ये रे ये रे पावसा..........
जून महिन्याचा शेवटचा आठवडा आला पण...... पाऊस नाही आला. आत्ता खरं तर खूप मस्त पाऊस पडावा असं वाटतय. नको तेव्हा किती बरसला हा. अगदी भर उन्हाळ्यात, मे महिन्यात ढगांची दाटी काय, वीजांचा कडकडाट काय. सगळ्या पावसाच्या कविता, गाणी तेव्हाच मनात दाटून आली. पण आत्ता तर पाऊस पडण्याचा, सरींमध्ये चिंब भिजण्याचा, मस्त रोमॅंटिक होण्याचा, पावसाच्या कविता करण्याचा - ऐकवण्याचा, आल्याचा गरम चहा पिण्याचा, गरम कांदा भजी खाण्याचा हा सीझन. पण पावसाची चिन्हच दिसत नाहीयेत.
शाळेच्या पहिल्या दिवशी पालकांची आणि मुलांची धांदल उडवणारा पाऊस पोर्शन पुढे चाललाय तरी अजून आला नाही. वर्तमानपत्रामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी पावसानेदेखील लावली हजेरी.......... अशा फोटोओळीचा टिपिकल फोटो बघण्याची किती सवय झाली. पावसाळ्यात घालायचे कपडे, त्वचेची घ्यायची काळजी, काय खा, काय खाऊ नका असे लेख हे सगळं तसचं पडलय वर्तमानपत्रांच्या कॉम्प्युटरमध्ये. पाऊस आला रे आला की या लेखांचा मारा वाचकांवर करण्यासाठी शस्त्रांना धार लावतो तसे लेख तयार आहेत. काही वर्तमानपत्रांमध्ये हे लेख आले ....पण
पाऊस .......... तोच नाहीये.
अजून एक गंमत.... पावसाळी बूट, रेनकोट, छत्र्या सगळ आलय बाजारात. पण हे सगळ वापरण्यासाठी आवश्यक असणारा पाऊस काही आलेला नाही. बाहेर प्रचंड उन आहे. दुकानात बघितलं तरी घाम फुटतोय असे रेनकोट मात्र आलेत. पण पाऊस .... तोच नाहीये.
ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या आता सासवड पार करून पुढे चालल्या आहेत. तरीही पाऊस अजून पडला नाही. वारक-यांना भिजवणारा पाऊस का पडत नाहीये. पाऊस पडल्यानी थोडी गैरसोय होते हे मान्य आहे. पण वारीत पाऊस हवाच ना.
रेडिओवरसुध्दा पावसाची गाणी लावण्यासाठी सगळा स्टॉक तयार आहे. पाऊस हा एकच विषय घेऊन त्यावर विशेष कार्यक्रम करण्यासाठी संहिता तयार आहे. पण पाऊस ...... तोच नाहीये. रंगमंचीय कार्यक्रम सादर करण्यासाठी गाणी तयार आहेत. निवेदिकेच्या पावसाच्या कविता तयार आहेत पण पाऊस ...... तोय नाहीये.
पावसावर आपल्या सगळ्यांच्याच आशा आहेत. कारण शेतीप्रधान असलेल्या आपल्या देशात पाऊस नसेल तर मोठ्या आपत्तीला सामोरं जावं लागेल. म्हणून पावसाला म्हणावसं वाटतं.....
मी कधीच नव्हतं म्हटलं.....
तू अवेळी येऊ नकोस
वेळेचं बंधन
भावात्मक येण्याला असतं
तू तर कायमचा मनात कोरून आहेस....
वेळ - अवेळ हे गणित तुझं माझं नाहीच.......
No comments:
Post a Comment