मी एकटीच माझी असते कधी कधी .....
रेडिओवर एक मस्त गाणं लागलं होतं. मी एकटीच माझी असते कधी कधी ..... गर्दीत भोवतीच्या नसते कधी कधी....वा वा.... काय सुरेख शब्द आहेत. या गाण्यावरून मनात विचार आला. खरच आपण एकटेच असतो नाही ? कोणी कितीही जवळच असलं तरी आयुष्यभरआपली आपल्यालाच साथ असते. समाजात मिसळणा-या माणसाला एकटेपणा नको वाटतो. पण काही वेळा सभोवताली असलेल्या गर्दीच्या जाणीवेपलिकडे असणारा एकटेपणा कधी अनुभवलाय का ?
यावरून माझे आवडते लेखक प्रविण दवणे यांच्या पुस्तकातल्या काही ओळी आठवल्या........
गगनभरल्या आठवणींचे, गर्द झाडीत शिरती थवे
ओला काळोख आळत येतो, उकत्या झाकत्या काजव्यांसवे
ही गर्द झाडी मनातलीच. आठवणींच एक आभाळ होतं. या आठवणी दंश करतात. त्यामुळेच न दिसणा-या दरवाज्यांच्या कड्या आपण न दिसणा-या हातांनी लावून घेतो. आणि गर्दीत न दिसणारे आपण त्या गर्दीतच एकाकी ठरतो. जगाला वाटतं अरे हा इतका सुखी माणूस असा दुःखात का ? पण ब-याचदा या का ? चं उत्तर आपल्यालाच माहिती नसतं.
आपण आलोत एकटे आणि जाणारही एकटे असं कितीही म्हणलं ना तरीही ''विरह'' हा एकटेपणा वाढवतो . अस्तित्वाची किंमत दूर गेल्याशिवाय कळत नाही. पण ही किंमत मोजताना अस्तित्वच हरवून बसतं. काही वेळा हा विरह परिस्थितीमुळे येतो. पण काही वेळा माणसं ठरवून लांब रहातात. अगदी आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो त्याच्यापासून लांब रहातात. का करतात लोक असं? कोणती तत्व बाळगतात
उराशी ? अगदी एका घरात राहून सुध्दा एकाकी रहातात. हल्ली त्याला अभिमानानी TTMM असं म्हणतात. तुझं तू माझं मी. अरे ठीक आहे.... द्या स्पेस एकमेकांना. पण एकमेकांमध्ये हरवून जाऊन, एकमेकांच्या सोबतीनं वाट चालली तर .... रस्ता लवकर संपेल. इच्छित स्थळी लवकर पोहोचता येईल.
एकटेपणा घालवण्यासाठी किंवा एकाकीपणावर मात करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. आपल्याला एकाकी सोडून गेलेल्यांसाठी हळहळ करत बसण्यापेक्षा, जिथे आपली खरच गरज आहे अशा ठिकाणी गेललं बर नाही का ? जगात अनेकांना फक्त मायेची नितांत गरज असते. आपला एकटेपणा अशा लोकांसाठी वरदान ठरू शकतो. मित्र मैत्रिणींनो आपण मात्र एकमेकांना कधीच एकटं सोडायचं नाही बरं का......
वा! ख्रूपच मस्त लिहिलंयस... keep it up...
ReplyDeleteमी जाते गं कधी कधी ह्याच एकटेपणातून ... पण माझ्या या एकटेपणाच्या प्रवासातही माझ्यासारखं विचार करणारं कोणीतरी आहे, हे वाचून बरं वाटलं ... असो !
ReplyDeleteपण बाकी नेहमी सारखंच छान लिहीलं आहेस...