य शक्य नसेल तर निदान आपल्या मुलांमध्ये तरी करूणेचा, मायेचा झरा जिवंत ठेवूयात. कारण हीच मुलं पुढची पिढी घडवणार आहेत.
समाजात प्रचंड विषमता आहे. अति गरीबी आणि अति श्रीमंती अशी टोकं आहेत. तरीही आपल्या परीने समाजाचं देणं देण्याचा प्रयत्न करूयात. मुलांवर वेगळे संस्कार करण्याची गरज नसते. आपलं पाहूनच मुलं शिकत असतात. त्यामुळे संस्कार करायचे असतील तर ते स्वतःच्या मनावर करायला हवेत.
No comments:
Post a Comment