Saturday, 7 March 2015

फिरूनी नवी जन्मेन मी....  




आज जागतिक महिला दिन. गमतीत सांगायचं झाल तर आमचा पोळा. आजच्या दिवशी स्त्री, तिचा सन्मान, तिची सुरक्षितता याविषयी वारेमाप लेख आणि चर्चा ऐकायला येतील. आज शिवजयंतीसुध्दा आहे, त्यामुळे कार्यक्रमांचा पाऊसच पडेल. डीजेनामक कर्णकर्कश्श यंत्रांच्या मालकांची आज दिवाळी. शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या प्रयत्नांपैकी एक टक्का प्रयत्न केले ना तर सुराज्य निर्माण होईल. पण या सगळ्यात वेळ खर्च करण्यापेक्षा डीजे लावून नाचलेलं चांगलं नाही का ? आर्थिक गणितांचा विचार केला तर या सगळ्या खर्चातून कितीतरी विधेयकं कामं उभी राहू शकतात. असे विचार पटतच नाहीत का कोणाला? प्रवाहाविरूध्द जाऊन काही शिवप्रेमींनी असे प्रयोग केले तर... असो.....  
महिला दिन साजरा करावा का नाही ? या वादात मला पडायचं नाही. कारण या जगात अशा कित्येक गोष्टी चालू आहेत , ज्याला मी काहीच करू शकत नाहीये. त्यातली एक मला प्रचंड त्रास देणारी गोष्ट म्हणजे स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून दाखवल्या जाणा-या जाहिराती. मध्येच एक जाहिरात पाहिली ज्यामध्ये एक  मुलगी तोकडे कपडे घालूनही मुलांना त्यांच्या नजरेतली बेशरमी लपवायला सांगते. थोडं विचित्र वाटलं . कदाचित जुन्या पण संस्कारी विचारांचा पगडा असेल. पण असे विचित्र कपडे घातल्यानी आपण पुढारलेल्या किंवा पुरोगामी विचारांच्या आहोत असं असतं का? वेशभूषा कशी असावी हे  स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. फक्त या स्वातंत्र्यानी, '' आ बैल मुझे मार ''असं होत नाहीये ना याचा विचार व्हावा.  वाईट नजरा निस्तनाभूत करण्यासाठी आपला एक कटाक्ष पुरे असतो. लाजून झुकणा-या नजरेतच जळजळीत निखारे सुध्दा असतात. आता कुठे, कोणाला आणि कसं सरळ करायचं हे आपणच ठरवायला हवं.  ''चलता        है ''संस्कृती नको. त्यामुळेच बलात्कार हा अंगावर घाव घालणारा शब्द हल्ली बोथट वाटायला लागलाय. आपल्या मनाविरूध्द  आपल्याला हात लावण्याची हिम्मत    करणा-याला शासन देण्याची ताकद  आपल्यात असते. फक्त ती वापरली पाहिजे. 
एक पुरोगामी विचारांची स्त्री कुटुंबालाच नाही तर समाजाला पुढे घेऊन जाऊ शकते. त्यासाठी स्त्री असण्याचा अभिमान तर हवाच. पण परमेश्वरानी दिलेलं स्त्रीत्व जपता आलं पाहिजे. समाजरथ पुढे जाण्यासाठी स्त्री आणि पुरूष ही दोन्ही चाकं महत्त्वाची आहेत. एकटी स्त्री किंवा एकटा पुरूष समाज विकसित करण्यासाठी असमर्थ आहे. त्यामुळे मुक्त कोणापासून व्हायचं हे आधी पक्क ठरवायला हवं. पुरूषापासून मुक्ति हवीय का ?  मला वाटतं नाही. मुक्ती हवीय परंपरेच्या जोखडातून , जाचक रुढींमधून, रोज असणा-या अत्याचाराच्या टांगत्या तलवारीपासून.  स्त्रीला दुय्यम वागणूक देणारी मानसिकता बदलली पाहिजे, मग ती स्त्रियांकडून असो की पुरूषांकडून. तिला तिचं आयुष्य तिच्या पध्दतीनी जगण्याची मुभा दिली पाहिजे. आजही कितीतरी कमावत्या स्त्रिया आपला पगार आपल्या मनाप्रमाणे वापरू शकत नाहीत. स्त्री मुळातच काटकसरी आणि योग्य विनिमयाची पुरस्कर्ती असते. त्यामुळे वायफळ खर्च ती करत नाही. पण तरीही तिच्या पगारावर तिचा अधिकार नसतो.  मोठ्या पातळीवर बदल होतायत. स्त्री पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून चाललीय. पण आजही कितीतरी मध्यमवर्गीय कुटुंबात मुलींना त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षण, नोकरी करण्याचा अधिकार नाही. स्त्री पुरूष समानता याचा मला समजलेला अर्थ म्हणजे स्त्री आणि पुरूषांनी एकमेकांना समजून घेऊन विकसित होणं. विधात्यानी स्त्रीला सहनशील बनवलय म्हणून तिनी सहन करायचं आणि पुरूषांनी अन्याय करायचा असं नाही. किंवा स्त्री मुक्तीच्या नावावर स्त्रियांनी स्वैराचार करायचा असंही नाही. समानता म्हणजे समजून घेऊन उन्नती करणं. 
बोलण्यासारखं खुप आहे. अन्याय, अत्याचार, असमानता हे सगळं संपवण्यासाठी विचारांची उच्च पातळी गाठून समजून घेतलं गेलं पाहिजे.. अर्थात स्त्री आणि पुरूष दोघांकडूनही. चलो फिर,  दो कदम आप चलो... दो कदम हम चलेंगे... 

No comments:

Post a Comment