Friday, 21 May 2021

 

हवास मज तू…



काल परवाची गोष्ट, तुला कोणीतरी अवकाळी म्हणलं आणि अमानुष सुद्धा. म्हणे जरा माणसासारखा वाग…पण मला एक कळल नाही माणसासारखा म्हणजे कसा?  खर तर आत्ता तू माणसा सारखाच वागतो आहेस
, नाही का? बेभरोशी, माणुसकी सोडून, आत्मकेंद्री, स्वत:ला हवा तसा, अहंकारी… हे सगळं तुला नव्हतं हा,  प्लीज गैरसमज नको करून घेउस. माणूस माणसासारखा वागत नाही आणि तुला नावं ठेवतो ना म्हणून बोलले इतकं. नाही तर तुझ्यासारखा मित्र आहे का कोण?

मागे एकदा तू असाच आला होतास अचानक, धुंवाधार. माझ्याशी बोलायला. माझ्या मनातले आणि डोळ्यातले अश्रू स्वत:चे समजून माझ्या गालावरून ओघळला होतास. तुला कळल ते अश्रू आहेत पण सगळ्यांना वाटलं तू आहेस. मला तेव्हा सुद्धा तुझ्या सोबत असण्यानी किती आधार मिळाला होता, तुला बोलले सुद्धा मी, आठवतंय ना? मी तुला म्हणाले होते, ‘तू मला खूप आवडतोस. कारण माझ्या मनात आणि चेहेऱ्यावर असलेल्या खऱ्या भावना कोणाला कळू देत नाहीस. कारण त्या कोणाला कळू नयेत यासाठी खूप धडपड केलेली असते ना त्यावेळी. तुझ्यामुळे ती धडपड सफल होते.’

तू आलास की अजून एक फायदा होतो, मी किती लहान आहे. माझं अस्तित्व तुझ्यापुढे काहीच नाही याची जाणीव होते आणि सगळा मी पणा वाहून जातो, तुझ्या सोबत. तू धाडधाड कोसळतोस आणि सगळी दारं – खिडक्या आपटवून दाणादाण उडवून लावतोस. तेव्हा कळत आपण नीट लावून ठेवलेलं सगळं किती क्षणभंगुर आहे.

तुझ्या येण्याने आलेला गारवा, बदललेलं वातावरण माझ्यासाठी तर संजीवक असत. मला कधीच तू येण्याने झालेल्या चिखलाचा राग नाही आला. कारण प्रत्येक वेळी तुझा मोसम नसताना तू येतोस ना, तेव्हा माझ्यासाठी येतोस, मला माहितीय. या वर्षी मी जरा अतिपणा केला. म्हणजे तू येत होतास पण माझ्याच विचारांमध्ये इतकी अडकले होते की तू आपला सारखी धडधड करत होतास दाराशी. पण मीच जरा दुर्लक्ष केलं. पण आज तू जिंकलास, नेहमीप्रमाणे. दिवे नसताना मनातला दिवा लावलाच आज, तुझ्यासाठी.

आता सगळ छान होणार. मला माफ कर, बोलायला हवं होतं वेळेतच तुझ्याशी. पण हे किती छान आहे ना रे, आपल्या नात्यात इगो नाहीच. म्हणजे, मी कशीही वागले तरी तू परत परत येतोस आणि तू वेड्यासारखा वागलास तरी मला कायम नवा वाटतोस, तितकाच हवाहवासा.

15 comments:

  1. वाह,सुंदर. मनातले विचार उतरले शब्दरूप घेऊन.

    ReplyDelete
  2. खूप अप्रतिम

    ReplyDelete
  3. घन घन माला नभी दाटल्या..... कोसळती शब्दे...

    ReplyDelete
  4. घन घन माला नभी दाटल्या..... कोसळती शब्दे...

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. विनू,
    खूप छान
    अप्रतिम

    ReplyDelete
  7. आभाळातून सांडणाऱ्या सरी अन् लेखिकेच्या भरलेल्या मनातून वाहणाऱ्या शब्दसरी.. दोन्हीही तितक्याच नितळ.. आपल्या वाटणाऱ्या..

    ReplyDelete
  8. खूप छान लिहिलंयस विनया, साधा विषय पण मांडणी छान

    ReplyDelete
  9. Nehmi prmane apratim...shbdat nahi sangta yenar dolyatun samjun ghe na.

    ReplyDelete
  10. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पाऊस आल्यासारखे वाटले. दरवर्षी गेल्या पावसाच्या आठवणी जागवायच्या. छान लिहिले आहे.
    असेच प्रसंगानुरूप लिहीत रहा.

    ReplyDelete
  11. छान...👌

    ReplyDelete