माझं आणि फक्त माझं.....
माणूस स्वतःच्या अशा अनेक गोष्टींबाबत खूप पझेसिव्ह असतो नाही? माझं आणि फक्त माझं.....असं बरच असतं आपल्या आयुष्यात. ते किती खर असतं हा चर्चेचा मुद्दा आहे. हे सगळ माझं जे आहे ते इथे सोडून वर जाव लागणार आहे असं कितीही म्हणलं तरी माझं माझं संपत नाही . त्यात आम्ही बायका जरा जास्तच पझेसिव्ह असतो.
माझं पोलपाट लाटण असल्याशिवाय माझ्या पोळ्या चांगल्या होत नाहीत. मला बाई माझच पांघरूण लागत नाहीतर मला झोप येत नाही. माझी खुर्ची ऑफिसमध्ये माझ्या जागेवर नसेल तर मला काम सुचत नाही. माझी कपडे वाळत घालायची काठी मला लागतेच बाई. हे काय, आज नेहमीचा झारा दिसत नाहीये भांड्यात आता तळण कसं तळणार ? माझं हे पेन मी किती वर्ष वापरतोय मला तेच लागत लिहायला. माझं टेबल नसेल तर सुचत नाही अभ्यास. पाठांतर करण्यासाठी मला हीच जागा लागते. माझं घर, माझं ताट, माझी उशी, माझी क्लिप, ............
बापरे...... किती मोठी आहे ही लिस्ट. वस्तूंच्या आणि जागांच्या बाबतीत आपण इतके पझेसिव्ह असतो मग माणसांच्या बाबतीत तर कहरच करू. नाही का ? मला आठवतय शाळेत असताना माझी एक खुप जिवलग मैत्रिण होती , अजूनही आहे. मी सोडून कोणाशीही जास्त बोललेलं मला आवडायचं नाही. कॉलेजच्या निमित्तानी ती पुण्याला रहायला गेली. तेव्हा मला त्यातून सावरायला खूप दिवस लागले. आपण ज्याच्यावर जिवापाड प्रेम करतो त्यानी दुस-या कोणाबद्दल बोललेलं आवडत नाही. शेअरिंग भलत्या बाबतीत नाही हा...
अजून एक मी नोटिस केलेली गोष्ट. आपण कोणत्या ट्रीपला वगैरे गेलो ना. तर तिथे प्रत्येक जण आपण पहिल्यांदा ज्या जागेवर बसलो आहोत तिथेच बसतो. अगदी कितीही वेळा उतरलो , चढलो तरी. तिथे सुध्दा माझी जागा.
सकाळी फिरायला जाणा-या ज्येष्ठ नागरिकांचे कट्टे, संध्याकाऴी टाईम पास करणा-या तरूणांचे कट्टे ठरलेले असतात. शाळेत डबे खाण्याच्या जागा ठरलेल्या असतात. ट्रेनमध्ये रोज अप डाऊन करणारे सुध्दा त्या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये माझं - तुझं करतात. आपल्या ठरलेल्या जागांवर कोणाला बसू देत नाहीत.
जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय.... हे जीवनाचं कटू सत्य असलं तरी माणूस म्हणून असणारी ही भावना कमी होत नाही. म्हणूनच सांगते माझ्या मित्र मैत्रिणींनो माझा ब्लॉग वाचून मला प्रतिक्रिया द्या......
खूप छान... मी माझं जरा कमीच करायला हवं हा धडा मिळाला...
ReplyDelete