झोपेची महती.....
खूप दिवसात काही भावलचं नाही मनाला. त्यामुळे मनीमानसी काही आलच नाही. पण आज अचानक एक मस्त कल्पना डोक्यात आली. खरं सांगा बर माणसं सगळ्यात जास्त निरागस कधी दिसतात ? लहानपणी..... नाही.... अगदी मोठेपणीसुध्दा माणसं निरागस दिसतात. पण फक्त झोपेत. विश्वास नाही बसत ? पण ही गोष्ट खरी आहे. झोप ही आपल्यासाठी संजीवनी आहे. अन्न , व्सत्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. पण खरच नीट विचार केला तर झोप ही गरज सुध्दा तितकीच महत्त्वाची आहे. झोप नसेल तर काय होईल किंवा एखाद्या रात्री झोप आलीच नाही तर... निद्रानाशाचा त्रास असणा-यांनाच झोपेचं महत्त्व समजू शकेल. म्हणून हे निद्रा आख्यान.....
झोपेची महती काय वर्णावी ? एक वेळ जेवायला नसलं तरी चालेल (पण एक वेळच हं...) पण झेप हवीच. झोपेचा काळ तेवढा असा असतो की आपण सगळे मुखवटे काढून, मनातले वाईट विचार टाकून, निरागस होऊन निद्रादेवीच्या कुशीत शिरतो.
प्रत्येक ऋतुतल्या झोपेला एक वेगळं महत्त्व आहे. दुपारची डुलकी असो अगर रात्रीजी निवांत झोप. झोपावं ते थंडीच्या दिवसात, असं आपल म्हणायचं. ज्याला झोप येते त्याला थंडी काय अगर रखरखीत उन्हाळा काय, सगळ सारखच. बाहेर छान कडाक्याची थंडी पडली आहे, घरात मस्त शेकोटी पेटवलेली आहे, झोपताना गरम चहा असेल मस्तपैकी आलं घातलेला तर वा वा.... कोण म्हणतं चहानी झोप उडते.. झोप येते ती उडण्यासाठी नाहीच मुळी.
पावसाळ्यातली झोप म्हणजे तर खूपच छान. बाहेर छान पाऊस पडतोय, वातावरण अगदी ढगाळ झालय. दुपार असली तर बहारच आणि रात्र असली तर खूपच छान. पट्टीच्या झोपणा-याला काय हो ? दुपार काय आणि रात्र काय सगळ सारखच. सोनेवालो को सोने का बहाना चाहिये असं म्हणलं तर अनुभवसिध्द म्हण तयार केल्याचा किताब मिळेल.
उन्हाळ्यात बाहेर कितीही गरम होत असलं तरी पंख्याखाली मस्त झोप लागते. एकदा झोप लागली की आजुबाजुला काय चाललय याचं भान कुठे असतं. माझं मत विचाराल तर झोप हे वरदान आहे. कोणत्याही परिस्थितीत, कुठेही ज्याला पटकन झोप लागते तो सुखी माणूस. झोपेला घटकेचं मरणदेखील म्हणलं आहे. झोपेनंतर प्रत्येक सकाळी आपला पुनर्जन्म होतो. आदल्या दिवशीची टेन्शन्स, रुसवे- फुगवे याची तीव्रता कमी होते. निरोगी आयुष्यासाठी झोप आवश्यक आहे. मन शांत आणि शुध्द असेल तर निद्रानाशाचा त्रास होणारच नाही.
अजूनही पटन नाहीये.... तुम्ही म्हणाल झोपेचा काय एवढा विचार करायचा? बरोबर आहे. झोपेचा विचार करायचाच नसतो. मस्तपैकी झोपायचं असतं. का? तर... दुस-या दिवशीच्या आनंददायी गोष्टी ख-या अर्थाने जगण्यासाठी.
Wa! Khup mast zop lagali wachtana!
ReplyDelete