आजारपण........
नमस्कार, बरेच दिवस झाले आपल्याला भेटून. मला तुमची आठवण येत होती. तुम्हाला येत होती का नाही माहिती नाही. कोणत्याही अभिव्यक्तिच्या कलेमध्ये कलाकार किंवा सादर करणा-याला आपल्या कलेच्या चाहत्यांची आठवण होतेच. नाही का ? म्हणजे मी हे गृहित धरते, की तुम्ही माझ्या लेखाची वाट पहात होतात. काही विचार, मुद्दे , मतं तुमच्याशी शेअर केलं की मन हलकं होतं. आज पण एका मस्त अनुभवाचं शेअरिंग तुमच्याशी करायचं आहे.
गेल्या २३ तारखेपासून म्हणजे ऑगस्टच्या हं मी एका वेगळ्या अनुभवातून जातीय. तुम्हा - आम्हा सर्वांना आलेला हा अनुभव आहे. फार काही वेगळं नाहीये. पण तरीही सांगतेच तुम्हाला.... व्हायरल इन्फेक्शन नावाच्या एका किरकोळ आजाराने मी मस्त आजारी पडले होते. हो.... मस्तच म्हणते . कारण यामुळेच मला माझ्यावर माया
करणा-या लोकांचं प्रेम अनुभवता आलं. कारण कितीही आजारी असलं तरी झोपून न रहाण्याची वाईट सवय मला आहे. पण यावेळच्या व्हायरलनी मज्जा आणली.
एका गाण्याच्या कार्यक्रमाचे निवेदन करत असतानाच व्हायरलनी आपले हात पाय पसरले. भर तापात आणि भर पावसात कशीबशी दवाखान्यात पोहोचले. मला बरं नाहीये यावर डॉक्टरसुध्दा विश्वास ठेवेनात. मग काय झाल्या तपासण्या वगैरे.... रोजच्या सकाळ संध्याकाळ बारा गोळ्यांचा पाऊस आजपर्यंत माझ्यावर बरसतो आहे. पण खरं सांगते फार मजा आली या अनुभवातून. सासुबाईंकडून सेवा करून घेता आली. इतकंच काय नव-यानी सुध्दा नारळ पाणी वगैरे आणून दिलं. मुलगा घाबरला होता. वा वा वा......... सगळे काम करतायत आणि आपण मस्त झोपून रहायचं. एरवी ते पोलपाट लाटणं आणि फोडणी यातून सुटकाच नव्हती. आजारपणामुळे चक्क दोन दिवस मी स्वयपाकघराचं तोंड पाहिलं नाही. घरी येणा-या सगळ्यांनाचआश्चर्य वाटतं होतं. अरे विनया आजारी आहे ? चेहे-यावरून तर वाटतं नाही. काय मेलं दुर्देव मी आजारी आहे हे सांगावं लागत होतं. तीच गोष्ट डॉक्टरांच्या दवाखान्यात गेल्यावर झाली. तिथे ओळखीचे सगळे लोक म्हणत होते, 'काय मग आज इकडे कुठे ? ' अरे बाबांनो , बरं नाहीये. म्हणून आलीय. पण कोणी विश्वास ठेवत नव्हतं. प्रसन्न चेहे-याचे तोटे हो दुसरं काय ....
असो..... आता मी बरी आहे. कामं करायला सुरूवात केलीय. त्यामुळे मस्त मस्त विषय घेऊन पुन्हा भेटूच....
No comments:
Post a Comment