Sunday, 8 February 2015

आभास हा.......


सुधीर मोघ्यांची एक मस्त कविता वाचली आज 
नसताना तू जवऴी असण्याचा भास तुझा......
जाणवतो अणुरेणूत ... इथे तिथे वास तुझा......
कुठुनी ये इतुकी धग... विझलेल्या गतस्मृतीस..... 
वेदनेस संजीवक करणारा ध्यास तुझा....
''प्रेम ''या एका भावनेनी हे सगळे शब्द कसे जिवंत झालेत. एरवी भास, ध्यास, वास,आभास , वेदना या शब्दांना तितकी परिणामकारकता नसते, जितकी प्रेम या एका भावनेनी निर्माण होते. प्रेम या एका भावनेनी आभास ही एक छान कल्पना प्रत्यक्षात आणलीय. कधी दूर, कधी समोर , कधी अगदी जवळ, अगदी कुठेही त्याला किंवा तिला अनुभवता येतं या आभासातून...
पुन्हा एकदा कल्पनेचं सुंदर जग या आभासाला जिवंत करत. आपली प्रिय व्यक्ती जवळ असेल तर काहीच प्रश्न नाही. अर्थात नुसती शरीरानी जवळ असणं उपयोगाचं नाही म्हणा... शरीर आणि मनानीसुध्दा आपल्या जवळ असेल तर आभासी प्रतिमांची गरज भासत नाही. पण जेव्हा ती दूर असते तेव्हा मात्र हे आभास विरहाच्या त्या भयाण वाळवंटातून बाहेर काढतात. काही भावनांना प्रॅक्टिकल , बुध्दिवादी विचारांनी बघुन नाही चालत. त्या अनुभवायच्या असतात..... 
कुणाच्या तरी आठवणीत त्याच्या आभासी दिसण्यातच मन रमवणं ही गोड कल्पना आहे. अशा वेळी तो किंवा ती आपल्या जवळ नसली तरीही त्या आभासातच अस्तित्वाचा अनुभव घेता येतो. कारण अस्तित्वाची किंमत दूर गेल्याशिवाय कळत नाही. नेहमी आपल्या जवळ असणारी आपली प्रिय व्यक्ति जेव्हा दूर जाते तेव्हा तिचा ध्यासच आभासाला जन्माला घालतो. 
आभासातला तो किंवा ती जाम धमाल उडवून देतात. सिनेमात नेहमी आपण हे बघतो तेव्हा वाटतं , छे... काय हे ... काहीही दाखवतात... पण जेव्हा स्वतःलाच असे आभास होऊ लागतात तेव्हा.... ''दर्पणी पहाता रूप, न दिसे वो आपुले'' .. असं होतं तेव्हा... मग सुरू होतो आपला आणि आभासांचा लपंडाव... प्रत्येकानी हा लपंडाव नक्की अनुभवावा.. हा छळणारा,  आनंद देणारा, अनुभूती देणारा आभास मन भारून टाकतो... समोर असलं की नुसतच पहाणं होतं... आणि नसताना आभासासोबत जगणं होतं... या कवीकल्पना अनुभवण्यासाठी एकच भावना मनात असली पाहिजे...  प्रेम.. साधारणपणे ज्या वस्तू देहाला समाधान देतात त्या मिळवण्याकडे आपला कल असतो. त्या मिळवणं हेच जन्माचं ध्येय होतं. पण नीट विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की. अशा सगळ्या वस्तू ज्यांच्याकडे आहेत ते तरी सुखी आहेत का ? सुख आणि समाधान मानण्यावर असतं, मनातल्या प्रेम या भावनेवर असतं. प्रचंड त्रासात, वेदनेत असतानाही प्रेमाचा आभासही जगण्याचं बळ देतो... 

1 comment:

  1. तीनदा वाचुनही exactly काय म्हणायचय कळू शकलं नाही... उद्या परत वाचून बघेन ... कदाचित कळेल.

    ReplyDelete