Tuesday, 29 July 2014


ओळख .......




आज एक वेगळाच विषय डोक्यात घोळतोय. आपण कित्येकदा असं म्हणतो नाही की, मी तिला किंवा त्याला चांगलीच ओळखून आहे. किती बिनधास्त, केवढं मोठ्ठ धाडसं करतो आपण. खर तर, नाही ओळखत आपण इतकं कोणालाच. किंवा आपले अंदाज चुकतात. का आपण ओळखायलाच चुकतो माणसांना ? संदीप खरेच्या कवितेत मस्त ओळी आहेत, ''भेट जरी ना या जन्मातून ओळख झाली इतकी आतून. पश्न मला जो पडला नाही त्याचेही तिज सुचते उत्तर.'' अशी इतकी आतून ओळख झाली तर...... कोणाला काही प्रकटपणे सांगावच लागणार नाही. एकमेकांच्या सहवासात राहून  अशी ओळख होत असावी. पण तसंही नसतं. मग काय हवं असतं अशी ओळख व्हायला ? त्याला सहवासाची नाही तर मनांची नाळ जोडली जाण्याची गरज असते. या ओळखीतून ब-याच गोष्टी घडतात. काळजी, प्रेम, आपुलकी , आस्था, आधार या मानसिक गरजा अशा ओळखीतून घडतात , वाढतात. 
रोज दिसणारी अनेक माणसं , ज्यांच नावसुध्दा माहिती नसत त्यांची तोंडओळख एक वेगळ नातं निर्माण करते. सकाऴी फिरायला जाताना ठराविक कट्ट्यावर बसलेले ज्येष्ठ नागरिक एखाद्या दिवशी नसले तरी जीव उगाच कासावीस होतो. रोज ठराविक वेळी येणा-या फेरीवाल्याचा आवाज आला नाही, तर मन त्या आवाजाच्या दिशेनी शोध घेतं. देवळात रोज येणारी माणसं एकमेकांना नावानी ओळखत नसतीलही. पण कोणी एखाद्या दिवशी दिसलं नाही तर बेचैन व्हायला होतं. ट्रेनमध्ये  किंवा बसमध्ये तर अशा तोंडओळखी कितीतरी असतात.  नुसत स्माईल पुरतं  ओळखींना. आता अशा ओळखींना काय लागतं हो ? पण लोक तितकं मोकळसुध्दा वागत नाहीत.असो.... तो एका वेगळ्या लेखाचा विषय आहे.
एखाद्या व्यक्तिला आपण नुसतच बघत असतो. पण ओळखत नसतो. त्याच्या किंवा तिच्याबद्दल अंदाज - आडाखे बांधतो. पण ते अगदीच चूक ठरतात. रागीट वाटणारी एखादी व्यक्ति एकदम प्रेमळ असते. प्रेमळ वाटणारी एखादी व्यक्ति तुसडी असते. म्हणजे हे वरवरचं ओळखणं किती फोल ठरतं. 
फार कशाला अगदी रस्त्यावर दिसणारी कुत्री सुध्दा अशी ओळख ठेवतात. माझ्या ओळखीचे एक आहेत. ते कॉलनीत  जाण्याची चाहूल लागताच रस्त्यावरची कुत्री लगेच शेपट्या वर करून त्यांच्या मागे जातात. असं म्हणतात की,  प्राणीजगत निसर्गाच्या जास्त जवळ असतं. त्यामुळे त्यांना शुध्द मनाची माणसं लगेच कळतात किंवा ते लगेच ओळखतात.  ही आतली ओळख  आहे नाही का ? 
सुसंवाद वाढून मनांची विण घट्ट व्हायला हवी. एकमेकांना मदतीची, प्रेमाची, आपुलकीची गरज असते.  शुध्द मनानी मैत्री करायला हवी..... अगदी कोणाशीही... अशा ओळखी माणसाचं खरं दर्शन घडवतात. नाती निर्माण करतात. सगळ विश्वच माझं घर आहे हे संतवचन अशा ओळखीतून सत्यात उतरेल. आता तर फेसबुक, व्हॉटस अप आणि अशी कितीतरी माध्यमं  आहेत, ज्यातून ओळखी वाढतात. आपली ओऴख अशीच झालीय नाही का ?  तर, मित्र मैत्रिणींनो अशीच ओळख राहूदे.... किंबहुना वाढूदे.....  

Monday, 28 July 2014






पुन्हा एकदा....स्वरचित कवितेसह
वेडं मन..........






आजकाल हे काय झालय मला?

अगदी लहान आवाजाचाही कोलाहल वाटतोय

तुझ्याशी बोलता याव म्हणून,

स्वतःच्याच मनाला कोंडलय एकांतात 

पण प्रत्यक्षात काही शब्दच फुटत नाहीत.

याला काय म्हणतात माहित नाही

आणि हे जाणून घ्यायची इच्छाही नाही

कारण अशा या गो़ड अवस्थेत 

तत्वज्ञान ऐकून हे क्षण  गमवायचे नाहीयेत मला

या अवस्थेचा अंत मनाप्रमाणे झाला तर......

ईश्वरा मी शतशः ऋणी राहीन....

Sunday, 27 July 2014


जरा जपून.......

सकाळची वेळ होती.... मॉर्निंग वॉकसाठी एक आजोबा रस्ता क्रॉस करत होते. अचानक रॉंग साईडनी एका मुलानी गाडी घातली. ते आजोबा बिचारे घाबरून गेले. बरं त्या मुलाला आपण काही चुकलोय याची जाणीवसुध्दा नव्हती. पुढे जाऊन निर्लज्जपणे हसत तो निघून गेला......
आज एका वेगळ्याच विषयावर तुमच्याशी बोलावस वाटतय. निदान तळेगावमध्ये फार मोठ्या प्रमाणात जाणवणारी ही समस्या आहे.कदाचित तुम्हालाही जाणवत असेल. गेले काही दिवस मी बघतीय, टू व्हीलरवर अगदी लहान मुलं भरधाव वेगानी जातायत. वेळ सकाळची असो की संध्याकाळची,  हल्ली ट्रॅफिकची समस्या गंभीर बनते आहे. त्यातच ही मुलं फारसा विचार न करता गाड्या हाणत असतात. पावसाळ्याच्या दिवसात किती घसरडे रस्ते झाले आहेत. त्यातच अशा पध्दतीनी गाडी चालवणं म्हणजे ''आ बैल मुझे मार'' असं आहे. बरं याबद्दल या मुलांना काही सांगायला जावं तर त्यांना ते पटत नाही. ''आमच्या आई बाबांना काही प्रॉब्लेम नाहीये. मग तुम्ही का टेन्शन घेताय उगाच'' असली उत्तर ऐकावी लागतात. एकदा शहाणपणा करून एका मुलाच्या पालकांशी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्या महाशयांनीदेखील असच उत्तर दिलं, ''अहो  ठीक आहे ना वय आहे मुलांच. काही प्रॉब्लेम होत नाहीये ना , मग उगाच कशाला घाबरता
तुम्ही ? ''तो मुलगा  सुरुवातीला सांगितल्यावर असं का बोलला असेल ते आत्ता लक्षात आलं. आडातच नाही तर पोहो-यात कुठून येणार.
याच गंभीर विषयावर एकदा माझ्या ओळखीच्या काकू बोलल्या होत्या. त्यांनी एका मुलाला असच ज्ञानामृत पाजण्याचा प्रयत्न केला. एक अगदी शाळकरी मुलगा भरधाव वेगात चारचाकी चालवत होता. त्याला त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यानी उलट काकूंनाच समजावलं, ''तुम्ही जुन्या पिढीतले लोक फार घाबरट आहात. आता जग बदललं आहे.  कुठल्या जमान्यात आहात तुम्ही.''  काकूंनी हार मानली नाही. त्या बिचा-या त्याच्या वडिलांकडे गेल्या. त्यांना म्हणाल्या, '' अहो तुम्ही तरी समजावून सांगा तुमच्या मुलाला. '' तर त्याचे वडिल म्हणाले, '' अहो काकू , गाडी आमची, मुलगा आमचा, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ? आणि आमचं लक्ष आहे ना आमच्या मुलाकडे. तुम्ही कशाला उगाच काळजी करताय ? ''
या दोन्ही उदारणावरून  त्या मुलांइतकाच त्यांच्या आई वडिलांचा पण दोष आहे असं मला वाटतं. शाळकरी मुलांना गाडी हातात देणं चूक आहे. एक तर त्यांच वय आणि मन दोन्ही विचित्र असतं. या वयात फास्ट गाडी चालवण्याची उर्मी त्यांच्या मनात असली तर ते चूक नाही. धूम १, २, ३ आणि येणारे सगळे तसचं इतर सिनेमांमध्येदेखील गाड्या उडवणं हा प्रकार ही मुलं आणि मुलीसुध्दा पहात असतातच. त्यात पालकांचा पाठिंबा मिळाला तर काय विचारायलाच नको.  या सगळयामुळे आपल्या मुलाचा जीव धोक्यात येईलच. पण चालणा-यांनासुध्दा धोका आहे. हे लक्षात घ्यायला हवं. गाडी चालवण्याची क्रेझ असणं स्वाभाविक आहे. पण प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. नाही का ? लायसन्सवर वय टाकण्यामागे नक्कीच खूप मोठा विचार केला गेला असणार. आपण नेहमी कायद्यांच्या बाबतीत उलट सुलट बोलतो. पण हे कायदे  आपण आणि आपल्या आसपासचे लोक पाळतात की नाही ही जबाबदारी पण आपलीच आहे
ना ?
 कोवळ्या वयाच्या या सळसळत्या तरूणाईला जपण्याचं आणि त्यांना योग्य दिशा दाखवण्याचं काम आपलच आहे. आपला जीव इतका स्वस्त नाही की तो अशा रीतीने गमवायला लागावा. नंतर दुःख करत बसण्यात काहीही अर्थ नाही. खूप मनापासून विनंती आहे की, चुकीच्या वयात मुलांच्या हातात अशा कोणत्याही गोष्टी पडू देऊ नका, की ज्यामुळे नंतर पश्चाताप करावा लागेल.
एका कवीच्या सुंदर ओळी आठवतात,
उसळत्या रक्तात मला ज्वालामुखीचा दाह दे,
वादळाची दे गती , पण भान ध्येयाचे असूदे. 

Tuesday, 22 July 2014



स्कूल चले हम..........

शाऴा आणि शाळेच्या आठवणी आपल्या सगळ्यांच्याच मनाच्या आतल्या कप्प्यातल्या असतात. मला जर देवानी असं विचारलं की, ''बोल तुला तुझ्या आयुष्यातला कोणता काळ पुन्हा एकदा जगायला आवडेल?'' तर मी म्हणेन, ''देवा, मला माझ्या शाळेच्या दिवसांमध्ये पुन्हा एकदा जायचय.''
त्याला कारणही तसच आहे हो. माझी शाळा आहेच तशी अगदी आत्ताच्या फुलऑन भाषेत बोलायचं तर '' लय भारी  ''.  भोरला राजा रघुनाथराव विद्यालयात आम्ही शाळेमध्ये खूप मजा लुटली आहे. आनंददायी शिक्षण म्हणजे काय ते मनसोक्त अनुभवलं आहे. भरपूर स्पर्धा, खूप खेळणं, प्रार्थना म्हणणं, कविता म्हणण्यासाठी (कविता चालीत शिकवण्यासाठी) सगळ्या वर्गामधून जाणं, पावसाळ्यात ग्राऊंडवर स्केटिंग करताना पडणं, शाळेबाहेर बसणा-या  गोळया बिस्किटवाल्या काकांकडून कधीतरीच  खाऊ घेणं, नाटकात काम करणं, खूप पुस्तकं वाचणं , गॅदरिंगमध्ये तर काय विचारूच नका........
शाळेचा विषय निघाला ना की माझं असच होत. खूप बोलावस वाटतं भरभरून. पण आज काही वेगळच सांगायचय मला.  परवा मी पुन्हा एकदा विद्यार्थिनी होण्याचा आनंद लुटला. पुण्याच्या मा.स. गोळवलकर शाळेत माझ्या भाच्याच्या शाळेत मला ही संधी मिळाली. त्या शाळेत ''पालक शाळा'' नावाचा अभिनव आणि प्रचंड आनंददायी उपक्रम राबवला जातो. दर वर्षी एक दिवस पालक मुलांऐवजी शाळेत येतात आणि विद्यार्थी बनतात.
मी अशी संधी सोडणं शक्यच नव्हतं. शाळेत जायचं म्हणून लवकर उठून पहिल्या लोकलनी पुण्यात गेले. एक सांगायचच राहीलं. मी दुसरीत होते बरं का........ताई वर्गात आल्या होत्याच. मग आम्ही सगळ्यांनी प्रार्थना म्हटली. मग प्रतिज्ञा झाली. भारत माझा देश आहे..... सारे भारतीय माझे बांघव आहेत.... आश्चर्य म्हणजे प्रतिज्ञा मला आठवत होती. खूप मस्त वाटलं. मग भाषेचा तास सुरू झाला. कविता, धडे, चित्रवर्णन असं सगळ शिकवलं. मग हस्तकलेमध्ये खराट्याच्या काडीचा मस्त शो पीस बनवायला शिकवलं. मग माझा नावडता तास सुरू झाला. गणित..... पण सुदैवानी लगेच मधली सुट्टी झाली. मग काय सगळ्या पालक विद्यार्थ्यांनी डबे खाल्ले. एरवी मुलांना बळेच पोळी भाजी खायला घालणा-या चीटर पालकांनी डब्यात खाऊ आणला होता. मध्येच संगीताच्या ताई आल्या. वा..... किती छान. ''आम्ही गड्या डोंगरचे रहाणार, चाकर शिवबाचे होणार... '' हे झकास गाणं आम्ही अगदी तालासुरात म्हणलं . पुन्हा गणिताचा तास........ मूल्यवाचक आणि क्रमवाचक संख्या..... बापरे..... डोक्यावरून गेलं. पण त्या ताई इतक्या छान शिकवत होत्या की त्या वर्गातल्या मुलांचा हेवा वाटला. सोप्या पध्दतीनी केलेली वजाबाकी माझ्यासारख्या अगणिती (अमराठी सारख हं) विद्यार्थिनीला सुध्दा जमली.
असा सुंदर दिवस खूप दिवसांनी अनुभवायला मिळाला. त्यासाठी माझी वहिनी सोनाली, भाच्चा निषाद आणि अर्थात  गोळवलकर शाऴेचे मनापासून आभार. असे उपक्रम सगळ्या शाळांनी राबवले पाहिजेत. अर्थातच पालकांनीदेखील उत्साहानी त्यात सहभागी झालं पाहिजे. पालक सभेपुरतं शाळेशी कनेक्ट न रहाता, शाळेशी
ख-या अर्थानी जोडलं जाण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आहे. आता मी वाट पहातीय पालक शाऴा परत कधी भरेल याची.........

Wednesday, 16 July 2014




मी एकटीच माझी असते कधी कधी .....



रेडिओवर एक मस्त गाणं लागलं होतं. मी एकटीच माझी असते कधी कधी ..... गर्दीत भोवतीच्या नसते कधी कधी....वा वा.... काय सुरेख शब्द आहेत. या गाण्यावरून मनात विचार आला. खरच आपण एकटेच असतो नाही ? कोणी कितीही जवळच असलं तरी आयुष्यभरआपली आपल्यालाच  साथ असते. समाजात मिसळणा-या माणसाला एकटेपणा नको वाटतो. पण काही वेळा सभोवताली असलेल्या गर्दीच्या जाणीवेपलिकडे असणारा एकटेपणा कधी अनुभवलाय का ?
यावरून माझे आवडते लेखक प्रविण दवणे यांच्या पुस्तकातल्या काही ओळी आठवल्या........  
गगनभरल्या आठवणींचे, गर्द झाडीत शिरती थवे
ओला काळोख आळत येतो, उकत्या झाकत्या काजव्यांसवे
ही गर्द झाडी मनातलीच. आठवणींच एक आभाळ होतं. या आठवणी दंश करतात. त्यामुळेच न दिसणा-या दरवाज्यांच्या कड्या आपण न दिसणा-या हातांनी लावून घेतो. आणि गर्दीत न दिसणारे आपण त्या गर्दीतच एकाकी ठरतो. जगाला वाटतं अरे हा इतका सुखी माणूस असा दुःखात का ? पण ब-याचदा या का ? चं उत्तर आपल्यालाच माहिती नसतं.
आपण आलोत एकटे आणि जाणारही एकटे असं कितीही म्हणलं ना तरीही ''विरह'' हा एकटेपणा वाढवतो . अस्तित्वाची किंमत दूर गेल्याशिवाय कळत नाही. पण ही किंमत मोजताना अस्तित्वच हरवून बसतं. काही वेळा हा विरह परिस्थितीमुळे येतो. पण काही वेळा माणसं ठरवून लांब रहातात. अगदी आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो त्याच्यापासून लांब रहातात. का करतात लोक असं? कोणती तत्व बाळगतात
उराशी ? अगदी एका घरात राहून सुध्दा एकाकी रहातात. हल्ली त्याला अभिमानानी TTMM असं म्हणतात. तुझं तू माझं मी. अरे ठीक आहे.... द्या स्पेस एकमेकांना. पण एकमेकांमध्ये हरवून जाऊन, एकमेकांच्या सोबतीनं वाट चालली तर .... रस्ता लवकर संपेल. इच्छित स्थळी लवकर पोहोचता येईल.
एकटेपणा घालवण्यासाठी किंवा एकाकीपणावर मात करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. आपल्याला एकाकी सोडून गेलेल्यांसाठी हळहळ करत बसण्यापेक्षा, जिथे आपली खरच गरज आहे अशा ठिकाणी गेललं बर नाही का ? जगात अनेकांना फक्त मायेची नितांत गरज असते. आपला एकटेपणा अशा लोकांसाठी वरदान ठरू शकतो. मित्र मैत्रिणींनो आपण मात्र एकमेकांना कधीच एकटं सोडायचं नाही बरं का......  

Friday, 11 July 2014



मोकळेपणानी जपलेलं मोकळ नात...........

मराठी साहित्यामध्ये स्त्री लेखिकांनी आपल्या व्यथा ,वेदना मांडण्याचा प्रयत्न केला. पुरूष लेखकांच्या नजरेतून निर्माण झालेल्या साहित्यापेक्षा हे जास्त खरं होतं. कारण ''ज्याचं जळत, त्यालाच कळतं'' याप्रमाणे ही व्यथा स्त्रियांनी अधिक सक्षमपणे मांडली. तरीही हा मोकळेपणा समाजाची बंधनं पाळून लिहिला गेला. ज्या लेखिकांनी शृंगारिक, मनाला खरच पटेल ते आणि हवं ते लिहिलं त्याकडे चांगल्या दृष्टीनी पाहिलं गेलं नाही. इतकं स्पष्ट बोलण्याची काय गरज आहे ? हे म्हणजे जरा अतिच आहे. असे शेरे अगदी स्त्रियांनीसुध्दा मारले.

मोकळेपणानी वागावसं वाटणं, व्यक्त होणं याला इतकी बंधनं का असतात ? निरपेक्ष, निखळ असं काही असू शकत नाही का ? जग बदललं आहे, समाज विकसित झाला आहे असं म्हणताना आजही  स्त्री - पुरूष संबंधाकडे एका ठराविक चष्म्यातून का पाहिलं जातं ? मैत्री ही फक्त मुली- मुलींची आणि मुला - मुलांचीच असते का ? एखादी स्त्री आणि पुरूष निरपेक्ष मैत्री करूच शकत नाहीत?

तुम्ही म्हणाल हे सगळ आऊटडेटेड झालयं. पण मित्र मैत्रिणींनो तसं नाहीये. मोकळेपणानी वागण आजही समाजाला रूचत नाही. कोणालाही न कळता , गुपचुप , लपत - छपत मैत्री करणं हे किती लाजिरवाण आहे. स्त्रियासुध्दा आपल्या नव-याची मैत्रीण स्विकारत नाहीत. पुरूषांना तर याबाबतीत जमेसच धरायचं नाही. कितीही म्हणलं तरी आजही पुरूषसत्ताक राजवटच आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील अशा पुरूषांना आपल्या बायकोचा मित्र समजतो. अशा नात्यांची गरज मान्य का होत नाही ? दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर न करण्याची जबाबदारी  पार पाडणं हेही महत्त्वाचं आहेच. पण विश्वास टाकून तर पहा. अशी नाती निर्माण झाली आणि ती मोकळेपणानी स्विकारली गेली तर बरेचसे प्रॉब्लेम्स निर्माण होणारच नाहीत.

मिलिंद बोकील सरांच्या ''एकम'' या कादंबरीमध्ये स्त्री - पुरुष नात्याबद्दल ते फार छान सांगतात. सुभद्रा आणि देवकी या मैत्रिणींमधल्या संवादामध्ये या नात्याविषयी सुभद्रा सांगते, ''स्त्री - पुरूषांमध्ये बेसिक आकर्षण असतं. त्याचा बॉंड खूप घट्ट असतो. या आकर्षणातून जे नातं निर्माण होतं ते कायम टिकणारं आहे. मग तुम्ही लग्न करता का नाही हा मुद्दा महत्त्वाचा नाही. स्त्री - पुरूष नातं बेसिक आहे. अगदी मुलभूत. पण बायकांचा प्रॉब्लेम हा आहे की त्या असं नातं पुरूषांशी निर्माण करू शकत नाहीत. पुरूषांचा प्रॉब्लेम हा आहे की त्यांना ते कोणाशीच निर्माण करायचं नसतं. त्यामुळे दोघही करंटेच. ''
या सगळ्या विचारावर संदीप खरेची एक मस्त कविता अगदी पटकन आठवली.
मी मनस्वीतेला पाप मानले नाही
अन उपभोगाला शाप मानले नाही
ढग काळा  जेथून एकही फिरला नाही
नभ असले मी अद्याप पाहिले नाही.

Wednesday, 9 July 2014





पुन्हा एकदा एक स्वरचित कविता
निःशब्द प्रेम........

तुझ्याशी बोलण्याची खूप सवय झालीय
कधी गाण्यातून
कधी कवितेतून
तर कधी स्पर्शातून
प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा हे स्पर्शच बोलतात खूप काही
माझ्या मनाच्या अगदी तळात लपलेल्या भावनाही
खरच मला सांग ना
का इतकं वेड लावलयस?
तुझ्यावाचून जगणचं अवघड होऊन बसलय
कधी कधी वाटतं,  माझ्या या प्रेमाचा तुला त्रास होतोय का ?
तुझ्या स्वातंत्र्याला प्रेमाच्या या पाशांनी बांधून टाकलय का ?
कारण तूच नेहमी म्हणतोस,
कधीतरी सुख मिळण्यातच खरी मजा
रोजच सुख मिळालं तर ती वाटू लागते सजा
मीही खूप ठरवते रे, निःशब्द प्रेम करायचं
तसही तुला कळतच की सगळ
मग सगळ शब्दात कशाला बांधायच ?

Saturday, 5 July 2014


शहाणे अंतर...........




नुकतीच निलिमा गुंडींची एक कविता वाचनात आली,
तर आपण विचार करूया आपल्या नात्याचा , त्यातल्या जवळकीचा आणि अंतराचा
तशा मिलनासाठी अनेक प्रतिमा आहेत
उदाहरणार्थ .......... धरतीवर टेकलेलं आकाश,
प्रतिमा थोडी खरवडली की कळेल
धरती खरी एकटीच आहे... कारण आकाश म्हणजे चक्क आभास...
दुसरीही प्रतिमा आहे तयार
सुरात वाजणारी सतार
सतारीकडे नीट पाहूया म्हणजे कळेल
सूर लागण्यासाठी कसे तारांमध्ये अंतर ठेवले आहे
आपल्या नात्याविषयी मला हेच म्हणायचे आहे...
              या कवितेतून ''अंतर'' या अगदी सहज वापरल्या जाणा-या शब्दाचा किती छान अर्थबोध होतो. विरह ... अंतर हे  शब्द चांगल्या अर्थानी वापरले जात नाहीत. पण त्यामध्येसुध्दा एक वेगळीच मजा आहे. तुम्ही म्हणाल, भेटण्यात जी मजा आहे, ती अंतर असण्यात कशी असेल?
पण कधीतरी विचार करून बघा. ज्या व्यक्तिवर आपण हातचं काहीही न राखता प्रेम करतो . ती व्यक्ति कितीही दिवसांनी भेटली तरी त्या प्रेमात काहीही फरत पडत नाही. कारण भेट होणं म्हणजे अंतर मिटणं. म्हणजे प्रवास संपण... मुक्कामाच्या ठिकाणी जाण्याची आस प्रत्येकालाच असते. पण ते ठिकाण आलं की प्रवास थाबतो. खरी मजा तर प्रवासात आहे ना?
दोन व्यक्तिंमध्ये अंतर असेल तरच त्यांना एकमेकांची किती ओढ आहे हे कळेल. कायम जवळ असणारी सगळी माणसं आपल्याला खरच आवडतात का ? अगदी ज्या व्यक्तिवर भरभरून प्रेम करतो तीसुध्दा रोज सहवासात आली तर ते प्रेम तितकच उत्कट राहू शकत का ?
हल्ली एक खूप चांगला शब्द ऐकायला मिळतो. ''स्पेस '' प्रत्येकाला ती हवी असते. कोणीही आपल्याशी फार जास्त जवळीक साधून आपल्या खाजगी गोष्टीत लक्ष घालायला लागलं तर ते आपल्याला आवडत नाही. मग  ती व्यक्ति कितीही जवळची  असो. ही स्पेस, हे अंतर हवच. कारण हे अंतर शहाणं असत.
अंतरच आपल्याला प्रेमाच्या साक्षात्काराची जाणीव करून देत. प्रत्येक बाईचा असा गोड गैरसमज असतो की, मी नसले तर घरातलं पानही हलणार नाही. एकदा बाहेर गेले ना मग कळेल. वगैरे.... तसं होत असेलही. पण या अंतरामुळेच घरातल्यांनासुध्दा तिची किंमत कळते. म्हणून बायकांनीसुध्दा आपली स्पेस जपण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. संसार, नोकरी, मुलं - बाळ हे सगळ आहेच. पण तरीही जसं घरातल्या बाकीच्यांना स्पेस हवी. तशी तिलाही हवी. या उदाहरणामध्ये अंतर किती महत्त्वाची भूंमिका बजावतं. हो की नाही ?
प्रेमी जीवांच्या बाबतीत हे अंतर त्रासदायक ठरत असेल. पण शरीरानी दूर गेल्यावरच मन अधिक जवळ येतात. हे अंतरच दोघांमधला दुवा ठरतं. ख-या प्रेमाची जाणीव करून देत.
संदीप खरेनी या शहाण्या अंतराचं वर्णन फार छान केलयं. मला खूप जास्त आवडलेली ही कविता आहे.
कितीक हळवे, कितीक सुंदर , किती शहाणे अपुले अंतर...
त्याच जागी त्या येऊन जासी माझ्यासाठी माझ्यानंतर...
भेट जरी ना या जन्‍मातून, ओळख झाली इतकी आतून
प्रश्‍न मला जो पडला नाही, त्याचेही तुज सुचते उत्तर
किती शहाणे अपुले अंतर...
पण मित्र मैत्रिणींनो, विचारांमध्ये आणि मनांमध्ये अंतर पडू देऊ नका हं. काय ते म्हणतात ना , KEEP IN TOUCH.

Thursday, 3 July 2014



झिम्मड पावसाची...........

              मन चिंब पावसाळी, घरट्यात रंग ओले
              घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले.
                चिंब असा हा पाऊस आज अनुभवला.  घरातून बाहेर पडताना हलक्याच वाटणा-या सरी जोरदार बरसल्या. अगदी हव्या तशा. आमच्या तळेगावला वेगळा वर्षा विहार करण्याची गरज नाही. मुद्दाम छत्री आणि रेनकोट न घेता बाहेर पडलं ,की वर्षा विहार घडतो. मनावर आलेली मरगळ कुठल्या कुठे पळाली. पावसाच्या या धारा झेलताना मन प्रसन्न झालं. तप्त अशा धरतीवर पाऊस बरसला की ती आनंदित का होत असावी? ते पावसात मस्त भिजल्याशिवाय कळणार नाही. व्हॉटस अॅपवर गरम भजी, चहा अशा इमेजेस टाकून जळवणा-या माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज तळेगावात मस्त पाऊस पडला.
                   श्रावणातल्या पावसाची आणि ढगांची मजा किती आणि कशी सांगावी? सूर्यबिंब बघता बघता नाहीसं होतं. ढग आपली काळी सावळी छाया धरेवर पाडतात. मग सुरु होतो मस्त पाऊस. मध्येच ढग वा-यामुळे पांगतात. सोसाट्याचा वारा सुरु होतो आणि अचानक पाऊस थांबतो. मग हळूच सूर्य ढगांमागून डोकावतो. जणू सृष्टीतला लपंडावच चालू असतो. मग पिवळा, केशरी, लाल असे रंग आकाशात पसरु लागतात. निळे, काळे ढग त्यांना रुपेरी किनार असं लोभसवाणं दृश्य बघायला मिळतं. बराच वेळ ही रंगपंचमी चालू असते. मग पुन्हा एकदा जांभळे, काळे ढग फिरुन येतात आणि लाल, पिवळ्या छटा कुठच्या कुठे लपुन जातात. पाऊस मुसळधार पडतानासुध्दा शेजारचे घर एकवेळ दिसत नाही पण आकाश मात्र निराळे, पांढरट, मध्येच काळसर दिसते. संध्याकाळी ही काळसर छटा पाहून सगळं वातावरण अंगावरच येतं. पण तेही काही काळापुरतच. मस्त पावसानी ही भीती लगेच पळून जाते.
                       उन्हाळ्यानंतर दोन, तीन महिने वठलेल्या झाडांना कोवळी तांबुस पालवी फुटायला लागते. काही दिवसांपूर्वी हे झाड वठल्यासारखं वाटत होतं यावर विश्वासही बसत नाही. रुक्ष वाटाव असं जणू काही घडलच नव्हत अशी ही झाडं दिसु लागतात. मऊ मातीतून हिरवे अंकुर फुटले तर नवल नाही. पण रुक्ष, काळे दगडही या दिवसात हिरवी शाल पांघरुन बसतात. मानव जातीला निसर्गाकडून मिळालेली ही केवढी मोठी शिकवण आहे. सगळ काही संपलय असं  न म्हणता नव्या उमेदीने जगलं पाहिजे. हा संदेश हा ऋतु आपल्याला देतो.
                       हा ऋतू प्रेमिकांना आणखी ओढ लावतो. त्याच्या असण्यानी रिमझिम भासतो. तर त्याच्या नसण्यानी काट्यांप्रमाणे टोचतो. सगळ्याच कवींना प्रेम आणि पावसाच्या अतूट नात्याचं वर्णन करण्याचा मोह आवरता आलेला नाही.  म्हणूनच कवी म्हणतो,
                      तृप्त झाली शांत धरणी,  मधुस्मिते हिरव्या कुरणी,
                     पुसट चुंबनासम ओल्या सरी येती जाती,
                      भुईसवे आभाळाची जुळे आज प्रीती.
  पावसाळ्यातच मानवालाच नाही तर सा-या सृष्टीलाच प्रेमाची बाधा झालेली असते.
अशा या मस्त पावसाचा खूप आनंद घ्या.


Wednesday, 2 July 2014




माऊली माऊली......

काल एका विलक्षण अनुभवानी मी तृप्त झाले आहे. त्याची झिंग आत्तासुध्दा मनात तशीच आहे. गेली दोन - तीन वर्ष ज्याची मी वाट पहात होते, तो क्षण काल मी अनुभवला. नुसता अनुभवला नाही तर मी तो क्षण पुरेपुर जगले. मित्र - मैत्रिणींनो काल मी वारीला गेले होते. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम काल फलटणला होता. तिथे जाण्याचा योग काल आला. घरातून निघाल्यापासूनच त्या चैतन्याचा अनुभव मी घेतला. अगदी एस.टी. पटकन मिळण्यापासून माऊलींनी काळजी घेतली.
तिथे गेल्यावर  फलटण येण्या आधीपासूनच वारकरी दिसत होते. लई भारी वाटत होतं. तिथे सगळेच माऊली. कंडक्टर माऊली, ड्रायव्हर माऊली, चहावाला माऊली, रिक्षावाला माऊली, स्त्री माऊली, पुरूष माऊली. मग काय हो, अडचण येईल तरी कशी. माझ्या पत्रकार मित्रानी माऊलींच्या अभूतपूर्व दर्शनाची संधी दिली. त्यासाठी त्याच्या ऋणात रहायला आवडेल. लांबच लांब रांग लावून दोन सेकंद सुध्दा दर्शन मिळत नाही. अशा परिस्थितीत मी आणि मैत्रिण माऊलींच्या पादुकांजवळ चक्क १५ मिनीटं होतो. आम्ही तिथे असतानाच माऊलींना नैवेद्य दाखवला. ते जेवले. त्यानंतर माऊलींच्या पादुकांवर डोकं ठेवताना समाधानाचा झरा अंतःकरणात वहात होता. डोळ्यातून अश्रू येत होते. आत्ता लिहिताना सुध्दा येतायत. काय पुण्य केलं असेल की ज्यामुळे हा क्षण माझ्या आयुष्यात आला असं वाटलं. एक वेगळाच सुगंध मनात भरून राहिला. खरच आईच्या कुशीत गेल्यासारख वाटलं. देव भेटला...... हो देव भेटला. देव भेटल्यावर काही मागायची बुध्दिच होत नाही असं नुसतं ऐकलं होतं, काल अनुभवल.
नंतर तिथल्याच एका दिंडीत प्रसाद घेतला. माहेरी मिळावं तितकं प्रेम आणि अगत्य अनुभवलं. किती हो प्रेम.... कसं वर्णन करू? कोण होतो आम्ही त्यांचे ? पण तरीही इतकी माया.... हे फक्त वारीतच होऊ शकत.
तिथेच एका तरूण लोककलाकाराच्या भारूडाचा आनंद घेतला. भारूडातून प्रबोधन केलं जातं हे छापील वाक्य अनुभवल. काही  मिनीटातच बेमालुम वेशभूषा आणि हावभाव बदलणा-या या कलाकाराला मनापासून सलाम. प्रचंड उर्जा होती त्याच्या सादरीकरणामध्ये. हे सगळ झाल्यावर तो क्षण आला जेव्हा पुन्हा डोळ्यात पाणी आलं. आम्ही  पुण्याकडे यायला निघालो. असं वाटत होतं घरी जाऊच नये.
 या सगळ्या सुखद अनुभवांनी मन भारावलं गेलय. खूप जास्त. हा आनंद असाच राहूदे आणि पुढच्या वर्षी वारी घडुदे हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना.

जय जय राम कृष्ण हरि.