Thursday, 5 February 2015


व्हॅलेंटाईन डे ...........





मी कालच तुम्हाला म्हणलं होतं की व्हॅलेंटाईन डे पर्यंत ''प्रेम'' या भावनेविषयी व्यक्त होण्याचा प्रयत्न करेन... अर्थात मनीमानसी काही आलं तरच हं.... मुळातच जुलमाचा राम राम नकोच वाटतो मला.... खरचं मनापासून वाटलं तर लिहावं, बोलावं... जगरहाटी पाळण्याबाबात जरा  डोकं कमीच आहे .... 
असो..... मैत्रिणीला सहजच फोन केला आणि विचारलं .... ''काय गं, व्हॅलेंटाईन डेचं काय विशेष प्लॅनिंग ?'' ती म्हणाली, ''छे गं, आता इतक्या वर्षांनी कसला आलाय व्हॅलेंटाईन डे आणि खरं सांगु का तुला आमच्या ह्यांना हा असला प्रकार अजिबात आवडत नाही. ते म्हणतात, प्रेम मनात असावं लागतं त्यासाठी त्याचं प्रदर्शन करण्याची काय गरज  आहे ?'' 
फोन ठेवल्यावर माझ्या मनात विचार आला.... काही वर्ष झाली की प्रेम व्यक्त करायचं नसतं का? प्रेम व्यक्त करणं म्हणजे प्रदर्शन का ? एकमेकांना पुन्हा एकदा माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणलं तर काय हरकत आहे ? मनात ठेवून प्रेम करण्यापेक्षा, व्यक्त केलेलं चांगलं नाही का ? व्यक्त झाल्यानी आपल्या जोडीदाराला आनंदच वाटेल.... एकमेकांसोबत रहायचं ते एकमेकांना आनंदी करण्यासाठी ना ?  .... मग किती वर्ष लोटलीत याला अर्थ नसला पाहिजे... लग्न झालं की सगळं संपल असं म्हणणा-यांनी तर या दिवसाचा चांगला उपयोग करून घ्यायला हवा. एरवी जोडीदाराला वेळ देता येत नसेल तर या दिवशी पूर्ण वेळ द्यायला हवा....
व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस... मग ते जोडीदारावरचं असो की मित्र मैत्रिणीवरच. अगदी एखाद्या वडीलधा-या व्यक्तिविषयी आदर व्यक्त करायलादेखील हा दिवस छान आहे . प्रेम म्हणजे प्रियकर - प्रेयसी असं असलं तरी ते इतकं संकुचित नसतं. प्रेमाची व्याप्ती खूप मोठी आहे... निर्व्याजपणे, निरपेक्षपणे कुणावरही केलेलं प्रेम तितकचं आदराचं असतं. मनाच्या कप्प्यात कितीतरी व्यक्ति असतात.. ज्यांच्याविषयी आदराची भावना असते. ही भावना व्यक्त केली तर काय हरकत आहे ? 
 'प्रेम कुणावर करावं ? प्रेम कुणावरही करावं, प्रेम काळजाच्या नात्यावर करावं आणि प्रेम खडगाच्या पात्यावरही करावं.' प्रेमाचा हा संदेश घेऊन व्हॅलेंटाईन डे जवळ आलाय. खरच नीट विचार केला तर लक्षात येतं की हा दिवस फक्त प्रियकर प्रेयसीने प्रेम व्यक्त करण्याचा दिवस नसून ज्या व्यक्तिबद्दल आपल्याला आदर किंवा प्रेम वाटते ते व्यक्त करण्याचा दिवस आहे. मात्र व्हॅलेंटाईन डेचं बदलतं स्वरुपच या दिवसाला बंदी असावी या विचाराला कारणीभूत झालं आहे. व्हॅलेंटाइन या संतानी माणुसकीची, प्रेमाची जी शिकवण दिली, त्याची स्मृती जागृत रहावी म्हणून या दिवसाकडे पाहुया...... मनात माणुसकीची भावना वाढवण्यासाठी...... 

Tuesday, 3 February 2015

     व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानी.........    


आता गुलाबी भावनांना बहर येणारा महिना सुरू झालाय. अगदी उद्या परवापासूनच व्हॅलेटाईन डे चे मेसेजेस यायला सुरूवात होईल. पण मला तुमच्याशी  व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानी , जसं सुचेल तसं, आत्तापासूनच  बोलायचय. म्हणजे ठरवून रोज एक लेख असं काही नाही हं..... पण १४ तारखेपर्यंत... या भावनेचे जे भाव माझ्या मनात   उमटतील , ते तुमच्याशी शेअर करायचेत मला..... 
  नवरा म्हणतो, 'मी तुला लग्नाच्या दहाव्या वाढदिवसाला अंदमान निकोबारला घेऊन जाणारे.' बायको आनंदून म्हणते, 'मग पंचविसाव्या वाढदिवासाला काय करणार? 'नवरा म्हणतो, 'तुला तिथून घेऊन जायला येणार.'  नुकताच हा मेसेज वाचला. गमतीचा भाग सोडला तर लग्नाला दहा पंधरा वर्ष झाल्यावर असंच वाटत असेल का एकमेकांबद्दल?  'हल्ली तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटतच नाहीये. कामाच्या नावाखाली तुम्ही माझ्याकडे किती दुर्लक्ष करताय. मी म्हणून तुमचा हा संसार नीट चाललाय. दुसरं कोणी असत तर..........' वगैरे वगेरे. लग्न थोडं जुनं झालं की हे संवाद जवळपास सगळ्याच घरांमधून ऐकायला मिळतात. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अनेक तरूण - तरूणी आपल्या मनातले विचार आपल्या प्रिय व्यक्तिपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतील. म्हणूनच लग्न झालेल्या त्याचे किंवा तिचे विचार त्यांच्या व्हॅलेंटाईनपर्यंत पोहोचविण्याचा हा मी केलेला एक प्रयत्न.  
             लग्नानंतर या व्हॅलेंटाईन डेचा प्रभाव कमी होतो की काय? कोण जाणे. असं म्हणतात की, प्रेमाची पूर्तता लग्नात होते. पण लग्नानंतरच या प्रेमाची 'पूर्णता' होते की काय अशी शंका मनात येते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मग आपला जीवनसाथी आणि जर ती बायको असेल तर तिच्याकडे लक्ष द्यायला वेळ कुठे आहे? सर्व विवाहित पुरूषांचा आणखी एक नेहमीचा डायलॉग, 'ही जी धडपड चाललीय ती कोणासाठी? तुझ्यासाठीच ना ?' या सगळ्यामध्ये नेमकं कोण चुकतय, कोण बरोबर आहे यामध्ये वेळ आणि शक्ति खर्च करण्यापेक्षा तो मुद्दाच किती सामान्य आहे हे नंतर आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात येतं. पण तोपर्यंत मनं दुखावलेली असतात...... दुरावलेली असतात.....  ही मनं दुरावण्याआधीच प्रयत्न केले पाहिजेत.
          प्रेम व्यक्त करायला कशाला हवाय कुठला डे? ते असं एकमेकांकडे नुसतं बघितलं की समजलं पाहिजे. कारण प्रेम करणं म्हणजे एकमेकांकडे पहाणं नाही तर दोघांनी मिळून एकाच गोष्टीकडे पहाणं. काव्य,  कल्पना म्हणून सगळ्याच गोष्टी मस्त वाटतात. पण प्रत्यक्षात नेमकं काय होतं ते समजून घ्यायला हवं. दोन व्यक्ति म्हणलं की वेगळे स्वभाव आलेच. काही चांगले , काही वाईट गुणही ओघानी येतात. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आपल्या जोडीदाराचं एक वेगळं स्थान असतं. खर तर एकमेकांना दुखवावं असं कोणालाच वाटत नसतं. मग का बर असे मेसेज आणि असे संवाद तयार झाले?
             मला वाटतं एकमेकांना जे गृहित धरलं जात ना, त्यातूनच असे विसंवाद तयार होतात. एकदा लग्न झालं की मग काय आपल्या जोडीदाराशी कसंही वागा. त्यानी किंवा तिनी समजून 'घेतलचं' पाहिजे. हा जो 'घेतलचं' पाहिजे आहे ना, तोच खटकतो. एकमेकांच्या सहवासानी गुण - दोष माहिती होतात. प्रत्येकानेच आपल्या माणसाला गुण -दोषांसहित स्वीकारलं पाहिजे. 'प्लॅटोनिक लव्ह' की काय ते यालाच म्हणत असावेत. पूर्वीच्या आणि आत्ताच्या काळात बराच फरक आहे. संवादाची माध्यमं मोठ्याप्रमाणात वाढली आहेत. त्याचा योग्य उपयोग करून आपण आपली नाती फुलवू शकतो.. कित्येक वेळा प्रचंड राग आला असताना एखादा मेसेज.... एखादी छोटीशी भेटवस्तू ... एखादा सॉरीचा फोन किंवा एखादा मेल राग क्षणार्धात घालवू शकतो. पण हे 'सॉरी'  म्हणण कमी झालय. आपला इगो आडवा येतो या सगळ्यात. मला वाटत मराठीत 'माफ कर' असं म्हणल ना तर त्याचा अर्थ मनापर्यंत पोहोचतो. कारण सॉरी या शब्दाला हल्ली काही अर्थच राहीला नाहीये. 
        इंदिरा संतांनी म्हणलय, 'ज्याचा सहवास आवडतो, हवाहवासा वाटतो, ज्याचं सुख आपल्यामुळे वाढतं आणि दुःख कमी होतं. साहित्य, संगीत, चित्रकला या कलांचा आनंद लुटताना ज्याच्याबरोबर आपलं मनही आनंदानं तुडुंब भरून जातं त्या व्यक्तिचा सहवास म्हणजे संसार.'
           या व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने फक्त प्रियकर- प्रेयसी, नवरा - बायको यांनीच संवाद साधला पाहिजे असं नाही. पण व्हॅलेंटाईन म्हणजे फक्त जोडीदार असं नसून, आपल्याला आदर आणि प्रेम वाटणारी आपल्या भोवतीची सगळी माणसं. ''कसला आलाय व्हॅलेंटाईन डे ?'', '' आपल्या संस्कृतीत बसतो का हा डे साजरं करणं ?'', ''  छे, फॅड आहे नुसतं. ''असा विरोध करण्यापेक्षा असं आपुलकीचं आणि प्रेमाचं नात सगळ्यांशीच निर्माण झालं, तर द्वेष, हेवा, मत्सर, भांडण या नकारात्मक गोष्टींना जागा तरी राहील का? अशी नाती निर्माण करायलाच हवीत, नाही का ? ही अशीच नाती आपल्याला आपल्या पुढच्या पिढीसाठी आदर्श निर्माण करण्यासाठी मदत करतील. 


Sunday, 1 February 2015


अति  सर्वत्र  वर्जयेत्  .......... 



नेटवर सर्च करत असताना चाणक्य नितीचा तिसरा अध्याय वाचण्यात आला. अत्यंत विचारपूर्वक मांडलेल्या एका श्लोकानी मला विचारप्रवृत्त केलं. 
''अति रूपेण वै सीता चातिगर्वेण रावणः। अतिदानाद् बलिर्बद्धो ह्यति सर्वत्र वर्जयेत्।।''     
हाच तो श्लोक . कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की ती संपते. हा एक निष्कर्ष सांगणारा हा श्लोक. जी गोष्ट आजच्या काळातही आपल्याला कळायला हवी. चांगलं असो वा वाईट ते अति झालं की त्रासदायक होतं. 
संदीप खरे आणि डॉ. सलील कुलकर्णी यांच्या आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाचा प्रयोग आमच्या तळेगावात झाला होता. तेव्हा रंगलेली ही मैफिल थांबुच नये   असं रसिकांना वाटतं होतं. पण त्याच एका पॉईंटवर आता हे समारोपाचं गीत असं डॉ. सलिल म्हणाले. त्यावेळी रसिकांनी त्यांना आग्रह केला की अजून एक तास सुध्दा आम्ही या गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी थांबु. तेव्हा त्यांनी दिलेलं  उत्तर फार छान होतं. ही मैफिल संपूच नये असं ज्या क्षणी वाटतं तोच क्षण असतो भैरवी घेण्याचा. 
चांगलं असलं तरी ते मर्यादेतच असलं पाहिजे. नाहीतर रंगाचा बेरंग होतो. कुठे थांबायला हवं हे ज्याला कळलं तो जीवनासकट सगळ्या मैफिली ताज्या, टवटवीत ठेवण्यात यशस्वी होतो. कित्येक वेळा आपल्याला हा अनुभव येतो बघा , कितीही चांगला वक्ता असला, गायक असला तरी, लांबलेला परफॉर्मन्स रसिकांपर्यंत पोहोचत नाही. ''अरे याला आवरा कुणीतरी ''असं मनातल्या मनात म्हणणारे रसिक खोटं हसं घेऊन समोर बसतात. (नाईलाजानी ) उलटपक्षी  एका उंचीवर जाऊन थांबणारा कलावंत  रसिकांच्या काळजात घर करतो.   
माणसाला मिळालेल्या सोयी सुविधांचा अतिवापर होतोय असं निसर्गाच्या लक्षात आलं की तो त्याला पुन्हा त्याच्या मुळ रूपात नेण्याची तयारी करेल यात शंका नाही. (जंगलातले आदिमानव आठवतायत ना ?) आपल्याला मिळालेल्या कोणतीही गोष्ट योग्य पध्दतीनी वापरली तर त्याचे फायदे आपल्याबरोबरच आपल्या पुढच्या पिढ्यांना मिळतील. उदाहरण द्यायचं झालं तर वीज, पाणी, पेट्रोल याचं देता येईल. या सगळ्याचा गरजेइतका वापर  केला तरच  त्यापासुन मिळणारा आनंद घेता येईल. विज्ञानानी आपल्याला दिलेल्या  कित्येक गोष्टी वरदानच ठराव्यात हे आपल्याच हातात आहे. मोबाईल, नेट, विकसित तंत्रज्ञान या सगळ्याचा अतिवापर केला तर काय अनर्थ घडू शकतो त्याची चुणूक आपल्याला रोजच्या बातम्यांमधून दिसतीय. मिळालेल्या स्वातंत्र्याचा उचित असा वापर केला तरच हुतात्म्यांच्या, क्रांतिकारकांच्या प्रयत्नांना अर्थ प्राप्त होईल. रूढी-  परंपरांचा अतिरेक झाला तेव्हा बदल झाला. आता स्वातंत्र्याचा अतिरेक होऊ देता कामा नये. कारण तो बदल परवडणारा नाही. 
विज्ञानानी दिलेल्या सगळ्याच सुविधांचा योग्य वापर केला तरच त्यापासून मिळणा-या फायद्यांचा आनंद घेता येईल. फेसबुक, व्हॉटस अप, मोबाईल ही संवादाची प्रभावी माध्यमं आहेत यात शंकाच नाही. दूर असणा-या आपल्या माणसांशी निदान आपण कनेक्ट होऊ शकतो.  सगळ जग आपल्या हातात आलय. पण मुठीतलं जग निसटतय का ?   जिथे आपण फेस टू फेस बोलु शकतो, तिथे या सगळ्या अॅप्सची काय गरज    आहे ? कित्येक घरांमध्ये हल्ली घरातल्या घरातसुध्दा मोबोईलचा आधार घेऊन संभाषण केलं जातय.   समोरच्या माणसाच्या चेहे-यावरचे हावभाव समजून घेऊन केलेला संवाद नक्कीच आनंददायी असेल ना ? 
मनातल्या या विचारांना मोकळ केलं  एका कवितेनी....... आमच्या बॅचमेटसचा एक ग्रुप केलाय व्हॉटस अॅप वर त्यामध्ये  एक कविता शेअर केली होती माझ्या मैत्रिणीनी.....                                             

स्वावलंबन, स्वतंत्र वृत्ती सगळच थोड्या अंतरावरती
कधीतरी आईच्या कुशीतही येऊद्या
मुळांना थोडीतरी माती राहुद्या ... प्लीज..... मुळांना थोडीतरी माती राहुद्या




Tuesday, 20 January 2015


कल्पनेचा कुंचला......





पाहिले न मी तुला , तू मला न पाहिले 
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले...... पाहिले न मी तुला......
वा वा वा.......काही काही गाणी ना अगदी वेड लावतात बघा.... ही अशी गाणी कितीही वेळा ऐकली तरी पोट भरत नाही. गाण्याची सुरावट जितकी लक्षात रहाते ना, तितकेच गाण्याचे शब्द सुध्दा.... एकमेकांना न पहाता मन गुंतवण्याची कल्पना.... किती छान. कारण समोर असताना जीव गुंतला तर नवल नाही. पण कधीही एकमेकांना न पहाता जीव गुंतणं हे काही वेगळच नाही का? अर्थात कल्पनेच्या जगात काहीही अशक्य नाही. 
पण कल्पना ही भावना विचारात घेऊनही, वास्तवात जगता येईल का ? तुम्ही म्हणाल , कुछ तो गडबड है.... पण नाही हो. असं होऊ शकत. म्हणजे वास्तवातही कल्पनेच्या जगात रमता येतं आणि आपल्याजवळ अमुक एक गोष्ट नाही या गोष्टीपासून मिळणारं दुःख कमी करता येतं. 
म्हणजे बघा, देवाला आपण कधी पाहिलय का ? पण आपण तो असल्याचा आनंद घेतोच ना ? नेवैद्य दाखवून विठ्ठलाला घास भरवणारे नामदेव विरळाच. पण आपणसुध्दा देवाला नेवैद्य दाखवून , हा प्रसाद देवाचा आहे असं मानून समाधान मिळवतोच ना. आनंदमयी अशा भगवंताचं सान्निध्य नामानी  मिळवतोच ना. 
न अनुभवलेला स्पर्श, वस्तू, व्यक्ति, सुगंध, रंग  याची अनुभूती घेता येते. कित्येक वेळा आपल्या मनात चालू असलेल्या गाण्याचे सूरसुध्दा ऐकू येतात. कल्पनेनी जगाची सफर करून येतो आपण. अंध व्यक्ति आपल्या मनाच्या डोळ्यांनीच कल्पना करून अनुभूतीचा आनंद मिळवतात. त्यामुळे अनुभूतीचा आनंद मिळवण्यासाठी ती वस्तू पहायलाच हवी असं नाही. समोर असताना त्याचा आनंद घेता येईल यात काही शंकाच नाही. किंवा हा आनंद नक्कीच जास्त प्रमाणात असेल. पण कल्पना करूनही याचा आनंद घेता येतो. 
भाषा विषयांच्या पेपरमध्येसुध्दा कल्पनारम्य निबंधाचा एक विषय हमखास असतोच.  कारण क्रिएटिव्हीटीचा उगम कल्पनेत होतो. एखाद्या कलाकृतीची, व्यवसायाची, यशाचं शिखर गाठण्याची कल्पनाच केली नाही तर तिथपर्यंतचा प्रवास कसा निश्चित करता येईल ? कल्पनेत स्वप्न बघून, वास्तवात प्रयत्नांची जोड दिली तर .. अशक्य अशी गोष्टच नाही. सगळ्या महान लोकांनी कल्पना, स्वप्नं  वास्तवात उतरवण्यासाठी जीवापाड मेहनत केली म्हणूनच या कल्पना साकार होऊ शकल्या. पण कल्पनाच केली नसती तर..... 
आपण कित्येक वेळा म्हणतो बघा.... कल्पना करायला काय हरकत आहे ? हो नक्कीच काहीच हरकत नाही. कल्पनेच्या जगात रमायलाही काही हरकत नाही. सगळ्या कवींनी, गीतकारांनी आपल्या कल्पनेतल्या जगातूनच आपल्याला उत्तमोत्तम काव्य दिली आहेत.  जरी तू.. कळले तरी ना कळणारे....दिसले तरी ना दिसणारे..  विरणारे मृगजळ एक क्षणात.......    या काव्यात मृगजळ असले, कल्पना असली तरी तो जीवापाड प्रेम करतोच ना.... विरहाचा सल कमी करण्यासाठी ही कल्पना किती छान आहे .... जरा घन झुरू दे ना, वारा गुदमरू दे ना , तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना ! ….. भगवंत आणि आपलं नातं सांगणारी ही कल्पना किती छान आहे ... काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल . ससुल्याला शाळेत , सिनेमात , सर्कशीत नेण्याची ही कल्पना म्हणजे.... कोणास ठाऊक कसा ? पण सिनेमात गेला ससा ! किती छान रमतो आपण कल्पनेच्या या जगात... 
  मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तू साठी जगतो . वस्तू ही सत्य नसल्यानी तिचं स्वरूप अशाश्वतच असतं अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंदही अशाश्वत.... खरा आनंद हा वस्तूमध्ये नसून तिच्या पलिकडे आहे. वास्तवातलं जग आणखी सुंदर बनवण्यासाठी.... चला तर चितारूया एक चित्र  कल्पनेच्या कुंचल्यानी.... 

Friday, 16 January 2015

उत्सव वेदनेचा............ 



डोळ्यांमध्ये जमते पाणी , कशासाठी कळत नाही.... ऊर भरल्या उसाशाला ....कुठेच वाट मिळत नाही......... प्रवीण दवणे यांच्या अलगुजमधल्या या ओळी..... काही वेळा अशी मनःस्थिती आपली सुध्दा होते. डोळे भरून येतात.... का? कुणासाठी ? काहीच कळत नाही. व्यवहारी जगातले नियम या भावनांना समजू शकत नाहीत. सगळ काही व्यवस्थित असणारी ही व्यक्ति नेमक्या कोणत्या कारणानी व्याकुळ झालीय तेच कळत नाही.  पाडगावकरांच्या या ओळी मनात रूंजी घालतात..... कुठुनी हे येति सूर लावितात मज हुरहुर, फडफडतो तडफडतो प्राणविहग पंजरी.......
अमुक एक कारण नसत या उदासीला..... ही उदासी आपलीच,  आपल्या मनातली... काही वेळा , काही गोष्टी आपल्या मनातच ठेवलेल्या ब-या.... कारण कोणालाही या भावना कळणं अशक्यच असतं.  कोणत्याही मोठ्या संकटांशी सामना करणारे आपण असे गलीतगात्र का झालोय? हेच मुळी कळत नाही.... 
पण एकदम एक विचार डोक्यात चमकून जातो.. जगण्यासाठी आवश्यक असणारी उर्जा मिळवण्यासाठीच अडचणी असतात ना....... जेव्हा सगळं संपून गेलय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नव्यानी काहीतरी सुरू करण्याची.... खरं आहे हे..... वेदना तर आहेच...... ती रहाणारच..... पण या वेदनेचा उत्सव करता आला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीला अंत आहे.... सुखाचे क्षण जसे फार काळ रहात   नाहीत ... तसंच ही उदासी पण संपेल... काहीतरी मिळवायचय हा ध्यास ही उदासी घालवण्यासाठी उपयोगी पडतो. कदाचितच..... पण प्रयत्न करायला काय हरकत आहे.... कारण न लढता जगण्यापेक्षा  लढून जगलेलं बरं.... काय सांगाव ज्या कारणानी आपण दुःखी झालोय ते कारणच आपल्या जगण्याचा आधार बनेल... ध्यासही असा असावा जो वेदनेला संजीवन देईल.... 

Tuesday, 13 January 2015

आठवणी दाटतात........... 



आठवणी दाटतात ! धुके जसे पसरावे
जे घडले ते सगळे सांग कसे विसरावे...........
 विविध भारतीला हे जुनं मराठी गाणं लागलं होतं. ''आठवण'' हा शब्द उच्चारताच कितीतरी आठवणी जाग्या होतात........... आठवण ही फार छान देणगी दिलीय देवानी आपल्याला. भूतकाळात घडून गेलेल्या चांगल्या वाईट आठवणी पुन्हा एकदा त्याच प्रसंगाची, घटनेची अनुभूती देतात. 
अगदी लहानपणणापासून आत्तापर्यंत घडलेल्या ब-या  वाईट प्रसंगांच्या आठवणी मनाला दुःख आणि आनंद देतात. काही आठवणी नकोशा वाटतात, तर काही हव्याशा.... आपली माणसाची जात ना मोठी चतुर... चांगलं ते हवं आणि वाईट मात्र नको.... नाण्याला दोन बाजू असतात वगैरे हे सगळं बोलतो आपण. पण वाईट किंवा मनाला वेदना देणा-या आठवणी नको असतात आपल्याला. या अशा आठवणींमधून सुध्दा बरचं काही शिकायला मिळतं. त्या वाईट आठवणी नकोत म्हणून त्या वस्तू, त्या जागा,  ते रस्ते सगळं टाळतो आपण. असं करूनही ती आठवण काही पाठ सोडत नाही. मग त्यापासून पळून काय फायदा..... 
हव्याश्या आठवणी मनाला तरल अनुभूती देतात.  लहानपणीच्या खट्याळ, तरूण वयातल्या गोड गुलाबी , पहिल्यांदा मिळालेला पगार, पहिल्यांदा आपल्या पैशानी घेतलेल्या गोष्टी, मैत्रिणींची पत्रं... मी तर आजही माझ्या एका मैत्रिणीचं,  मेघनाचं  पत्र जपून ठेवलय. ते पत्र पुन्हा पुन्हा वाचते मी वेड्यासारखं.... किती छान आठवणी आहेत शाळेमधल्या.....  आम्हा बायकांच्या बाबतीत एक गोड आठवण म्हणजे............ लग्न ..... नाही हो.......... काहीही काय ? ती काय सुखद आठवण आहे का ? या आठवणीपेक्षा आई झाल्याचा क्षण ही  आठवण फारच छान........मुलं कितीही मोठं झालं तरी ती आठवण येताच नकळतपणे, '' माझं पिल्लू गं ते ''.... असे शब्द बाहेर पडतात......   या सुखद आठवणी हव्याशा वाटतात. 
गोंदवलेकर महाराज त्यांच्या प्रवचनात सांगतात, एकच वस्तू एकाला सुखरूप वाटते तर दुस-याला दुःखरूप वाटते. म्हणजे  ती मुळात ती सुखरुप नाही आणि दुःखरूपही नाही. जी गोष्ट आज सुखरूप वाटते, ती उद्या वाटेलच असं नाही.  संकट आलं की पूर्वीच्या गोष्टी, नाती, आठवणी गोड लागत नाहीत. हा सगळा कल्पनेचाच खेळ नाही का ? 
जरी हा कल्पनेचा खेळ असला तरीदेखील  चांगल्या वाईट आठवणी येतातच. त्या मनाला सुख दुःख  देतातच.  आपल्या आयुष्यातून आठवणच वजा केली तर काय   उरतं ?   काहीच नाही. वर्तमानकाळात जगणं हे खरं तर आयडियल आहे. पण आपण मनुष्य आहोत. त्यामुळे भूत, वर्तमान आणि भविष्य अशा तिन्ही काळांची सफर करणं अगदी सहाजिक आहे. या सफरीत येणा-या आठवणींना असं म्हणावसं वाटतं..... 
आठवणींनो उघडा डोळे, आसवांचे अमृत प्याले
आठवणींनो नयनी बघु द्या, सुखाचे ते क्षण जे निमाले...... 

Friday, 9 January 2015


प्रवास ....... वाट बघण्याचा 



आज पुन्हा एकदा माझ्या आवडत्या विषयावर लिहिता येईल असं काहीतरी वाचनात आलं.... राधा कृष्णाच्या नात्याबद्दल आपण सगळ्यांनीच खूप काही ऐकलं  आणि वाचलं आहे. मी नुकतीच एक गोष्ट ऐकली.... उध्दव राधेला भेटून कृष्णाकडे परत निघाला होता. तेव्हा त्याने तिला विचारलं, ''कृष्णाला काही  निरोप आहे का ? '' तेव्हा आधी राधा काकुळतीला येऊन म्हणाली,'' हो आहे ना निरोप. त्याला मला भेटायला सांग....'' उध्दवाची पाठ फिरताच राधा त्याला हाक मारून म्हणाली, ''नको , त्याला म्हणावं की मला कधीच भेटू नकोस. कारण तू भेटलास की तुझी वाट बघण्याची मजा निघून जाईल. त्याच्या  प्रतिक्षेतले हे दिवस कधीच संपू नयेत. कारण तो भेटला तर माझं त्याच्याशी असणारं अनुसंधान संपेल... त्यापेक्षा तो भेटला नाही तरच बर....''
ही कथा ऐकली आणि मन सुन्न झालं. असं  प्रेम करणं किती वरच्या पातळीवरचं आहे. प्राणाहून प्रिय अशा आपल्या प्रिय व्यक्तिला भेटण्यापेक्षा त्याची वाट बघण्यात रमणारी राधा किती वेगळी आहे ..... विरह प्रेमाची तीव्रता वाढवतो या एका संकल्पनेवर आधारलेलं हे जगावेगळ प्रेम..... ''तू नसता मजसंगे वाट ही उन्हाची, संगतीस एकाकी वेदना मनाची !''  ही उन्हाची वाट एकट्यानी चालत जाण्याइतकं धैर्य हवं , नाही का ? 
प्रत्येकाचं प्रेम वेगवेगळ्या गोष्टींवर असत... कोणाचं पैशावर प्रेम, कोणाचं नोकरीवर, कोणाचं ध्येयावर प्रेम, कोणाचं व्यक्तिवर, कोणाचं कवितेवर प्रेम, कोणाचं गाण्यावर... अचाट प्रेम केल्यानी आणि वेडं लागल्यानीच आपण ज्या गोष्टीवर प्रेम करतो ती मिळते... वेडे लोकच इतिहास लिहितात असं म्हणतात ना.... पण राधेचा दृष्टिकोन ठेवून वेड्यासारखं प्रेम केलं तर इच्छित गोष्ट मिळण्यापेक्षा प्रवासातला आनंद लुटता येईल नाही का ? कारण प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंदच अधिक असतो. एखादं नाटक बसवताना किंवा कार्यक्रमाची आखणी करतानासुध्दा हा अनुभव येतो.  नाटकाच्या प्रयोगापेक्षा तालमीतला आनंदच जास्त असतो. कारण एकदा नाटकाचा प्रयोग झाला की दुस-या दिवशी प्रॅक्टिस नसते...... म्हणून वाट बघण्यातच मजा आहे....त्या प्रवासातच मजा आहे....  एक वेगळीच गोष्ट आज जाणवली , कारण ब-याच वेळा हवं ते मिळवण्याच्या गडबडीत प्रवासातली मौज अनुभवायच राहूनच जातं. 
इच्छित स्थळी गेल्यावर हवं ते ध्येय मिळेलच. पण ते लवकर मिळत नाही म्हणून आक्रोश न करता ..... प्रवासातला आनंद घेऊया का ?