रंग माझा वेगळा........
रंगाच्या या सणाला, असे काहीसे बोलुया,
प्रेमाच्या रंगामध्ये, सारे रंगुन जाऊया.....
आजच्या रंगीबेरंगी दिवसाच्या तुम्हाला काव्यमय शुभेच्छा. प्रेम आणि उत्साह घेऊन येणारा हा दिवस मनातली कटुता संपवून एका वेगळ्या रंगात रंगण्याच्या आहे. अर्थात त्या रंगाचं नाव प्रेम आहे. कारण हा एकच रंग वाईट भावनांवर विजय मिळवतो. मनातला सगळा द्वेष, राग, मत्सर , ''प्रेम '' या एका भावनेनी अक्षरशः निष्प्रभ ठरतात.
मनातल्या सगळ्या भावनांना वेगवेगळे रंग असतात. या रंगांची रंगपंचमी आपल्या मनात कायमच चाललेली असते. प्रत्येक प्रसंगी आपलं मन आपल्याला वेगवेगळ्या रंगांची अनुभूती देतं. एखाद्याचा राग येणं खुप चांगलं. तुम्ही म्हणाल, हे काय नवीन ? पण खरच आपण ज्या व्यक्तिवर प्रेम करतो ना त्याच्यावरच हक्कानी रागवतो. त्यामुळे रागाचा रंग चांगला. पण त्याचा अतिरेक नको. प्रेमाच्या वर्षावानी राग कुठच्या कुठे निघून जातो. आपलं इतक छोटसं आयुष्य , त्यात राग या भावनेला कशाला उगाच थारा द्यायचा. काही लोक अभिमानानी सांगतात, एकदा मला एखाद्याचा राग आला किंवा माझ्या ब्लॅक लिस्टला त्याचं नाव गेलं की संपलं. मला नेहमी हा प्रश्न पडतो, इतक्या सुंदर आयुष्यात कोणी कोणावर इतकं रागवू कसं शकतं? कारण आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात माणूस आज आहे तर उद्या नाही अशी अवस्था आहे. अशा वेळी भलतेच निग्रह करून आणि तेच मनात धरून काय फायदा ? त्यापेक्षा, '' जाने भी दो यारो'' असं म्हणलं ना तर सगळं सोप्प होतं.
मत्सर ही भावना आम्हा स्त्रियांमध्ये जरा जास्तच. अगदी समोरचीच्या साडीपासून गाडीपर्यंत अनेक गोष्टींवर आम्ही जेलस होतो. काही प्रमाणात हा रंगसुध्दा चांगला. कारण जेलसीमुळे आपण तिच्यापेक्षा अजून चांगलं काय करू शकतो हा विचार तरी करतो आपण. जेलसीच नसेल तर आपल्यात सुधारणा कशी होणार. त्या मत्सराचा अतिरेक नको , हे वेगळं सांगायला नकोच. काही वेळा या मत्सरापोटी अनावश्यक गोष्टी आणि भावनांची अडगळ निर्माण होते. ती होऊ देता कामा नये. आपल्याला आपल्यात सुधारणा व्हावी हा हेतू असला पाहिजे. कारण उगाच भलत्या विचारांना थारा दिला तर नुकसान आपलच होतं.
द्वेष या भावनिक रंगाचा फायदा होऊ शकतो बरं का ? कारण द्वेषातूनच काहीतरी करून दाखवण्याची इर्षा निर्माण होते. प्रगती होण्यासाठी आतून पेटुन उठण्याची गरज आहेच की. काहीतरी मिळवायचं आहे हे आधी ठरवायला लागतं . त्यासाठी द्वेषाची भावना मदत करते. पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडायची नाही हे मात्र नक्की.
मनातल्या भावनांच्या सगळ्या रंगांची आपल्या जीवनात गरज आहेच. त्या कोणत्याही भावनेचा अतिरेक होऊ द्यायचा नाही हे काम प्रेम करतं. मनात प्रेमाचा रंग गहिरा हवा. हे प्रेम एका व्यक्तिपुरतं मर्यादित नसावं. तसं प्रेम तर सगळेच करतात. पण आपापसात प्रेम निर्माण होऊ शकलं तर बरेचसे प्रश्न मिटतील. सगळं गुडी गुडी हवं असं नाही. सगळे रंग आवश्यक आहेतच. तसं नसेल तर आयुष्य बेचव, बेरंग होईल. फक्त लोणच्यानी भाजीची जागा घेतली की घोळ होतो. काळा रंग इतका अशुभ मानतात. पण एका गवळणीत म्हणटल्याप्रमाणे, ''आवड तुला नाही काळ्याची , केसाचा रंग का काळा? गो-या गालावरी शोभे सांगा, तीळ का काळा ? '' म्हणजे काळा रंग सोंदर्यात भर घालतो ना ? या सगळ्या रंगांची उधळणच आपलं आयुष्य रंगीबेरंगी करतं.
तसं म्हणलं तर प्रॉब्लेम्स कोणाला नाहीत ? पण या सगळ्यावर मात करून जगण्यातला आनंद शोधला पाहिजे. प्रत्येकाला या ओळी आपल्यासाठीच लिहिल्या गेल्यात असं वाटलं पाहिजे, त्या म्हणजे, '' रंगुनि रंगात सा-या रंग माझा वेगळा ''
No comments:
Post a Comment