व्याख्यानमाला काळाची गरज
इंटरनेटच्या माध्यमातून जग लहान बनत आहे. मात्र दुसरीकडे माणसे समुदायातही एकेकटी होताहेत. अशा गोंधळलेल्या परिस्थितीत एकूण समाजालाच सुसंवादाची निकड आहे, असे वाटते. पूर्वी हेच काम विविध व्याख्यानमालांनी केले. मात्र आता व्याख्यानमालांना साहित्यप्रेमी रसिकांचा प्रतिसाद कमी झाल्याचे दिसून येते. या सगळ्याची काय कारणे आहेत तसेच व्याख्यानमालेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन का बदलला आहे ? याविषयी विचार मांडणारा लेख
महाराष्ट्रात एकोणिसावे शतक हे 'प्रबोधनाचे शतक' म्हणून ओळखले जाते. हा कालखंड सर्वार्थाने प्रबोधनाचा, नवे ज्ञान-नवे विज्ञान यांच्या परिचयाचा आणि भारतीय व पाश्चात्त्य विचारसरणींच्या विश्लेषणाचा होता. नवे ज्ञान जुन्या ज्ञानाला मागे सारते आणि प्रश्न विचारते. आधुनिक ज्ञान आणि विद्या आत्मसात केलेली पिढी जुन्या पिढ्यांसमोर काही प्रश्न उभे करते; तर्कसंगत उत्तरे मागते. बदलण्याच्या अवस्थेत असणारा समाज नेहमीच संभ्रमावस्थेत असतो. या संभ्रमातून समाजाला बाहेर काढण्यासाठी, व्यापक लोकशिक्षण साधण्यासाठी, तसेच लोकसंवाद साधण्यासाठी 'व्याख्यानमाला' हे एक सशक्त माध्यम निर्माण झाले. वक्ता आणि श्रोता यांच्यामध्ये संवाद घडवणे, वस्तुनिष्ठ ज्ञान देणे, वर्तमान व भविष्यकाळाचे विश्लेषण करणे, घडणा-या बदलांवर भाष्य करणे आणि सामूहिक आत्मपरीक्षणातून माणसाच्या विचारांना प्रेरित करणे हेच खरे व्याख्यानमालांचे कार्य म्हणता येईल.
इंटरनेटच्या आजच्या युगात आणि जागतिकीकरणाच्या रेट्यात संवाद संपत चालला आहे. एका क्लिकवर जर सगळी माहिती मिळते तर घराबाहेर पडून व्याख्यान ऐकण्यासाठी कोण येणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणूनच आज खुल्या संवादाची, लोकसंवादाची गरज अधिक आहे. कारण माणसामाणसातले संवाद कमी होत चालले आहेत. येणारे मानसिक ताणतणाव हेदेखील त्यामागचे एक प्रमुख कारण आहे. म्हणून कोणत्याही वयातल्या माणसाने दुस-याचे ऐकण्याला महत्त्व दिले पाहिजे. व्याख्यानमालांच्या मदतीने हा सामुदायिक सुसंवाद वाढायला मदत होईल. एखाद्या महान व्यक्तिच्या स्मरणाच्या निमित्ताने अनेक व्याख्यानमाला अस्तित्वात आल्याचेही दिसून येते.
आजमितीला महाराष्ट्रात किमान दोनशे व्याख्यानमाला अस्तित्वात आहेत. पुण्यापासून प्रेरणा घेऊन 'मराठी संस्कृती, भाषा व जीवन' यांविषयी आपुलकी असणा-या महाराष्ट्रातील सर्व मोठी शहरे आणि गावे यांमधून अनेकविध संस्थांनी आपापल्या व्याख्यानमाला रुजवल्या आणि दृढ केल्या आहेत. मावळ तालुक्यात तीन ते चार ठिकाणी व्याख्यानमाला चालू आहेत. तळेगाव दाभाडे येथे श्री गणेश मोफत वाचनालयाच्या वतीने ''अॅड. दादासाहेब तथा पु. वा. परांजपे व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. लोणावळा येथे वसंत व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. तसेच वडगाव येथे सरस्वती व्याख्यानमाला व महादजी शिंदे स्मृती व्याख्यानमाला आयोजित केली जाते.
लोणावळा येथे गेली तेरा वर्षे वसंत व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. या व्याख्यानमालेचे जनक प्रकाश मोहाडीकर होते. याविषयी व्याख्यानमालेचे संस्थापक सदस्य डॉ. कमलाकांत देसाई म्हणाले, ''लोकशिक्षण व राष्ट्रउभारणीसाठी व्याख्यानमाला सुरू करण्यात आल्या. पूर्वीच्या काळी व्याख्याते समाजसुधारणेसाठी व्याख्याने देत असत. आत्ताचा काळ बदलला आहे. त्यामुळे आत्ताचे व्याख्याते ज्ञानी नाहीत असे नाही. मात्र काही वेळा विस्तृत वाचनाचा अभाव त्यांच्या बोलण्यात जाणवतो. त्यामुळे चांगले व्याख्याते शोधणे हे एक आव्हान झाले आहे. तसेच आर्थिक गणितदेखील महत्त्वाचे आहे. आमची व्याख्यानमाला आठ दिवस चालते. तिकीटविक्रीमधून आर्थिक बाजू सांभाळली जाते. व्याख्यानमालेला ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती असते. त्या मानानी तरूणांची उपस्थिती कमी असते. लहान मुलांकरीता व्याख्यानमाला सुरू केल्यास त्यांना लहानपणापासून ऐकण्याची सवय लागेल. घरी बसून मनोरंजन होत असेल तर बाहेर व्याख्यानमालांसाठी बाहेर कोण पडणार? यामध्ये आई वडीलदेखील प्रबोनधनासाठी कमी पडतात असे मला वाटते ''
वडगाव येथील महादजी शिंदे स्मृती व्याख्यानमालेचे संस्थापक अॅड. रविंद्र यादव म्हणाले, ''14 जानेवारीला महादजी शिंदे यांनी इंग्रजांवर शेवटचा विजय मिळवला. त्यामुळे या विजयाची स्मृती म्हणून ही तीन दिवसीय व्याख्यानमाला सुरू करण्यात आली. मुख्यत्वे इतिहास या विषयावर व्याख्याने आयोजित केली जातात. तसेच सामाजिक विषयांवरदेखील व्याख्यानांचे आयोजन केले जाते. मात्र लोकांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. एखादी क्रिकेटची मॅच असेल तर कितीही मोठा व्याख्याता बोलवला तरी लोक येत नाहीत. टी.व्ही. पुढे लोकांना काहीही अवांतर ऐकण्याची इच्छा राहीलेली नाही. तसेच व्याख्यानमालांना प्रायोजकदेखील मिळत नाहीत. त्यामुळे बजेट हा मोठा प्रॉब्लेम आहे. असे असले तरीदेखील वैचारिक भूक भागवण्यासाठी अशा व्याख्यानमालांची गरज आहे. ते काम असेच जिद्दिने चालू ठेवले पाहिजे ''
तळेगाव दाभाडे येथील गणेश मोफत वाचनालयाचे प्रशांत दिवेकर म्हणाले, ''व्याख्यानमालांचे योग्य नियोजन व विषयाचा योग्य विचार केल्यास उपस्थिती चांगली असते. तरूणांच्या काही विशिष्ट ध्येयाने भारलेला गट त्यांच्या आवडीच्या वविषयांच्या व्याख्यानाला प्रचंड प्रतिसाद देतात. त्यातून प्रेरणा घेऊन कार्यप्रवृत्त होतात. ग्रामीण भागात व्याख्यानांना चांगला प्रतिसाद मिळतो. व्याख्यान हा प्रबोधनाचा उत्तम मार्ग आहे. हे मान्य करणारा मोठा वर्ग समाजात आजही आहे. तो वर्ग व्याख्यानांना नक्की येतो. व्याख्यानांच्या विषयातली विविधता वाढते आहे. जीवनाच्या सर्व विषयांना स्पर्श करणआरे विषय घेतले जात आहेत. लायन्स कल्ब, रोटरी क्लब सारख्या संस्था आणि धनाढ्य व्यक्तिंनाही व्याख्यानमाला आकर्षणाचा भाग वाटू लागली आहे. असे असले तरीदेखील काही मुद्दे निराशाजनक वाटतात. ज्येष्ठ नागरिकांशिवाय अन्य वयोगटाची उपस्थइती कमी असते. वक्त्यांच्या मांडणीत अनेक वेळा नेमकेपणा नसतो. व्याख्यानमालेचा नेमका हेतू संयोजकांनी ठरवलेला नसतो. व्याख्यानाचा विषय लांबल्यास तो कंटाळवाणा होतो. प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, सत्कार या सगळ्या औपचारिकतेमध्ये मूळ व्याख्यान मागे पडते. वेळेवर कार्यक्रम सुरू होत नाही. त्यामुळे बराच वेळ जातो. गणेश वाचनालयाच्या बाबतीत शतकमहोत्सवी वाटचाल करणा-या संस्थेच्या वाटचालीत व्याख्यानमाला हा मुख्य उपक्रम आहे. स्थानिक प्रश्न, स्थानिक वक्ते, साहित्य अभिवाचन या विषयांचा समावेश व्याख्यानमालेत केला जातो. नेटके व नियोजित व्याख्यान पार पाडण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. व्याख्यानमालेच्या माध्यमातून चांगले वक्ते, निवेदक, श्रोते, कार्यकर्ते निर्माण करण्याचा प्रयत्न आहे''
वडगावच्या सरस्वती व्याखानमालेचे डॉ. रवि आचार्य यांनी व्याख्यानमालेच्या संदर्भात अतिशय सकारात्मक मत सांगितले. ते म्हणाले, ''गेली चौदा वर्षे वडगावसारख्या ग्रामीण भागामध्ये आम्ही नवरात्रामध्ये नऊ दिवस व्याख्यानमाला आयोजित करतो आहे. आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. कमीत कमी पाचशे श्रोते व्याख्यानास येतात. स्थानिक वक्त्यांपासून अॅड. उज्ज्वल निकम, जयंत नारळीकर, सुधा मूर्ती, डॉ. अमोल कोल्हे असे दिग्गज वक्त्यांनी व्याख्यानमालेत व्याख्यान दिले आहे. मला वाटते, आपण व्याख्यानमाला कोणत्या उद्देशाने आयोजित करतो ते महत्त्वाचे आहे. केवळ राजकीय हेतू असेल तर त्याला प्रतिसाद मिळत नाही. वक्ते कोण आहेत यावर श्रोत्यांची उपस्थइती अवलंबून असते. तसेच व्याख्यानाची वेळ महत्त्वाची आहे. विषयांमध्ये नाविन्य व वैविध्य असेल तर वेगवेगळ्या वयोगटातील श्रोते मंडळी उपस्थित रहातात. आमच्या व्याख्यानमालेमध्ये साठ टक्के महिलांचा सहभाग असतो. महिला केंद्रबिंदू असल्याने आपोआपच कुटुंबाला व समाजाला या व्याख्यानांचा उपयोग होतो.''
व्याख्यानमाला आणि समाजमन यांचे परस्पराशी घनिष्ट असा संबंध आहे. या व्याख्यानमालांच्या व्यासपीठांनी उत्तम वक्ते घडवले, चांगले संवादक घडवले, सभाध्यक्ष घडवले आणि मुख्य म्हणजे संवेदनशील श्रोते घडवले आहेत. त्यामुळे व्याख्यानमालांची आजही समाजाला नितांत गरज आहे असेच म्हणावेसे वाटते.