Tuesday, 24 February 2015

माझ्या मना रे ऐक जरा.... 



माझं मन ना कधी कधी वेड्यासारखं हट्टीपणा करतं. कित्येक वेळा अगदी कणखर आणि ठाम असणारं माझं मन असं गलितगात्र झालं ना की मला त्याचा राग येतो. ब-याचदा मनातल्या उदासीला काही कारणच हवं असं काही नसतं. अगदी छोट्या छोट्या घटना सुध्दा विनाकारण मनस्ताप देतात. 
मग सुरू होतो खेळ मनातल्या विचारांचा. खरं म्हणजे आपला आनंद हा बाहेरच्या माणसांवर अवलंबुन नसून आपल्या मनावरच अवलंबुन आहे. मन प्रसन्न असेल तर सगळं कसं छान वाटतं. पण कित्येकदा एक छोटीसी अपेक्षा असते, की मला कोणीतरी समजुन घ्यावं. माझ्या एका वैचारिक मित्रानी खुप छान सांगितलं  होतं मागे एकदा, ''कोणतंही नातं घे ते दोन्ही बाजुने जोपासायची हौस हवी एकटयाच्या मर्जीनी ते नातं फुलत नाही फक्त श्वास घेतं'' खुप पटलं मला ते सगळं. कारण कित्येक वेळा आपल्याला असा अनुभव येतो, अरे मीच काय मेसेज किंवा फोन करायचा ? समोरच्या माणसाला गरज नाहीये का ? लोक पटकन नाती जोडतात आणि परकं समजतात. अगदी सहजच केलेली चेष्टा, मस्करी समजून घेत नाहीत. सॉरी म्हणण्यात कमीपणा नक्कीच नाहीये. पण पुन्हा हाच प्रश्न , प्रत्येक वेळी मीच का ? 
माझ्यासारख्या अति भावनाशील ( आत्ताच्या भाषेत बावळट) लोकांना तर अशा रणधुमाळीला सारखं सामोरं जाव लागत. आपल्या भावना समोरच्या माणसाच्या मनाला भिडतच नसतील तर व्यक्त तरी कशाला    व्हायचं ? तसंही करून पाहिलं. पण माझंच काहीतरी चुकत असेल असा ठाम विश्वास  असणारे लोक पटकन अपसेट होतात. (आत्ताच्या भाषेत इमोशनल फुल्स) आमच्या ओळखीचे एक काका आहेत , ते तर  नेहमी म्हणतात, ''प्रत्येक वाईट गोष्ट आपल्यामुळेच झाली असेल असं वाटायची काहीच गरज नाही. '' 
पण तरीही का कोणास ठाऊक प्रकर्षांनी असं वाटतं की आपली गरज नसेल तिथे जाऊ नये, फुकटचे सल्ले देऊ नये, विनाकारण कोणालाही आपलं मानू नये.   हे सगळं कितीही बोललं ना तरी जुन्या सवयी जाणार नाहीतच.   काही वेळा आपल्या मनातल्या भावना आणि समोरच्याच्या मनातल्या भावना भिन्न असतील, किंवा त्याची तीव्रता कमी अधिक असेल तर गोंधळ होतो. '' दया, कुछ तो गडबड है '' असं म्हणण्याची वेळ येते. 

पुन्हा एकदा आपलं मनच आपल्याला या सगळ्या विचारांमधून बाहेर काढतं. ''The only thing in this world is constant and that is Change''. या विधानाप्रमाणे आलेली मरगळही जाईलच. त्यासाठी कोणी बाहेरच्या माणसानी मदत करावी असा अट्टाहास करण्यात काय अर्थ आहे.  या जगात आपल्या मनाविरूध्द घडणा-या अनेक घटना आहेत, आपण कुठे काय करू शकतो त्याविषयी? त्या प्रत्येक घटनेला, घटनेतल्या पात्रांना ''मला समजुन घ्या हो'' असं सांगण्यापेक्षा, आपणच आपल्याला समजुन घेऊया... नव्यानी.  मनाला समजावुन सांगुया, तेही मस्तपैकी गुणगुणुन,   माझ्या मना रे ऐक जरा ... हळवेपणा हा नाही बरा....

Saturday, 14 February 2015

सर्वस्व तुजला वाहुनी...... 


मित्र, मैत्रिणींनो सगळयात आधी तुम्हाला आजच्या व्हॅलेंटाईन डेच्या खुप शुभेच्छा. या ब्लॉगच्या निमित्तानी माझ्या मनीमानसी दाटलेल्या भावना तुम्ही समजुन घेतल्यात, प्रतिसाद दिलात. खुप बरं वाटतं. कोणत्याही कलाकृतीला रसिकांशिवाय शून्य किंमत असते. सादाला प्रतिसाद नसेल तर माणूस एकटाच असतो , नाही 
का ?  माझ्या ब्लॉगवर असच प्रेम करत रहा. कारण आजकालच्या काळात सगळ्यात मोठी गरज आहे ती म्हणजे शेअरिंग, व्यक्त होणं, प्रेम मिळवणं . कारण सगळी सुखं पैशानी विकत घेता येत नाहीत. 

आजच्या दिवशी अनेकांनी आपल्या मनातला आदर, प्रेम व्यक्त केला असेल, प्लॅन आखले असतील. एकमेकांना एकमेकांविषयी प्रेम वाटणं महत्त्वाचं आहे. ते असलं की मग तक्रारी, अपेक्षा, उपेक्षा वाट्याला येत नाही. प्रेम या भावनेला समर्पपणाची जोड मिळाली तर... कारण स्वार्थी प्रेम दगाबाज असतं. निरपेक्ष प्रेम चिरंतन टिकतं. तकलादू प्रेम फुलाप्रमाणे अल्पायुषी ठरतं. खरच कोणीतरी आपल्या मनासारखं भेटणं ही भाग्याची गोष्ट आहे. समर्पणाची सोनेरी किनार असणारं प्रेमच समाधान मिळवून देतं. ओरबाडून किंवा हिसकावून घेतलेली कोणताही गोष्ट फार काळ टिकत नाही. प्रेमात हरवून जाणं, समर्पण करणं महत्त्वाचं. समर्पणाची भावना इतकी उत्कट हवी की शरीर म्हणून वेगळं दिसत असलं तरी मन त्याच्या किंवा तिच्यापाशीच हवं. 
प्रेम निरपेक्ष असलं की चांगल्या , वाईट प्रसंगात ते तसच टिकून रहातं. माझं तुझ्यावर प्राणापलिकडे प्रेम आहे , हे बोलणं खुप सोप आहे. पण त्याचा गुढ अर्थ समजुन घेण तितकच अवघड. मला काय हवय यापेक्षा त्याला काय हवयं हे महत्त्वाचं. कवितेतूनच सांगायच झालं तर....
ठावे तुला तरी का, मी काय वाहिले रे,  माझे मला म्हणाया काही न राहिले रे.
सारे तुला दिले मी, झाले कृतार्थ झाले,  नाही हिशेब केला, हातात काय आले..
आजकालच्या स्वार्थानी भरलेल्या जगात समर्पण, त्याग या भावना फेटकळ वाटतात. सिधी उंगली से घी नही निकलता  तो उंगली टेढी करनी पडती है , असं म्हणणा-यांना समर्पणाचं महत्त्व काय कळणार ? आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तिचं सुख महत्त्वाचं. कुणाच्या तरी सुखासाठी आपल्या सुखाचं समर्पण करणं हे महत्त्वाचं. समर्पणात अहंकाराचा नाश होतो. अगदी अध्यात्मिक पातळीवर जाऊन विचार केला तर प्रेमाच्या अत्युच्च पातळीवरच्या समर्पण या भावनेनी देहातीत प्रेमाची अनुभूती घेता येते. 
आजच्या दिवशी निदान  हे तरी ठरवुयात की आपल्या मनातल्या  प्रेम  आणि माणुसकीच्या रोपट्याला खत पाणी घालून जिवंत ठेवुया, जोपासुया..

Thursday, 12 February 2015


प्रेम केले प्रेम.... 



व्हॅलेंटाईन डे अगदी उद्यावर आलाय. प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्या दिवसाची गरज नाही हे खरच. पण कोणत्याही गोष्टीला काहीतरी निमित्त लागतच. त्या दृष्टिकोनातून विचार केला तर काय हरकत आहे , प्रेम व्यक्त करायला. 
प्रेम  या भावनेचा विचार करतानाअजून एका महत्त्वाच्या मुद्याचा विचार करायला हवा. ते म्हणजे नात्याचं लेबल. ते लेबल नाही तर प्रेम पण नाही असं काही आहे का ? आणि असलं तर ते कसं शक्य आहे ? प्लॅटोनिक लव्ह या संकल्पनेचा विचार केला तर दोन शरीरं आणि एक मन हे शब्द जिवंत होतात. अशा वेळी अपेक्षेला काही महत्त्वच उरत नाही. ग्रीक तत्ववेत्ता अॅरिस्टॉटल म्हणतो, प्रेम म्हणजे दोन शरीरात वास करणारा एक आत्मा. किती सुंदर कल्पना. प्रेम हे अंतरिक, मानसिक असतं. घोटून गुळगुळीत झाल्यामुळे प्लॅटोनिक लव्ह या शब्दाचा वापर तितक्या गांभीर्यानी केला जात नाही. एक मन असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्या मनात काही आलं ते तिला उमजलं आणि तिच्या मनात काही आलं तर ते त्याला समजलं हे होण्यासाठी खूप मोठी तपश्चर्या लागते. म्हणजे एकमेकांवर जिवापाड प्रेम असाव लागत. ''शब्देविण संवादू'' ही कल्पना शारीर सौंदर्यात रमणा-यांना अतर्क्यच वाटते. एकमेकांचं मन जाणण महत्त्वाचं. एकदा असं नात निर्माण झालं की मग त्याच्यासारखा आनंद नाही, समाधान नाही. पण असं नातं निर्माण करणं खुप कठीण आहे. 
कोणत्याही नात्याला लेबल किंवा नाव लावलं की मग येतात अपेक्षा, मालकी हक्क. प्रेमाचं सहज सुंदर नात निर्माण करण्यासाठी या नावांच्या, लेबलांच्या पलिकडे जाऊन विचार करता येईल का? कारण अपेक्षा हे दुःखाचे कारण. अपेक्षा ठेवूच नयेत हे शक्यच नाही. पण अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर येणारा कडवटपणा टाळता येतो का ? जर आपण मनापासून प्रेम करत असू तर तो कडवटपणा टाळता येईलच. नक्की. पण काही वेळा या अपेक्षांच्या अतिरेकामुळे एकतर्फी प्रेमातून घडणारे भयंकर प्रकार घडतात. मला एक प्रश्न कायम सतावतो. आपण ज्या व्यक्तिवर प्रचंड प्रेम करतो त्याला इजा पोहोचवण्याचा, दुखावण्याचा विचार कसा येत असेल मनात ? उलटपक्षी त्याच्या किंवा तिच्या सुखातच माझं सुख आहे असा विचार रूजायला हवा. कारण या एका गोष्टीवर प्रत्येकानी विश्वास ठेवायला हवा, जे आपलं असत ते आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. जे आपलं नसत ते कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला मिळत नाही.  खरं सुख मिळवण्यात आहे असं म्हणलं तर ते अलगद, हळुवार असलं पाहिजे. नाही तर सुख मिळूनही ते  न मिळाल्यासारखच आहे. म्हणून प्रेम तुटून करावं,  पण ज्याच्यावर आहे, त्याला किंवा तिला न तुटू देता.... 

Tuesday, 10 February 2015


स्वप्नातल्या कळ्यांनो....

संवेदना, भावना, जाणीवा , रुसवा, वाट बघणं याची अनुभूती प्रेमात पडल्याशिवाय येत नाही. अजून एक गोष्ट अशी आहे ज्याचा अनुभव प्रेमात पडल्यावर जास्त रोमांचकारी वाटतो, ते म्हणजे स्वप्न. माणसाच्या मनाला समजून घ्यायचं असेल ना तर त्याला कोणती स्वप्न पडतात हे बघायला हवं. ज्या गोष्टी आपण प्रत्यक्षात करू शकत नाही त्याचा अनुभव स्वप्नात घेता येतो. ज्या भावनांची तृप्तता जागृतावस्थेत होऊ शकत नाही , त्याची पूर्तता स्वप्नाच्या दुनियेत  होते. आपल्याला आवडणारी व्यक्ति प्रत्यक्षात भेटणं जेव्हा शक्य नसतं तेव्हा तीच व्यक्ति स्वप्नात येते. चेतन मनातली इच्छा अचेतन मनाकडे पाठवली जाते. मग तीच इच्छा अचेतन मनाकडून स्वप्नांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. 
ही स्वप्नं इतकी खरी वाटतात की सत्य काय आणि स्वप्न काय याचं भान उरत नाही. स्वप्नात दिसणारा तो किंवा ती खरच समोर आहे की काय असं वाटायला लागतं. ''मनी वसे ते स्वप्नी दिसे '' असं म्हणतात. आपल्या मनात असणा-या व्यक्तिचं स्वप्न कधी संपूच नये असं वाटत. स्वप्नात उमटलेल्या खुणा प्रत्यक्षातही कोणाला कळतील की काय या कल्पनेनी गडबडायला होतं, लाजायला होतं. जागं आल्यावरही ही धुंदी ओसरत नाही. हे स्वप्नच आहे हे समजूनही मनं त्यातच रमून जात.
we are what and where we are because we have first dreamed it. आपली आत्ताची परिस्थिती म्हणजे पूर्वी कधीतरी पाहिलेलं स्वप्न असू शकते. म्हणून स्वप्न मोठी बघावीत. वास्तवाची जाणीव बुध्दि करून देत असते , पण आपलं मन मात्र देहभान हरपून स्वप्नांच्या दुनियेत भरा-या घेत असतं. 
स्वप्नं म्हणजे नेमक काय ? मानसशास्त्राचा अभ्यास करणा-यांच्या मते, झोपेमध्ये मिळणा-या चेतनावस्थेच्या अनुभवांना स्वप्न म्हणता येईल. मृगजळ जसं आभास निर्माण करतं तस स्वप्नही आपल्याला आभासात सत्य मानायला भाग पाडत. स्वप्न पडणा-या माणसाला प्रॅक्टिकल जगातली माणस वेड्यात काढतात. ''तुला बरी स्वप्न पडतात, आम्हाला नाही पडत'' असं म्हणून हिणवतात. मनात चाललेल्या गोष्टी नकळतपणे अंतर्मनात उमटतात. या भावना सत्यात उतरव्यात यासाठी धडपड सुरू असते. मनात उठणा-या या भावना प्रत्यक्षात होणं शक्य नसेल तर ती पूर्तता स्वप्नात केली जाते. 
स्वप्न आणि सत्याचं भांडण झालं तर कोण जिंकेल? भविष्य घडवण्यात यापैकी कोणाचा वाटा सर्वाधिक आहे ? एकाच वेळी आभाळाला हात टेकतील आणि तरीही आपण जमिनीवर राहू असं शक्य आहे का ? कारण स्वप्नात पाय जमिनीवर नसतात आणि सत्यात हात आभाळाला टेकत नाहीत. म्हणूनच  आपल्या आयुष्यात स्वप्न आणि सत्य या दोघांनाही समान महत्त्व आहे. माणसाला पडणारी स्वप्नं हा एक व्यर्थ मानसिक अनुभव आहे असं अजिबात म्हणता येणार नाही. कारण स्वप्नात येऊन  त्यानी  किंवा तिनी केलेला गोड छळ किती  हवाहवासा वाटतो . नाही का ? काय ?  विश्वास नाही बसत? चला तर झोपा आणि स्वप्न बघा.... 

Sunday, 8 February 2015

आभास हा.......


सुधीर मोघ्यांची एक मस्त कविता वाचली आज 
नसताना तू जवऴी असण्याचा भास तुझा......
जाणवतो अणुरेणूत ... इथे तिथे वास तुझा......
कुठुनी ये इतुकी धग... विझलेल्या गतस्मृतीस..... 
वेदनेस संजीवक करणारा ध्यास तुझा....
''प्रेम ''या एका भावनेनी हे सगळे शब्द कसे जिवंत झालेत. एरवी भास, ध्यास, वास,आभास , वेदना या शब्दांना तितकी परिणामकारकता नसते, जितकी प्रेम या एका भावनेनी निर्माण होते. प्रेम या एका भावनेनी आभास ही एक छान कल्पना प्रत्यक्षात आणलीय. कधी दूर, कधी समोर , कधी अगदी जवळ, अगदी कुठेही त्याला किंवा तिला अनुभवता येतं या आभासातून...
पुन्हा एकदा कल्पनेचं सुंदर जग या आभासाला जिवंत करत. आपली प्रिय व्यक्ती जवळ असेल तर काहीच प्रश्न नाही. अर्थात नुसती शरीरानी जवळ असणं उपयोगाचं नाही म्हणा... शरीर आणि मनानीसुध्दा आपल्या जवळ असेल तर आभासी प्रतिमांची गरज भासत नाही. पण जेव्हा ती दूर असते तेव्हा मात्र हे आभास विरहाच्या त्या भयाण वाळवंटातून बाहेर काढतात. काही भावनांना प्रॅक्टिकल , बुध्दिवादी विचारांनी बघुन नाही चालत. त्या अनुभवायच्या असतात..... 
कुणाच्या तरी आठवणीत त्याच्या आभासी दिसण्यातच मन रमवणं ही गोड कल्पना आहे. अशा वेळी तो किंवा ती आपल्या जवळ नसली तरीही त्या आभासातच अस्तित्वाचा अनुभव घेता येतो. कारण अस्तित्वाची किंमत दूर गेल्याशिवाय कळत नाही. नेहमी आपल्या जवळ असणारी आपली प्रिय व्यक्ति जेव्हा दूर जाते तेव्हा तिचा ध्यासच आभासाला जन्माला घालतो. 
आभासातला तो किंवा ती जाम धमाल उडवून देतात. सिनेमात नेहमी आपण हे बघतो तेव्हा वाटतं , छे... काय हे ... काहीही दाखवतात... पण जेव्हा स्वतःलाच असे आभास होऊ लागतात तेव्हा.... ''दर्पणी पहाता रूप, न दिसे वो आपुले'' .. असं होतं तेव्हा... मग सुरू होतो आपला आणि आभासांचा लपंडाव... प्रत्येकानी हा लपंडाव नक्की अनुभवावा.. हा छळणारा,  आनंद देणारा, अनुभूती देणारा आभास मन भारून टाकतो... समोर असलं की नुसतच पहाणं होतं... आणि नसताना आभासासोबत जगणं होतं... या कवीकल्पना अनुभवण्यासाठी एकच भावना मनात असली पाहिजे...  प्रेम.. साधारणपणे ज्या वस्तू देहाला समाधान देतात त्या मिळवण्याकडे आपला कल असतो. त्या मिळवणं हेच जन्माचं ध्येय होतं. पण नीट विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की. अशा सगळ्या वस्तू ज्यांच्याकडे आहेत ते तरी सुखी आहेत का ? सुख आणि समाधान मानण्यावर असतं, मनातल्या प्रेम या भावनेवर असतं. प्रचंड त्रासात, वेदनेत असतानाही प्रेमाचा आभासही जगण्याचं बळ देतो... 

Saturday, 7 February 2015


 खरी श्रीमंती..........




परवा एक विचित्र प्रसंग स्वतः अनुभवला.  तळेगावहून पुण्याला जाताना, प्रचंड गर्दी असलेल्या ट्रेनमध्ये लेडीज डब्यात घडलेला हा प्रसंग... प्रत्येक जण आपल्याला बसायला जागा कशी मिळेल या गडबडीत. जागा मिळाली की आपापले मोबाईल काढून,  माना खाली घालून , मनाशीच हसत बोलणा-या सगळ्या जणी.... आपल्या शेजारी कोण आहे? याची कोणाला पर्वा नाही आणि जाणून घ्यायची गरज नाही... त्यापेक्षा मोबाईलमधल्या त्याच्याशी किंवा तिच्याशी किंवा त्यांच्याशी बोलण्यात सगळे मग्न... अशाच वेळी माझ्यासमोरच्या सीटवर एक मावशी ऑलमोस्ट चक्कर येऊन पडायला आल्या होत्या. मदतीसाठी त्या हात पुढे करून .... पाणी... पाणी... असं पुटपुटत होत्या. एक तप खुप गलका आणि कानात हेडफोन.. यामुळे कोणालाच त्यांचा आवाज ऐकू आला नाही... मी सुध्दा मोबाईलमध्ये व्यस्त होते... तरी सुदैवानी माझं लक्ष गेलं... मी त्यांना पाणी देऊ केलं. पण त्यांचे डोळे मिटले गेले.. मी खुप घाबरले होते.. मला काहीच कळेना.... त्यांना हात लावून उठवलं.... त्या उठेचना... शेवटी अगदी कासारवाडी आल्यावर त्यांना जाग आली... त्या माझ्याकडे आशेनी पहात होत्या... बाटलीतलं पाणीअंगावर सांडत , सांडत  त्यांनी पाणी प्यायलं. त्या डोकं टेकवून शांत बसल्या... त्यांच्या शेजारी बसलेली मुलगी निर्विकारपणे उठून गेली... ती मुलगी उठताच, टेकू हललेल्या पिशवीसारख्या त्या मटकन बाकावर पडल्या. अगदी शिवाजीनगर गेलं तरी त्यांना भान नव्हतं.. मी त्यांना हाक मारली... त्या किंचित हसल्या... ''पुणे स्टेशन आलं की मला उठव'' असं म्हणाल्या... मी म्हणलं , ''अहो मावशी , आता उठा , आलं पुणे स्टेशन ''... माझ्या शेजारी बसलेल्या एका मावशींनी मला सांगितल..''कशाला या भानगडीत पडलीस? नाटकं करत होती ती बाई.... '' स्टेशनला उतरल्यावर त्या मावशींनी (चक्कर आलेल्या) मला थांबवून सांगितलं, ''मी नाटक करत नव्हते गं.. माझा ना बी पी वाढला असनं.'' मी म्हणलं , ''ठीक आहे मावशी , नीट जा तुम्ही...''
या प्रसंगातून मला प्रकर्षानी जाणवलं की आपली संवेदना बोथट होतीय का ? आपल्या आजुबाजुला काय चाललय हे जाणून घेण्याचीसुध्दा आपल्याला गरज वाटत नाही...  आपल्या ग्रेडचं कोणी असेल तरच त्याला बसायला जागा देणं, लक्ष देणं म्हणजे संवेदनशीलता नाही ना ? प्रेम आणि संवेदनशीलता या अगदी जिवलग मैत्रिणी आहेत नाही का? बघा ना जो माणूस संवेदनशील असतो, त्यालाच दुस-यांबद्दल प्रेम, आपुलकी वाटते. प्रेम ही भावना संकुचित नाही या माझ्या मताशी तुम्हीसुध्दा सहमत असालच. म्हणजे आपल्याकडे प्रेम म्हणलं की, पुरूष आणि स्त्री यांच्यातलं प्रेम.... पण , प्रेमाची व्याप्ती इतकी संकुचित नाही....वेगवेगळ्या नात्यांमध्ये ती भावना बदलते... 
मुळात आपल्या सगळ्यांमध्ये जे तत्व वसलेलं आहे.. त्यावर प्रेम करायला हवं.. कारण परमेश्वराला पूजणं म्हणजेच सगळ्या सजीव सृष्टीत वसलेल्या तत्वावर प्रेम करणं... प्रेम ही एक व्यापक भावना आहे. तिला कोणत्याही साच्यात बसवून अनुभवु नये. प्रेम द्याव.. घ्याव... वाटावं सगळ्यांच्यात... कारण शेवटी ही माणसं... ही नाती... त्यांना दिलेलं आणि घेतलेलं प्रेमच आपली खरी श्रीमंती आहे , नाही का? 

Thursday, 5 February 2015


प्रेमाला उपमा नाही..... 



आज रेडिओवर एक मस्त गाणं ऐकलं..... बाहो मे चले आओ , हमसे सनम क्या परदा..... वाह क्या बात है... काही गाणी श्रवणीय आणि प्रेक्षणीय अशा दोन्ही सदरात चपखल बसतात. त्यापैकीच हे एक गाणं आहे... निरागस डोळ्यांची जया आणि मनात असूनही प्रेम न दाखवणारा संजीव कुमार...
हे गाणं ऐकत असतानाच एक विचार मनात आला... प्रेम म्हणलं की त्यानी तिला प्रपोझ करायचं ... तिनी विचार करून होकार किंवा नकार कळवायचा.... वगैरे वगैरे.... पण प्रेमात तिनी पुढाकार घेतला तर.... काळ कितीही पुढे गेला असला तरी प्रेमामध्ये त्यानी पुढाकार घ्यावा असच तिला वाटतअसतं. पण जे प्रेम दोन जीवांमध्ये होतं त्याला कोण पुढाकार घेतय हे खरच तितकं महत्त्वाचं आहे का ? व्यक्त होणं महत्त्वाचं..... 
आत्ताच्या काळात तिनी पुढाकार घेणं हे फार अवघड राहिलेलं नाही. पण तरीही तिनी पुढाकार घेऊन प्रेमाची भावना व्यक्त करणं हा मोकळेपणा सहन करायला थोडं जड जातच. कवितांमध्ये किंवा गाण्यांमध्ये सुध्दा त्यानी प्रेम व्यक्त करणं हाच अन्वयार्थ  ब-याचदा पहायला मिळतो. प्रेम, प्रणय या हळुवार भावनांसाठी कितीतरी कविता केल्यात... गाणी रचलीयत.... पण तिनी त्याला सरळ सरळ आव्हान देणं ही गोष्ट जरा दुर्मिळच. पण तिनी तरी आपल्या मनातले भावनांचे तरंग का लपवावे ? स्पेशली जर तिचा प्रियकर जरा बिनडोकच असेल तर तिनी काय कराव ? त्याच्या मनात असूनही प्रेमा बिमाच्या फंदात पडायचच नाही असं त्यानी ठरवलच असेल तर तिनी गप्प बसायचं   का ? एरवी अगदी कवीच्या भूमिकेत असणारा तो एकदम मुक्यासारखाच वागायला लागला तर काय करायचं ? तर.....तिनीच प्रेम व्यक्त करायचं... 
प्रेम करणं म्हणजे एकमेकांकडे पहाणं नाही तर दोघांनी मिळून एकाच गोष्टीकडे पहाणं. असा एक संकेतच आहे की प्रेम पहिल्यांदा त्यानी व्यक्त केलेलं चांगलं. कारण पुरूषांना मोहाचा शाप आणि स्त्रियांना मर्यादेचं बंधन आहे. हे कितीही खरं असलं तरी स्त्री असो की पुरूष भावना तर सगळ्यांना सारख्याच असतात ना.... मग व्यक्त करायला काय हरकत आहे ? कारण फार कमी भाग्यवंतांना आपलं प्रेम कळतं आणि मिळतं... मग मनातल्या मनात ठेवण्यापेक्षा सांगितलेलं बर... कारण अवती भवती कितीही माणसं असली तरी आपलं असं कोणीतरी एकच असतं...... कारण.... प्रेमाला उपमा नाही..... हे देवाघरचे देणे...........

व्हॅलेंटाईन डे ...........





मी कालच तुम्हाला म्हणलं होतं की व्हॅलेंटाईन डे पर्यंत ''प्रेम'' या भावनेविषयी व्यक्त होण्याचा प्रयत्न करेन... अर्थात मनीमानसी काही आलं तरच हं.... मुळातच जुलमाचा राम राम नकोच वाटतो मला.... खरचं मनापासून वाटलं तर लिहावं, बोलावं... जगरहाटी पाळण्याबाबात जरा  डोकं कमीच आहे .... 
असो..... मैत्रिणीला सहजच फोन केला आणि विचारलं .... ''काय गं, व्हॅलेंटाईन डेचं काय विशेष प्लॅनिंग ?'' ती म्हणाली, ''छे गं, आता इतक्या वर्षांनी कसला आलाय व्हॅलेंटाईन डे आणि खरं सांगु का तुला आमच्या ह्यांना हा असला प्रकार अजिबात आवडत नाही. ते म्हणतात, प्रेम मनात असावं लागतं त्यासाठी त्याचं प्रदर्शन करण्याची काय गरज  आहे ?'' 
फोन ठेवल्यावर माझ्या मनात विचार आला.... काही वर्ष झाली की प्रेम व्यक्त करायचं नसतं का? प्रेम व्यक्त करणं म्हणजे प्रदर्शन का ? एकमेकांना पुन्हा एकदा माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणलं तर काय हरकत आहे ? मनात ठेवून प्रेम करण्यापेक्षा, व्यक्त केलेलं चांगलं नाही का ? व्यक्त झाल्यानी आपल्या जोडीदाराला आनंदच वाटेल.... एकमेकांसोबत रहायचं ते एकमेकांना आनंदी करण्यासाठी ना ?  .... मग किती वर्ष लोटलीत याला अर्थ नसला पाहिजे... लग्न झालं की सगळं संपल असं म्हणणा-यांनी तर या दिवसाचा चांगला उपयोग करून घ्यायला हवा. एरवी जोडीदाराला वेळ देता येत नसेल तर या दिवशी पूर्ण वेळ द्यायला हवा....
व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस... मग ते जोडीदारावरचं असो की मित्र मैत्रिणीवरच. अगदी एखाद्या वडीलधा-या व्यक्तिविषयी आदर व्यक्त करायलादेखील हा दिवस छान आहे . प्रेम म्हणजे प्रियकर - प्रेयसी असं असलं तरी ते इतकं संकुचित नसतं. प्रेमाची व्याप्ती खूप मोठी आहे... निर्व्याजपणे, निरपेक्षपणे कुणावरही केलेलं प्रेम तितकचं आदराचं असतं. मनाच्या कप्प्यात कितीतरी व्यक्ति असतात.. ज्यांच्याविषयी आदराची भावना असते. ही भावना व्यक्त केली तर काय हरकत आहे ? 
 'प्रेम कुणावर करावं ? प्रेम कुणावरही करावं, प्रेम काळजाच्या नात्यावर करावं आणि प्रेम खडगाच्या पात्यावरही करावं.' प्रेमाचा हा संदेश घेऊन व्हॅलेंटाईन डे जवळ आलाय. खरच नीट विचार केला तर लक्षात येतं की हा दिवस फक्त प्रियकर प्रेयसीने प्रेम व्यक्त करण्याचा दिवस नसून ज्या व्यक्तिबद्दल आपल्याला आदर किंवा प्रेम वाटते ते व्यक्त करण्याचा दिवस आहे. मात्र व्हॅलेंटाईन डेचं बदलतं स्वरुपच या दिवसाला बंदी असावी या विचाराला कारणीभूत झालं आहे. व्हॅलेंटाइन या संतानी माणुसकीची, प्रेमाची जी शिकवण दिली, त्याची स्मृती जागृत रहावी म्हणून या दिवसाकडे पाहुया...... मनात माणुसकीची भावना वाढवण्यासाठी...... 

Tuesday, 3 February 2015

     व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानी.........    


आता गुलाबी भावनांना बहर येणारा महिना सुरू झालाय. अगदी उद्या परवापासूनच व्हॅलेटाईन डे चे मेसेजेस यायला सुरूवात होईल. पण मला तुमच्याशी  व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानी , जसं सुचेल तसं, आत्तापासूनच  बोलायचय. म्हणजे ठरवून रोज एक लेख असं काही नाही हं..... पण १४ तारखेपर्यंत... या भावनेचे जे भाव माझ्या मनात   उमटतील , ते तुमच्याशी शेअर करायचेत मला..... 
  नवरा म्हणतो, 'मी तुला लग्नाच्या दहाव्या वाढदिवसाला अंदमान निकोबारला घेऊन जाणारे.' बायको आनंदून म्हणते, 'मग पंचविसाव्या वाढदिवासाला काय करणार? 'नवरा म्हणतो, 'तुला तिथून घेऊन जायला येणार.'  नुकताच हा मेसेज वाचला. गमतीचा भाग सोडला तर लग्नाला दहा पंधरा वर्ष झाल्यावर असंच वाटत असेल का एकमेकांबद्दल?  'हल्ली तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटतच नाहीये. कामाच्या नावाखाली तुम्ही माझ्याकडे किती दुर्लक्ष करताय. मी म्हणून तुमचा हा संसार नीट चाललाय. दुसरं कोणी असत तर..........' वगैरे वगेरे. लग्न थोडं जुनं झालं की हे संवाद जवळपास सगळ्याच घरांमधून ऐकायला मिळतात. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अनेक तरूण - तरूणी आपल्या मनातले विचार आपल्या प्रिय व्यक्तिपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतील. म्हणूनच लग्न झालेल्या त्याचे किंवा तिचे विचार त्यांच्या व्हॅलेंटाईनपर्यंत पोहोचविण्याचा हा मी केलेला एक प्रयत्न.  
             लग्नानंतर या व्हॅलेंटाईन डेचा प्रभाव कमी होतो की काय? कोण जाणे. असं म्हणतात की, प्रेमाची पूर्तता लग्नात होते. पण लग्नानंतरच या प्रेमाची 'पूर्णता' होते की काय अशी शंका मनात येते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मग आपला जीवनसाथी आणि जर ती बायको असेल तर तिच्याकडे लक्ष द्यायला वेळ कुठे आहे? सर्व विवाहित पुरूषांचा आणखी एक नेहमीचा डायलॉग, 'ही जी धडपड चाललीय ती कोणासाठी? तुझ्यासाठीच ना ?' या सगळ्यामध्ये नेमकं कोण चुकतय, कोण बरोबर आहे यामध्ये वेळ आणि शक्ति खर्च करण्यापेक्षा तो मुद्दाच किती सामान्य आहे हे नंतर आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात येतं. पण तोपर्यंत मनं दुखावलेली असतात...... दुरावलेली असतात.....  ही मनं दुरावण्याआधीच प्रयत्न केले पाहिजेत.
          प्रेम व्यक्त करायला कशाला हवाय कुठला डे? ते असं एकमेकांकडे नुसतं बघितलं की समजलं पाहिजे. कारण प्रेम करणं म्हणजे एकमेकांकडे पहाणं नाही तर दोघांनी मिळून एकाच गोष्टीकडे पहाणं. काव्य,  कल्पना म्हणून सगळ्याच गोष्टी मस्त वाटतात. पण प्रत्यक्षात नेमकं काय होतं ते समजून घ्यायला हवं. दोन व्यक्ति म्हणलं की वेगळे स्वभाव आलेच. काही चांगले , काही वाईट गुणही ओघानी येतात. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आपल्या जोडीदाराचं एक वेगळं स्थान असतं. खर तर एकमेकांना दुखवावं असं कोणालाच वाटत नसतं. मग का बर असे मेसेज आणि असे संवाद तयार झाले?
             मला वाटतं एकमेकांना जे गृहित धरलं जात ना, त्यातूनच असे विसंवाद तयार होतात. एकदा लग्न झालं की मग काय आपल्या जोडीदाराशी कसंही वागा. त्यानी किंवा तिनी समजून 'घेतलचं' पाहिजे. हा जो 'घेतलचं' पाहिजे आहे ना, तोच खटकतो. एकमेकांच्या सहवासानी गुण - दोष माहिती होतात. प्रत्येकानेच आपल्या माणसाला गुण -दोषांसहित स्वीकारलं पाहिजे. 'प्लॅटोनिक लव्ह' की काय ते यालाच म्हणत असावेत. पूर्वीच्या आणि आत्ताच्या काळात बराच फरक आहे. संवादाची माध्यमं मोठ्याप्रमाणात वाढली आहेत. त्याचा योग्य उपयोग करून आपण आपली नाती फुलवू शकतो.. कित्येक वेळा प्रचंड राग आला असताना एखादा मेसेज.... एखादी छोटीशी भेटवस्तू ... एखादा सॉरीचा फोन किंवा एखादा मेल राग क्षणार्धात घालवू शकतो. पण हे 'सॉरी'  म्हणण कमी झालय. आपला इगो आडवा येतो या सगळ्यात. मला वाटत मराठीत 'माफ कर' असं म्हणल ना तर त्याचा अर्थ मनापर्यंत पोहोचतो. कारण सॉरी या शब्दाला हल्ली काही अर्थच राहीला नाहीये. 
        इंदिरा संतांनी म्हणलय, 'ज्याचा सहवास आवडतो, हवाहवासा वाटतो, ज्याचं सुख आपल्यामुळे वाढतं आणि दुःख कमी होतं. साहित्य, संगीत, चित्रकला या कलांचा आनंद लुटताना ज्याच्याबरोबर आपलं मनही आनंदानं तुडुंब भरून जातं त्या व्यक्तिचा सहवास म्हणजे संसार.'
           या व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने फक्त प्रियकर- प्रेयसी, नवरा - बायको यांनीच संवाद साधला पाहिजे असं नाही. पण व्हॅलेंटाईन म्हणजे फक्त जोडीदार असं नसून, आपल्याला आदर आणि प्रेम वाटणारी आपल्या भोवतीची सगळी माणसं. ''कसला आलाय व्हॅलेंटाईन डे ?'', '' आपल्या संस्कृतीत बसतो का हा डे साजरं करणं ?'', ''  छे, फॅड आहे नुसतं. ''असा विरोध करण्यापेक्षा असं आपुलकीचं आणि प्रेमाचं नात सगळ्यांशीच निर्माण झालं, तर द्वेष, हेवा, मत्सर, भांडण या नकारात्मक गोष्टींना जागा तरी राहील का? अशी नाती निर्माण करायलाच हवीत, नाही का ? ही अशीच नाती आपल्याला आपल्या पुढच्या पिढीसाठी आदर्श निर्माण करण्यासाठी मदत करतील. 


Sunday, 1 February 2015


अति  सर्वत्र  वर्जयेत्  .......... 



नेटवर सर्च करत असताना चाणक्य नितीचा तिसरा अध्याय वाचण्यात आला. अत्यंत विचारपूर्वक मांडलेल्या एका श्लोकानी मला विचारप्रवृत्त केलं. 
''अति रूपेण वै सीता चातिगर्वेण रावणः। अतिदानाद् बलिर्बद्धो ह्यति सर्वत्र वर्जयेत्।।''     
हाच तो श्लोक . कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की ती संपते. हा एक निष्कर्ष सांगणारा हा श्लोक. जी गोष्ट आजच्या काळातही आपल्याला कळायला हवी. चांगलं असो वा वाईट ते अति झालं की त्रासदायक होतं. 
संदीप खरे आणि डॉ. सलील कुलकर्णी यांच्या आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाचा प्रयोग आमच्या तळेगावात झाला होता. तेव्हा रंगलेली ही मैफिल थांबुच नये   असं रसिकांना वाटतं होतं. पण त्याच एका पॉईंटवर आता हे समारोपाचं गीत असं डॉ. सलिल म्हणाले. त्यावेळी रसिकांनी त्यांना आग्रह केला की अजून एक तास सुध्दा आम्ही या गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी थांबु. तेव्हा त्यांनी दिलेलं  उत्तर फार छान होतं. ही मैफिल संपूच नये असं ज्या क्षणी वाटतं तोच क्षण असतो भैरवी घेण्याचा. 
चांगलं असलं तरी ते मर्यादेतच असलं पाहिजे. नाहीतर रंगाचा बेरंग होतो. कुठे थांबायला हवं हे ज्याला कळलं तो जीवनासकट सगळ्या मैफिली ताज्या, टवटवीत ठेवण्यात यशस्वी होतो. कित्येक वेळा आपल्याला हा अनुभव येतो बघा , कितीही चांगला वक्ता असला, गायक असला तरी, लांबलेला परफॉर्मन्स रसिकांपर्यंत पोहोचत नाही. ''अरे याला आवरा कुणीतरी ''असं मनातल्या मनात म्हणणारे रसिक खोटं हसं घेऊन समोर बसतात. (नाईलाजानी ) उलटपक्षी  एका उंचीवर जाऊन थांबणारा कलावंत  रसिकांच्या काळजात घर करतो.   
माणसाला मिळालेल्या सोयी सुविधांचा अतिवापर होतोय असं निसर्गाच्या लक्षात आलं की तो त्याला पुन्हा त्याच्या मुळ रूपात नेण्याची तयारी करेल यात शंका नाही. (जंगलातले आदिमानव आठवतायत ना ?) आपल्याला मिळालेल्या कोणतीही गोष्ट योग्य पध्दतीनी वापरली तर त्याचे फायदे आपल्याबरोबरच आपल्या पुढच्या पिढ्यांना मिळतील. उदाहरण द्यायचं झालं तर वीज, पाणी, पेट्रोल याचं देता येईल. या सगळ्याचा गरजेइतका वापर  केला तरच  त्यापासुन मिळणारा आनंद घेता येईल. विज्ञानानी आपल्याला दिलेल्या  कित्येक गोष्टी वरदानच ठराव्यात हे आपल्याच हातात आहे. मोबाईल, नेट, विकसित तंत्रज्ञान या सगळ्याचा अतिवापर केला तर काय अनर्थ घडू शकतो त्याची चुणूक आपल्याला रोजच्या बातम्यांमधून दिसतीय. मिळालेल्या स्वातंत्र्याचा उचित असा वापर केला तरच हुतात्म्यांच्या, क्रांतिकारकांच्या प्रयत्नांना अर्थ प्राप्त होईल. रूढी-  परंपरांचा अतिरेक झाला तेव्हा बदल झाला. आता स्वातंत्र्याचा अतिरेक होऊ देता कामा नये. कारण तो बदल परवडणारा नाही. 
विज्ञानानी दिलेल्या सगळ्याच सुविधांचा योग्य वापर केला तरच त्यापासून मिळणा-या फायद्यांचा आनंद घेता येईल. फेसबुक, व्हॉटस अप, मोबाईल ही संवादाची प्रभावी माध्यमं आहेत यात शंकाच नाही. दूर असणा-या आपल्या माणसांशी निदान आपण कनेक्ट होऊ शकतो.  सगळ जग आपल्या हातात आलय. पण मुठीतलं जग निसटतय का ?   जिथे आपण फेस टू फेस बोलु शकतो, तिथे या सगळ्या अॅप्सची काय गरज    आहे ? कित्येक घरांमध्ये हल्ली घरातल्या घरातसुध्दा मोबोईलचा आधार घेऊन संभाषण केलं जातय.   समोरच्या माणसाच्या चेहे-यावरचे हावभाव समजून घेऊन केलेला संवाद नक्कीच आनंददायी असेल ना ? 
मनातल्या या विचारांना मोकळ केलं  एका कवितेनी....... आमच्या बॅचमेटसचा एक ग्रुप केलाय व्हॉटस अॅप वर त्यामध्ये  एक कविता शेअर केली होती माझ्या मैत्रिणीनी.....                                             

स्वावलंबन, स्वतंत्र वृत्ती सगळच थोड्या अंतरावरती
कधीतरी आईच्या कुशीतही येऊद्या
मुळांना थोडीतरी माती राहुद्या ... प्लीज..... मुळांना थोडीतरी माती राहुद्या