Wednesday, 18 June 2014

प्रेम.........
आज पुन्हा एकदा ' प्रेम' या विषयावर बोलावसं वाटतय. पुन्हा एकदा का, मला नेहमीच या विषयावर बोलावस वाटतं. कारण मला असं वाटतं या जगात प्रत्येक माणसाला याच एका बेसिक गोष्टीची सगळयात जास्त गरज आहे. मग ते कोणत्याही माध्यमातून मिळूदे.

आपलं मन आनंदी आणि प्रसन्न असेल तरच आपण अगदी रोजची कामंदेखील करू शकतो. ते आनंदी रहाण्यासाठी प्रेम आवश्यक आहे. हे प्रेम वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या लोकांकडून मिळतं. फक्त आपला हट्ट असतो की , मला असच हवं, तसंच हवं. पण नीट विचार केला तर असं वाटतं, आनंद आणि प्रेम मिळवण्यासाठी फार धडपड करण्याची गरज नाही. आपल्या मनात ते भरून वहात असेल ना, तर ते समोरूनही मिळतं. फक्त आपण ठराविक अशा कोणत्याही अट्टाहासाला चिकटता कामा नये.

कित्येक वेळा असं वाटतं की आपल्यावर मनापासून प्रेम करणारं कोणी नाहीये. अगदी आपला पोटचा मुलगा सुध्दा. अशा वेळी आपल्या आजुबाजुच्या लोकांनी केलेलं प्रेम समजून घेण्याची क्षमता मन हरवून बसतं. म्हणून प्रेम बाहेर शोधण्यापेक्षा ते आपल्या आतच आहे हे आधी समजून घ्यावं लागेल. ब-याचदा आपला मूड खूप चांगला असेल तर समोरच्या माणसाच्या मोठ्या गोष्टीदेखील आपण विसरून जातो. ''त्यात काय गं एवढं, ठीक आहे. बडे बडे शेहेरो मे ऐसी छोटी छोटी बाते होती रेहेती है.'' वगैरे म्हणून सोडून देतो. तेव्हा का नाही असं वाटत की , समोरच्याचं माझ्यावर प्रेम नाहीये. कारण आपण आपल्या मनाचं ऐकतो. बुध्दि काहीही सांगत असली तरी मनाचं ऐकतो. बुध्दिनी विचार करणा-या लोकांना हे पटणार नाही. पण मनाचं ऐकलं की आपल्याला समाधान मिळतं. त्याला  भरकटू न देणं हे बुध्दिचं काम आहे हे मान्य. मन शुध्द आणि निर्मळ असेल तर ते बुध्दिला पटेल असंच वागेल. फक्त अशा शुध्द मनाची लोकं मिळणं आता दुर्मिळ झालय. 

No comments:

Post a Comment