उर्जेचं आगार
“ काय मावशी, भेंडी कशी
दिली?”
“घे बाय तुला काय हवी तशी”
“असं कसं हो मावशी? काही तरी सांगा ना”
“तशी १० रुपये पावशेर आहे. बर
चल, दे ३० रुपये आणि घेऊन जा किलोभर. “
“छे, इतकी काय करू नेऊन. मला
अर्धा किलो द्या आणि घ्या हे वीस रुपये”
“इतके काय करायचेत. ५ रुपये
कमी दे”
“असुदेत, १ किलो घेत होते
म्हणून ३० रुपये म्हणालात ना?”
“ हो ग बाय, पन घे तुला हवी
तर”
“नको मावशी, अर्धा किलोच
द्या. काय हो? कुठे राहता?”
“हे काय मागल्या अंगाला.”
“तुमच्याकडे लॉकडाऊन नाही
का?”
“आमच्याकडे नाय ते तसलं
काही. रेशनच दुकान चालू आहे, भाज्या बी मिळतात. काय नाय लॉक डाऊन बिक डाऊन”
“मावशी, तुमच्या भाषेत बोला
कि माझ्याशी”
“माझी कातकरी भाषा , तुला
नाय कळणार”
असं म्हणून सुरकुतलेल्या
गालात गोड लाजलेली आजी डोळ्यासमोरून हालत नाही. परवा एका कामानिमित्त कर्जत फाट्यावरून
येत असताना करवंद घेण्याचा मोह आवरला नाही. तिथे भेटली ही आजी. करवंद घेता घेता
कोवळ्या लुसलुशीत भेंडीवर नजर पडली आणि टिपिकल गृहिणी जागी होऊन भाजी घ्यायला
गेले. तिच्या बोलण्यावरून लगेच कळत होतं की अनुभवाची शिदोरी आहे या आजीकडे. या
सगळ्या संवादात माझ्या लक्षात राहिलेलं तिचं वाक्य म्हणजे, “आमच्याकडे नाय ते तसलं
काही. रेशनच दुकान चालू आहे, भाज्या बी मिळतात. काय नाय लॉक डाऊन बिक डाऊन”
किती कमी गरजा आणि त्यामुळे
किती समाधानी आयुष्य होत त्या आजीच. मनात आलं, आपण किती बाऊ करतोय लॉक डाऊन आणि
आलेल्या परिस्थितीचा. खर तर अन्न, वस्त्र आणि निवारा याच आपल्या मुलभूत गरजा आहेत
हे आपण लहानपणी शिकलो. पण मोठे होत गेलो आणि बेसिक विसरून गेलो. त्यातल्या त्यात
अशा कठीण काळात तरी या तीनच आपल्या गरजा असायला हव्यात आणि माझ्या सारखी मध्यम
परिस्थिती असणाऱ्या बहुतांश लोकांच्या या गरजा नक्कीच पूर्ण होतायत. मग तरी आपण
तक्रार का करतोय? असं मनात आलं. रेशन आणि भाज्या मिळतायत अजून काय हवं? हे आजीच
साध सोपं तत्वज्ञान किती शिकण्यासारख आहे.
Online कुर्ता अजून आला नाही,
मोबाईल मिळण्यासाठी पण वाट पहावी लागते आहे, घरात घालायची
चप्पल (extra) आलीच नाही, हेडफोन पार
कामातून गेलेत पण या लॉक डाऊन मुळे काहीच मिळत नाहीये. किती पुस्तकं घ्यायची आहेत
यार, (जी आहेत त्यांच्याकडे ढुंकूनही बघायचं नाहीये), लोकल नाही, हे नाही , ते
नाही…. आपली यादी संपतच नाही.
मनोरंजनाची अमाप साधनं, तीन
, चार वेळेस वेगवेगळ खायला, कपड्यांनी भरून वाहणारं कपाट, online सुविधेमधून जवळपास सगळं मिळण्याची परिस्थिती असं सगळ
असताना आपल्याला अजून काय हवंय? मला वाटत, थोडं थांबून विचार करायला हवा. परिस्थती
कधीच अशी राहत नाही, हे माहिती असून सुद्धा सकारात्मक राहण्यासाठी इतकी धडपड का
करावी लागते आहे? यापैकी काहीही नसताना, सोयी – सुविधा नसताना ती आजी आनंदी कशी
राहू शकते? विचार करायला हवा आणि आचरणात आणायला हवा. नाही का? अशा काळात एकमेकांना
आधार देणं, समजून घेणं, समाजासाठी काही तरी करण्याची तयारी दाखवण आणि कृती करण,
घरात आणि बाहेर सकारात्मक वातावरण तयार करण किती गरजेचं आहे असं आपण खूप बोलतो. पण
रुपया, दोन रुपयात, कमी गरजांमध्ये समाधानी राहणाऱ्या
आजी सारख्या लोकांकडून स्वत: आनंदी राहण्याची कला शिकलो तरी खूप झालं अस वाटत. करूया
का प्रयत्न?
खूप लोक त्रासदायक परिस्थितीत देखील आनंदी असतात या आजीसारखे. हेच तर शिकायचे आपण!
ReplyDeleteआपली ही सगळी तगमग आपल्याला नक्की काय आणि किती हवंय हे न कळल्यामुळे होते. अशा उदाहरणांवरून आपण फक्त भेंडी घेतो आणि निघून येतो. पण विनयासारखी लेखिका त्या बाईकडील साधं तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत घेऊन येते. मस्त.
ReplyDeleteखूपच छान शब्दबद्ध केले आहे. खरच सर्वांनी यावर विचार करण्याची वेळ आलेली आहे. अवास्तव गरजा वाढवून ठेवल्या आहेत आपण याची फार जाणीव होते.
ReplyDeleteयाला जीवन ऐसें नाव....सुंदर आणि नेहमीची ओघवती शैली....
ReplyDeleteअवास्तव आणि अतिवास्तव गरजांमधे अडकलेल्या नव्या मध्यमवर्गीय माणसांनी असं ग्रामीण पण समाधानी जगणं या कठीण काळात तरी थोडं थोडं अंगवळणी पाडायला हवं..
ReplyDeleteसुंदर शब्दांकन..!!
जीवन जगण्याची कला आजीला साधली म्हणायची! आपण हे कधी शिकणार आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणार.नक्कीच विचार करायलाच हवा.खूप छान आणि सोप्प्या शब्दात खूप मोठा संदेश दिला आहेस विनाया!,
ReplyDeleteखरी व आनंदी जगण्याची ऊर्जा यांच्याकडूनच मिळते फक्त गरज आहे लेखिकेसारखी कांन व डोळे उघडे ठेवून समजून घेऊन आत्मसात करायची।
ReplyDeleteविनू,
ReplyDeleteखूप छान संदेश
खूप छान अनुभव
खूप छान लिहलास
ठेविले अनंते तैसेची रहावे। चित्ती असावे समाधान।।
ReplyDeleteसोपं पण मनाला भिडणारं........
हे सारं खरं असलं तरी आपण आजीबाई सारखं जगू शकणार नाही. यत्न-प्रयत्न करून देखील ते आपल्याच्यान शक्य नाही. कारण आपण बाजारात गेलो, की एकतर भाव कमी करायची याचना करतो, आणि वजन झाल्यावरही त्यात पटकन एखादं फळ टाकतो। (आपण याचा अर्थ अनेकजन अशा अर्थानं घ्यावा)
ReplyDeleteम्हणजे सोनाराच्या किंवा मदिरेच्या दुकानात गेलो तर कसलीच खळखळ नाही. अन भाजीपाला खरेदी करताना मनाची ही चिंधीगिरी!
डॉ. विनया ह्या संवेदनशील आहेत,हे सत्य, पण त्या कृतिशील संवेदनशील आहेत हे परिपूर्ण सत्य.
एकदा तरी असा प्रयत्न करा, भाजीपाला घेताना म्हणा, "अहो, एक टोमॅटो काढा, जास्त कशाला देताय? ... आणि तरीही त्यानं/तिनं दिलं तर फक्त दोन रुपये जादा द्या, आणि मनापासून म्हणा, "अहो, तुम्ही जास्त वजन दिलं, मी जास्त पैसे" या एकदीड मिनिटांच्या संवादादरम्यानचा अनुभव घ्या।।।।।
"तुम एक पैसा दोगे, वो दस लाख देगा.." चा अनुभव तुमची वजन वाटमारीची सवयच!)🎂
बदलून टाकील. 100 टक्के ग्यारंटी!
ReplyDeleteअसे अनेक अनुभव आपल्याला असतात पण तेव्हा आपण काही शिकण्याचा विचार न करता त्यांची कीव करतो,,,आपण किती चांगल आयुष्य जगतो यातच समाधान मानतो नाहीका?
ReplyDelete