स्कूल चले हम..........
शाऴा आणि शाळेच्या आठवणी आपल्या सगळ्यांच्याच मनाच्या आतल्या कप्प्यातल्या असतात. मला जर देवानी असं विचारलं की, ''बोल तुला तुझ्या आयुष्यातला कोणता काळ पुन्हा एकदा जगायला आवडेल?'' तर मी म्हणेन, ''देवा, मला माझ्या शाळेच्या दिवसांमध्ये पुन्हा एकदा जायचय.''
त्याला कारणही तसच आहे हो. माझी शाळा आहेच तशी अगदी आत्ताच्या फुलऑन भाषेत बोलायचं तर '' लय भारी ''. भोरला राजा रघुनाथराव विद्यालयात आम्ही शाळेमध्ये खूप मजा लुटली आहे. आनंददायी शिक्षण म्हणजे काय ते मनसोक्त अनुभवलं आहे. भरपूर स्पर्धा, खूप खेळणं, प्रार्थना म्हणणं, कविता म्हणण्यासाठी (कविता चालीत शिकवण्यासाठी) सगळ्या वर्गामधून जाणं, पावसाळ्यात ग्राऊंडवर स्केटिंग करताना पडणं, शाळेबाहेर बसणा-या गोळया बिस्किटवाल्या काकांकडून कधीतरीच खाऊ घेणं, नाटकात काम करणं, खूप पुस्तकं वाचणं , गॅदरिंगमध्ये तर काय विचारूच नका........
शाळेचा विषय निघाला ना की माझं असच होत. खूप बोलावस वाटतं भरभरून. पण आज काही वेगळच सांगायचय मला. परवा मी पुन्हा एकदा विद्यार्थिनी होण्याचा आनंद लुटला. पुण्याच्या मा.स. गोळवलकर शाळेत माझ्या भाच्याच्या शाळेत मला ही संधी मिळाली. त्या शाळेत ''पालक शाळा'' नावाचा अभिनव आणि प्रचंड आनंददायी उपक्रम राबवला जातो. दर वर्षी एक दिवस पालक मुलांऐवजी शाळेत येतात आणि विद्यार्थी बनतात.
मी अशी संधी सोडणं शक्यच नव्हतं. शाळेत जायचं म्हणून लवकर उठून पहिल्या लोकलनी पुण्यात गेले. एक सांगायचच राहीलं. मी दुसरीत होते बरं का........ताई वर्गात आल्या होत्याच. मग आम्ही सगळ्यांनी प्रार्थना म्हटली. मग प्रतिज्ञा झाली. भारत माझा देश आहे..... सारे भारतीय माझे बांघव आहेत.... आश्चर्य म्हणजे प्रतिज्ञा मला आठवत होती. खूप मस्त वाटलं. मग भाषेचा तास सुरू झाला. कविता, धडे, चित्रवर्णन असं सगळ शिकवलं. मग हस्तकलेमध्ये खराट्याच्या काडीचा मस्त शो पीस बनवायला शिकवलं. मग माझा नावडता तास सुरू झाला. गणित..... पण सुदैवानी लगेच मधली सुट्टी झाली. मग काय सगळ्या पालक विद्यार्थ्यांनी डबे खाल्ले. एरवी मुलांना बळेच पोळी भाजी खायला घालणा-या चीटर पालकांनी डब्यात खाऊ आणला होता. मध्येच संगीताच्या ताई आल्या. वा..... किती छान. ''आम्ही गड्या डोंगरचे रहाणार, चाकर शिवबाचे होणार... '' हे झकास गाणं आम्ही अगदी तालासुरात म्हणलं . पुन्हा गणिताचा तास........ मूल्यवाचक आणि क्रमवाचक संख्या..... बापरे..... डोक्यावरून गेलं. पण त्या ताई इतक्या छान शिकवत होत्या की त्या वर्गातल्या मुलांचा हेवा वाटला. सोप्या पध्दतीनी केलेली वजाबाकी माझ्यासारख्या अगणिती (अमराठी सारख हं) विद्यार्थिनीला सुध्दा जमली.
असा सुंदर दिवस खूप दिवसांनी अनुभवायला मिळाला. त्यासाठी माझी वहिनी सोनाली, भाच्चा निषाद आणि अर्थात गोळवलकर शाऴेचे मनापासून आभार. असे उपक्रम सगळ्या शाळांनी राबवले पाहिजेत. अर्थातच पालकांनीदेखील उत्साहानी त्यात सहभागी झालं पाहिजे. पालक सभेपुरतं शाळेशी कनेक्ट न रहाता, शाळेशी
ख-या अर्थानी जोडलं जाण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आहे. आता मी वाट पहातीय पालक शाऴा परत कधी भरेल याची.........
No comments:
Post a Comment