Monday, 26 May 2014

सांगा ना कसं जगायचं ?

माणसाला आपल्याला हवं तसं जगता येत का? माझं उत्तर नाही आहे. अगदी साधी गोष्ट असली तरी आपण फार मन मारून जगतो असं वाटतं मला. असं म्हणतात की अगदी लहान मुलासारख रहावं.... निरागस. पण जगाचे हे नियम आपल्याला हवं तसं वागू देत नाहीत. त्यातही काही मनमौजी असे असतात जे स्वतःला हवं तसं वागतात. पण असे लोक हाताच्या बोटांवर मोजण्याइतके असतात.
साधारण मध्यम वर्गातले (परिस्थितीनी नाही बरं का..) लोक हवं तसं म्हणजे काय वागणार हो.... रस्त्यावर कुल्फी किंवा गोळा खावासा वाटला तर खाणं. आणि मुख्य म्हणजे ती कुल्फी तोंडाला बरबटली तरी त्याची लाज न बाळगणं. असं झाल तर ....पण  समाजातले सो कॉल्ड मॅनर्स तसं वागू देत नाहीत. हे काय साधं एवढ कळत नाही
का ? असं खाऊ नये हे कळत नाही या माणसाला. असं प्रत्यक्षपणे न म्हणता बरच काही सांगणा-या नजरा आपल्याला सगळ सांगून जातात.
हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर खुर्चीत पाय सोडून बसणं हा मॅनर्सचा भाग आहे. पण आपल्याला वाटलं मस्त मांडी घालून बसावं तर ते तितक्या सहजपणे आपण करू शकत नाही. काटा चमच्यानी पदार्थ खाणं ही तर मॅनर्सच्या नावाखाली मिळालेली मोठी शिक्षा आहे. ती सगळी कसरत करताना त्या पदार्थाचा आनंद घेणं तसच राहून जातं.
हातगाडीवर पाणी पुरी खाताना ब-याच वेळा ती अंगावर सांडते, तोडातून खाली पडते, तेव्हा उगाचच किती अपराध्यासारखं वाटतं. खर तर इतकं काही वाटण्याची गरज नाही. पण आपला हा बावळटपणा कोणी पाहिला तर नसेल या कल्पनेनी आपली उगाचच धांदल उडते.
रस्त्यावरून जाताना एखादं मस्त गाण गुणगुणावसं वाटलं तरी आपण ते मनातल्या मनात म्हणतो. आपल्या मनासारखे कपडे घालण्याचं स्वातंत्र्य सुध्दा नसतं कित्येक वेळा. साधारणपणे अगदी विचित्र काहीतरी कपडे घालणं आपल्याला सुध्दा मान्य नसतच. पण तरीही असं नको, तसं नको असं आपल्याच जवळची लोकं आपल्याला सांगतात. आणि गंमत म्हणजे लोक काय काहीही केलं तरी नावच ठेवतात. असं म्हणणारी आपल्या जवळची माणसं ठराविक वेळेला मात्र लोकांचा फार विचार करतात.
आपल्याला ब-याच प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. असं का? असं  ब-याच  वेळा म्हणूनही ते तसं का ? हे मात्र कळत नाही. आपल्या एखाद्या यशाचं कौतुक आपल्याच माणसांना नसेल तर खुप वाईट वाटतं. पण वेदनेतूनच निर्मिती होते. अडथळे जितके जास्त तितकी जिंकण्याची, जगण्याची मजा जास्त. सगळ सरळ आणि सोप्प असेल तर मग आयुष्य बेचव होईल. खुपदा या अडथळ्यांनी थकायला होतं. असं वाटतं का करतोय आपण हे सगळ? कोणासाठी ? पण आधी म्हणलं तसं कित्येक प्रश्नांची उत्तरं नसतात आपल्याकडे. माझा तर जगण्याचा फंडा आहे, ''नेहमी आनंदी रहा.'' आपली निम्मी संकट या फंड्यामुळे दूर होतात. कोणालाही त्रास न देता आपल्याला हवं तसं जगायची इच्छा असेल तर सगळ्यांनीच एकमेकांना मदत केली पाहिजे. आपल्या जवळच्या माणसाच्या आनंदात सहभागी होणं हे जास्त महत्त्वाचं , नाही का?
त्यामुळे  सांगा ना कसं जगायचं ? याचं उत्तर, कितीही अडचणी आल्या तरी कण्हत, कुढत न जगता आनंदानी जगणं (आपल्याला हवं तसं मोकळं....)

1 comment:

  1. rojchya ayushyat chotya vatnarya pan khartar khup motha parinam karnarya goshtiwar prakash taknara khup sunder lekh mam..........khup chan.........keep it up.....all the best...........

    ReplyDelete