मन मनास उमगत नाही...........
माणसाच्या मनाचा थांग लागणं फार अवघड असतं नाही का ? मन, प्रेम, पाऊस हे माझे आवडते विषय. कारण हे तीनही विषय आपल्या आतल्या भावनांना जागृत करतात. त्यातल्या त्यात 'मन' हा विषय खूप गुंतागुंतीचा. आपल्याच मनात चाललेल्या विचारांचा थांग लागत नाही. कित्येक वेळा आपण आनंदी असल्यासारख वाटतं पण तसं नसतच ते. मनातल्या या सगळ्या भावना क्षणभंगुर असतात. एखाद्याचा आपल्याला प्रचंड राग आला असेल तर तो तसाच टिकून रहात नाही. निदान माझ्या मनात तरी रहात नाही. तेवढ्यापुरता मात्र ज्वालामुखीच असतो तो.
कित्येक वेळा आदल्या दिवशी झालेलं कडाक्याचं भांडण का झालं ? हेच आठवत नाही. देवाने ही चांगली सिस्टिम बनवली आहे. सगळच लक्षात राहिलं तर जगण अवघड होईल. वाईट आठवणींमध्ये सुध्दा चांगलं शोधण्याचा प्रयत्न केला तरच जीवन सोप होईल. कारण ते वाईट आठवून मनस्तापाखेरीज काहीच मिळत नाही. आपल्यातली नकारात्मकता वाढते. बरं ज्या व्यक्तिशी हे सगळं जोडलेलं असतं, ती मजेत असते, सगळ्या चुकांचं खापर आपल्या माथी फोडून. ज्यानी त्यानी फक्त चूक कबुल केली तरी बरेच प्रश्न सुटतील. पण माझं काहीच चुकलं नाही . असा दावा करणा-यांबद्दल काय बोलणार ?
काहीही कारण नसताना मन उदास होतं. कित्येकदा हा अनुभव येतो. उगाच मन हळवं होतं. कातर होतं. आजुबाजुच्या सगळ्या गोष्टी भकास वाटू लागतात. काहीही केलं तरी मन रमत नाही. त्यातून जर अशा वेळी एकटेपणा वाट्याला आला तर काही खरं नाही. आपल्या आजुबाजुची लोकं तितकी सुज्ञ नसतात. त्यांना काहीच कळत नाही. अशा वेळी एरवी कधीही न चिडणारे आपण का चिडलो असू हेच त्यांना कळत नाही. अशा वेळी फार बडबड करणा-यांचाही त्रास होतो आणि गप्प रहाणा-यांचा तर खूप राग येतो. आपल्या मूडचा विचार कोणीतरी करावा असं वाटतं. पण माणसांवर असलेलं अवलंबन निराशा देतं.
काय बरं कराव? ध्येय ठरवावं . प्रत्येकाच्या आयुष्याला ते असतच. आपल्या मनाला पटेल तेच करावं. मायेचा ओलावा मिळाला तर मनापासून त्याचा आस्वाद घ्यावा. मनातली निराशा दूर करण्यासाठी बाहरेच्या कोणाचीही मदत घेण्यात अर्थ नाही. आपलं मनच आपल्याला आधार देतं. स्वच्छ , मोकळं जीवन जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यामुळे निराशेच्या क्षणी मनाचे फाजील लाड न करता, जीवनाच्या ध्येयाचा विचार करावा. कारण ते ध्येयच पुन्हा उभं रहाण्याची उमेद देतं.
No comments:
Post a Comment