Thursday, 5 February 2015


प्रेमाला उपमा नाही..... 



आज रेडिओवर एक मस्त गाणं ऐकलं..... बाहो मे चले आओ , हमसे सनम क्या परदा..... वाह क्या बात है... काही गाणी श्रवणीय आणि प्रेक्षणीय अशा दोन्ही सदरात चपखल बसतात. त्यापैकीच हे एक गाणं आहे... निरागस डोळ्यांची जया आणि मनात असूनही प्रेम न दाखवणारा संजीव कुमार...
हे गाणं ऐकत असतानाच एक विचार मनात आला... प्रेम म्हणलं की त्यानी तिला प्रपोझ करायचं ... तिनी विचार करून होकार किंवा नकार कळवायचा.... वगैरे वगैरे.... पण प्रेमात तिनी पुढाकार घेतला तर.... काळ कितीही पुढे गेला असला तरी प्रेमामध्ये त्यानी पुढाकार घ्यावा असच तिला वाटतअसतं. पण जे प्रेम दोन जीवांमध्ये होतं त्याला कोण पुढाकार घेतय हे खरच तितकं महत्त्वाचं आहे का ? व्यक्त होणं महत्त्वाचं..... 
आत्ताच्या काळात तिनी पुढाकार घेणं हे फार अवघड राहिलेलं नाही. पण तरीही तिनी पुढाकार घेऊन प्रेमाची भावना व्यक्त करणं हा मोकळेपणा सहन करायला थोडं जड जातच. कवितांमध्ये किंवा गाण्यांमध्ये सुध्दा त्यानी प्रेम व्यक्त करणं हाच अन्वयार्थ  ब-याचदा पहायला मिळतो. प्रेम, प्रणय या हळुवार भावनांसाठी कितीतरी कविता केल्यात... गाणी रचलीयत.... पण तिनी त्याला सरळ सरळ आव्हान देणं ही गोष्ट जरा दुर्मिळच. पण तिनी तरी आपल्या मनातले भावनांचे तरंग का लपवावे ? स्पेशली जर तिचा प्रियकर जरा बिनडोकच असेल तर तिनी काय कराव ? त्याच्या मनात असूनही प्रेमा बिमाच्या फंदात पडायचच नाही असं त्यानी ठरवलच असेल तर तिनी गप्प बसायचं   का ? एरवी अगदी कवीच्या भूमिकेत असणारा तो एकदम मुक्यासारखाच वागायला लागला तर काय करायचं ? तर.....तिनीच प्रेम व्यक्त करायचं... 
प्रेम करणं म्हणजे एकमेकांकडे पहाणं नाही तर दोघांनी मिळून एकाच गोष्टीकडे पहाणं. असा एक संकेतच आहे की प्रेम पहिल्यांदा त्यानी व्यक्त केलेलं चांगलं. कारण पुरूषांना मोहाचा शाप आणि स्त्रियांना मर्यादेचं बंधन आहे. हे कितीही खरं असलं तरी स्त्री असो की पुरूष भावना तर सगळ्यांना सारख्याच असतात ना.... मग व्यक्त करायला काय हरकत आहे ? कारण फार कमी भाग्यवंतांना आपलं प्रेम कळतं आणि मिळतं... मग मनातल्या मनात ठेवण्यापेक्षा सांगितलेलं बर... कारण अवती भवती कितीही माणसं असली तरी आपलं असं कोणीतरी एकच असतं...... कारण.... प्रेमाला उपमा नाही..... हे देवाघरचे देणे...........

2 comments: