Tuesday, 10 March 2015


माझा शत्रू.... 


आत्ता पाऊस पडतोय. पण आश्चर्य म्हणजे मी आज पावसावर नाही बोलणारे तुमच्याशी. आज मी अगदी नुकतीच  एक लढाई केली आणि त्यात मी जिंकले , त्याबद्दल बोलायचय मला. माझ्या घरातल्या स्वयपाकघरात होती ती लढाई. मी कोणता नवीन पदार्थ बनवला ? नाही हो.... पाणी प्यायला म्हणून गेले तेव्हा बघते तर काय .. चक्क माझा शत्रू टाईल्सवर दिसला मला. आता तो होता की ती ते मला माहिती नाही. पण माला खुप किळस,  राग, भीती अशा सगळ्या भावना जाग्या होतात त्या शत्रूला पाहिल्यावर. त्या शत्रूचं नाव म्हणजे ''पाल'' . होय हो. मला खुप भीती वाटते पालीची. आत्तापर्यंत अनेकदा या शत्रूशी दोन हात करायची वेळ आलीय. पण ते काम माझे मिस्टर करतात. मी त्यांना मॉरल सपोर्ट देते ,  मागे उभी राहून. ''अहो, असा कुंच्याचा फटका मारा तिच्यावर... असं काय करताय, आत पळेल ती. मग माझी  पंचाईत होईल. तिला बाहेरच्या बाहेर अशी ढकलून द्या.. '' वगैरे वगैरे म्हणत. पण आज हा बाका प्रसंग आला तेव्हा आमचे अहो नेमके घरी नव्हते. मग काय माझ्या भीतीनी धसक्याची जागा घेतली. अशा वेळी नेमकं कोणी घरी पण येत नाही. आमच्या आई म्हणतात, '' पालीला  काय घाबरायचं ? जशी आली तशी जाते ती.'' पण माझा या सासुवचनावर अजिबात विश्वास नाही. म्हणजे ती पाल बाहेर जाईपर्यंत मला चैनच पडत नाही.
आमच्या भोरला अशा पाली पाहिल्या की अजिबात भीती वाटत नव्हती. कारण ते नित्याचं झालं असावं. पण फ्लॅट सिस्टिममुळे ही सवयच गेलीय पार. त्यात आमचे चिरंजीव म्हणत होते, ''आई, जाऊदे तू लक्षच देऊ नकोस.'' असं म्हणून तो कॉम्प्युटरवर गेम खेळत बसला. असा राग येत होता मनातून. ''अरे तुला आईची काही काळजी आहे की नाही ? ''असं काहीसं मी पुटपुटले. तर मुळ मुद्द्याकडे येते. ती पाल एकटी होती तोवर मला इतकी भीती वाटली नाही. मग काचेच्या तावदानावर तिचा बॉयफ्रेंड पण आला. लांबून दोन किळसवाण्या पाली इतकचं कळत होतं. पण ज्या पध्दतीनी ते एकमेकांना बिलगून बसले होते, त्यावरून तो तिचा बॉयफ्रेंडच असावा. त्यांच बराच वेळ चाललं होतं प्रेमप्रकरण. माझा जीव इथे वरखाली होत होता. अरे बाबांनो, आपापल्या घरी जाऊन करा ना काय करायचय ते. असं मी त्यांना सांगत होते. काही वेळानी त्यांनी मिठीचा विळखा सोडला. पावसाळी हवेनी त्यांना पण रोमॅंटिक केलं होतं बहुतेक. माझा त्यावर आक्षेप नाही. पण  स्वतःच्या घरी करावं ना जे काय ते ... उगाच  दुस-यांना ताप. फायनली ते वेगळे होऊन चालायला लागले. मी म्हणलं , ''ए बाबा, तिला घेऊन जा. इथे काय तिचं काम आता ? ''पण त्यांची हालचाल पुन्हा मंदावली. माझ्या मदतीला कोणीही येणार नाही, याची मला जाणीव झाली. मी स्वतःलाच म्हणलं, ''अगं , काय हे नुकताच महिला दिन साजरा केलास ना ? हो पुढे आणि कर शत्रुचा बंदोबस्त.'' एकवेळ एखाद्याच्या श्रीमुखात भडकावणं सोप्प. पण पालीला हाकलणं म्हणजे जरा.. पण तरी मी शस्त्राला धार लावली. म्हणजे हातात झाडू घेतला. काचेच्या त्या बाजूला असलेल्या तिच्या बॉयफ्रेंडला काचेच्या बाहेरच ठेवलं. मग या बाजूची खिडकी बंद केली. हुश्श... अशा रीतीनी मी माझ्या लढाईत जिंकले. जाळी आणि खिडकीची काच यामध्ये ती अडकली बहुतेक. माझ्या मुलानी तिला झाडूनी छडी देण्याचा प्रयत्न पण केला.  पण आता ती घरात येऊ शकणार नाही याची खात्री झाली. बापरे... केवढं मोठं हे धाडस. तुमच्यापैकी काही हसतील मला. पण ज्यांना पालीची भीती, किळस, राग जे काही आहे ते वाटतं ना , त्यांना पटेल माझं म्हणणं. 
या प्रसंगातली मजा मी आत्ता लिहिताना अनुभवतीय. पण त्यावेळी भीतीनी गाळण उडाली होती. एक जाणवलं, संकट लहान असो की मोठं. आपल्याला एकट्याला त्याला सामोरं जायचय हे कळलं ना की आपण प्रयत्न करतो. कोणीतरी मदत करेल या आशेवर राहीलो की आपण आपले प्रयत्नच थांबवतो. एकुणात काय , आपल्या प्रॉब्लेम्सवर कोणीतरी सोल्युशन काढेल या आशेवर रहाण्यापेक्षा आपणच आपले प्रयत्न करायला हवेत , हा विचार पटलाच नाही तर  आज मी अनुभवला. 

No comments:

Post a Comment