Saturday, 14 February 2015

सर्वस्व तुजला वाहुनी...... 


मित्र, मैत्रिणींनो सगळयात आधी तुम्हाला आजच्या व्हॅलेंटाईन डेच्या खुप शुभेच्छा. या ब्लॉगच्या निमित्तानी माझ्या मनीमानसी दाटलेल्या भावना तुम्ही समजुन घेतल्यात, प्रतिसाद दिलात. खुप बरं वाटतं. कोणत्याही कलाकृतीला रसिकांशिवाय शून्य किंमत असते. सादाला प्रतिसाद नसेल तर माणूस एकटाच असतो , नाही 
का ?  माझ्या ब्लॉगवर असच प्रेम करत रहा. कारण आजकालच्या काळात सगळ्यात मोठी गरज आहे ती म्हणजे शेअरिंग, व्यक्त होणं, प्रेम मिळवणं . कारण सगळी सुखं पैशानी विकत घेता येत नाहीत. 

आजच्या दिवशी अनेकांनी आपल्या मनातला आदर, प्रेम व्यक्त केला असेल, प्लॅन आखले असतील. एकमेकांना एकमेकांविषयी प्रेम वाटणं महत्त्वाचं आहे. ते असलं की मग तक्रारी, अपेक्षा, उपेक्षा वाट्याला येत नाही. प्रेम या भावनेला समर्पपणाची जोड मिळाली तर... कारण स्वार्थी प्रेम दगाबाज असतं. निरपेक्ष प्रेम चिरंतन टिकतं. तकलादू प्रेम फुलाप्रमाणे अल्पायुषी ठरतं. खरच कोणीतरी आपल्या मनासारखं भेटणं ही भाग्याची गोष्ट आहे. समर्पणाची सोनेरी किनार असणारं प्रेमच समाधान मिळवून देतं. ओरबाडून किंवा हिसकावून घेतलेली कोणताही गोष्ट फार काळ टिकत नाही. प्रेमात हरवून जाणं, समर्पण करणं महत्त्वाचं. समर्पणाची भावना इतकी उत्कट हवी की शरीर म्हणून वेगळं दिसत असलं तरी मन त्याच्या किंवा तिच्यापाशीच हवं. 
प्रेम निरपेक्ष असलं की चांगल्या , वाईट प्रसंगात ते तसच टिकून रहातं. माझं तुझ्यावर प्राणापलिकडे प्रेम आहे , हे बोलणं खुप सोप आहे. पण त्याचा गुढ अर्थ समजुन घेण तितकच अवघड. मला काय हवय यापेक्षा त्याला काय हवयं हे महत्त्वाचं. कवितेतूनच सांगायच झालं तर....
ठावे तुला तरी का, मी काय वाहिले रे,  माझे मला म्हणाया काही न राहिले रे.
सारे तुला दिले मी, झाले कृतार्थ झाले,  नाही हिशेब केला, हातात काय आले..
आजकालच्या स्वार्थानी भरलेल्या जगात समर्पण, त्याग या भावना फेटकळ वाटतात. सिधी उंगली से घी नही निकलता  तो उंगली टेढी करनी पडती है , असं म्हणणा-यांना समर्पणाचं महत्त्व काय कळणार ? आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तिचं सुख महत्त्वाचं. कुणाच्या तरी सुखासाठी आपल्या सुखाचं समर्पण करणं हे महत्त्वाचं. समर्पणात अहंकाराचा नाश होतो. अगदी अध्यात्मिक पातळीवर जाऊन विचार केला तर प्रेमाच्या अत्युच्च पातळीवरच्या समर्पण या भावनेनी देहातीत प्रेमाची अनुभूती घेता येते. 
आजच्या दिवशी निदान  हे तरी ठरवुयात की आपल्या मनातल्या  प्रेम  आणि माणुसकीच्या रोपट्याला खत पाणी घालून जिवंत ठेवुया, जोपासुया..

4 comments:

  1. Wonderful chain of articles ......... the last article is like a pinnacle with the awesome poem --- ठावे तुला तरी का, मी काय वाहिले रे, माझे मला म्हणाया काही न राहिले रे.
    सारे तुला दिले मी, झाले कृतार्थ झाले, नाही हिशेब केला, हातात काय आले..

    Hats off to your imagination and writing skills ...... keep it up

    ReplyDelete
  2. आजचं वाचून खूप बरं वाटलं ! Keep sharing! All the best!

    ReplyDelete
  3. यातील "ठावे तुला तरी का मी काय वाहिलेले" या गाण्याबद्दल काही अधिक माहिती मिळेल का?
    चित्रपट किंवा कवीचे नाव, मिळाल्यास पूर्ण गाणे कुठे मिळू शकेल?

    ReplyDelete
  4. यातील "ठावे तुला तरी का मी काय वाहिलेले" या गाण्याबद्दल काही अधिक माहिती मिळेल का?
    चित्रपट किंवा कवीचे नाव, मिळाल्यास पूर्ण गाणे कुठे मिळू शकेल?

    ReplyDelete