नॉट आऊट 100 ..............
काल एका खुप मस्त कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. आमच्या तळेगावला एक वृध्दाश्रम आहे ''वानप्रस्थाश्रम'', तिथे मोहोळकर आजींचा शंभरावा वाढदिवस साजरा केला होता. त्या वृध्दाश्रमाला वेगळाच साज चढवला होता. एरवी डोळ्यात दुःखाची किनार असणा-या सगळ्या आजी आजोबांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक जाणवली. त्या वृध्दाश्रमाला लाईटच्या माळा लावल्या होत्या. फुगे, फुलांच्या माळा आणि रोषणाईनी सगळा परिसर सजला होता. छोट्याश्या स्टेजवर छान फ्लेक्स लावले होते. एरवी स्वतःला मान्यवर म्हणवणारे समोरच्या खुर्चीवर बसले होते. स्टेजवर काही मान्यवर होते. पण इतर वेळी असतो तसा त्यांचा बडेजाव नव्हता. आजींचा सत्कार करायला 105 वर्षांचे अंबोरे आजोबा आले होते. आजही शेतात खुरपं घेऊन काम करणारे ते आजोबा पाहिले आणि थक्क झाले. डोक्यावर पागोट, धोतर, पैरण असा साधा वेश घातलेले आजोबा सॉलिड होते. स्माईलिंग हार्टस नावाच्या तरूणांच्या एका ग्रुपनी आणि आमच्या उर्मिला ताईंनी सगळा कार्यक्रम आखला होता. अर्थात आश्रमातल्या सगळ्या सदस्यांची त्यांना साथ होतीच.
या कार्यक्रमाला आल्यानी शंभरीतल्या एका युवतीचं दर्शन घडलं. वयाच्या 14 व्या वर्षी लग्न झालेल्या आजींना खूप लवकर म्हणजे तिशीच्या आतच वैधव्य आलं. किती भयंकर आहे हे सगळं. आजकाल तिशीत मुली लग्न सुध्दा करत नाहीत. तारूण्यात कोसळलेल्या या संकटाला आजींनी झुंज दिली. मशिनवर कपडे शिवून संसार केला. मुलांना शिकवून आपल्या पायावर उभं केलं.
इतकं सगळ सोसून त्या गेली 15 वर्ष वृध्दाश्रमात आहेत. आता ते का ? कसं ? या वादात आपण न पडलेलं बरं. तो एक स्वतंत्र विषय आहे. पण वृध्दाश्रमातदेखील त्या आनंदानी रहातायत. तिथल्या सगळ्या उपक्रमात सहभागी होतायत. आपला आहार, व्यायाम हे सगळ अगदी योग्य पध्दतीनी पाळतायत. सत्काराला उत्तर देताना त्यांनी अगदी थोडक्यात आपल्या मनातले भाव व्यक्त केले. तिथे त्यांच्यासाठी आणलेले सगळे हार, पुष्पगुच्छ त्या आनंदानी स्विकारत होत्या. मस्तपैकी ऐटीत केक सुध्दा कापला. कुठेही आपल्या वार्धक्याच्या खुणा त्यांच्या वर्तनातून दिसत नव्हत्या. आहे त्या परिस्थितीत आनंदानी रहायचं इतका साधा सोपा मंत्र त्यांनी जपला आहे.
मोहोळकर आजींसारख जगता आलं तर आयुष्यात निराशा कधीच जाणवणार नाही. कोणत्याही काउन्सिलरकडे जाण्याची गरज भासणार नाही. जीवन आपल्याला कसं जगायचं हे शिकवत. फक्त आपली ते शिकण्याची तयारी नसते. कोणी तरी आधार द्यायला असावं असं वाटण चूक नाही. पण कोणी नाही म्हणून थांबण हे चूक आहे. आपल्याला आधार देणारे अनेक जण भेटतात. आपल्याला हवा तोच आधार मिळत नाहीये म्हणून आकांडतांडव करण्यात काय अर्थ आहे. त्यापेक्षा आत्ता जे आहे त्यामध्ये आनंदी रहाता आलं पाहिजे. प्रेम मिळवण्यासाठी आधी ते द्यावं लागतं. अशा अनेक संस्थांमध्ये कितीतरी जण आपली वाट बघतायत. तिथे आपल्या मनातल्या आनंदाची उधळण करूयात. दोन दोन तास व्हॉटस अॅपवर आणि फेसबुकवर घालवा. पण आठवड्यातला एक तास अशा संस्थांना देता आला तर. आपण नॉट आऊट 100 इतकं जगू का नाही माहिती नाही. पण जितकं आयुष्य आहे त्यात दुस-यांच्या चेहे-यावर आनंद, हसु आणण्याचा प्रयत्न करायचा. इतकं आज ठरवुयात का ?
सुरेख
ReplyDelete