हे एक रेशमी घरटे ......
शहरीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे तसेच धावपळीच्या जीवनशैलीमुळे पालकांना आपल्या मुलांना पुरेसा वेळ देता येत नसल्याने शहरी भागात ऑटिझम आजारातील बालरुग्णांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. अशा मुलांना सांभाळणे हे एक आव्हान असते. मात्र हे आव्हान पेलले आहे तळेगाव दाभाडे येथील एका कुटुंबाने. या कुटुंबात दोन ऑटिझम असलेली मुले आहेत.
तळेगाव दाभाडे येथील स्टेशन विभागात इंद्रायणी कॉलेजसमोरील इंद्रायणी कॉलनीमध्ये प्रल्हाद व राजश्री कदम या दांपत्याला विशाल आणि प्राजक्ता अशी दोन ऑटिझम असलेली मुले आहेत. विशाल 21 वर्षांचा आहे तर प्राजक्ता 16 वर्षांची. प्रल्हाद यांना विशालच्या जन्मानंतर पाच वर्षांनी त्याच्या आजाराबद्दल कळले. नंतर अक्षता हे कन्यारत्न झाले. ही मुलगी सर्वसामान्य मुलांसारखी होती. तिच्यानंतर प्राजक्ताचा जन्म झाला. प्राजक्तादेखील ऑटिझम या आजारानी ग्रस्त होती. प्रल्हाद आणि राजश्री यांना या गोष्टीचा प्रचंड मोठा धक्का बसला. तीन मुलांपैकी दोन मुले ऑटिस्टिक होती. त्यांचा सांभाळ करणे ही खुप आव्हानात्मक भूमिका होती.
कदम कुटुंब सुरुवातीला लोणावळ्यात रहात होते. प्रल्हाद हे लोणावळा नगरपरिषदेत सफाई कामगार म्हणून काम करतात. विशालचा जन्म झाला तेव्हा तो नॉर्मल होता. मात्र गॅसेसच्या त्रासामुळे त्याच्या टाळूचे पाणी सुकले. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, तो मोठा होईल तसा हा प्रॉब्लेम कमी होईल. मात्र तसे झाले नाही. उलट त्रास वाढत गेला. इतर मुलांसारखी त्याची प्रगती नसल्याचे राजश्री यांना जाणवले. नातेवाईक व शेजा-यांनी असा मुलगा असल्याने टाळायला सुरूवात केली. नाईलाजाने त्यांनी तळेगावला बि-हाड हलवले.
विशाल व प्राजक्ता यांना कान्हे येथील जय वकिल स्कूल या शाळेत घातले. तिथे या दोन्ही मुलांची प्रगती व्हायला सुरूवात झाली.
प्रल्हाद म्हणाले, ''आर्थिक ओढाताण, अशी दोन मुलं आणि पाठीशी कोणाचाही आधार नाही. या परिस्थितीमुळे खूप त्रास झाला. एकाच्या तुटपुंज्या पगारात घर चालवणं सोप नव्हतं. विशाल व प्राजक्ता या ऑटिस्टिक मुलांमुळे लोकांनी आमची खुप अवहेलना केली, अपमान केला. मात्र आम्ही कधीही या मुलांचा राग राग केला नाही. देवाला कधीही दोष दिला नाही. कारण ही मुलं सुध्दा प्रेमळ आहेत. त्यांना नीट सांगितलं तर सगळ समजत. मात्र लोकांचा दृष्टिकोन बदललेला नाही. त्यामुळे मानसिक त्रास अजूनही सहन करावा लागत आहे''
राजश्री म्हणाल्या, ''विशाल लहान असताना एका माणसाने त्याच्यावर काळा कुत्रा सोडला होता. तेव्हापासून त्याला कुत्र्याची खूप भीती वाटायची. रस्त्यात कुठेही कुत्रा दिसला की तो खूप त्रास द्यायचा. लोक हसायचे. बाहेर त्याच्या मनाविरूध्द काही केले तर तो मारायचा, कपडे काढून टाकायचा, आकांडतांडव करायचा. मात्र या कशाचाही त्रास मानून घेतला नाही. आपलं मुलं विशेष आहे. त्याला आपणच प्रेम दिलं पाहिजे. ही भावना कायम होती. जय वकिल स्कूलमुळे त्याच्यात खुप फरक पडला. प्राजक्ता ऑटिस्टिक आहे. पण तिला विशालपेक्षा जास्त समज आहे. या दोघांनाही सतत औषधे घ्यावी लागतात. त्यांची काळजी घेणं सोप नाहीये. मात्र कोणाचाही सपोर्ट नसताना, अक्षता व पतीच्या मदतीने मी हे आव्हान पेलते आहे. विशाल व प्राजक्ताने स्वावलंबी व्हावं एवढीच इच्छा आहे. तसच लोकांनी या मुलांबद्दल गैरसमज करून न घेता, किमान त्यांच्याशी दोन शब्द प्रेमानी बोलावं असं वाटतं''
जय वकिल स्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका नयना डोळस म्हणाल्या, ''एकाच कुटुंबात दोन ऑटिस्टिक मुलांचा सांभाळ करणारे कदम कुटुंबिय खरोखर कोतुकास पात्र आहेत. ब-याच वेळा अशा मुलांच्या बाबतीत कुटुंबाकडूनदेखील अवहेलना वाट्याला येते. मात्र विशाल आणि प्राजक्ताच्या प्रगतीत शाळेबरोबरच त्यांच्या कुटुंबियांचा मोठा वाटा आहे. विशालवर आम्ही ''डॉग थेरपीचा'' वापर केला. त्यामुळे त्याच्यात अमूलाग्र बदल घडून आला. या थेरपीमध्ये आम्ही मुलांना कुत्र्यांशी बोलायला लावतो. जी मुलं कोणाशीही बोलत नाहीत ती मुलं कुत्र्यांशी आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करतात. अगदी आज आई रागावली इथपासून, आज आवडीची भाजी डब्यात आहे इथपर्यंत सगळं सांगतात. कुत्र्यांना सांगितलेलं आपलं गुपित बाहेर कोणालाही कळणार नाही याचा त्यांना विश्वास वाटतो. यामुळे विशालची कुत्र्यांची भीती कमी झाली. प्राजक्ता स्लो लर्नर आहे. डान्स, ड्रामा थेरपीमुळे तिच्यात लक्षणीय बदल होतो आहे. अगदी नॉर्मल लोकांसाठीदेखील या थेरपीचा वापर लाभदायक ठरु शकतो, असं संशोधनानी सिध्द झालयं. स्वमग्नता हा एक प्रकारचा मनोविकार म्हणून ओळखला जातो. याचे पूर्ण नाव सायकोन्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटल डिसऑर्डर असे आहे. इंग्रजीत त्याला ‘ऑटिझम’ म्हणतात. ही एक गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे. स्वमग्नता वा ऑटिझम ही जन्मस्थ अवस्था आहे. तो रोग नाही, ही गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे''
No comments:
Post a Comment