Sunday, 15 June 2014

वेगळं काही तरी.....

आज खूप दिवसांनी मनामध्ये एका सुंदर भावनेनी जन्म घेतला. ती होतीच मनात. फक्त जाणीव आज झाली. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात मन फार महत्त्वाचं आहे. आपल्या मनाचं ऐकावं असं म्हणतात. ब-याचदा आपण दुस-यांसाठी, समाजासाठी, आपल्या घरातल्यांसाठी मनाचं ऐकत नाही. मला काय वाटतय यापेक्षा समोरच्याला काय वाटतय याचा विचार करतो. संवेदनशील माणसांना कळेल मी काय म्हणतीय ते.
एखादं नातं आपल्याला नको असताना समाजासाठी वागवतो आपण. मनापासून काय वाटतय याला फारस महत्त्व देत नाही. कृत्रिम वागु लागतो. अगदी कोणतही नात असुदे ते मनापासून निभावण्याची गरज आहे. नाहीतर त्यामध्ये यांत्रिकता येते. मतभेद, मनभेद असतातच हो. पण मनं खूप जास्त दुरावली तर कठीण होऊन बसत सगळ.
अगदी लहानपणापासून ज्यांच्यावर मनापासून प्रेम केलं असे आपले सगळे आप्त कालांतरानी विचित्र का वागतात ? मनापासून केलेलं सगळ चुकीचं असतं का मग ? आणि होतं काय , आधीचं मनापासून केलेलं सगळ विसरतात लोक. नंतर आपल्याकडून जे चुकतं तेच लक्षात रहातं. मोठ्यांनी मोठ्या मनानी हे सगळ विसरायला हवं ना. का होत नाही असं?
अगदी नुकताच आलेला अनुभव आहे. ज्या आपल्याच नातेवाईंबद्दल आपल्या मनात नितांत आदर असतो ते लोक विचित्र वागताना पाहिलं की वाईट वाटतं. मी अमुक केलं, तमुक केलं आणि त्यांना याची जाणीव नाही. असं काहीतरी बोलतात लोक. जाणीव आहे का नाही हे तेच ठरवून मोकळे होतात. आपलं मन शांत करताना आपण दुस-याचं मन दुखवतोय हे त्यांना कळत नाही. बरं त्यांना प्रतिउत्तर देऊन गप्प बसवणं हे योग्य नाही असं आपल मन सांगत. कारण शब्दानी शब्द वाढतो, दुसरं काही नाही. आधीच दुरावलेली मनं आणखीन दुरावतात.
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ?
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातात कसा हो यावा, आधार कसा शोधावा ?

1 comment: