Monday, 23 June 2014

व्यक्त व्हा......

बोलणं ही माणसाची खूप महत्त्वाची गरज आहे. खूप जड भाषेत बोलायचं तर व्यक्त होणं असं म्हणूया. मग ते माध्यम कोणतही असो, बोलणं, लेखन, कविता, चित्र, हावभाव किंवा प्रतिसाद. या सगळ्यातून आपण आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतो. प्रत्येक जण आपापल्या पध्दतीप्रमाणे रिअॅक्ट होतो.
मनात असूनही न बोलणा-या माणसांच मला आश्चर्य वाटतं. का व्यक्त होत नाहीत लोक? फार तर काय होईल. समोरच्याला आवडणार नाही. पण ब-याचदा व्यक्त न झाल्यानी प्रॉब्लेम होतात. कित्येक प्रश्न संवादाच्या अभावानी तसेच रहातात. बोलल्यानी प्रश्न सुटतात असं नाही. पण निदान मार्ग दिसतो.
आता तर संवादाची कित्येक माध्यमं आहेत. फोन, मोबाईल, व्हॉटस् अप, ई मेल, फेस बुक अशा कितीतरी माध्यमांमधून आपण व्यक्त होऊ शकतो. एखाद्या जिवलग व्यक्तिशी झालेलं कडाक्याचं भांडण एका सॉरीमुळे संपुष्टात येतं. पण...... हा पण आडवा येतो. आपल्या बोलण्यानी गैरसमजाचे बांध फुटणार असतील तर काय हरकत आहे. ते म्हणतात ना झालेल्या गैरसमजावर बोललं तर आयुष्याला स्वल्पविराम मिळेल. पण मौन बाळगलं तर पूर्णविराम. म्हणून बोला.... व्यक्त व्हा...
कोणीतरी असं असाव ज्याला आपण आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगू शकू. अगदी कोणीच नसेल तर लिहा, कविता करा, स्वतःशी बोला. पण आत साचलेलं सगळं बाहेर आलं पाहिजे. अडसर दूर होऊन नदी जशी खळाळत वहाते तसं मन स्वच्छ राहिलं पाहिजे. तरच आपण स्वतःच्या आणि आपल्या जवळच्या माणसांच्या बाबतीत सकारात्मक काम करू शकू.
मला मान्य आहे की काही गोष्टी सांगता येत नाहीत. पण निदान त्या मनात ठेऊ नयेत. चांगल्या  गोष्टी मनात ठेवल्या तरच भविष्यात चांगल्या विचारांची पेरणी होईल. शब्दांशिवायसुध्दा संवाद साधता येतो. कित्येकदा आपल्या जवळ वर्षानुवर्ष सहाणा-या माणसांना असा संवाद कळत नाही. पण असे जिवलग आयुष्याच्या प्रवासात भेटतात. त्यावेळी तरी या संवादातला आनंद घेतला पाहिजे,  मन शुध्द आणि स्वच्छ ठेवून. 

No comments:

Post a Comment