Friday, 23 May 2014

भावना........

माणसाच्या मनात वेगवेगळ्या भावनांची मस्त गर्दी असते. प्रेम, दया, करूणा, द्वेष, मत्सर, राग,  हेवा या सगळ्या भावना आपण माणूस असल्याची जाणीव करून देतात. याशिवाय असलेला माणूस असेल याची कल्पनादेखील करता येत नाही. अगदी ऋषी मुनी, राजे रजवाडे, देवादिकांनादेखील यामधून सुटका नाही. तर आपल्यासारख्या सामान्य माणसांना कुठली सुटका हो ?
प्रेमाबद्दल बोलण्यासारखं माझ्याकडे खुप आहे. पण आत्ता नको. पुन्हा कधीतरी. आज मला ना कोणाचातरी हेवा वाटला. मग म्हणलं, याबद्दलच बोलूया तुमच्याशी. तुम्ही म्हणाल, का वाटला हेवा? आज मला माझ्या एका मित्राचा हेवा वाटला. अतिशय निर्मळ आणि निरपेक्ष मनाचा आहे तो. ''कुल'' का काय म्हणतात ना तसा. कोणी कितीही चिडलं तरी अगदी शांतपणे वागणारा. मग तुम्ही विचाराल , तुला हेवा का वाटला ? त्याच्या स्वभावाचा हेवा वाटला. मी का नाही अशी शांतपणे वागू शकत असं वाटलं. 'उत्कटता' हा गुण चांगला पण संयम पण हवाच ना. तोच गुण कमी आहे असं वाटलं. आज एका विषयावरून खुप भांडण झालं त्याच्याशी. पण तो शांतपणे विचार करत होता. मी मात्र उगाच आदळआपट केली मनातल्या मनात. खूप हेवा वाटला मला त्याचा.
हे विचार चालू असतानाच एक गोंडस बाळ त्याच्या आईच्या कडेवर दिसलं. मग 'हेवा ' या भावनेनी आणखीनच जोर धरला. उगाच मोठे झालो. काय साल्या या जबाबदा-या? डोक्याला ताप आहे नुसता. या अशा भावना दाटून आल्या. ते बाळ आईच्या खांद्यावर विश्वासानी पहूडलं होतं. त्याला खात्री होती आपली आई आपल्या जवळ कायम असेल. आपण मोठे झालो की अशी खात्री आपल्या जवळच्या माणसांबद्दल आपल्याला का वाटत नाही ? या विचारानी हेवा जास्तच वाढला.
माझा मुलगा आजीला म्हणत होता, ''आजी मला तुझा हेवा वाटतो गं. तुझी मज्जा आहे. शाळा नाही अभ्यास नाही. नुसत घरात बसायचं आणि टी. व्ही. बघायचा, हवं तिथे जायचं. मज्जा आहे बाबा तुझी....'' बापरे, बघा माणसाला कशाचाही हेवा वाटतो. आपल्याजवळ असणा-या गोष्टींपेक्षा दुस-याकडे असणा-या गोष्टी जास्त चांगल्या असतात. देवानी मलाच का हे दुःख दिलं ? इतकं चांगल वागूनही आपण असे कमनशीबी का ? हा तर जवळपास सगळ्यांना पडणारा प्रश्न. शाऴेत काठावर पास होणारी मुलगी बॅंकेत नोकरीला लागते आणि चांगले मार्क पडूनही आम्ही आपले आहे तिथेच. माणसाचं हवेपण, हाव संपत नाही. त्यामुळे हेवा पण संपत नाही. पण असुदे. आम्हाला वाटतो हेवा...आणि तुम्हाला?

2 comments:

  1. nakkich.. tuzasarkhe lihita yet nahi mhanun amhala pan tuza heva watato.

    ReplyDelete
  2. Pan haach heva can change u positively.

    ReplyDelete