हरवलेली माणुसकी .....
खरं तर लिहिण्याचा मूड कायम असतो. रोज काही ना काही तरी असं घडतच की त्यावर आवर्जून लिहावं असं वाटतं. पण priorities या नावाखाली आपल्याला काय हवय ते करणच आपण सोडून देतो. वेळ ही एक अशी गोष्ट आहे जेव्हा ती आपल्याकडे असते तेव्हा तिची किंमत कळत नाही . जेव्हा ती निघून जाते तेव्हा कितीही साक्षात्कार झाला तरी त्याचा उपयोग नसतो. म्हणून आज ब-याच दिवसांनी वेळेचा सदुपयोग करत तुमच्याशी संवाद साधतीय.
जग बदलतय असं आपण सगळेच नेहमी म्हणतो. आपणही बदलतोय हे मात्र लक्षात येत नाही. जगाप्रमाणे वागून आपण आपलं असं काही ठेवत नाही. खरं म्हणजे असं करायची काही गरज नाही. आपण जसे आहोत तसेच रहायला काय हरकत आहे. मला तर असं वाटतं आपण वेगळं काही वागायला गेलो तरच गडबड होते.
जग बदलतय हा अनुभव आपल्या सगळ्यांना रोजच्या जगण्यात येतोय. काल लोकलमध्ये एक घटना घडली जी मनाला चटका लावून गेली, बरच काही शिकवून गेली. लोकलमध्ये दहा वर्षांपूर्वी जितकी गर्दी होती त्या मानानी कितीतरी पट गर्दी वाढलीय. ऑफिसच्या वेळांमध्येच नाही तर अगदी कधीही गर्दी असतेच हल्ली. जग बदलतय ना .... अजून एक ठळकपणे जाणवणारा बदल म्हणजे एकमेकांशी तुटलेला संवाद. मोबाईल नामक यंत्रात आपण सगळे इतके गुंतलोय की समोर कोणी बसलय याची जाणीवच नाही. त्यामुळे समोरच्याला होणारा त्रास वाचण्याचा प्रश्नच उरला नाहीये. आपल्याला जागा मिळालीय ना मग झालं तर. एखादा पेशंट उभा असला तरी त्याचा चेहेरा वाचण्यासाठी वेळ आहे कोणाला. आपल्याला मिळालेल्या जागेवर बसणे आणि मोबाईलमध्ये तोंड खुपसणे हेच महत्त्वाचं काम. स्टेशन आलं की उतरून जायचं. पण बदलणा-या या जगात संवादाचा अभाव ही खटकणारी गोष्ट आहे. बर , सहप्रवाशाशी बोलायला जावं तर ते कितपत आवडेल या शंकेनी गप्प बसलेलं बरं असं वाढत चाललय. एखाद्याला काही प्रॉब्लेम असेल तो विचारणं आणि तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे नाक खुपसण्यासारखं झालय.
संवाद वाढायला हवा हे प्रकर्षानी जाणवलं ती घटना आता सांगते. एक मध्यम वयाची बाई आपल्या दोन मुलांना घेऊन लोकलमधून प्रवास करत होती. डोक्यावर स्कार्फ होता. चेहेरा अगदी नॉर्मल होता. ती आजारी असेल अशी शंकाही आली नाही. नेहमीच्या धबडग्यात बायका चढत होत्या, उतरत होत्या. थोडी जागा झाली की तिथे बसण्यासाठी झुंबड उडत होती. खरं तर मला बसायला जागा हवी होती, पण त्या बाईला बसायला जागा मिळाली. त्यावेळी तिचा थोडा राग आला. कारण मी बसणार इतक्यात ती बाई बसली. त्याच डब्यात तिची आई लांबून सूचना देत होती, ''नीट बस, स्कार्फ नीट लाव.'' मला काही कळेना , हा काय प्रकार आहे. शेवटी न राहवून मी विचारलं तेव्हा ती बाई म्हणाली, ''कालच माझी दोन ऑपरेशन्स झाली. एक पोटाचं आणि दुसरं डोक्याचं. नगरच्या पुढे शेवगावला मला जायचं आहे. मुलांच्या शाळा बुडू नयेत म्हणून नव-यानी माहेरी राहू दिलं नाही. '' मी अक्षरशः चाट पडले. काय धीराची आहे ही बाई. सो कॉल्ड नाजुक बायकांनी आदर्श घ्यावा अशी. मला असं वाटलं, अगदी क्षुल्लक आजाराचा बाऊ करण्याची सवय लागलीय का आपल्याला ?
परिस्थिती माणसाला कोणत्याही दुःखाशी दोन हात करायला शिकवते. त्या व्यक्तिला आपल्या फक्त मॉरल सपोर्टची गरज असते. पण जग बदलतय या नावाखाली ही माणुसकी दाखवायला आपण कमी पडतोय की
काय ?
अतूट नातं......
खूप दिवस झालेत तुमच्याशी बोलून. रोज शेअर करावं असं काही ना काही असतच. पण गेल्या काही दिवसात नाही जमलं. खुप व्यस्त वगैरे नव्हते. पण तरी नाही वाटलं लिहावं असं . तुमच्या माझ्यामधला अतूट धागा हा ब्लॉग आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळेच कदाचित मी न बोलताही आपल्यातली कनेक्टिव्हीटी तशीच होती. जशी माझ्या आणि त्याच्यामधली.... ओळखलं असेलच तो कोण ते . बरोबर... पाऊस. आज मला हवा तसा तो आला. अगदी अचानक. कोणत्याही अटीशिवाय , कोणत्याही हानिशिवाय. फक्त आनंद देण्यासाठी.
रोजच्या आयुष्यातही हल्ली, उगाच आनंद देण्याचं प्रमाण खूपच कमी झालय. मध्यंतरी तो असा काही रूसला होता की विचारू नका. असं वाटलं , आता येतोय की नाही. खरं तर त्याला रुसण्याचा पूर्ण हक्क आहे. काय विचित्र वागलोय आपण सगळेच. तो मात्र मला हवा तसा. समोरचा कसाही वागला तरी आपण आपल्याला जे योग्य वाटेल तसच वागावं असं सांगणारा. कोणताही राग मनात न ठेवता तो आज बरसला. मनाची काहिली दूर केली. स्वच्छ आणि मोकळा झाला बरसून, अगदी मला हवा तसा.
अचानक एखादी मनासारखी गोष्ट घडावी तसा आला तो. अगदी दुपारपर्यंत येण्याची चाहूलही न देता मस्त बरसला, मला हवा तसा. अनेकांची धांदल उडवणारा खोडकर, धरणीला तृप्त करणारा मेघदूत, मरगळ घालवणारा आनंददायी अशी किती नावं देऊ त्याला. माझ्या मनात तर तो कायमच भरून असतो. मनाविरूध्द काहीही घडलं की मग त्याला हक्कानी बोलवते. मनात बरसून तो माझं बिनसलेलं पार घालवून टाकतो. बाहेर कितीही वादळं असली तरी मनातला हा पाऊस कुठल्यातरी कोप-यात असाच ठेवायला हवा. कारण बाहेरचं कोणीच मनातली वादऴं, अप्रिय, राग येईल असं दूर करू शकत नाही. बरोबर ना ? कारण प्रत्येक नात्याला लिमिटेशन्स आहेत. कितीही आणि काहीही वाटलं तरी दुस-यासाठी फार काही करता येत नाही आणि कोणी आपल्यासाठी काही करू शकत नाही. या सत्याचा सामना झाला की मनातला पाऊस मस्त बरसतो. आपल्याला हवा तसा. कधी रिमझिम, कधी कोसळणारा, कधी सगळ वाहून नेणारा..... जसा आज तो आला, अगदी मला हवा तसा.
उदासीत या............
उदासीत या कोणता रंग आहे? तुला ठाव नाही ,मला ठाव नाही....
तुला शब्द भेटायचे घोळक्यानी... मला मौन भेटायचे नेहमी
संदीप खरेनी लिलिलेलं आणखी एक मस्त गाणं. अगदी आपल्या सगळ्यांच्या मनःस्थितीचं वर्णन करणारं. कित्येकदा मनाची अशी अवस्था होते. मनातल्या भावनांचा जो रंग असतो तोच सगळीकडे दिसतो. परिस्थिती बदललेली असते का ? माणसं विचित्र वागत असतात का ? का सगळे आपल्या मनाचे खेळ असतात? बाहेरून विचार करणारी माणसं वेड्यात काढतात. सगळं काही छान असताना उगाच उदास व्हायला झालय काय ? असं हिणवतात. एका दृष्टीनी ते खरं पण असतं. कारण वरकरणी कोणतंही कारण नसताना ही उदासी का येते ?
एरवी सुरेल गाण्यांमध्ये रमणारं मन तिथेही रमत नाही. आजुबाजुची सगळी माणसं, त्यांचे आपल्याबद्दलचे विचार खोटे वाटायला वाटतात. सगळे नाटकी प्रेम आणि सहानुभूती का दाखवतायत ते कळत नाही. असं वाटतं. असं असेलच असंही नाही. पण त्यावेळी मनाला समजावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते ऐकत नाही. उदासीचा हा रंगच आवडायला लागतो. मनाच्या तळात काहीतरी असतं पण ते कळत नाही. व्यक्त होता येत नाही. शब्द सापडत नाहीत.
कोणाशी कसही वागलं तरी प्रश्न का निर्माण होतात ? आणि असे प्रश्न ज्यांची उत्तरं आपल्याकडे नसतात. ही हतबलता जास्त त्रासदायक वाटते. एकदा कारण कळलं की मग उपाय सापडवणं सोपं जातं. पण मनाच्या कप्प्याच्या कड्या नकळतपणे का लावल्या जातायत ? कोंडमारा का वाढतोय ? एका बिंदूवर सहन न होणारा कोंडमारा मन स्विकारतच नाही. मग व्यक्त व्हावसं वाटतं. पण कोणी समोर नको वाटतं. स्वतःशी बोलावस वाटतं. पण असं कसं स्वतःशीच बोलणार?
येतं स्वतःशी बोलता. कारण समोर असलेल्या कोणाशीही बोलून उदासीचा हा रंग फिका होत नाही. काहीही कारण नसेल तर उदासी कमी व्हायला फार त्रास होत नाही. कारण उदासी मनातलीच असते. मनानी वेगळ्या आणि हव्याश्या गोष्टींचा ध्यास घेतला की ही उदासी पऴून जाते. कारण असेल आणि ते सापडलं तर काय उदासी दूर होतेच होते. ब-याचदा अशी उदासी आल्यावर मनाला स्थिर ठेवणं अवघड जातं. पण तरी आपल्या प्रश्नांची उत्तरं आपणच शोधावीत. समोरून कोणी कितीही प्रयत्न केले तरी त्यावेळी ते नकोसे वाटतात. काही वेळा काहीही न करता बरं वाटतं. पण एक नक्की मनाला काय वाटतं तेच करावं. त्यातूनच सापडतो मार्ग... आपल्याला हवा असलेलाच मिळेल असं नाही. कारण नेमकं काय हवय हे कुठे कळत ???
Be Natural......
परवा एक वेगळा विचार ऐकला. खरं म्हणजे आपण सगळेच हा विचार नेहमी अनुभवतो. पण दुसरं कोणीतरी म्हणलं की अंतर्मुख होऊन विचार करायला लागतो. ''निसर्ग आपल्याला आवडतो, पण आपण नैसर्गिक वागत नाही. '' हाच तो विचार. किती खरं आहे ना हे. निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर मन शांत होतं. कसले मुखवटे, कसलाही खोटेपणा नसलेलं एक जग अनुभवायला मिळतं. निसर्गातल्या कितीतरी गोष्टी आपल्याला भुरळ घालतातच , पण जगायलाही शिकवतात. तत्वज्ञान न कळणा-या तुमच्या माझ्या सारख्या... मी माझ्याच म्हणायला हवं. कारण तुम्हाला सामान्य म्हणायचं धाडस होत नाहीये. पण निसर्गाबद्दल बोलताना तरी मनमोकळं बोलावं , नाही का ? म्हणून जे मनात आलं ते बोलले. तर मुळ मुद्दा असा की, तत्वज्ञान न कळणा-यांनी निसर्गाला गुरू करावं. बरेचसे प्रश्न चुटकीसरशी सुटतील.
बघा ना.. निसर्गात झाडावरून गळणारं पान कधीतरी रडताना पाहिलय का ? त्याचं हिरवेपण संपल्यावर ते झाडापासून अलगद , तक्रार न करता वेगळं होतं. पुन्हा मातीत मिसळून त्याच झाडावर पुन्हा उगवण्यासाठी. ते झाडही कधी पान गळून पडल्याचा शोक करत बसत नाही. कारण झाडावरल्या उरलेल्या पानांना त्याला जोपासायच असतं. आपण मात्र आपल्याला सोडून गेलेल्या माणसांबद्दल किती दुःख करत बसतो. कित्येक वर्ष हे दुः ख उगाळत बसतो. निसर्गासारखं वागता आलं पाहिजे. म्हणजे जवळच्या माणसांचा दुरावा त्रास देणारच. पण आत्मक्लेष करून न घेणं , हे तरी केलच पाहिजे.
कित्येक वेळा लावलेलं रोप काळजी घेऊनही उगवत नाही. पण मातीत मिसळणारं ते रोप तक्रार करत नाही. आपण मात्र मी एवढी मेहेनत करूनही यश मिळालं नाही म्हणून नाराज होतो. मातीत मिसळून पुन्हा उगवण्याची जिद्द निसर्गाकडून घ्यायलाच हवी.
निसर्गातला कोणताही अविष्कार डोळ्यांना हवाहवासा वाटतो. त्याचं भरभरून कौतुक करताना आपल्याला संकोच वाटत नाही. किती सहजपणे आपण निसर्गावरच प्रेम व्यक्त करतो. पण हेच सगळं आपल्या माणसांच्या जगात अलाऊड नाही. कोणी छान दिसतं असेल तर त्याचं कौतुक करणं यात काय वाईट आहे ? ते नैसर्गिकच आहे. अर्थात मनातली शुध्द भावना तितकीच महत्त्वाची. म्हणजे एखाद्या फुलपाखराकडे बघताना जितकी निरागसता मनात असते, तितकीच असली पाहिजे. काही व्यक्ती मनापासून आवडतात. ते नैसर्गिक रीतीने सांगितलं तर भलताच गैरसमज होऊन नाती तुटतात. असं होता कामा नये. आवडणं ही नैसर्गिक भावना आहे. ओरबाडणं हे अनैसर्गिक.
अंधाराकडून उजेड आणि उजेडाकडून अंधार हा निसर्गाचा नियम आहे. त्याप्रमाणे आयुष्यातही सुख, दुःख येणारच. कोणत्याही परिस्थितीत आपलं मानसिक संतुलन ढळू न देता आनंदात राहीलं पाहिजे. हे सगळ बोलणं कितीही सोप्प असलं तरी तसं वागणं अवघड आहे. पण निसर्ग आवडतो असं म्हणणा-या प्रत्येकानी असं वागण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. हिरवी झाडं, खळाळून वाहणारी नदी, थंडगार वारा, पाऊस, कोसळणारे धबधबे, रंगीबेरंगी फुलपाखरं, प्राणी - पक्षी , दरी - डोंगर असा निसर्ग न आवडणारा एक तरी माणूस असेल का ? अर्थातच नाही. त्यामुळेच निसर्ग आवडतो असं नुसतं न म्हणता त्याच्यासारख वागता आलं पाहिजे.
मना तुझे मनोगत .........
आज आशा बगे यांची एक खुप छान कथा वाचली. ''अनोळखी '' आशा बगे यांच्या सगळ्या कथा अगदी आपल्या जीवनात घडाव्यात इतक्या सहज आणि तरल आहेत. त्यांच्या कोणत्याही कथेत मुख्यत्वे स्त्रीच्या मनोव्यापाराचा विचार केला जातो. कदाचित म्हणून मला त्या जास्त आवडत असतील. ''अनोळखी'' कथेनी माझ्या आवडत्या विषयाचा वेध घेतला. आपलं मन एखाद्या डोहासारखं असत. कितीतरी वेळा मनात आलेले विचार योग्य की अयोग्य हे कळतच नाही. त्यांना थांबा म्हणलं तर ते थांबत नाहीत. कित्येकदा उगाच कातर, हळवं होत हे मन. आपल्या आजुबाजुला सगळ असूनही एकटं पाडतं. आणि अशा वेळी कोणतीही साधी गोष्ट मनाला खूप लागते. मनाच्या या डोहात माकडासारखे उड्या मारणारे काही विचार अस्वस्थ करून गेले.
रोज आपल्याला भेटणारे सगळे अचानक अनोळखी असल्यासारखे वागतात. अर्थात हा सुध्दा मनाचा खेळच असावा. कारण ज्यावेळी तीव्रतेने आपल्या मनात आग लागलेली असते , नेमकं त्याच वेळी कोणालाच वेळ नसतो. एरवी उगाच डोकं खाणारे सगळे कुठे गायब होतात काय माहिती? कित्येकदा आपलं ओळखीचं , सुरक्षित जग अनोळखी वाटू लागतं. पुन्हा एकदा पूर्णपणे अनोळखी जगात जाण्यासाठी कंबर कसली जाते. कारण अनोळखी आणि ओळखीच्या जगाला सामोरं जाण्यावाचून दुसरा पर्यायच नसतो आपल्याला.
आपण आपलं एकटच आयुष्य जगायचं असेल तर प्रेम या भावनेला काही अर्थच उरत नाही. प्रेमही व्यवहार पाहून करायचं असतं. काय वाईट दिसेल ? काय चांगलं दिसेल ? काय चौकटीत बसेल ? यावर सगळ अवलंबून आहे. अगदी मनाच्या तळातून वाटणा-या अनेक गोष्टींना अर्थच नसतो. आपण जन्म दिलेल्या आपल्या मुलांवरसुध्दा प्रेम करताना विचार करायचा असतो म्हणे. आमच्या ओळखीच्या एक आजी कायम सांगायच्या, ''आपल्या मुलांना समोरचं ताय द्याव, पण बसायचा पाट देऊ नये.'' बापरे... किती व्यवहारी प्रेम. पण काही वेळा अनुभवच माणसाला शहाणपण शिकवतो. आपल्या आजुबाजुला असणारी माणसांची फौज, ओळखी, अनोळखी सगळेच एका मर्यादेपर्यंतच असतात. म्हणजे एखाद्याला आपल्याबद्दल किंवा आपल्याला एखाद्याबद्दल कितीही वाटत असलं तरी प्रत्येकाच्या काही मर्यादाअसतात. मुलावर आईचं किती प्रेम असतं. पण तेच मुलं मोठं झालं की आईनी मन्या, पिल्या असं म्हणलेलं त्याला आवडत नाही. हल्ली मुलांना आपले पालक शाळा - कॉलेजात आलेले आवडत नाहीत. आमच्या लहानपणी आई शाळेत येत नाही म्हणून वाईट वाटायचं. म्हणजे आपल्याच मुलांवर प्रेम करायची पण एक मर्यादा आहे. ही मर्यादा ओळखली पाहिजे. तसं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपल्याला लहान वाटणारं आपलं पिल्लू आता मोठ्ठ झालेलं असत. बहुतांश नात्यांमध्ये ही मर्यादा येतेच. तिचा स्वीकार करणं यातच खरं शहाणपण आहे. नाहीतर आपल्याच अपेक्षांच्या ओझ्याखाली आपल्यालाच गुदमरायची वेळ येते.
तुटून आणि लुटून प्रेम करणं ही शंभरातल्या एखाद्या माणसाची गरज असू शकते. बाकीच्यांना फक्त व्यवहार हवा असतो. मग आपले शंभर टक्के उगाच वीस - तीस टक्के वाल्यांना का द्यायचे ? त्यापेक्षा खरच गरज आहे अशा ठिकाणी आपलं असणं हेच चांगल. हे सगळ कितीही म्हणलं तरी आपल्याला हव्या असणा-या गोष्टींमध्ये गुंतणं हा स्वभाव मन सोडायला तयार नाही. अशा वेळी मनाला विचारावसं वाटत, ''मना तुझे मनोगत मला कधी कळेल का ? ''
माझा दादू......
आजही तो दिवस आठवतो जेव्हा तो माझ्या आयुष्यात आला. माझ्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी. तो आला आणि माझं जग बदललं. आता मागे वळून पहाताना तो दिवस आजही चेहे-यावर आनंद आणतो. किती खुष होते मी त्या दिवशी, जेव्हा माझं बाळ माझ्या हातात होतं. माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस होता तो. मला मुळातच छोट्या पिल्लांची खूप आवड. त्यात आपल्याच हातात इवल्याशा त्याला पाहून मी अक्षरशः वेडी झाले होते. त्याचं पहिल्यांदा पालथं पडणं, चालणं, बोलणं, शाळेचा पहिला दिवस , स्टेजवर पहिल्यांदा उभं रहाणं हे सगळं मी खूप एन्जॉय केलं. त्यासाठी बांधिलकीची नोकरी केली नाही.
मला चांगल आठवतय . तो शाळेत जाताना त्याच्याबरोबर पावसाच्या डबक्यात पाय आपटताना मीदेखील लहान व्हायचे. त्याच्या बोबड्या बोलांनी मला कितीतरी सुख दिलं. माझं पिल्लू आज माझ्या खांद्यापेक्षा मोठ्ठ झालय.त्याच्या जन्माच्या वेळी जी हुरहुर मनात होती तीच आत्ता आहे. त्याचं कारण ,आज त्याचं जग बदलेल असा दिवस आहे. अर्थात त्याच्या जगाबरोबर माझंही. आज त्याचा दहावीचा निकाल लागला. त्याला 89 टक्के पडले. ते मार्क्स किती आहेत? त्याचं करियर कसं असेल ? याबाबत मला आत्ता अजिबात टेन्शन नाही. फक्त एकच इच्छा आहे , त्यानी चांगला माणूस व्हावं. आपल्या संवेदना जागृत ठेवून जगावं. कारण करियर, पैसा या गोष्टी मिळतातच. पण संवेदना जागृत ठेवणं गरजेचं आहे. कारण संवेदनशील माणूस कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो.
आज तो खुप खुष आहे. त्याला चांगले मार्क्स पडलेत. सगळेच खुष आहेत. त्याच्या आयुष्यात त्याला खुप समाधान मिळो. तो सदैव आनंदी राहो . हाच माझा आशिर्वाद आणि शुभेच्छा. आज पुन्हा एकदा माझ्यापासून लांब गेलेल्या माझ्या सगळ्या जिवलगांची आठवण येतीय. मला खात्री आहे ते सगळे जिथे आहेत तिथून त्याला आशिर्वाद देत असणार.... प्रणव पुन्हा एकदा अभिनंदन... खुप मोठा हो. बदललेल्या या नव्या जगात तुला कणखरपणे उभं रहाता यावं ही सदिच्छा.....
आला पाऊस.....
काल रात्रीपासूनच तुझी मी वाट पहात होते. जेव्हा मला अगदी असह्य हुरहुर लागते तेव्हा तुझी आठवण येते. का ते माहिती नाही? तुझे नि माझे नाते काय ? हे जाणून घ्यावसंही वाटत नाही. कारण तू माझ्या मनात कधीही बरसू शकतोस. माझी परवानगी न घेता. कारण वेळेचं बंधन तुला मला नाहीच. कालपर्यंत होणारी जीवाची घालमेल तू कशी क्षणार्धात संपवलीस. जादुगार आहेस तू. वठलेल्या तनामनाला पालवी देणारा. सृजनाची पेरणी करणारा. तू आलास की तुझ्याविषयी काहीतरी बोलावसं वाटतच. मग सकाळीच घरातली कामं टाकून तुझं कौतुक करत बसले मी. तू आलास की माझं असच होतं.
पाऊस सुरू झाला की हे असं काहीतरी होतं. एक मैत्रिण कायम चिडवते मला, '' या कवींना आणि लेखकांना पाऊस आला की काय होतं काय माहित ? मला तर या पावसाचा राग येतो. चिकचिक, घाण. सगळे ड्रेस खराब होतात.'' पण तिचं या कानानी ऐकून त्या कानानी सोडून देते मी. कारण पाऊस खरच नवनिर्मितीची प्रेरणा घेऊनच येतो.
पावसाची नुसती सुरूवात झाली की लगेच विविध भारतीला ''काली घटा छाये मेरा जिया तरसाये '' हे गाणं लागलं. अरे वा.... बाहेर पाऊस बरसत असताना असलं सॉलिड गाणं ऐकताना काय मस्त वाटलं. लगेच व्हॉटस अॅप चे मेसेज बदलले. Happy Rainy Morning .... या पावसानीना सगळं बदलूनच जातं. सगळ्या वाईट , अप्रिय गोष्टींचा निचरा होऊन पाणी पुन्हा एकदा वहात होतं. पाण्याचं डबक जसं वाईट तसच मनातल्या विचारांच साचलेपणही वाईटच. पाऊस पडला की सगळच स्वच्छ होतं. पुन्हा एकदा नव्यानी जगायला शिकवतो पाऊस. आपण फार लहान गोष्टी मनाला लावून घेऊन आपलं जगण अवघड करतो. पाऊस या मनोवृत्तीला बदलतो. कोणताही भेदभाव न करता सगळीकडे बरसतो. हवेत गारवा आणतो. आपल्यालाही रागाच्या काही क्षणांना थंड करण्याची कला पावसाकडून शिकली पाहिजे. रागात राग मिसळून काहीच मिळत नाही. त्यापेक्षा त्या रागावर प्रेमाचा शिडकाव केला तर पुढचे मोठे प्रश्न टळतील. नीट विचार केल्यानंतर आपल्यालाही पटत, उगाच चिडलो होतो आपण इतके. काही वेळा त्या त्या वेळेची परिस्थिती असते ती. ती वेळ गेली की सगळं नॉर्मल होतं. पण त्या वेळी असा विचार करणं कठीण असतं. पावसाला आज हे छान जमलय. काल होणारी जीवाची काहिली कशी संपवूनच टाकली त्यानी. पाऊस नसताना धुळीचे नुसते लोट उठत होते. पण पाऊस पडताच सगळं कस शांत झालं. पाऊसच प्रेमाचा धडा शिकवतो. पाऊस आला की हवा ढगाळ आणि कुंद असली तरीही हवेत एक तजेला असतो. आयुष्यात असा ढगाळपणा हवाच नाही का ?
तृप्त झाली शांत धरणी
मधुस्मिते हिरव्या कुरणी
रुसट चुंबनासम ओल्या सरी येती जाती
भुईसवे आभाळाची जुळे आज प्रीती
निसर्गासारखा नाही रे सोयरा...........
आपल्याला निसर्गाकडून शिकण्यासारखं खुप काही आहे. आपलं कर्तव्य निरपेक्षपणे बजवणे ही गोष्ट आपल्याला निसर्ग शिकवतो. म्हणजे बघा ना झाड कधी अशी फुशारकी मिरवतं का , बघा मी किती लोकांना सावली देतो. पाऊस कधी असं म्हणतो का की , माझ्यामुळेच ही सृष्टी हिरवीगार आहे. सूर्य कधीतरी विकेंडला थंड हवेच्या ठिकाणी जातो का ? पण आपण माणसं मात्र आपल्या जवळच्या माणसांसाठी जरी काही केलं तरी हजार वेळा बोलून दाखवतो आणि परतफेडीची अपेक्षा करतो. इतकच कशाला आपला शब्द ऐकला जातो तोवर सगळी नाती प्रिय वाटतात. जेव्हा आपला अपमान होतो किंवा आपल्या मनाप्रमाणे वागलं जात नाही तेव्हा हीच आपली माणसं आपली वाटेनाशी होतात. निसर्गात मात्र असं होत नाही. याचा अनुभव नुकताच घेतला.
माझ्या घराच्या छोट्याश्या गच्चीत एका पारव्याच्या जोडीनी त्यांच्या प्रेमाचा पुरावा झाडाच्या एका कुंडीत ठेवला. सगळे सरपटणारे प्राणी, चिमण्या , पक्षी यांना आमच घर comfortable आणि सुरक्षित वाटतं की काय काय माहित. जुनी लोकं म्हणतात ना, घर फक्त आपलच नसतं. त्याचा प्रत्यय येतो मला नेहमी. त्या पारव्याच्या जोडीतला बाबा, आई आणि अंड्यांची सोय करून निघून गेला. आई मात्र त्या अंड्यांच रक्षण करत होती. त्यात मध्येच पाऊस पडायचा, कधी ऊन. कावळे दादा टपून होतेच. पण ती माऊली नेटानी आपल्या अंड्यातल्या पिल्लांचा सांभाळ करत होती. गच्चीत सगळीकडे पिसं आणि घाण झाली होती. बरं ती पिल्लं अंड्यातून बाहेर आल्याशिवाय काहीच करता येत नव्हतं. मी खिडकीचा पडदा देखील हळूच उघडत होते. कपडे वाळत घालताना सुध्दा अलगद घालत होते. जरा खुट्ट झालं की ती आई मात्र लगेच आपले पंख पसरत होती. अगदी डोळ्यात तेल घालून आपल्या पिल्लांचा सांभाळ करत होती. तिच्या स्वतःच्या भूकेसाठी ती काय करायची काय माहित ? का मि. पारवा तिला काही आणून द्यायचे माहिती नाही.
फायनली त्या अंड्यातून दोन गोंडस पिल्लं बाहेर आली. मी पहिल्यांदाच जवळून लाईव्ह इतकी गोडं पिल्लं पाहिली होती. मग तर मी बाळ बाळंतिणीला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही असं ठरवलं. तिचं तिच्या पिल्लांवरचं प्रेम पाहून मलाच भरून यायचं. अगदी कमी वेळातच त्या पिल्लांनी आपले पंख फडफडवायला सुरूवात केली. मी रोज त्यांच्याकडे आणि त्यांच्या आईकडे बघायची. उगाच माझ्या आईपणाशी कम्पेअर करायची. माझं पिल्लू पहिल्यांदा पालथं पडलं, रांगायला लागलं, चालायला लागलं ते सगळे क्षण आठवून डोळ्यात पाणी आलं. त्या आईला पण असच वाटत असेल का असं वाटत होतं. ती आई आपल्या पिल्लांसाठी खायला आणायला बाहेर जायची तेव्हा उगाच मी त्यांच रक्षण करायची. त्यांना गरज होती का ? किंवा मी रक्षण करू शकतीय का ? याचा विचार न करता, मनानी सगळ करायची. ती आली की मी हुश्श करायची.
काही दिवसांनी ती पिल्लं उडून गेली. आई पण दिसेना. मी बेचैन झाले. कुंडीत आणि गच्चीभर त्यांनी घाण करून ठेवली होती. पण त्या घाणीपेक्षा आई आणि पिल्लं कुठे गेली हेच मी शोधत होते. माणसं जितकी मी, माझं करतात तितकं निसर्गातले सजीव करत नाहीत. आपल्या मुलांनी आपल्या म्हातारपणाची काठी व्हावं अशी अपेक्षा करत नाहीत. पिल्लं सुध्दा आई वडिलांच्या ईस्टेटीवर डोळा ठेवत नाहीत. आपलं कर्तव्य चोख पार पाडतात. परिणाम निसर्गावर सोडून देतात. या जिवंत अनुभवातून आपणच आपल्या अपेक्षांमुळे दुःखी होतो हे जाणवलं. निसर्ग नियम पाळला तर दुःखी होण्याचं कारण नाही. सुख आणि दुःख आपल्याचं कर्माचं फळ असतं. आपण जसं पेरतो तसं उगवतं. निसर्गातले सजीव कर्म करून फऴ निसर्ग देईल तसं स्वीकारतात. आपण मात्र फळ आपल्याच मनाप्रमाणे मिळावं असा हट्ट करतो. ईश्वर काय , निसर्ग काय त्यांच्या पदरचं काही देत नाहीत. आपल्या अकाऊंटमध्येच काही नसेल तर चेक बाऊंस होणारच ना? कोणत्याही गोष्टीत आपलं contribution किती आहे याचा विचार करून फळाची अपेक्षा केली पाहिजे. म्हणजे माझ्याच बाबतीत असं का ? हा प्रश्न पडणार नाही. निसर्ग नियमानुसार जे योग्य असतं तेच घडत यावर एकदा विश्वास बसला की, '' निसर्गासारखा नाही रे सोयरा. गुरू, सखा बंधु , माय बाप '' यावरही विश्वास बसतो.
संवाद मनाशी.....
मित्र. मैत्रिणींनो मी तुम्हाला ब-याच दिवसांनी भेटतीय. खरं तर मी खुप मिस केलं तुम्हाला. मला माहितीय तुम्ही सुध्दा माझ्या लेखाची वाट पहात होतात. कारण आपल्यामधल्या संवादाचं हे एकच महत्त्वाचं माध्यम आहे. पण या ब्ल़ॉगवर काहीही लिहिताना एक मनाशी नक्की केलयं. मारून मुटकून काहीही लिहायचं नाही. अगदी मनाला वाटेल ते, मनात येईल ते आणि मनाला भावेल तेच लिहायचं. गेल्या काही दिवसांत मनात काही आलच नाही असं नाही. पण का कोणास ठाऊक खूप शांत रहावसं वाटलं. मध्येच एकदा एक लेख लिहायला घेतला पण तो मनाला भावला नाही. मी तुमच्याशी यापूर्वी सुध्दा शेअर केलय की मन, प्रेम आणि पाऊस हे माझे आवडते विषय आहेत. त्यातल्या '' मन '' या एका विषयावर गेल्या काही दिवसांमध्ये खुप काही ऐकलं , अनुभवलं.
आपल्या आयुष्यातली सुख, दुःख तीव्र किंवा सौम्य प्रमाणात जाणवणं हे आपल्या मनावर अवलंबुन आहे. . एखादी किरकोळ गोष्ट मनाला लागून गेली की त्याचे परिणाम आत आणि बाहेर दिसतात. काही वेळा अगदी मोठ्ठ संकटदेखील आपल्या मनाच्या कणखरपणामुळे अणू, रेणूसारखं भासतं. त्यावेळी आश्चर्य वाटतं. अरे हे सगळं आपण कसं सहन केलं. तेच आपलं मन एखादा छोटासा अपमान सहन करू शकत नाही. काय आहे हा सगळा प्रकार? मनाच्या लहरीपणामुळे आपण वहावत जातो. कित्येकदा चुकीचे वागतो, समोरच्याला दुखावतो, स्वतः दुखावले जातो, काही वेळा खुप काही गमावतो, काही वेळा खुप काही मिळवतो. आपल्या आयुष्यातल्या ब-याचशा गोष्टी आपल्या मनाच्या सांगण्यानुसार आपण करतो. मग या मनालाच जिंकता आलं तर....
बहिणाबाई चौधरींनी केलेलं मनाचं वर्णन अनुभवानंतर पटतं. ''मन लहरी लहरी त्याचं न्यारं रे तंतर, आता व्हतं भुईवर गेलं गेलं आभायात.. ''मनातल्या विचारांचा विचार करता येत नाही हो. भयानक उड्या मारायला लावत ते आपल्याला. त्याचा गुणधर्म बदलणं इतकं सोप्प नाही. आपण मनाचं ऐकतो. पण आपल्या मनाला गुलाम बनवणं कठीण आहे. आपलं बोलणं, वागणं, आपल्या महत्वाकांक्षा, नातेसंबंध जपणं, आपलं समाधान, असमाधान, काम करण्यासाठी मिळणारी उर्जा, आपल्याला होणारे आजार, मनात येणारे विकार हे सगळ या अदृश्य अशा मनावर अवलंबून आहे. आपल्याच मनाचा आणि संवेदनांचा आपण विचारच करत नाही. सगळ फार वरवर विचार करून सोडून देतो. कित्येकदा आपण कृती करतो, बोलतो आणि म्हणतो माझ्या हे मनात नव्हतं. पण असं नसतं. आपले विचार, आचरण, कृती हे सगळं मनावरच अवलंबून असतं. म्हणूनच मन शांत, स्वच्छ, एकाग्र करता यायला हवं. अनित्य अशा सुख दुःखांचा आपल्या मनावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आपल्या मनासारखं झालं म्हणजे सुख आणि मनाविरूध्द झालं म्हणजे दुःख. बरं ही परिस्थिती कधीच कायम टिकत नाही. हे सगळं कळत असतानाही आपण किती आत्मक्लेष करून घेतो. या सगळ्यात वर्तमान बिघडवून घेतो. काय चूक काय बरोबर हे आपलं मन आपल्याला सांगत असतं. त्याची हाक ऐकणं गरजेचं आहे. बाहेर सगळ्यांशी संवाद साधता साधता आपल्याच मनाशी संवाद साधणं बंद होतं. तो संवाद साधला पाहिजे. मनाला सतत वर्तमानात जगायला शिकवता आलं पाहिजे. तरच आनंदी रहाण्याची इच्छा पूर्ण होईल. नाहीतर जे नाही त्याचा शोक करण्यात आयुष्य कधी संपेल कळणारच नाही.
ग्रामीण रूग्णालय....
सगळीकडे औषधाचा वास, अस्ताव्यस्त पडलेली औषधं , पेशंटसची खुप गर्दी, त्या गर्दीतले वेगवेगळे वास, वसावसा अंगावर ओरडणारे कर्मचारी, स्वच्छता या गोष्टीचा आनंद.... या वर्णनावरून तुम्हाला कळलच असेल मी कशाबद्दल बोलतीय. मी लहानपणी पाहिलेल्या सरकारी दवाखान्याचं हे वर्णन आहे. माझी आई नर्स होती त्यामुळे या वातावरणाचा मी कित्येकदा अनुभव घेतलाय. इतके वर्ष अशा वातावरणात काम करूनही ती इतकी गोड आणि संवेदनशील कशी राहीली हे मोठ कोडच आहे. हे सगळ पाहूनच मी तिला कायम म्हणायची, ''मी कधीच मेडिकल लाईनला जाणार नाही.'' पण ती कायम म्हणायची , ''या पेशाकडे सेवा म्हणून बघितलस ना तर असं म्हणणार नाहीस.''
आईच्या या बोलण्याचा प्रत्यय मी परवा घेतला. सध्या स्वाईन फ्लूची जबरदस्त साथ आहे. त्यामुळे साधा ताप, घसादुखी झाली तरी टेन्शन येतं. मी तर घसादुखी आणि तापानी हैराण झाले होते. मला स्वाईन फ्लू झालाय की काय असच वाटायला लागल मला. सुरूवातीला घरगुती उपाय केले. पण बरं वाटेना म्हणून डॉक्टरकडे जाव लागल. स्वाईन फ्लू नव्हता झाला. पण तरीही काळजी घेतलेली बरी म्हणून त्यांनी मला सरकारी दवाखान्यात जायला सांगितलं. कारण स्वाईन फ्लूचं औषध तिथेच मिळतं.
बापरे... माझ्या अंगावर काटा आला. म्हणलं परत तेच सगळे वास, आरडा ओरडा.. पण मी तिथे गेल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला. माझी आई ज्या सेवाभावी वृत्तीने पेशंटकडे बघायची तीच वृत्ती, तीच काळजी मला तिथे अनुभवायला मिळाली. आईची प्रचंड आठवण आली. शिस्तीत केसपेपर करणे, मग डॉक्टरांनी तपासणे, योग्य ती औषधं , इंजेक्शन्स देणे हे सगळं छान चाललेलं होतं. थोडी गडबड, बेशिस्त होती. पण याला ती यंत्रणा जबाबदार नव्हती. गर्दी नसताना गर्दी करणं ही आपल्या लोकांना लागलेली सवय आहे. बसमध्ये, लोकलमध्ये चढताना सुध्दा हा अनुभव येतो. उगाच ढकला ढकली.. मुळ मुद्दा हा आहे की त्या सरकारी दवाखान्यात एक वेगळा , आशादायी अनुभव आला. मला स्वाईन फ्लूची शक्यता असल्याने मला स्पेशल ट्रीटमेंट होती. मी लाईनमध्ये उभी होते. पण डॉक्टरांनी मला पुढे यायला सांगितलं. तिथल्या वाघमारे डॉक्टरांनी अगदी ठामपणे मला काहीही झालं नाहीये असं सांगितलं. ते म्हणाले, ''सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवा हो. तुम्ही अजिबात अॅंटिबायोटिक्स घेऊ नका. मी देतो त्याच गोळया घ्या. एक इंजेक्शन घ्या. ''
त्यांच ते आश्वासक बोलणं धीर देणारं होतं. लगेच तिथल्या नर्सनी इंजेक्शन दिलं. पुन्हा एकदा आईची आठवण झाली. तिनी इंजेक्शन दिलं की पेशंट म्हणायचे, ''बाई तुमचा हात लई हलका आहे बगा.'' मला पण त्या नर्स बाईंना असच म्हणावसं वाटलं. कारण इंजेक्शन कधी दिलं हे कळल सुध्दा नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती औषधं फुकट होती. इंजेक्शनचं अगदी नाममात्र शुल्क होतं. तिथलं कफ सिरप तर कमाल आहे. सगळयात चांगली गोष्ट तिथले डॉक्टर लोकांशी आपुलकीनी बोलत होते. त्यांचा मोबाईल नंबर सगळ्यांना देत होते. मला काहीही वाटलं तर कधीही कॉल करा असं सांगत होते. औषधं देणारे, केस पेपर करून देणारे नीट बोलत होते. शंका विचारली तर चिडत नव्हते. उलट थो़डं बरं वाटल्यानंतर त्या डॉक्टरांना फोन न केल्याची कृतघ्नता माझ्याकडूनच झाली.
हे सगळ शेअर करण्यामागे एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपण सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवायला पाहिजे. सरकारी यंत्रणा चांगल्या आहेत. त्या योग्य पध्दतीनी चालवल्या गेल्या पाहिजेत. सरकारी दवाखान्यात गरीबांनीच जावं. तिथे चांगली ट्रीटमेंट मिळत नाही. हे गैरसमज आहेत. मला हे मान्य आहे की अगदी प्रायव्हेट इतकी पॉश जागा नसेल तिथे. पण दर आठवड्याला नवीन औषधांचा स्टॉक सरकारी दवाखान्यात येतो. या यंत्रणेत त्रुटी असतीलही. पण थोड्या बदलाने त्या नक्कीच कमी होऊ शकतील. गरज आहे या बदलाची.
या अनुभवावरून माझं एक मत नक्की झालय. पूर्वग्रह मनात न ठेवता व्यक्ति, संस्था, यंत्रणा यांचा विचार करायला हवा.
माझा शत्रू....

आत्ता पाऊस पडतोय. पण आश्चर्य म्हणजे मी आज पावसावर नाही बोलणारे तुमच्याशी. आज मी अगदी नुकतीच एक लढाई केली आणि त्यात मी जिंकले , त्याबद्दल बोलायचय मला. माझ्या घरातल्या स्वयपाकघरात होती ती लढाई. मी कोणता नवीन पदार्थ बनवला ? नाही हो.... पाणी प्यायला म्हणून गेले तेव्हा बघते तर काय .. चक्क माझा शत्रू टाईल्सवर दिसला मला. आता तो होता की ती ते मला माहिती नाही. पण माला खुप किळस, राग, भीती अशा सगळ्या भावना जाग्या होतात त्या शत्रूला पाहिल्यावर. त्या शत्रूचं नाव म्हणजे ''पाल'' . होय हो. मला खुप भीती वाटते पालीची. आत्तापर्यंत अनेकदा या शत्रूशी दोन हात करायची वेळ आलीय. पण ते काम माझे मिस्टर करतात. मी त्यांना मॉरल सपोर्ट देते , मागे उभी राहून. ''अहो, असा कुंच्याचा फटका मारा तिच्यावर... असं काय करताय, आत पळेल ती. मग माझी पंचाईत होईल. तिला बाहेरच्या बाहेर अशी ढकलून द्या.. '' वगैरे वगैरे म्हणत. पण आज हा बाका प्रसंग आला तेव्हा आमचे अहो नेमके घरी नव्हते. मग काय माझ्या भीतीनी धसक्याची जागा घेतली. अशा वेळी नेमकं कोणी घरी पण येत नाही. आमच्या आई म्हणतात, '' पालीला काय घाबरायचं ? जशी आली तशी जाते ती.'' पण माझा या सासुवचनावर अजिबात विश्वास नाही. म्हणजे ती पाल बाहेर जाईपर्यंत मला चैनच पडत नाही.
आमच्या भोरला अशा पाली पाहिल्या की अजिबात भीती वाटत नव्हती. कारण ते नित्याचं झालं असावं. पण फ्लॅट सिस्टिममुळे ही सवयच गेलीय पार. त्यात आमचे चिरंजीव म्हणत होते, ''आई, जाऊदे तू लक्षच देऊ नकोस.'' असं म्हणून तो कॉम्प्युटरवर गेम खेळत बसला. असा राग येत होता मनातून. ''अरे तुला आईची काही काळजी आहे की नाही ? ''असं काहीसं मी पुटपुटले. तर मुळ मुद्द्याकडे येते. ती पाल एकटी होती तोवर मला इतकी भीती वाटली नाही. मग काचेच्या तावदानावर तिचा बॉयफ्रेंड पण आला. लांबून दोन किळसवाण्या पाली इतकचं कळत होतं. पण ज्या पध्दतीनी ते एकमेकांना बिलगून बसले होते, त्यावरून तो तिचा बॉयफ्रेंडच असावा. त्यांच बराच वेळ चाललं होतं प्रेमप्रकरण. माझा जीव इथे वरखाली होत होता. अरे बाबांनो, आपापल्या घरी जाऊन करा ना काय करायचय ते. असं मी त्यांना सांगत होते. काही वेळानी त्यांनी मिठीचा विळखा सोडला. पावसाळी हवेनी त्यांना पण रोमॅंटिक केलं होतं बहुतेक. माझा त्यावर आक्षेप नाही. पण स्वतःच्या घरी करावं ना जे काय ते ... उगाच दुस-यांना ताप. फायनली ते वेगळे होऊन चालायला लागले. मी म्हणलं , ''ए बाबा, तिला घेऊन जा. इथे काय तिचं काम आता ? ''पण त्यांची हालचाल पुन्हा मंदावली. माझ्या मदतीला कोणीही येणार नाही, याची मला जाणीव झाली. मी स्वतःलाच म्हणलं, ''अगं , काय हे नुकताच महिला दिन साजरा केलास ना ? हो पुढे आणि कर शत्रुचा बंदोबस्त.'' एकवेळ एखाद्याच्या श्रीमुखात भडकावणं सोप्प. पण पालीला हाकलणं म्हणजे जरा.. पण तरी मी शस्त्राला धार लावली. म्हणजे हातात झाडू घेतला. काचेच्या त्या बाजूला असलेल्या तिच्या बॉयफ्रेंडला काचेच्या बाहेरच ठेवलं. मग या बाजूची खिडकी बंद केली. हुश्श... अशा रीतीनी मी माझ्या लढाईत जिंकले. जाळी आणि खिडकीची काच यामध्ये ती अडकली बहुतेक. माझ्या मुलानी तिला झाडूनी छडी देण्याचा प्रयत्न पण केला. पण आता ती घरात येऊ शकणार नाही याची खात्री झाली. बापरे... केवढं मोठं हे धाडस. तुमच्यापैकी काही हसतील मला. पण ज्यांना पालीची भीती, किळस, राग जे काही आहे ते वाटतं ना , त्यांना पटेल माझं म्हणणं.
या प्रसंगातली मजा मी आत्ता लिहिताना अनुभवतीय. पण त्यावेळी भीतीनी गाळण उडाली होती. एक जाणवलं, संकट लहान असो की मोठं. आपल्याला एकट्याला त्याला सामोरं जायचय हे कळलं ना की आपण प्रयत्न करतो. कोणीतरी मदत करेल या आशेवर राहीलो की आपण आपले प्रयत्नच थांबवतो. एकुणात काय , आपल्या प्रॉब्लेम्सवर कोणीतरी सोल्युशन काढेल या आशेवर रहाण्यापेक्षा आपणच आपले प्रयत्न करायला हवेत , हा विचार पटलाच नाही तर आज मी अनुभवला.
फिरूनी नवी जन्मेन मी....
आज जागतिक महिला दिन. गमतीत सांगायचं झाल तर आमचा पोळा. आजच्या दिवशी स्त्री, तिचा सन्मान, तिची सुरक्षितता याविषयी वारेमाप लेख आणि चर्चा ऐकायला येतील. आज शिवजयंतीसुध्दा आहे, त्यामुळे कार्यक्रमांचा पाऊसच पडेल. डीजेनामक कर्णकर्कश्श यंत्रांच्या मालकांची आज दिवाळी. शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या प्रयत्नांपैकी एक टक्का प्रयत्न केले ना तर सुराज्य निर्माण होईल. पण या सगळ्यात वेळ खर्च करण्यापेक्षा डीजे लावून नाचलेलं चांगलं नाही का ? आर्थिक गणितांचा विचार केला तर या सगळ्या खर्चातून कितीतरी विधेयकं कामं उभी राहू शकतात. असे विचार पटतच नाहीत का कोणाला? प्रवाहाविरूध्द जाऊन काही शिवप्रेमींनी असे प्रयोग केले तर... असो.....
महिला दिन साजरा करावा का नाही ? या वादात मला पडायचं नाही. कारण या जगात अशा कित्येक गोष्टी चालू आहेत , ज्याला मी काहीच करू शकत नाहीये. त्यातली एक मला प्रचंड त्रास देणारी गोष्ट म्हणजे स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून दाखवल्या जाणा-या जाहिराती. मध्येच एक जाहिरात पाहिली ज्यामध्ये एक मुलगी तोकडे कपडे घालूनही मुलांना त्यांच्या नजरेतली बेशरमी लपवायला सांगते. थोडं विचित्र वाटलं . कदाचित जुन्या पण संस्कारी विचारांचा पगडा असेल. पण असे विचित्र कपडे घातल्यानी आपण पुढारलेल्या किंवा पुरोगामी विचारांच्या आहोत असं असतं का? वेशभूषा कशी असावी हे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. फक्त या स्वातंत्र्यानी, '' आ बैल मुझे मार ''असं होत नाहीये ना याचा विचार व्हावा. वाईट नजरा निस्तनाभूत करण्यासाठी आपला एक कटाक्ष पुरे असतो. लाजून झुकणा-या नजरेतच जळजळीत निखारे सुध्दा असतात. आता कुठे, कोणाला आणि कसं सरळ करायचं हे आपणच ठरवायला हवं. ''चलता है ''संस्कृती नको. त्यामुळेच बलात्कार हा अंगावर घाव घालणारा शब्द हल्ली बोथट वाटायला लागलाय. आपल्या मनाविरूध्द आपल्याला हात लावण्याची हिम्मत करणा-याला शासन देण्याची ताकद आपल्यात असते. फक्त ती वापरली पाहिजे.
एक पुरोगामी विचारांची स्त्री कुटुंबालाच नाही तर समाजाला पुढे घेऊन जाऊ शकते. त्यासाठी स्त्री असण्याचा अभिमान तर हवाच. पण परमेश्वरानी दिलेलं स्त्रीत्व जपता आलं पाहिजे. समाजरथ पुढे जाण्यासाठी स्त्री आणि पुरूष ही दोन्ही चाकं महत्त्वाची आहेत. एकटी स्त्री किंवा एकटा पुरूष समाज विकसित करण्यासाठी असमर्थ आहे. त्यामुळे मुक्त कोणापासून व्हायचं हे आधी पक्क ठरवायला हवं. पुरूषापासून मुक्ति हवीय का ? मला वाटतं नाही. मुक्ती हवीय परंपरेच्या जोखडातून , जाचक रुढींमधून, रोज असणा-या अत्याचाराच्या टांगत्या तलवारीपासून. स्त्रीला दुय्यम वागणूक देणारी मानसिकता बदलली पाहिजे, मग ती स्त्रियांकडून असो की पुरूषांकडून. तिला तिचं आयुष्य तिच्या पध्दतीनी जगण्याची मुभा दिली पाहिजे. आजही कितीतरी कमावत्या स्त्रिया आपला पगार आपल्या मनाप्रमाणे वापरू शकत नाहीत. स्त्री मुळातच काटकसरी आणि योग्य विनिमयाची पुरस्कर्ती असते. त्यामुळे वायफळ खर्च ती करत नाही. पण तरीही तिच्या पगारावर तिचा अधिकार नसतो. मोठ्या पातळीवर बदल होतायत. स्त्री पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून चाललीय. पण आजही कितीतरी मध्यमवर्गीय कुटुंबात मुलींना त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षण, नोकरी करण्याचा अधिकार नाही. स्त्री पुरूष समानता याचा मला समजलेला अर्थ म्हणजे स्त्री आणि पुरूषांनी एकमेकांना समजून घेऊन विकसित होणं. विधात्यानी स्त्रीला सहनशील बनवलय म्हणून तिनी सहन करायचं आणि पुरूषांनी अन्याय करायचा असं नाही. किंवा स्त्री मुक्तीच्या नावावर स्त्रियांनी स्वैराचार करायचा असंही नाही. समानता म्हणजे समजून घेऊन उन्नती करणं.
बोलण्यासारखं खुप आहे. अन्याय, अत्याचार, असमानता हे सगळं संपवण्यासाठी विचारांची उच्च पातळी गाठून समजून घेतलं गेलं पाहिजे.. अर्थात स्त्री आणि पुरूष दोघांकडूनही. चलो फिर, दो कदम आप चलो... दो कदम हम चलेंगे...
रंग माझा वेगळा........
रंगाच्या या सणाला, असे काहीसे बोलुया,
प्रेमाच्या रंगामध्ये, सारे रंगुन जाऊया.....
आजच्या रंगीबेरंगी दिवसाच्या तुम्हाला काव्यमय शुभेच्छा. प्रेम आणि उत्साह घेऊन येणारा हा दिवस मनातली कटुता संपवून एका वेगळ्या रंगात रंगण्याच्या आहे. अर्थात त्या रंगाचं नाव प्रेम आहे. कारण हा एकच रंग वाईट भावनांवर विजय मिळवतो. मनातला सगळा द्वेष, राग, मत्सर , ''प्रेम '' या एका भावनेनी अक्षरशः निष्प्रभ ठरतात.
मनातल्या सगळ्या भावनांना वेगवेगळे रंग असतात. या रंगांची रंगपंचमी आपल्या मनात कायमच चाललेली असते. प्रत्येक प्रसंगी आपलं मन आपल्याला वेगवेगळ्या रंगांची अनुभूती देतं. एखाद्याचा राग येणं खुप चांगलं. तुम्ही म्हणाल, हे काय नवीन ? पण खरच आपण ज्या व्यक्तिवर प्रेम करतो ना त्याच्यावरच हक्कानी रागवतो. त्यामुळे रागाचा रंग चांगला. पण त्याचा अतिरेक नको. प्रेमाच्या वर्षावानी राग कुठच्या कुठे निघून जातो. आपलं इतक छोटसं आयुष्य , त्यात राग या भावनेला कशाला उगाच थारा द्यायचा. काही लोक अभिमानानी सांगतात, एकदा मला एखाद्याचा राग आला किंवा माझ्या ब्लॅक लिस्टला त्याचं नाव गेलं की संपलं. मला नेहमी हा प्रश्न पडतो, इतक्या सुंदर आयुष्यात कोणी कोणावर इतकं रागवू कसं शकतं? कारण आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात माणूस आज आहे तर उद्या नाही अशी अवस्था आहे. अशा वेळी भलतेच निग्रह करून आणि तेच मनात धरून काय फायदा ? त्यापेक्षा, '' जाने भी दो यारो'' असं म्हणलं ना तर सगळं सोप्प होतं.
मत्सर ही भावना आम्हा स्त्रियांमध्ये जरा जास्तच. अगदी समोरचीच्या साडीपासून गाडीपर्यंत अनेक गोष्टींवर आम्ही जेलस होतो. काही प्रमाणात हा रंगसुध्दा चांगला. कारण जेलसीमुळे आपण तिच्यापेक्षा अजून चांगलं काय करू शकतो हा विचार तरी करतो आपण. जेलसीच नसेल तर आपल्यात सुधारणा कशी होणार. त्या मत्सराचा अतिरेक नको , हे वेगळं सांगायला नकोच. काही वेळा या मत्सरापोटी अनावश्यक गोष्टी आणि भावनांची अडगळ निर्माण होते. ती होऊ देता कामा नये. आपल्याला आपल्यात सुधारणा व्हावी हा हेतू असला पाहिजे. कारण उगाच भलत्या विचारांना थारा दिला तर नुकसान आपलच होतं.
द्वेष या भावनिक रंगाचा फायदा होऊ शकतो बरं का ? कारण द्वेषातूनच काहीतरी करून दाखवण्याची इर्षा निर्माण होते. प्रगती होण्यासाठी आतून पेटुन उठण्याची गरज आहेच की. काहीतरी मिळवायचं आहे हे आधी ठरवायला लागतं . त्यासाठी द्वेषाची भावना मदत करते. पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडायची नाही हे मात्र नक्की.
मनातल्या भावनांच्या सगळ्या रंगांची आपल्या जीवनात गरज आहेच. त्या कोणत्याही भावनेचा अतिरेक होऊ द्यायचा नाही हे काम प्रेम करतं. मनात प्रेमाचा रंग गहिरा हवा. हे प्रेम एका व्यक्तिपुरतं मर्यादित नसावं. तसं प्रेम तर सगळेच करतात. पण आपापसात प्रेम निर्माण होऊ शकलं तर बरेचसे प्रश्न मिटतील. सगळं गुडी गुडी हवं असं नाही. सगळे रंग आवश्यक आहेतच. तसं नसेल तर आयुष्य बेचव, बेरंग होईल. फक्त लोणच्यानी भाजीची जागा घेतली की घोळ होतो. काळा रंग इतका अशुभ मानतात. पण एका गवळणीत म्हणटल्याप्रमाणे, ''आवड तुला नाही काळ्याची , केसाचा रंग का काळा? गो-या गालावरी शोभे सांगा, तीळ का काळा ? '' म्हणजे काळा रंग सोंदर्यात भर घालतो ना ? या सगळ्या रंगांची उधळणच आपलं आयुष्य रंगीबेरंगी करतं.
तसं म्हणलं तर प्रॉब्लेम्स कोणाला नाहीत ? पण या सगळ्यावर मात करून जगण्यातला आनंद शोधला पाहिजे. प्रत्येकाला या ओळी आपल्यासाठीच लिहिल्या गेल्यात असं वाटलं पाहिजे, त्या म्हणजे, '' रंगुनि रंगात सा-या रंग माझा वेगळा ''
आज मौसम बडा बेईमान है.....
आज मौसम कितना खुश गवार हो गया, खत्म सभी का इंतजार हो गया ;
बारिश की बुंदे गीरी कुछ इस तरहसे; लगा जैसे आसमान को जमीन से प्यार हो गया
काल संध्याकाळपासून कोसळणारा हा पाऊस किती छान शब्दबध्द केलाय. व्हॉटस अप चे काही मेसेजेस खरच खुप छान असतात. फेब्रुवारी महिन्यात पडणा-या पावसाला उन्हसाळा वगैरे म्हणून झालय. किंवा अगदी बरेच विनोद करून झालेत या पावसावर. पण पावसाला काही बोललं ना की वाईट वाटतं. सृजनाची निर्मिती करणारा पाऊस हवासाच वाटतो. मला हे मान्य आहे की असा अवेळी पडलेला पाऊस नुकसान घेऊन येईल कदाचित. लोकं आजारी पडतील. पण तरीही पाऊस छानच असतो.. नाही का ?
अवेळी पडलल्या पावसानी काही पूर्वनियोजित कार्यक्रमांचा फज्जा उडवला. अगदी सकाळपासून ढग दाटून आलेले असले तरीदेखील तो पावसाळ्यासारखा बरसेल असं वाटलं नव्हतं. पण संध्याकाळी मातीचा सुगंध मन भरून गेला. बघता बघता सगळा आसमंत ओला चिंब झाला. मनातल्या आठवणी ढगांसारख्या दाटून आल्या. पावसाच्या सरींप्रमाणे या आठवणी बरसू लागल्या. पावसाळ्यामध्ये सृजनाची, नवनिर्मितीची फार मोठी ताकद आहे. जमिनीवर तो बरसतो तेव्हा सृष्टी सुंदर दिसते. आजुबाजुचं वातावरण पाहून, तन - मनाला पालवी फुटते. 2015 मधला हा पहिला पाऊस..
धुंद आणि कुंद अशा या रोमॅंटिक हवेमध्ये विं. दा. करंदीकरांची ही कविता आठवली,
'' हिरवे हिरवे रान मोकळे,ढवळ्या पवळ्या त्यावर गायी.
प्रेम करावे अशा ठिकाणी, विसरूनी भीती विसरूनी घाई.
प्रेम करावे मुके अनामिक, प्रेम करावे होऊनिया तृण,
प्रेम करावे असे परंतु, प्रेम करावे हे कळल्याविन. ''
वाहवा... अगदी एखाद्या हिरव्यागार, सुंदर डोंगरावर गेल्यासारखं वाटलं.
या पावसात काय जादू आहे तेच कळत नाही. त्याचा कितीही राग आला तरी रागवता येत नाही. तो अवेळी आला तरी त्याचं स्वागतच करावसं वाटतं. त्याला कोणी रागानी काही बोललं तर वाईट वाटतं... कारण पाऊस हा वठलेल्या तना - मनाला पुनरूज्जिवीत करतो. त्याला बोल लावलेले कसे सहन होतील ? आणि सगळा राग त्याच्यावरच का ? हल्ली माणसं तरी कुठे शहाण्यासारखं वागतायत ? मनात येईल तसंच वागतात ना ? मग निसर्गालाच सगळे नियम का ? माणसानी वागाव नियमाप्रमाणे. अशा वेळी मात्र, '' दुनिया बदल गयी है '' असं ऐकवलं जातं ना? मग आमच्या पावसाची पण मर्जी बदललीय, असं म्हणलं तर.
असा अवेळी पाऊस पडणं म्हणजे विनाशाकडे वाटचाल वगैरे सगळं मान्य आहे. पण हा विनाश टाळण्यासाठी काय करावं लागेल याचा विचार करूया ना... उगाच पावसाला नावं का ठेवायची ? जे आहे त्याचा आनंद घेत घेत... काय असायला हवं याचा विचार करून कृती करूया.
माझ्या मना रे ऐक जरा....
माझं मन ना कधी कधी वेड्यासारखं हट्टीपणा करतं. कित्येक वेळा अगदी कणखर आणि ठाम असणारं माझं मन असं गलितगात्र झालं ना की मला त्याचा राग येतो. ब-याचदा मनातल्या उदासीला काही कारणच हवं असं काही नसतं. अगदी छोट्या छोट्या घटना सुध्दा विनाकारण मनस्ताप देतात.
मग सुरू होतो खेळ मनातल्या विचारांचा. खरं म्हणजे आपला आनंद हा बाहेरच्या माणसांवर अवलंबुन नसून आपल्या मनावरच अवलंबुन आहे. मन प्रसन्न असेल तर सगळं कसं छान वाटतं. पण कित्येकदा एक छोटीसी अपेक्षा असते, की मला कोणीतरी समजुन घ्यावं. माझ्या एका वैचारिक मित्रानी खुप छान सांगितलं होतं मागे एकदा, ''कोणतंही नातं घे ते दोन्ही बाजुने जोपासायची हौस हवी एकटयाच्या मर्जीनी ते नातं फुलत नाही फक्त श्वास घेतं'' खुप पटलं मला ते सगळं. कारण कित्येक वेळा आपल्याला असा अनुभव येतो, अरे मीच काय मेसेज किंवा फोन करायचा ? समोरच्या माणसाला गरज नाहीये का ? लोक पटकन नाती जोडतात आणि परकं समजतात. अगदी सहजच केलेली चेष्टा, मस्करी समजून घेत नाहीत. सॉरी म्हणण्यात कमीपणा नक्कीच नाहीये. पण पुन्हा हाच प्रश्न , प्रत्येक वेळी मीच का ?
माझ्यासारख्या अति भावनाशील ( आत्ताच्या भाषेत बावळट) लोकांना तर अशा रणधुमाळीला सारखं सामोरं जाव लागत. आपल्या भावना समोरच्या माणसाच्या मनाला भिडतच नसतील तर व्यक्त तरी कशाला व्हायचं ? तसंही करून पाहिलं. पण माझंच काहीतरी चुकत असेल असा ठाम विश्वास असणारे लोक पटकन अपसेट होतात. (आत्ताच्या भाषेत इमोशनल फुल्स) आमच्या ओळखीचे एक काका आहेत , ते तर नेहमी म्हणतात, ''प्रत्येक वाईट गोष्ट आपल्यामुळेच झाली असेल असं वाटायची काहीच गरज नाही. ''
पण तरीही का कोणास ठाऊक प्रकर्षांनी असं वाटतं की आपली गरज नसेल तिथे जाऊ नये, फुकटचे सल्ले देऊ नये, विनाकारण कोणालाही आपलं मानू नये. हे सगळं कितीही बोललं ना तरी जुन्या सवयी जाणार नाहीतच. काही वेळा आपल्या मनातल्या भावना आणि समोरच्याच्या मनातल्या भावना भिन्न असतील, किंवा त्याची तीव्रता कमी अधिक असेल तर गोंधळ होतो. '' दया, कुछ तो गडबड है '' असं म्हणण्याची वेळ येते.
पुन्हा एकदा आपलं मनच आपल्याला या सगळ्या विचारांमधून बाहेर काढतं. ''The only thing in this world is constant and that is Change''. या विधानाप्रमाणे आलेली मरगळही जाईलच. त्यासाठी कोणी बाहेरच्या माणसानी मदत करावी असा अट्टाहास करण्यात काय अर्थ आहे. या जगात आपल्या मनाविरूध्द घडणा-या अनेक घटना आहेत, आपण कुठे काय करू शकतो त्याविषयी? त्या प्रत्येक घटनेला, घटनेतल्या पात्रांना ''मला समजुन घ्या हो'' असं सांगण्यापेक्षा, आपणच आपल्याला समजुन घेऊया... नव्यानी. मनाला समजावुन सांगुया, तेही मस्तपैकी गुणगुणुन, माझ्या मना रे ऐक जरा ... हळवेपणा हा नाही बरा....
सर्वस्व तुजला वाहुनी......
मित्र, मैत्रिणींनो सगळयात आधी तुम्हाला आजच्या व्हॅलेंटाईन डेच्या खुप शुभेच्छा. या ब्लॉगच्या निमित्तानी माझ्या मनीमानसी दाटलेल्या भावना तुम्ही समजुन घेतल्यात, प्रतिसाद दिलात. खुप बरं वाटतं. कोणत्याही कलाकृतीला रसिकांशिवाय शून्य किंमत असते. सादाला प्रतिसाद नसेल तर माणूस एकटाच असतो , नाही
का ? माझ्या ब्लॉगवर असच प्रेम करत रहा. कारण आजकालच्या काळात सगळ्यात मोठी गरज आहे ती म्हणजे शेअरिंग, व्यक्त होणं, प्रेम मिळवणं . कारण सगळी सुखं पैशानी विकत घेता येत नाहीत.
आजच्या दिवशी अनेकांनी आपल्या मनातला आदर, प्रेम व्यक्त केला असेल, प्लॅन आखले असतील. एकमेकांना एकमेकांविषयी प्रेम वाटणं महत्त्वाचं आहे. ते असलं की मग तक्रारी, अपेक्षा, उपेक्षा वाट्याला येत नाही. प्रेम या भावनेला समर्पपणाची जोड मिळाली तर... कारण स्वार्थी प्रेम दगाबाज असतं. निरपेक्ष प्रेम चिरंतन टिकतं. तकलादू प्रेम फुलाप्रमाणे अल्पायुषी ठरतं. खरच कोणीतरी आपल्या मनासारखं भेटणं ही भाग्याची गोष्ट आहे. समर्पणाची सोनेरी किनार असणारं प्रेमच समाधान मिळवून देतं. ओरबाडून किंवा हिसकावून घेतलेली कोणताही गोष्ट फार काळ टिकत नाही. प्रेमात हरवून जाणं, समर्पण करणं महत्त्वाचं. समर्पणाची भावना इतकी उत्कट हवी की शरीर म्हणून वेगळं दिसत असलं तरी मन त्याच्या किंवा तिच्यापाशीच हवं.
प्रेम निरपेक्ष असलं की चांगल्या , वाईट प्रसंगात ते तसच टिकून रहातं. माझं तुझ्यावर प्राणापलिकडे प्रेम आहे , हे बोलणं खुप सोप आहे. पण त्याचा गुढ अर्थ समजुन घेण तितकच अवघड. मला काय हवय यापेक्षा त्याला काय हवयं हे महत्त्वाचं. कवितेतूनच सांगायच झालं तर....
ठावे तुला तरी का, मी काय वाहिले रे, माझे मला म्हणाया काही न राहिले रे.
सारे तुला दिले मी, झाले कृतार्थ झाले, नाही हिशेब केला, हातात काय आले..
आजकालच्या स्वार्थानी भरलेल्या जगात समर्पण, त्याग या भावना फेटकळ वाटतात. सिधी उंगली से घी नही निकलता तो उंगली टेढी करनी पडती है , असं म्हणणा-यांना समर्पणाचं महत्त्व काय कळणार ? आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तिचं सुख महत्त्वाचं. कुणाच्या तरी सुखासाठी आपल्या सुखाचं समर्पण करणं हे महत्त्वाचं. समर्पणात अहंकाराचा नाश होतो. अगदी अध्यात्मिक पातळीवर जाऊन विचार केला तर प्रेमाच्या अत्युच्च पातळीवरच्या समर्पण या भावनेनी देहातीत प्रेमाची अनुभूती घेता येते.
आजच्या दिवशी निदान हे तरी ठरवुयात की आपल्या मनातल्या प्रेम आणि माणुसकीच्या रोपट्याला खत पाणी घालून जिवंत ठेवुया, जोपासुया..
प्रेम केले प्रेम....
व्हॅलेंटाईन डे अगदी उद्यावर आलाय. प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्या दिवसाची गरज नाही हे खरच. पण कोणत्याही गोष्टीला काहीतरी निमित्त लागतच. त्या दृष्टिकोनातून विचार केला तर काय हरकत आहे , प्रेम व्यक्त करायला.
प्रेम या भावनेचा विचार करतानाअजून एका महत्त्वाच्या मुद्याचा विचार करायला हवा. ते म्हणजे नात्याचं लेबल. ते लेबल नाही तर प्रेम पण नाही असं काही आहे का ? आणि असलं तर ते कसं शक्य आहे ? प्लॅटोनिक लव्ह या संकल्पनेचा विचार केला तर दोन शरीरं आणि एक मन हे शब्द जिवंत होतात. अशा वेळी अपेक्षेला काही महत्त्वच उरत नाही. ग्रीक तत्ववेत्ता अॅरिस्टॉटल म्हणतो, प्रेम म्हणजे दोन शरीरात वास करणारा एक आत्मा. किती सुंदर कल्पना. प्रेम हे अंतरिक, मानसिक असतं. घोटून गुळगुळीत झाल्यामुळे प्लॅटोनिक लव्ह या शब्दाचा वापर तितक्या गांभीर्यानी केला जात नाही. एक मन असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्या मनात काही आलं ते तिला उमजलं आणि तिच्या मनात काही आलं तर ते त्याला समजलं हे होण्यासाठी खूप मोठी तपश्चर्या लागते. म्हणजे एकमेकांवर जिवापाड प्रेम असाव लागत. ''शब्देविण संवादू'' ही कल्पना शारीर सौंदर्यात रमणा-यांना अतर्क्यच वाटते. एकमेकांचं मन जाणण महत्त्वाचं. एकदा असं नात निर्माण झालं की मग त्याच्यासारखा आनंद नाही, समाधान नाही. पण असं नातं निर्माण करणं खुप कठीण आहे.
कोणत्याही नात्याला लेबल किंवा नाव लावलं की मग येतात अपेक्षा, मालकी हक्क. प्रेमाचं सहज सुंदर नात निर्माण करण्यासाठी या नावांच्या, लेबलांच्या पलिकडे जाऊन विचार करता येईल का? कारण अपेक्षा हे दुःखाचे कारण. अपेक्षा ठेवूच नयेत हे शक्यच नाही. पण अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर येणारा कडवटपणा टाळता येतो का ? जर आपण मनापासून प्रेम करत असू तर तो कडवटपणा टाळता येईलच. नक्की. पण काही वेळा या अपेक्षांच्या अतिरेकामुळे एकतर्फी प्रेमातून घडणारे भयंकर प्रकार घडतात. मला एक प्रश्न कायम सतावतो. आपण ज्या व्यक्तिवर प्रचंड प्रेम करतो त्याला इजा पोहोचवण्याचा, दुखावण्याचा विचार कसा येत असेल मनात ? उलटपक्षी त्याच्या किंवा तिच्या सुखातच माझं सुख आहे असा विचार रूजायला हवा. कारण या एका गोष्टीवर प्रत्येकानी विश्वास ठेवायला हवा, जे आपलं असत ते आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. जे आपलं नसत ते कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला मिळत नाही. खरं सुख मिळवण्यात आहे असं म्हणलं तर ते अलगद, हळुवार असलं पाहिजे. नाही तर सुख मिळूनही ते न मिळाल्यासारखच आहे. म्हणून प्रेम तुटून करावं, पण ज्याच्यावर आहे, त्याला किंवा तिला न तुटू देता....
स्वप्नातल्या कळ्यांनो....
संवेदना, भावना, जाणीवा , रुसवा, वाट बघणं याची अनुभूती प्रेमात पडल्याशिवाय येत नाही. अजून एक गोष्ट अशी आहे ज्याचा अनुभव प्रेमात पडल्यावर जास्त रोमांचकारी वाटतो, ते म्हणजे स्वप्न. माणसाच्या मनाला समजून घ्यायचं असेल ना तर त्याला कोणती स्वप्न पडतात हे बघायला हवं. ज्या गोष्टी आपण प्रत्यक्षात करू शकत नाही त्याचा अनुभव स्वप्नात घेता येतो. ज्या भावनांची तृप्तता जागृतावस्थेत होऊ शकत नाही , त्याची पूर्तता स्वप्नाच्या दुनियेत होते. आपल्याला आवडणारी व्यक्ति प्रत्यक्षात भेटणं जेव्हा शक्य नसतं तेव्हा तीच व्यक्ति स्वप्नात येते. चेतन मनातली इच्छा अचेतन मनाकडे पाठवली जाते. मग तीच इच्छा अचेतन मनाकडून स्वप्नांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते.
ही स्वप्नं इतकी खरी वाटतात की सत्य काय आणि स्वप्न काय याचं भान उरत नाही. स्वप्नात दिसणारा तो किंवा ती खरच समोर आहे की काय असं वाटायला लागतं. ''मनी वसे ते स्वप्नी दिसे '' असं म्हणतात. आपल्या मनात असणा-या व्यक्तिचं स्वप्न कधी संपूच नये असं वाटत. स्वप्नात उमटलेल्या खुणा प्रत्यक्षातही कोणाला कळतील की काय या कल्पनेनी गडबडायला होतं, लाजायला होतं. जागं आल्यावरही ही धुंदी ओसरत नाही. हे स्वप्नच आहे हे समजूनही मनं त्यातच रमून जात.
we are what and where we are because we have first dreamed it. आपली आत्ताची परिस्थिती म्हणजे पूर्वी कधीतरी पाहिलेलं स्वप्न असू शकते. म्हणून स्वप्न मोठी बघावीत. वास्तवाची जाणीव बुध्दि करून देत असते , पण आपलं मन मात्र देहभान हरपून स्वप्नांच्या दुनियेत भरा-या घेत असतं.
स्वप्नं म्हणजे नेमक काय ? मानसशास्त्राचा अभ्यास करणा-यांच्या मते, झोपेमध्ये मिळणा-या चेतनावस्थेच्या अनुभवांना स्वप्न म्हणता येईल. मृगजळ जसं आभास निर्माण करतं तस स्वप्नही आपल्याला आभासात सत्य मानायला भाग पाडत. स्वप्न पडणा-या माणसाला प्रॅक्टिकल जगातली माणस वेड्यात काढतात. ''तुला बरी स्वप्न पडतात, आम्हाला नाही पडत'' असं म्हणून हिणवतात. मनात चाललेल्या गोष्टी नकळतपणे अंतर्मनात उमटतात. या भावना सत्यात उतरव्यात यासाठी धडपड सुरू असते. मनात उठणा-या या भावना प्रत्यक्षात होणं शक्य नसेल तर ती पूर्तता स्वप्नात केली जाते.
स्वप्न आणि सत्याचं भांडण झालं तर कोण जिंकेल? भविष्य घडवण्यात यापैकी कोणाचा वाटा सर्वाधिक आहे ? एकाच वेळी आभाळाला हात टेकतील आणि तरीही आपण जमिनीवर राहू असं शक्य आहे का ? कारण स्वप्नात पाय जमिनीवर नसतात आणि सत्यात हात आभाळाला टेकत नाहीत. म्हणूनच आपल्या आयुष्यात स्वप्न आणि सत्य या दोघांनाही समान महत्त्व आहे. माणसाला पडणारी स्वप्नं हा एक व्यर्थ मानसिक अनुभव आहे असं अजिबात म्हणता येणार नाही. कारण स्वप्नात येऊन त्यानी किंवा तिनी केलेला गोड छळ किती हवाहवासा वाटतो . नाही का ? काय ? विश्वास नाही बसत? चला तर झोपा आणि स्वप्न बघा....
आभास हा.......
सुधीर मोघ्यांची एक मस्त कविता वाचली आज
नसताना तू जवऴी असण्याचा भास तुझा......
जाणवतो अणुरेणूत ... इथे तिथे वास तुझा......
कुठुनी ये इतुकी धग... विझलेल्या गतस्मृतीस.....
वेदनेस संजीवक करणारा ध्यास तुझा....
''प्रेम ''या एका भावनेनी हे सगळे शब्द कसे जिवंत झालेत. एरवी भास, ध्यास, वास,आभास , वेदना या शब्दांना तितकी परिणामकारकता नसते, जितकी प्रेम या एका भावनेनी निर्माण होते. प्रेम या एका भावनेनी आभास ही एक छान कल्पना प्रत्यक्षात आणलीय. कधी दूर, कधी समोर , कधी अगदी जवळ, अगदी कुठेही त्याला किंवा तिला अनुभवता येतं या आभासातून...
पुन्हा एकदा कल्पनेचं सुंदर जग या आभासाला जिवंत करत. आपली प्रिय व्यक्ती जवळ असेल तर काहीच प्रश्न नाही. अर्थात नुसती शरीरानी जवळ असणं उपयोगाचं नाही म्हणा... शरीर आणि मनानीसुध्दा आपल्या जवळ असेल तर आभासी प्रतिमांची गरज भासत नाही. पण जेव्हा ती दूर असते तेव्हा मात्र हे आभास विरहाच्या त्या भयाण वाळवंटातून बाहेर काढतात. काही भावनांना प्रॅक्टिकल , बुध्दिवादी विचारांनी बघुन नाही चालत. त्या अनुभवायच्या असतात.....
कुणाच्या तरी आठवणीत त्याच्या आभासी दिसण्यातच मन रमवणं ही गोड कल्पना आहे. अशा वेळी तो किंवा ती आपल्या जवळ नसली तरीही त्या आभासातच अस्तित्वाचा अनुभव घेता येतो. कारण अस्तित्वाची किंमत दूर गेल्याशिवाय कळत नाही. नेहमी आपल्या जवळ असणारी आपली प्रिय व्यक्ति जेव्हा दूर जाते तेव्हा तिचा ध्यासच आभासाला जन्माला घालतो.
आभासातला तो किंवा ती जाम धमाल उडवून देतात. सिनेमात नेहमी आपण हे बघतो तेव्हा वाटतं , छे... काय हे ... काहीही दाखवतात... पण जेव्हा स्वतःलाच असे आभास होऊ लागतात तेव्हा.... ''दर्पणी पहाता रूप, न दिसे वो आपुले'' .. असं होतं तेव्हा... मग सुरू होतो आपला आणि आभासांचा लपंडाव... प्रत्येकानी हा लपंडाव नक्की अनुभवावा.. हा छळणारा, आनंद देणारा, अनुभूती देणारा आभास मन भारून टाकतो... समोर असलं की नुसतच पहाणं होतं... आणि नसताना आभासासोबत जगणं होतं... या कवीकल्पना अनुभवण्यासाठी एकच भावना मनात असली पाहिजे... प्रेम.. साधारणपणे ज्या वस्तू देहाला समाधान देतात त्या मिळवण्याकडे आपला कल असतो. त्या मिळवणं हेच जन्माचं ध्येय होतं. पण नीट विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की. अशा सगळ्या वस्तू ज्यांच्याकडे आहेत ते तरी सुखी आहेत का ? सुख आणि समाधान मानण्यावर असतं, मनातल्या प्रेम या भावनेवर असतं. प्रचंड त्रासात, वेदनेत असतानाही प्रेमाचा आभासही जगण्याचं बळ देतो...
खरी श्रीमंती..........

परवा एक विचित्र प्रसंग स्वतः अनुभवला. तळेगावहून पुण्याला जाताना, प्रचंड गर्दी असलेल्या ट्रेनमध्ये लेडीज डब्यात घडलेला हा प्रसंग... प्रत्येक जण आपल्याला बसायला जागा कशी मिळेल या गडबडीत. जागा मिळाली की आपापले मोबाईल काढून, माना खाली घालून , मनाशीच हसत बोलणा-या सगळ्या जणी.... आपल्या शेजारी कोण आहे? याची कोणाला पर्वा नाही आणि जाणून घ्यायची गरज नाही... त्यापेक्षा मोबाईलमधल्या त्याच्याशी किंवा तिच्याशी किंवा त्यांच्याशी बोलण्यात सगळे मग्न... अशाच वेळी माझ्यासमोरच्या सीटवर एक मावशी ऑलमोस्ट चक्कर येऊन पडायला आल्या होत्या. मदतीसाठी त्या हात पुढे करून .... पाणी... पाणी... असं पुटपुटत होत्या. एक तप खुप गलका आणि कानात हेडफोन.. यामुळे कोणालाच त्यांचा आवाज ऐकू आला नाही... मी सुध्दा मोबाईलमध्ये व्यस्त होते... तरी सुदैवानी माझं लक्ष गेलं... मी त्यांना पाणी देऊ केलं. पण त्यांचे डोळे मिटले गेले.. मी खुप घाबरले होते.. मला काहीच कळेना.... त्यांना हात लावून उठवलं.... त्या उठेचना... शेवटी अगदी कासारवाडी आल्यावर त्यांना जाग आली... त्या माझ्याकडे आशेनी पहात होत्या... बाटलीतलं पाणीअंगावर सांडत , सांडत त्यांनी पाणी प्यायलं. त्या डोकं टेकवून शांत बसल्या... त्यांच्या शेजारी बसलेली मुलगी निर्विकारपणे उठून गेली... ती मुलगी उठताच, टेकू हललेल्या पिशवीसारख्या त्या मटकन बाकावर पडल्या. अगदी शिवाजीनगर गेलं तरी त्यांना भान नव्हतं.. मी त्यांना हाक मारली... त्या किंचित हसल्या... ''पुणे स्टेशन आलं की मला उठव'' असं म्हणाल्या... मी म्हणलं , ''अहो मावशी , आता उठा , आलं पुणे स्टेशन ''... माझ्या शेजारी बसलेल्या एका मावशींनी मला सांगितल..''कशाला या भानगडीत पडलीस? नाटकं करत होती ती बाई.... '' स्टेशनला उतरल्यावर त्या मावशींनी (चक्कर आलेल्या) मला थांबवून सांगितलं, ''मी नाटक करत नव्हते गं.. माझा ना बी पी वाढला असनं.'' मी म्हणलं , ''ठीक आहे मावशी , नीट जा तुम्ही...''
या प्रसंगातून मला प्रकर्षानी जाणवलं की आपली संवेदना बोथट होतीय का ? आपल्या आजुबाजुला काय चाललय हे जाणून घेण्याचीसुध्दा आपल्याला गरज वाटत नाही... आपल्या ग्रेडचं कोणी असेल तरच त्याला बसायला जागा देणं, लक्ष देणं म्हणजे संवेदनशीलता नाही ना ? प्रेम आणि संवेदनशीलता या अगदी जिवलग मैत्रिणी आहेत नाही का? बघा ना जो माणूस संवेदनशील असतो, त्यालाच दुस-यांबद्दल प्रेम, आपुलकी वाटते. प्रेम ही भावना संकुचित नाही या माझ्या मताशी तुम्हीसुध्दा सहमत असालच. म्हणजे आपल्याकडे प्रेम म्हणलं की, पुरूष आणि स्त्री यांच्यातलं प्रेम.... पण , प्रेमाची व्याप्ती इतकी संकुचित नाही....वेगवेगळ्या नात्यांमध्ये ती भावना बदलते...
मुळात आपल्या सगळ्यांमध्ये जे तत्व वसलेलं आहे.. त्यावर प्रेम करायला हवं.. कारण परमेश्वराला पूजणं म्हणजेच सगळ्या सजीव सृष्टीत वसलेल्या तत्वावर प्रेम करणं... प्रेम ही एक व्यापक भावना आहे. तिला कोणत्याही साच्यात बसवून अनुभवु नये. प्रेम द्याव.. घ्याव... वाटावं सगळ्यांच्यात... कारण शेवटी ही माणसं... ही नाती... त्यांना दिलेलं आणि घेतलेलं प्रेमच आपली खरी श्रीमंती आहे , नाही का?
प्रेमाला उपमा नाही.....
आज रेडिओवर एक मस्त गाणं ऐकलं..... बाहो मे चले आओ , हमसे सनम क्या परदा..... वाह क्या बात है... काही गाणी श्रवणीय आणि प्रेक्षणीय अशा दोन्ही सदरात चपखल बसतात. त्यापैकीच हे एक गाणं आहे... निरागस डोळ्यांची जया आणि मनात असूनही प्रेम न दाखवणारा संजीव कुमार...
हे गाणं ऐकत असतानाच एक विचार मनात आला... प्रेम म्हणलं की त्यानी तिला प्रपोझ करायचं ... तिनी विचार करून होकार किंवा नकार कळवायचा.... वगैरे वगैरे.... पण प्रेमात तिनी पुढाकार घेतला तर.... काळ कितीही पुढे गेला असला तरी प्रेमामध्ये त्यानी पुढाकार घ्यावा असच तिला वाटतअसतं. पण जे प्रेम दोन जीवांमध्ये होतं त्याला कोण पुढाकार घेतय हे खरच तितकं महत्त्वाचं आहे का ? व्यक्त होणं महत्त्वाचं.....
आत्ताच्या काळात तिनी पुढाकार घेणं हे फार अवघड राहिलेलं नाही. पण तरीही तिनी पुढाकार घेऊन प्रेमाची भावना व्यक्त करणं हा मोकळेपणा सहन करायला थोडं जड जातच. कवितांमध्ये किंवा गाण्यांमध्ये सुध्दा त्यानी प्रेम व्यक्त करणं हाच अन्वयार्थ ब-याचदा पहायला मिळतो. प्रेम, प्रणय या हळुवार भावनांसाठी कितीतरी कविता केल्यात... गाणी रचलीयत.... पण तिनी त्याला सरळ सरळ आव्हान देणं ही गोष्ट जरा दुर्मिळच. पण तिनी तरी आपल्या मनातले भावनांचे तरंग का लपवावे ? स्पेशली जर तिचा प्रियकर जरा बिनडोकच असेल तर तिनी काय कराव ? त्याच्या मनात असूनही प्रेमा बिमाच्या फंदात पडायचच नाही असं त्यानी ठरवलच असेल तर तिनी गप्प बसायचं का ? एरवी अगदी कवीच्या भूमिकेत असणारा तो एकदम मुक्यासारखाच वागायला लागला तर काय करायचं ? तर.....तिनीच प्रेम व्यक्त करायचं...
प्रेम करणं म्हणजे एकमेकांकडे पहाणं नाही तर दोघांनी मिळून एकाच गोष्टीकडे पहाणं. असा एक संकेतच आहे की प्रेम पहिल्यांदा त्यानी व्यक्त केलेलं चांगलं. कारण पुरूषांना मोहाचा शाप आणि स्त्रियांना मर्यादेचं बंधन आहे. हे कितीही खरं असलं तरी स्त्री असो की पुरूष भावना तर सगळ्यांना सारख्याच असतात ना.... मग व्यक्त करायला काय हरकत आहे ? कारण फार कमी भाग्यवंतांना आपलं प्रेम कळतं आणि मिळतं... मग मनातल्या मनात ठेवण्यापेक्षा सांगितलेलं बर... कारण अवती भवती कितीही माणसं असली तरी आपलं असं कोणीतरी एकच असतं...... कारण.... प्रेमाला उपमा नाही..... हे देवाघरचे देणे...........
व्हॅलेंटाईन डे ...........
मी कालच तुम्हाला म्हणलं होतं की व्हॅलेंटाईन डे पर्यंत ''प्रेम'' या भावनेविषयी व्यक्त होण्याचा प्रयत्न करेन... अर्थात मनीमानसी काही आलं तरच हं.... मुळातच जुलमाचा राम राम नकोच वाटतो मला.... खरचं मनापासून वाटलं तर लिहावं, बोलावं... जगरहाटी पाळण्याबाबात जरा डोकं कमीच आहे ....
असो..... मैत्रिणीला सहजच फोन केला आणि विचारलं .... ''काय गं, व्हॅलेंटाईन डेचं काय विशेष प्लॅनिंग ?'' ती म्हणाली, ''छे गं, आता इतक्या वर्षांनी कसला आलाय व्हॅलेंटाईन डे आणि खरं सांगु का तुला आमच्या ह्यांना हा असला प्रकार अजिबात आवडत नाही. ते म्हणतात, प्रेम मनात असावं लागतं त्यासाठी त्याचं प्रदर्शन करण्याची काय गरज आहे ?''
फोन ठेवल्यावर माझ्या मनात विचार आला.... काही वर्ष झाली की प्रेम व्यक्त करायचं नसतं का? प्रेम व्यक्त करणं म्हणजे प्रदर्शन का ? एकमेकांना पुन्हा एकदा माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणलं तर काय हरकत आहे ? मनात ठेवून प्रेम करण्यापेक्षा, व्यक्त केलेलं चांगलं नाही का ? व्यक्त झाल्यानी आपल्या जोडीदाराला आनंदच वाटेल.... एकमेकांसोबत रहायचं ते एकमेकांना आनंदी करण्यासाठी ना ? .... मग किती वर्ष लोटलीत याला अर्थ नसला पाहिजे... लग्न झालं की सगळं संपल असं म्हणणा-यांनी तर या दिवसाचा चांगला उपयोग करून घ्यायला हवा. एरवी जोडीदाराला वेळ देता येत नसेल तर या दिवशी पूर्ण वेळ द्यायला हवा....
व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस... मग ते जोडीदारावरचं असो की मित्र मैत्रिणीवरच. अगदी एखाद्या वडीलधा-या व्यक्तिविषयी आदर व्यक्त करायलादेखील हा दिवस छान आहे . प्रेम म्हणजे प्रियकर - प्रेयसी असं असलं तरी ते इतकं संकुचित नसतं. प्रेमाची व्याप्ती खूप मोठी आहे... निर्व्याजपणे, निरपेक्षपणे कुणावरही केलेलं प्रेम तितकचं आदराचं असतं. मनाच्या कप्प्यात कितीतरी व्यक्ति असतात.. ज्यांच्याविषयी आदराची भावना असते. ही भावना व्यक्त केली तर काय हरकत आहे ?
'प्रेम कुणावर करावं ? प्रेम कुणावरही करावं, प्रेम काळजाच्या नात्यावर करावं आणि प्रेम खडगाच्या पात्यावरही करावं.' प्रेमाचा हा संदेश घेऊन व्हॅलेंटाईन डे जवळ आलाय. खरच नीट विचार केला तर लक्षात येतं की हा दिवस फक्त प्रियकर प्रेयसीने प्रेम व्यक्त करण्याचा दिवस नसून ज्या व्यक्तिबद्दल आपल्याला आदर किंवा प्रेम वाटते ते व्यक्त करण्याचा दिवस आहे. मात्र व्हॅलेंटाईन डेचं बदलतं स्वरुपच या दिवसाला बंदी असावी या विचाराला कारणीभूत झालं आहे. व्हॅलेंटाइन या संतानी माणुसकीची, प्रेमाची जी शिकवण दिली, त्याची स्मृती जागृत रहावी म्हणून या दिवसाकडे पाहुया...... मनात माणुसकीची भावना वाढवण्यासाठी......
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानी.........
आता गुलाबी भावनांना बहर येणारा महिना सुरू झालाय. अगदी उद्या परवापासूनच व्हॅलेटाईन डे चे मेसेजेस यायला सुरूवात होईल. पण मला तुमच्याशी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानी , जसं सुचेल तसं, आत्तापासूनच बोलायचय. म्हणजे ठरवून रोज एक लेख असं काही नाही हं..... पण १४ तारखेपर्यंत... या भावनेचे जे भाव माझ्या मनात उमटतील , ते तुमच्याशी शेअर करायचेत मला.....
नवरा म्हणतो, 'मी तुला लग्नाच्या दहाव्या वाढदिवसाला अंदमान निकोबारला घेऊन जाणारे.' बायको आनंदून म्हणते, 'मग पंचविसाव्या वाढदिवासाला काय करणार? 'नवरा म्हणतो, 'तुला तिथून घेऊन जायला येणार.' नुकताच हा मेसेज वाचला. गमतीचा भाग सोडला तर लग्नाला दहा पंधरा वर्ष झाल्यावर असंच वाटत असेल का एकमेकांबद्दल? 'हल्ली तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटतच नाहीये. कामाच्या नावाखाली तुम्ही माझ्याकडे किती दुर्लक्ष करताय. मी म्हणून तुमचा हा संसार नीट चाललाय. दुसरं कोणी असत तर..........' वगैरे वगेरे. लग्न थोडं जुनं झालं की हे संवाद जवळपास सगळ्याच घरांमधून ऐकायला मिळतात. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अनेक तरूण - तरूणी आपल्या मनातले विचार आपल्या प्रिय व्यक्तिपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतील. म्हणूनच लग्न झालेल्या त्याचे किंवा तिचे विचार त्यांच्या व्हॅलेंटाईनपर्यंत पोहोचविण्याचा हा मी केलेला एक प्रयत्न.
लग्नानंतर या व्हॅलेंटाईन डेचा प्रभाव कमी होतो की काय? कोण जाणे. असं म्हणतात की, प्रेमाची पूर्तता लग्नात होते. पण लग्नानंतरच या प्रेमाची 'पूर्णता' होते की काय अशी शंका मनात येते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मग आपला जीवनसाथी आणि जर ती बायको असेल तर तिच्याकडे लक्ष द्यायला वेळ कुठे आहे? सर्व विवाहित पुरूषांचा आणखी एक नेहमीचा डायलॉग, 'ही जी धडपड चाललीय ती कोणासाठी? तुझ्यासाठीच ना ?' या सगळ्यामध्ये नेमकं कोण चुकतय, कोण बरोबर आहे यामध्ये वेळ आणि शक्ति खर्च करण्यापेक्षा तो मुद्दाच किती सामान्य आहे हे नंतर आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात येतं. पण तोपर्यंत मनं दुखावलेली असतात...... दुरावलेली असतात..... ही मनं दुरावण्याआधीच प्रयत्न केले पाहिजेत.
प्रेम व्यक्त करायला कशाला हवाय कुठला डे? ते असं एकमेकांकडे नुसतं बघितलं की समजलं पाहिजे. कारण प्रेम करणं म्हणजे एकमेकांकडे पहाणं नाही तर दोघांनी मिळून एकाच गोष्टीकडे पहाणं. काव्य, कल्पना म्हणून सगळ्याच गोष्टी मस्त वाटतात. पण प्रत्यक्षात नेमकं काय होतं ते समजून घ्यायला हवं. दोन व्यक्ति म्हणलं की वेगळे स्वभाव आलेच. काही चांगले , काही वाईट गुणही ओघानी येतात. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आपल्या जोडीदाराचं एक वेगळं स्थान असतं. खर तर एकमेकांना दुखवावं असं कोणालाच वाटत नसतं. मग का बर असे मेसेज आणि असे संवाद तयार झाले?
मला वाटतं एकमेकांना जे गृहित धरलं जात ना, त्यातूनच असे विसंवाद तयार होतात. एकदा लग्न झालं की मग काय आपल्या जोडीदाराशी कसंही वागा. त्यानी किंवा तिनी समजून 'घेतलचं' पाहिजे. हा जो 'घेतलचं' पाहिजे आहे ना, तोच खटकतो. एकमेकांच्या सहवासानी गुण - दोष माहिती होतात. प्रत्येकानेच आपल्या माणसाला गुण -दोषांसहित स्वीकारलं पाहिजे. 'प्लॅटोनिक लव्ह' की काय ते यालाच म्हणत असावेत. पूर्वीच्या आणि आत्ताच्या काळात बराच फरक आहे. संवादाची माध्यमं मोठ्याप्रमाणात वाढली आहेत. त्याचा योग्य उपयोग करून आपण आपली नाती फुलवू शकतो.. कित्येक वेळा प्रचंड राग आला असताना एखादा मेसेज.... एखादी छोटीशी भेटवस्तू ... एखादा सॉरीचा फोन किंवा एखादा मेल राग क्षणार्धात घालवू शकतो. पण हे 'सॉरी' म्हणण कमी झालय. आपला इगो आडवा येतो या सगळ्यात. मला वाटत मराठीत 'माफ कर' असं म्हणल ना तर त्याचा अर्थ मनापर्यंत पोहोचतो. कारण सॉरी या शब्दाला हल्ली काही अर्थच राहीला नाहीये.
इंदिरा संतांनी म्हणलय, 'ज्याचा सहवास आवडतो, हवाहवासा वाटतो, ज्याचं सुख आपल्यामुळे वाढतं आणि दुःख कमी होतं. साहित्य, संगीत, चित्रकला या कलांचा आनंद लुटताना ज्याच्याबरोबर आपलं मनही आनंदानं तुडुंब भरून जातं त्या व्यक्तिचा सहवास म्हणजे संसार.'
या व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने फक्त प्रियकर- प्रेयसी, नवरा - बायको यांनीच संवाद साधला पाहिजे असं नाही. पण व्हॅलेंटाईन म्हणजे फक्त जोडीदार असं नसून, आपल्याला आदर आणि प्रेम वाटणारी आपल्या भोवतीची सगळी माणसं. ''कसला आलाय व्हॅलेंटाईन डे ?'', '' आपल्या संस्कृतीत बसतो का हा डे साजरं करणं ?'', '' छे, फॅड आहे नुसतं. ''असा विरोध करण्यापेक्षा असं आपुलकीचं आणि प्रेमाचं नात सगळ्यांशीच निर्माण झालं, तर द्वेष, हेवा, मत्सर, भांडण या नकारात्मक गोष्टींना जागा तरी राहील का? अशी नाती निर्माण करायलाच हवीत, नाही का ? ही अशीच नाती आपल्याला आपल्या पुढच्या पिढीसाठी आदर्श निर्माण करण्यासाठी मदत करतील.
अति सर्वत्र वर्जयेत् ..........
नेटवर सर्च करत असताना चाणक्य नितीचा तिसरा अध्याय वाचण्यात आला. अत्यंत विचारपूर्वक मांडलेल्या एका श्लोकानी मला विचारप्रवृत्त केलं.
''अति रूपेण वै सीता चातिगर्वेण रावणः। अतिदानाद् बलिर्बद्धो ह्यति सर्वत्र वर्जयेत्।।''
हाच तो श्लोक . कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की ती संपते. हा एक निष्कर्ष सांगणारा हा श्लोक. जी गोष्ट आजच्या काळातही आपल्याला कळायला हवी. चांगलं असो वा वाईट ते अति झालं की त्रासदायक होतं.
संदीप खरे आणि डॉ. सलील कुलकर्णी यांच्या आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाचा प्रयोग आमच्या तळेगावात झाला होता. तेव्हा रंगलेली ही मैफिल थांबुच नये असं रसिकांना वाटतं होतं. पण त्याच एका पॉईंटवर आता हे समारोपाचं गीत असं डॉ. सलिल म्हणाले. त्यावेळी रसिकांनी त्यांना आग्रह केला की अजून एक तास सुध्दा आम्ही या गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी थांबु. तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर फार छान होतं. ही मैफिल संपूच नये असं ज्या क्षणी वाटतं तोच क्षण असतो भैरवी घेण्याचा.
चांगलं असलं तरी ते मर्यादेतच असलं पाहिजे. नाहीतर रंगाचा बेरंग होतो. कुठे थांबायला हवं हे ज्याला कळलं तो जीवनासकट सगळ्या मैफिली ताज्या, टवटवीत ठेवण्यात यशस्वी होतो. कित्येक वेळा आपल्याला हा अनुभव येतो बघा , कितीही चांगला वक्ता असला, गायक असला तरी, लांबलेला परफॉर्मन्स रसिकांपर्यंत पोहोचत नाही. ''अरे याला आवरा कुणीतरी ''असं मनातल्या मनात म्हणणारे रसिक खोटं हसं घेऊन समोर बसतात. (नाईलाजानी ) उलटपक्षी एका उंचीवर जाऊन थांबणारा कलावंत रसिकांच्या काळजात घर करतो.
माणसाला मिळालेल्या सोयी सुविधांचा अतिवापर होतोय असं निसर्गाच्या लक्षात आलं की तो त्याला पुन्हा त्याच्या मुळ रूपात नेण्याची तयारी करेल यात शंका नाही. (जंगलातले आदिमानव आठवतायत ना ?) आपल्याला मिळालेल्या कोणतीही गोष्ट योग्य पध्दतीनी वापरली तर त्याचे फायदे आपल्याबरोबरच आपल्या पुढच्या पिढ्यांना मिळतील. उदाहरण द्यायचं झालं तर वीज, पाणी, पेट्रोल याचं देता येईल. या सगळ्याचा गरजेइतका वापर केला तरच त्यापासुन मिळणारा आनंद घेता येईल. विज्ञानानी आपल्याला दिलेल्या कित्येक गोष्टी वरदानच ठराव्यात हे आपल्याच हातात आहे. मोबाईल, नेट, विकसित तंत्रज्ञान या सगळ्याचा अतिवापर केला तर काय अनर्थ घडू शकतो त्याची चुणूक आपल्याला रोजच्या बातम्यांमधून दिसतीय. मिळालेल्या स्वातंत्र्याचा उचित असा वापर केला तरच हुतात्म्यांच्या, क्रांतिकारकांच्या प्रयत्नांना अर्थ प्राप्त होईल. रूढी- परंपरांचा अतिरेक झाला तेव्हा बदल झाला. आता स्वातंत्र्याचा अतिरेक होऊ देता कामा नये. कारण तो बदल परवडणारा नाही.
विज्ञानानी दिलेल्या सगळ्याच सुविधांचा योग्य वापर केला तरच त्यापासून मिळणा-या फायद्यांचा आनंद घेता येईल. फेसबुक, व्हॉटस अप, मोबाईल ही संवादाची प्रभावी माध्यमं आहेत यात शंकाच नाही. दूर असणा-या आपल्या माणसांशी निदान आपण कनेक्ट होऊ शकतो. सगळ जग आपल्या हातात आलय. पण मुठीतलं जग निसटतय का ? जिथे आपण फेस टू फेस बोलु शकतो, तिथे या सगळ्या अॅप्सची काय गरज आहे ? कित्येक घरांमध्ये हल्ली घरातल्या घरातसुध्दा मोबोईलचा आधार घेऊन संभाषण केलं जातय. समोरच्या माणसाच्या चेहे-यावरचे हावभाव समजून घेऊन केलेला संवाद नक्कीच आनंददायी असेल ना ?
मनातल्या या विचारांना मोकळ केलं एका कवितेनी....... आमच्या बॅचमेटसचा एक ग्रुप केलाय व्हॉटस अॅप वर त्यामध्ये एक कविता शेअर केली होती माझ्या मैत्रिणीनी.....
स्वावलंबन, स्वतंत्र वृत्ती सगळच थोड्या अंतरावरती
कधीतरी आईच्या कुशीतही येऊद्या
मुळांना थोडीतरी माती राहुद्या ... प्लीज..... मुळांना थोडीतरी माती राहुद्या
कल्पनेचा कुंचला......
पाहिले न मी तुला , तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले...... पाहिले न मी तुला......
वा वा वा.......काही काही गाणी ना अगदी वेड लावतात बघा.... ही अशी गाणी कितीही वेळा ऐकली तरी पोट भरत नाही. गाण्याची सुरावट जितकी लक्षात रहाते ना, तितकेच गाण्याचे शब्द सुध्दा.... एकमेकांना न पहाता मन गुंतवण्याची कल्पना.... किती छान. कारण समोर असताना जीव गुंतला तर नवल नाही. पण कधीही एकमेकांना न पहाता जीव गुंतणं हे काही वेगळच नाही का? अर्थात कल्पनेच्या जगात काहीही अशक्य नाही.
पण कल्पना ही भावना विचारात घेऊनही, वास्तवात जगता येईल का ? तुम्ही म्हणाल , कुछ तो गडबड है.... पण नाही हो. असं होऊ शकत. म्हणजे वास्तवातही कल्पनेच्या जगात रमता येतं आणि आपल्याजवळ अमुक एक गोष्ट नाही या गोष्टीपासून मिळणारं दुःख कमी करता येतं.
म्हणजे बघा, देवाला आपण कधी पाहिलय का ? पण आपण तो असल्याचा आनंद घेतोच ना ? नेवैद्य दाखवून विठ्ठलाला घास भरवणारे नामदेव विरळाच. पण आपणसुध्दा देवाला नेवैद्य दाखवून , हा प्रसाद देवाचा आहे असं मानून समाधान मिळवतोच ना. आनंदमयी अशा भगवंताचं सान्निध्य नामानी मिळवतोच ना.
न अनुभवलेला स्पर्श, वस्तू, व्यक्ति, सुगंध, रंग याची अनुभूती घेता येते. कित्येक वेळा आपल्या मनात चालू असलेल्या गाण्याचे सूरसुध्दा ऐकू येतात. कल्पनेनी जगाची सफर करून येतो आपण. अंध व्यक्ति आपल्या मनाच्या डोळ्यांनीच कल्पना करून अनुभूतीचा आनंद मिळवतात. त्यामुळे अनुभूतीचा आनंद मिळवण्यासाठी ती वस्तू पहायलाच हवी असं नाही. समोर असताना त्याचा आनंद घेता येईल यात काही शंकाच नाही. किंवा हा आनंद नक्कीच जास्त प्रमाणात असेल. पण कल्पना करूनही याचा आनंद घेता येतो.
भाषा विषयांच्या पेपरमध्येसुध्दा कल्पनारम्य निबंधाचा एक विषय हमखास असतोच. कारण क्रिएटिव्हीटीचा उगम कल्पनेत होतो. एखाद्या कलाकृतीची, व्यवसायाची, यशाचं शिखर गाठण्याची कल्पनाच केली नाही तर तिथपर्यंतचा प्रवास कसा निश्चित करता येईल ? कल्पनेत स्वप्न बघून, वास्तवात प्रयत्नांची जोड दिली तर .. अशक्य अशी गोष्टच नाही. सगळ्या महान लोकांनी कल्पना, स्वप्नं वास्तवात उतरवण्यासाठी जीवापाड मेहनत केली म्हणूनच या कल्पना साकार होऊ शकल्या. पण कल्पनाच केली नसती तर.....
आपण कित्येक वेळा म्हणतो बघा.... कल्पना करायला काय हरकत आहे ? हो नक्कीच काहीच हरकत नाही. कल्पनेच्या जगात रमायलाही काही हरकत नाही. सगळ्या कवींनी, गीतकारांनी आपल्या कल्पनेतल्या जगातूनच आपल्याला उत्तमोत्तम काव्य दिली आहेत. जरी तू.. कळले तरी ना कळणारे....दिसले तरी ना दिसणारे.. विरणारे मृगजळ एक क्षणात....... या काव्यात मृगजळ असले, कल्पना असली तरी तो जीवापाड प्रेम करतोच ना.... विरहाचा सल कमी करण्यासाठी ही कल्पना किती छान आहे .... जरा घन झुरू दे ना, वारा गुदमरू दे ना , तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना ! ….. भगवंत आणि आपलं नातं सांगणारी ही कल्पना किती छान आहे ... काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल . ससुल्याला शाळेत , सिनेमात , सर्कशीत नेण्याची ही कल्पना म्हणजे.... कोणास ठाऊक कसा ? पण सिनेमात गेला ससा ! किती छान रमतो आपण कल्पनेच्या या जगात...
मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तू साठी जगतो . वस्तू ही सत्य नसल्यानी तिचं स्वरूप अशाश्वतच असतं अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंदही अशाश्वत.... खरा आनंद हा वस्तूमध्ये नसून तिच्या पलिकडे आहे. वास्तवातलं जग आणखी सुंदर बनवण्यासाठी.... चला तर चितारूया एक चित्र कल्पनेच्या कुंचल्यानी....
उत्सव वेदनेचा............
डोळ्यांमध्ये जमते पाणी , कशासाठी कळत नाही.... ऊर भरल्या उसाशाला ....कुठेच वाट मिळत नाही......... प्रवीण दवणे यांच्या अलगुजमधल्या या ओळी..... काही वेळा अशी मनःस्थिती आपली सुध्दा होते. डोळे भरून येतात.... का? कुणासाठी ? काहीच कळत नाही. व्यवहारी जगातले नियम या भावनांना समजू शकत नाहीत. सगळ काही व्यवस्थित असणारी ही व्यक्ति नेमक्या कोणत्या कारणानी व्याकुळ झालीय तेच कळत नाही. पाडगावकरांच्या या ओळी मनात रूंजी घालतात..... कुठुनी हे येति सूर लावितात मज हुरहुर, फडफडतो तडफडतो प्राणविहग पंजरी.......
अमुक एक कारण नसत या उदासीला..... ही उदासी आपलीच, आपल्या मनातली... काही वेळा , काही गोष्टी आपल्या मनातच ठेवलेल्या ब-या.... कारण कोणालाही या भावना कळणं अशक्यच असतं. कोणत्याही मोठ्या संकटांशी सामना करणारे आपण असे गलीतगात्र का झालोय? हेच मुळी कळत नाही....
पण एकदम एक विचार डोक्यात चमकून जातो.. जगण्यासाठी आवश्यक असणारी उर्जा मिळवण्यासाठीच अडचणी असतात ना....... जेव्हा सगळं संपून गेलय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नव्यानी काहीतरी सुरू करण्याची.... खरं आहे हे..... वेदना तर आहेच...... ती रहाणारच..... पण या वेदनेचा उत्सव करता आला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीला अंत आहे.... सुखाचे क्षण जसे फार काळ रहात नाहीत ... तसंच ही उदासी पण संपेल... काहीतरी मिळवायचय हा ध्यास ही उदासी घालवण्यासाठी उपयोगी पडतो. कदाचितच..... पण प्रयत्न करायला काय हरकत आहे.... कारण न लढता जगण्यापेक्षा लढून जगलेलं बरं.... काय सांगाव ज्या कारणानी आपण दुःखी झालोय ते कारणच आपल्या जगण्याचा आधार बनेल... ध्यासही असा असावा जो वेदनेला संजीवन देईल....
आठवणी दाटतात...........
आठवणी दाटतात ! धुके जसे पसरावे
जे घडले ते सगळे सांग कसे विसरावे...........
विविध भारतीला हे जुनं मराठी गाणं लागलं होतं. ''आठवण'' हा शब्द उच्चारताच कितीतरी आठवणी जाग्या होतात........... आठवण ही फार छान देणगी दिलीय देवानी आपल्याला. भूतकाळात घडून गेलेल्या चांगल्या वाईट आठवणी पुन्हा एकदा त्याच प्रसंगाची, घटनेची अनुभूती देतात.
अगदी लहानपणणापासून आत्तापर्यंत घडलेल्या ब-या वाईट प्रसंगांच्या आठवणी मनाला दुःख आणि आनंद देतात. काही आठवणी नकोशा वाटतात, तर काही हव्याशा.... आपली माणसाची जात ना मोठी चतुर... चांगलं ते हवं आणि वाईट मात्र नको.... नाण्याला दोन बाजू असतात वगैरे हे सगळं बोलतो आपण. पण वाईट किंवा मनाला वेदना देणा-या आठवणी नको असतात आपल्याला. या अशा आठवणींमधून सुध्दा बरचं काही शिकायला मिळतं. त्या वाईट आठवणी नकोत म्हणून त्या वस्तू, त्या जागा, ते रस्ते सगळं टाळतो आपण. असं करूनही ती आठवण काही पाठ सोडत नाही. मग त्यापासून पळून काय फायदा.....
हव्याश्या आठवणी मनाला तरल अनुभूती देतात. लहानपणीच्या खट्याळ, तरूण वयातल्या गोड गुलाबी , पहिल्यांदा मिळालेला पगार, पहिल्यांदा आपल्या पैशानी घेतलेल्या गोष्टी, मैत्रिणींची पत्रं... मी तर आजही माझ्या एका मैत्रिणीचं, मेघनाचं पत्र जपून ठेवलय. ते पत्र पुन्हा पुन्हा वाचते मी वेड्यासारखं.... किती छान आठवणी आहेत शाळेमधल्या..... आम्हा बायकांच्या बाबतीत एक गोड आठवण म्हणजे............ लग्न ..... नाही हो.......... काहीही काय ? ती काय सुखद आठवण आहे का ? या आठवणीपेक्षा आई झाल्याचा क्षण ही आठवण फारच छान........मुलं कितीही मोठं झालं तरी ती आठवण येताच नकळतपणे, '' माझं पिल्लू गं ते ''.... असे शब्द बाहेर पडतात...... या सुखद आठवणी हव्याशा वाटतात.
गोंदवलेकर महाराज त्यांच्या प्रवचनात सांगतात, एकच वस्तू एकाला सुखरूप वाटते तर दुस-याला दुःखरूप वाटते. म्हणजे ती मुळात ती सुखरुप नाही आणि दुःखरूपही नाही. जी गोष्ट आज सुखरूप वाटते, ती उद्या वाटेलच असं नाही. संकट आलं की पूर्वीच्या गोष्टी, नाती, आठवणी गोड लागत नाहीत. हा सगळा कल्पनेचाच खेळ नाही का ?
जरी हा कल्पनेचा खेळ असला तरीदेखील चांगल्या वाईट आठवणी येतातच. त्या मनाला सुख दुःख देतातच. आपल्या आयुष्यातून आठवणच वजा केली तर काय उरतं ? काहीच नाही. वर्तमानकाळात जगणं हे खरं तर आयडियल आहे. पण आपण मनुष्य आहोत. त्यामुळे भूत, वर्तमान आणि भविष्य अशा तिन्ही काळांची सफर करणं अगदी सहाजिक आहे. या सफरीत येणा-या आठवणींना असं म्हणावसं वाटतं.....
आठवणींनो उघडा डोळे, आसवांचे अमृत प्याले
आठवणींनो नयनी बघु द्या, सुखाचे ते क्षण जे निमाले......
प्रवास ....... वाट बघण्याचा
आज पुन्हा एकदा माझ्या आवडत्या विषयावर लिहिता येईल असं काहीतरी वाचनात आलं.... राधा कृष्णाच्या नात्याबद्दल आपण सगळ्यांनीच खूप काही ऐकलं आणि वाचलं आहे. मी नुकतीच एक गोष्ट ऐकली.... उध्दव राधेला भेटून कृष्णाकडे परत निघाला होता. तेव्हा त्याने तिला विचारलं, ''कृष्णाला काही निरोप आहे का ? '' तेव्हा आधी राधा काकुळतीला येऊन म्हणाली,'' हो आहे ना निरोप. त्याला मला भेटायला सांग....'' उध्दवाची पाठ फिरताच राधा त्याला हाक मारून म्हणाली, ''नको , त्याला म्हणावं की मला कधीच भेटू नकोस. कारण तू भेटलास की तुझी वाट बघण्याची मजा निघून जाईल. त्याच्या प्रतिक्षेतले हे दिवस कधीच संपू नयेत. कारण तो भेटला तर माझं त्याच्याशी असणारं अनुसंधान संपेल... त्यापेक्षा तो भेटला नाही तरच बर....''
ही कथा ऐकली आणि मन सुन्न झालं. असं प्रेम करणं किती वरच्या पातळीवरचं आहे. प्राणाहून प्रिय अशा आपल्या प्रिय व्यक्तिला भेटण्यापेक्षा त्याची वाट बघण्यात रमणारी राधा किती वेगळी आहे ..... विरह प्रेमाची तीव्रता वाढवतो या एका संकल्पनेवर आधारलेलं हे जगावेगळ प्रेम..... ''तू नसता मजसंगे वाट ही उन्हाची, संगतीस एकाकी वेदना मनाची !'' ही उन्हाची वाट एकट्यानी चालत जाण्याइतकं धैर्य हवं , नाही का ?
प्रत्येकाचं प्रेम वेगवेगळ्या गोष्टींवर असत... कोणाचं पैशावर प्रेम, कोणाचं नोकरीवर, कोणाचं ध्येयावर प्रेम, कोणाचं व्यक्तिवर, कोणाचं कवितेवर प्रेम, कोणाचं गाण्यावर... अचाट प्रेम केल्यानी आणि वेडं लागल्यानीच आपण ज्या गोष्टीवर प्रेम करतो ती मिळते... वेडे लोकच इतिहास लिहितात असं म्हणतात ना.... पण राधेचा दृष्टिकोन ठेवून वेड्यासारखं प्रेम केलं तर इच्छित गोष्ट मिळण्यापेक्षा प्रवासातला आनंद लुटता येईल नाही का ? कारण प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंदच अधिक असतो. एखादं नाटक बसवताना किंवा कार्यक्रमाची आखणी करतानासुध्दा हा अनुभव येतो. नाटकाच्या प्रयोगापेक्षा तालमीतला आनंदच जास्त असतो. कारण एकदा नाटकाचा प्रयोग झाला की दुस-या दिवशी प्रॅक्टिस नसते...... म्हणून वाट बघण्यातच मजा आहे....त्या प्रवासातच मजा आहे.... एक वेगळीच गोष्ट आज जाणवली , कारण ब-याच वेळा हवं ते मिळवण्याच्या गडबडीत प्रवासातली मौज अनुभवायच राहूनच जातं.
इच्छित स्थळी गेल्यावर हवं ते ध्येय मिळेलच. पण ते लवकर मिळत नाही म्हणून आक्रोश न करता ..... प्रवासातला आनंद घेऊया का ?