Tuesday, 24 February 2015

माझ्या मना रे ऐक जरा.... 



माझं मन ना कधी कधी वेड्यासारखं हट्टीपणा करतं. कित्येक वेळा अगदी कणखर आणि ठाम असणारं माझं मन असं गलितगात्र झालं ना की मला त्याचा राग येतो. ब-याचदा मनातल्या उदासीला काही कारणच हवं असं काही नसतं. अगदी छोट्या छोट्या घटना सुध्दा विनाकारण मनस्ताप देतात. 
मग सुरू होतो खेळ मनातल्या विचारांचा. खरं म्हणजे आपला आनंद हा बाहेरच्या माणसांवर अवलंबुन नसून आपल्या मनावरच अवलंबुन आहे. मन प्रसन्न असेल तर सगळं कसं छान वाटतं. पण कित्येकदा एक छोटीसी अपेक्षा असते, की मला कोणीतरी समजुन घ्यावं. माझ्या एका वैचारिक मित्रानी खुप छान सांगितलं  होतं मागे एकदा, ''कोणतंही नातं घे ते दोन्ही बाजुने जोपासायची हौस हवी एकटयाच्या मर्जीनी ते नातं फुलत नाही फक्त श्वास घेतं'' खुप पटलं मला ते सगळं. कारण कित्येक वेळा आपल्याला असा अनुभव येतो, अरे मीच काय मेसेज किंवा फोन करायचा ? समोरच्या माणसाला गरज नाहीये का ? लोक पटकन नाती जोडतात आणि परकं समजतात. अगदी सहजच केलेली चेष्टा, मस्करी समजून घेत नाहीत. सॉरी म्हणण्यात कमीपणा नक्कीच नाहीये. पण पुन्हा हाच प्रश्न , प्रत्येक वेळी मीच का ? 
माझ्यासारख्या अति भावनाशील ( आत्ताच्या भाषेत बावळट) लोकांना तर अशा रणधुमाळीला सारखं सामोरं जाव लागत. आपल्या भावना समोरच्या माणसाच्या मनाला भिडतच नसतील तर व्यक्त तरी कशाला    व्हायचं ? तसंही करून पाहिलं. पण माझंच काहीतरी चुकत असेल असा ठाम विश्वास  असणारे लोक पटकन अपसेट होतात. (आत्ताच्या भाषेत इमोशनल फुल्स) आमच्या ओळखीचे एक काका आहेत , ते तर  नेहमी म्हणतात, ''प्रत्येक वाईट गोष्ट आपल्यामुळेच झाली असेल असं वाटायची काहीच गरज नाही. '' 
पण तरीही का कोणास ठाऊक प्रकर्षांनी असं वाटतं की आपली गरज नसेल तिथे जाऊ नये, फुकटचे सल्ले देऊ नये, विनाकारण कोणालाही आपलं मानू नये.   हे सगळं कितीही बोललं ना तरी जुन्या सवयी जाणार नाहीतच.   काही वेळा आपल्या मनातल्या भावना आणि समोरच्याच्या मनातल्या भावना भिन्न असतील, किंवा त्याची तीव्रता कमी अधिक असेल तर गोंधळ होतो. '' दया, कुछ तो गडबड है '' असं म्हणण्याची वेळ येते. 

पुन्हा एकदा आपलं मनच आपल्याला या सगळ्या विचारांमधून बाहेर काढतं. ''The only thing in this world is constant and that is Change''. या विधानाप्रमाणे आलेली मरगळही जाईलच. त्यासाठी कोणी बाहेरच्या माणसानी मदत करावी असा अट्टाहास करण्यात काय अर्थ आहे.  या जगात आपल्या मनाविरूध्द घडणा-या अनेक घटना आहेत, आपण कुठे काय करू शकतो त्याविषयी? त्या प्रत्येक घटनेला, घटनेतल्या पात्रांना ''मला समजुन घ्या हो'' असं सांगण्यापेक्षा, आपणच आपल्याला समजुन घेऊया... नव्यानी.  मनाला समजावुन सांगुया, तेही मस्तपैकी गुणगुणुन,   माझ्या मना रे ऐक जरा ... हळवेपणा हा नाही बरा....

1 comment:

  1. nice to c you back in form .... nice article once again .... CHANGE IS ETERNAL .. so bring some change each time every time ... we can feel the difference ..

    ReplyDelete