Saturday, 7 February 2015


 खरी श्रीमंती..........




परवा एक विचित्र प्रसंग स्वतः अनुभवला.  तळेगावहून पुण्याला जाताना, प्रचंड गर्दी असलेल्या ट्रेनमध्ये लेडीज डब्यात घडलेला हा प्रसंग... प्रत्येक जण आपल्याला बसायला जागा कशी मिळेल या गडबडीत. जागा मिळाली की आपापले मोबाईल काढून,  माना खाली घालून , मनाशीच हसत बोलणा-या सगळ्या जणी.... आपल्या शेजारी कोण आहे? याची कोणाला पर्वा नाही आणि जाणून घ्यायची गरज नाही... त्यापेक्षा मोबाईलमधल्या त्याच्याशी किंवा तिच्याशी किंवा त्यांच्याशी बोलण्यात सगळे मग्न... अशाच वेळी माझ्यासमोरच्या सीटवर एक मावशी ऑलमोस्ट चक्कर येऊन पडायला आल्या होत्या. मदतीसाठी त्या हात पुढे करून .... पाणी... पाणी... असं पुटपुटत होत्या. एक तप खुप गलका आणि कानात हेडफोन.. यामुळे कोणालाच त्यांचा आवाज ऐकू आला नाही... मी सुध्दा मोबाईलमध्ये व्यस्त होते... तरी सुदैवानी माझं लक्ष गेलं... मी त्यांना पाणी देऊ केलं. पण त्यांचे डोळे मिटले गेले.. मी खुप घाबरले होते.. मला काहीच कळेना.... त्यांना हात लावून उठवलं.... त्या उठेचना... शेवटी अगदी कासारवाडी आल्यावर त्यांना जाग आली... त्या माझ्याकडे आशेनी पहात होत्या... बाटलीतलं पाणीअंगावर सांडत , सांडत  त्यांनी पाणी प्यायलं. त्या डोकं टेकवून शांत बसल्या... त्यांच्या शेजारी बसलेली मुलगी निर्विकारपणे उठून गेली... ती मुलगी उठताच, टेकू हललेल्या पिशवीसारख्या त्या मटकन बाकावर पडल्या. अगदी शिवाजीनगर गेलं तरी त्यांना भान नव्हतं.. मी त्यांना हाक मारली... त्या किंचित हसल्या... ''पुणे स्टेशन आलं की मला उठव'' असं म्हणाल्या... मी म्हणलं , ''अहो मावशी , आता उठा , आलं पुणे स्टेशन ''... माझ्या शेजारी बसलेल्या एका मावशींनी मला सांगितल..''कशाला या भानगडीत पडलीस? नाटकं करत होती ती बाई.... '' स्टेशनला उतरल्यावर त्या मावशींनी (चक्कर आलेल्या) मला थांबवून सांगितलं, ''मी नाटक करत नव्हते गं.. माझा ना बी पी वाढला असनं.'' मी म्हणलं , ''ठीक आहे मावशी , नीट जा तुम्ही...''
या प्रसंगातून मला प्रकर्षानी जाणवलं की आपली संवेदना बोथट होतीय का ? आपल्या आजुबाजुला काय चाललय हे जाणून घेण्याचीसुध्दा आपल्याला गरज वाटत नाही...  आपल्या ग्रेडचं कोणी असेल तरच त्याला बसायला जागा देणं, लक्ष देणं म्हणजे संवेदनशीलता नाही ना ? प्रेम आणि संवेदनशीलता या अगदी जिवलग मैत्रिणी आहेत नाही का? बघा ना जो माणूस संवेदनशील असतो, त्यालाच दुस-यांबद्दल प्रेम, आपुलकी वाटते. प्रेम ही भावना संकुचित नाही या माझ्या मताशी तुम्हीसुध्दा सहमत असालच. म्हणजे आपल्याकडे प्रेम म्हणलं की, पुरूष आणि स्त्री यांच्यातलं प्रेम.... पण , प्रेमाची व्याप्ती इतकी संकुचित नाही....वेगवेगळ्या नात्यांमध्ये ती भावना बदलते... 
मुळात आपल्या सगळ्यांमध्ये जे तत्व वसलेलं आहे.. त्यावर प्रेम करायला हवं.. कारण परमेश्वराला पूजणं म्हणजेच सगळ्या सजीव सृष्टीत वसलेल्या तत्वावर प्रेम करणं... प्रेम ही एक व्यापक भावना आहे. तिला कोणत्याही साच्यात बसवून अनुभवु नये. प्रेम द्याव.. घ्याव... वाटावं सगळ्यांच्यात... कारण शेवटी ही माणसं... ही नाती... त्यांना दिलेलं आणि घेतलेलं प्रेमच आपली खरी श्रीमंती आहे , नाही का? 

No comments:

Post a Comment