द्वैत खरे की अद्वैत..........
काल एका वेगळ्या विषयावर एका अध्यात्मिक मित्राशी मस्त गप्पा झाल्या. द्वैत खरे की अद्वैत. फार गंमत वाटली यावर बोलताना. भक्ती ही उत्कट प्रेमाची पुढची पायरी. असं सांगितलं जातं. ज्या व्यक्तिवर आपलं मनापासून प्रेम असतं, त्याच्या जागी ईश्वराला ठेवलं की झाली भक्ती. काही संत सांगतात, व्यसनी किंवा हट्टी माणसं भक्तीमार्गासाठी चांगली. त्यांचं व्यसन आणि हट्ट काढून त्याच्या जागी देव असला की झालं काम.
या सगळ्यात मूळ विषय मागेच राहिला. मी म्हणत होते की, प्रेम काय किंवा भक्ति काय समोर कोणीतरी हवं ना. तर तो म्हणाला, जे आपल्यामध्येच आहे त्याचा शोध बाहेर कशाला घ्यायचा ? परमेश्वर आपल्यामध्येच वसलेला आहे. त्यामुळे त्यासाठी बाहेर कुठे शोधायची गरज नाही.
नंतर एक गोष्ट आठवली. मिलिंद बोकिल यांच्या 'एकम' या कादंबरीचं अभिवाचन आम्ही करतो. त्यामध्ये असलेल्या मनस्वी लेखिकेलादेखील आपल्यामध्येच असलेल्या सगळ्यांची ओळख होते. त्यानंतर तिला जाणवतं की,' मी सगळ्यांमध्ये होते आणि सगळे माझ्यात. मुळात एकटेपणा असं काही नाहीये. आपण एकटेपणामुळे ब-याचदा उगाच खंतावत बसतो.' किती सुंदर आहे हा विचार. प्रत्येकाला सोबतीची गरज असते. पण सोबत कोणीही नाही या विचारानी वाईट वाटून घ्यायची गरज नाही.
आपल्याला आवडणारी व्यक्ति आपल्यामध्येच आहे. ही कल्पना खूप सुखावह आहे. बाहेर शोध घेण्यापेक्षा , वाट बघण्यापेक्षा आपल्यामध्येच असणा-या त्याच्याशी किंवा तिच्याशी संवाद साधणं ही किती भारी गोष्ट होईल. विरहातलं प्रेम अनुभवण्यासाठी काय सॉलिड आयडिया आहे ही. तो समोर असतानादेखील जे बोलता येणार नाही, ते अशा माध्यमातून व्यक्त होता येईल. त्यासाठी भेट व्हायलाच पाहिजे असं नाही.
सुधीर मोघ्यांची एक मस्त कविता आहे,
नसताना तू जवळी असण्याचा भास तुझा भासातही भिडणारा हा दाहक श्वास तुझा.
कुठूनी ये इतुकी धग , विझलेल्या गतस्मृतीस. वेदनेस संजीवक करणारा ध्यास तुझा..
वाह वा. किती सुंदर भावना आहे ही.
उत्कट प्रेमाचा अविष्कार असो की भक्ती, व्दैत आणि अद्वैताच्या या संकल्पना मनाला किती आधार देतात. द्वैत असेल तर व्यक्त होणं शक्य आहेच. पण अव्दैतामध्ये सुध्दा भेटीचा आनंद मिळू शकतो. अनुभव घेऊन पाहूयात का?...
No comments:
Post a Comment