Saturday, 30 August 2014


        जपूया संस्कृती....




माऊली, माऊली, माऊली , माऊली....... प्लीज या हो माऊली. तुम्हाला पण असच वाटतय ना ? अहो गणेशोत्सव सुरू झाल्यापासून मला पण हेच वाटतय. आता तुम्ही म्हणाल, गणेशोत्सव आणि माऊली काय संबंध ? अहो आहे. नीट कान देऊन ऐका म्हणजे कळेल तुम्हाला पण. अर्थात हे ऐकण्यासाठी कान देऊन ऐकायची गरज नाहीये. कानावर आदळणा-या  गोष्टी ऐकण्यासाठी कान देऊन ऐकण्याची काय गरज, नाही
 का ? 
आता तरी कळलं का तुम्हाला मी काय म्हणतीय ते ? नाही....... हं........नाहीतर मला राग येतो.... अरे बापरे , हे काय झालय मला? पण काय करू सारखं जे ऐकायला मिळत तसाच रिअॅक्ट होतो ना माणूस. आता तरी कळलं का तुम्हाला? यस्स... बरोबर ओळखलतं. गणपती बाप्पाला सुध्दा त्रास होत असेल हो या मोठ्या आवाजाचा. गणेशोत्सव असो की कोणताही सण हे लाऊड स्पीकर इतके लाऊड का असतात ? 
चांगल्या गाण्यांची वाटोळी करणारी रिमिक्स गाणी, भसाड्या आवाजातली अर्थहीन गाणी, लांबून तर नुसतच ढाक चीक ढाक चीक इतकच ऐकू येतील अशी गाणी वाजवणं म्हणजे गणेशोत्सव का ? आनंद व्यक्त करण्यासाठी अशा लाऊड गोष्टींचा आधार का घेतोय आपण ?  आपली संस्कृती विकृतीमध्ये बदलण्याआधी आपण जागं होणं गरजेचं आहे. 
मागच्याच्या मागच्या वर्षी आमच्या तळेगावच्या सर्व गणेश मंडळांनी आणि चक्क राजकारण्यांनी सुध्दा डीजेविना गणेशोत्सव पार पाडला. प्रचंड अभिमान आणि आनंद  वाटला आम्हाला. पण हा आनंद फार काळ टिकला नाही.  कार्यकर्त्यांना सांभाळण्याच्या नावाखाली राजकारणी आणि पर्यायानी पोलिस यंत्रणेनी डीजेला छुपी परवानगी दिली. परिणामी गणशोत्सवाची मिरवणूक चांगलीच गाजली. इतकच कशाला गणेशोत्सवात इतर दिवशीदेखील डीजे ढाकचीकला.....
ध्वनीप्रदूषणावर काम करणा-या अनेक कार्यकर्त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ हे सारेच टाहो .... असंच काहीसं झालं. या डीजेच्या भिंती आपल्या आरोग्याला हानिकारक आहेत हे समजायला हवं. त्या आवाजाच्या नशेत बेधुंद होऊन नाचताना कदाचित काहीही जाणवणार नाही. पण याचे दूरगामी परिणाम होणार हे नक्की. ठराविक डेसिबलच्या आत आवाजाची पातळी ठेवणं हेच हिताचं आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, गर्भवती महिला यांच्यासाठी तर हा मोठा आवाज जीवघेणा ठरू शकतो. अहो कशाला, अगदी नॉर्मल माणसाला सुध्दा त्रास होऊ शकतो. जी गोष्ट शास्त्राच्या आधाराने सिध्द झाली आहे. ती आपल्यासारख्या एकविसाव्या शतकातल्या लोकांनी ऐकायलाच हवी. नाही का ? परदेशात विनाकारण गाडीचा हॉर्न वाजवला तरी दंड आहे. मग या अकारण वाजणा-या भोंग्यांना किती दंड पडेल परदेशात ? आपण पाश्चात्यांच अंधानुकरण करतो असं म्हणलं जात. पण नाही, आपण आपल्याला हवं ते करण्यासाठी प्रसंगी असं तर प्रसंगी तसं असं दुटप्पी वागतो. 
सण समारंभ साजरे करताना त्यातून आपल्याबरोबर सगळ्यांना आनंद मिळावा ही आपली संस्कृती आहे. ध्वनीप्रदूषण ही समस्या प्रचंड मोठी आहे. यावर प्रत्येकानी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. आपण आपल्या आनंदासाठी स्वतःसकट अनेकांचे जीव धोक्यात घालत नाही आहोत ना ? इतका विचार करू शकलो तरी खूप झालं. 

Thursday, 21 August 2014


बायकांची साडी खरेदी

पावसाळा म्हणलं की आठवण होते कांदा भजी, चहा आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॉन्सून सेलची. 15, 20, 25, 50 टक्के डिस्काऊंट वगैरे गोष्टी तर मनाला भुरळ घालतात.  खरेदी आणि स्त्रिया हे असच एक अजब समीकरण आहे. हल्ली नेहमीच बाजारपेठांचे रस्ते अक्षरशः फुलून येतात.  पूर्वीसारखं खरेदीचं नाविन्य आता राहीलं नाही म्हणा. आता काय बाराही महिने खरेदी. पण तरीही मॉन्सून सेलची गंमतच वेगळी नाही का?  पिनेवालो को .........असं काहीतरी म्हणतात ना, तसं आम्हा बायकांच होतं. खरेदीला का कोणतं कारण लागतं? पण पावसाळी सेल म्हणलं की कोणतही कारण न देता पतीराजांना यथेच्छ लुटण्याची संधी मिळते. 
सारं जगणंच महागलं असलं तरी आम्हा बायकांचा खरेदीचा उत्साह जराही कमी झालेला नाही. हल्ली आपण वर्षभर सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची खरेदी करत असलो तरीही पावसाळ्यातलं शॉपिंग जरा वेगळचं 
असतं . प्रचंड पाऊस पडत असतानाही छत्र्या, रेनकोट यांच्यासह खरेदी करण्यातली  मजा काही वेगळीच असते. एरवी चिकचिक, घाण, चिखल त्रासदायक वाटतो. पण खरेदी करताना काय होतं कळतच नाही. हे सगळ कुठे दिसतच नाही बाई. 
 आता कपड्यांमध्ये कितीही आधुनिकता आली असली तरीही पारंपरिक साडीला पर्याय नाही. म्हणूनच उत्तम साडीची निवड केल्यास वेगळी फॅशन काही करण्याची गरज उरत नाही. पण ही साडी खरेदी करताना यजमानांना ''कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो'' हे गाणं गुणगुणावसं वाटतं. पण बायकोच्या उत्साहाच्या झ-याला बांध घालण्याचं सामर्थ्य पतीराजांकडे कुठे असतं. 
नेमक्या कोणत्या दुकानात साडी घ्यायला जायचं हा ही एक यक्षप्रश्नच असतो. जाहिरातींना भुलून, एकावर एक फ्रीच्या नादात अनेक दुकानांना भेट दिली जाते. मग काय ह्या दुकानातून त्या दुकानात अशी वारी निघते. पुढे यजमानीण बाई आणि मागे मागे यजमान आणि पिल्लू. असा तांडा त्या प्रचंड गर्दीतून चाललेला असतो. बर बाईसाहेबांचा उत्साह इतका असतो की. एरवी पायी चालण्याचा कंटाळा असणा-या त्या अगदी उत्साहात तरातरा चालतात. (पावसाची पर्वा न करता) यजमान त्यांच्या ओढीनी ओढग्रस्तपणे मार्ग कंठत असतात. 
बर नवरा नुसता बरोबर असून आम्हाला चालत नाही. त्यानी आमच्या निवडीवर, ती साडी कशी दिसेल यावर कमेंट पास केलीच पाहिजे असा आग्रह असतो. बर तो बिचारा म्हणाला ना की, ''मस्त आहे साडी.'' की म्हणायचं, ''तुम्हाला ना काही चॉईसच नाहीये.'' जर तो म्हणाला, ''जरा दुसरा रंग बघ ना.'' तर म्हणायचं, ''अय्या, काय तुम्ही वेंधळे आहात. कित्ती युनिक रंग आहे हा.''
या खेरदी प्रकरणात आणखी गंमत येते सेल्समन जेव्हा यजमानीण बाईंना फुगवून सांगतो की तुम्हाला ही साडी कशी चांगली दिसेल तेव्हा. मनातून सुखावलेली यजमानीण बाई लगेच ट्रायल वगैरे घेते. पलिकडच्या बाजुला मुलाला, पिशवीला सांभाळणारा आणि अन्य गि-हाईकांमध्ये रमलेल्या 
नव-याला हाका मारून मारून विचारते. तोही बिचारा केविलवाणेपणानी हो हो करतो. सगळ काही फिक्स होतं. तेव्हाच मॅडमना शेजारच्या गि-हाईकाच्या समोरील ढिगा-यातील एक साडी आवडते. रंग, पोत, कापड सगळ मनात भरतं. पण ती साडी त्या बाईंनी घेतलेली असते. अर्थात ती तिला आवडलेली असतेच असं नाही. तिला या बाईंच्या हातातली साडी आवडलेली असते. अखेर परस्पर संवादातून आणि सामंजस्यातून दोघीही सुखावतात. दोघींच्या 
चेहे-यावर जिंकल्याचे भाव. बिल वगैरे देऊन बाहेर आल्यावर पिशवीतून साडी काढून यजमानीण बाई म्हणतात, खरं तर तीच साडी मला जास्त चांगली दिसेल असं वाटतय नाही?  या प्रश्नावर मात्र पतीराज हतबल होतात.  या प्रचंड जनसागरात मी हरवून का जात नाही असा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारून चेहे-यावर जमेल तितकं हसू ठेवून मला जाऊद्या ना घरी....... हे गाणं गुणगुणतात (मनातल्या मनात).


Tuesday, 19 August 2014


जपुया कोवळ्या कळ्यांना आणि  मनांना...........

मित्र, मैत्रिणींनो, एका वेगळ्या विषयावरचा लेख  ...........



सरिता एक उच्चशिक्षित, सुंदर , हुशार तरूणी. तिचं लग्न अजयशी झालं. अगदी दृष्ट लागावा असा जोडा. पण का कुणास ठाऊक लवकरच या दोघांच्यात खटके उडायला लागले. भांडणं होऊ लागली. अगदी मानसोपचारतज्ज्ञाकडे जायची वेळ आली. तेव्हा कळलं, सरितावर तिच्या अजाणत्या वयात अगदी तिच्या घरातल्या कोणीतरी अत्याचार केला होता. त्यामुळे नवरा बायकोमधल्या नाजुक, तरल संबंधांविषयी तिच्या मनात तिडिक बसली होती. सगळे पुरूष वाईट असतात अशी तिची भावना झाली होती. मात्र अजयच्या  मदतीने ती या भयंकर मनोवस्थेतून बाहेर आली. 
अशा अनेक सरिता आपलं आयुष्य घालवत असतील. पण सगळयांनाच असे अजय भेटतात का ? नाहीतर लग्नानंतरही पुरूषार्थ गाजवून बायकोच्या मनाविरूध्द संबंध ठेवणारे पुरूष आहेतच की. तो एक वेगळाच विषय आहे.  या विचारांबरोबरच मनात आलं, 
''बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा.''   ही हवीहवीशी मागणी करणा-या या काव्यपंक्ति आता तितक्याशा हव्याशा वाटत नाहीत. रोज वर्तमानपत्र उघडल्यानंतर अल्पवयीन मुलींवर, बालिकांवर होणारे अत्याचार मन सुन्न करतात. काही वेळा असा सुर सुध्दा ऐकू येतो, ''आमच्या वेळी नव्हतं हे असं.''  पण खरच असं आहे का? पूर्वीपासून हे अत्याचार होत असणार. फक्त आता प्रसिध्दी माध्यमांमुळे या घटना प्रकाशात येऊ लागल्या आहेत. ज्या वयात मुलींना चांगल काय वाईट काय याची पुसटशी सुध्दा कल्पना नसते,  त्यावेळी त्यांच्या कोवळ्या मनावर ओरखडे उठतात. काही वेळा हे ओरखडे इतके भयंकर असतात, की त्या मुलींचं आयुष्य पणाला लागतं. भावनाविरहित असं जिवंत प्रेतासारख आयुष्य तिच्या वाट्याला येऊ शकतं. या सगळ्या भयानक परिस्थितीचा विचार केला तर अनेक पालकांना आपल्या लहानग्यांना शाळेत सोडायला सुध्दा भीती वाटते आहे, असं चित्र दिसत. महिलांवर, युवतींवर होणा-या अत्याचारांचा प्रतिकार करणं अवघड आहे. पण अशक्य नाही. मात्र लहान वयातल्या मुलींवर होणारे अत्याचार कसे थांबणार? 
या अत्याचारांमध्ये घडणा-या घटनांचा मागोवा घेतला तर हे लक्षात येतं की, ब-याच वेळा हे अत्याचार घरातल्या किंवा ओळखीच्या लोकांकडून केले जातात. काही बातम्या तर इतक्या शॉकिंग असतात की त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाही. ''वडिलांनी मुलीवर अत्याचार केला'' ही अशीच एक बातमी. कुंपणानीच शेत खाल्लं तर राखण कोण करणार?  प्रत्येक मुलीसाठी वडिल म्हणजे आनंदाचा ठेवा असतो. मुलीचं रक्षण करणं हे तर वडिलांच पहिलं कर्तव्य. आपल्या आयुष्यात कोणतीही अडचण आली तर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणारे आपले वडिल नराधमासारखे वागायला लागल्यावर त्या मुलीच्या मनात कोणत्या भावना येत असतील हे शब्दात सांगणे अशक्य आहे. 
खाऊमधून गुंगीचं ओषध देऊन त्या मुलीवर अत्याचार करणं ही अशीच एक लाच्छंनास्पद घटना. अंध आणि विशेष मुलींच्या बाबतीत किंवा शारिरीक व्यंग असणा-या अल्पवयीन मुलींच्या बाबतीत तर हा प्रश्न बिकट आहे. रोजच्या व्यवहारातल्या भावना समजून घेण्यासाठी सक्षम नसणा-या या मुलींना या रानटी आणि पाशवी भावना कशा समजणार? बरं, या मुलींच्या बाबतीत दुर्दैव म्हणजे, त्यांना प्रेमानी जवळ करणारी माणसंच फार थोडी असतात. त्यामुळे अशा कोणत्याही माणसाला अडवणं त्यांना शक्य नसतं आणि जे होईल ते प्रेमानी केलेला स्पर्श आहे अशी त्यांची समजुत होत असेल का?  
अल्पवयीन, निरागस मुलींच्या बाबतीत पाशवी कृत्य करणा-या या राक्षसांना या मुलींचे निष्पाप, गोंडस चेहेरे दिसत नाहीत का? ज्या मुलींची मानसिक आणि शारिरीक वाढ अपूर्ण आहे अशा मुलींवर अत्याचार करून त्यांना नेमकं कोणतं राक्षसी समाधान मिळत असेल? 
या सगळ्या कृतीमागे विकृती, असमाधान आणि मनावर ताबा नसणे या गोष्टी आहेत. स्त्रियांकडे भोगाची वस्तू म्हणून बघण्याचा पुरूषांचा दृष्टिकोन हे अजून एक कारण. महिला किंवा युवतींवर होणा-या अत्याचाराच्या बाबतीत त्या महिलासुध्दा तितक्याच जबाबदार असतात असा सूर ऐकायला येतो. आपलं रहाणीमान, पोशाख यावर ब-याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे तोकड्या कपड्यातल्या एखाद्या युवतीला पाहून सो कॉल्ड पुरूषार्थ जागा होतो असं म्हटलं जातं. अर्थात पुरूषांच्या या मानसिकतेमुळे त्याच्या कृत्यांना माफी मिळू शकत नाही. तसंच रात्री उशीरा कशाला बाहेर पडायचं ? आपण स्त्री आहोत हे विसरता कामा नये.  क्षणभर हे जरी खरं आहे असं धरलं तरी अल्पवयीन मुलींच्या बाबतीत हे निकष गैरलागू आहेत. त्यांची काहीही चूक नसताना त्यांना हे भोगावं लागत. स्त्रीभ्रूणहत्येचं प्रमाण आधीच वाढतं आहे. त्यात अशा घटनांची भर पडली तर मुलगी हवी असं म्हणणा-यांची संख्या कमी होईल की काय अशी भीती वाटते. 
हा असंस्कृतपणा दूर होण्यासाठी बालपणापासून घरातून व शिक्षणातून चांगले संस्कार होण्याची गरज आहे. लहानपणी रूजलेल्या विचारांचा प्रभाव खूप जास्त असतो. त्यामुळे पालक व शिक्षक दोघांनीही समांतर पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत. घरामध्ये मुलींना good touch आणि bad touch याविषयी मोकळेपणानी पण त्यांना समजेल अशा भाषेत सांगितलं पाहिजे. आपल्या गुप्तांगांना कोणी हात लावत असेल अशा माणसाकडे जायचं नाही. त्याला हात लावू द्यायचा नाही. इतकं मोकळ आणि स्पष्ट सांगितलं पाहिजे. कारण मायेनी , प्रेमानी स्पर्श करणारे सुध्दा असतात ना? चुकीच्या शिकवणुकीमुळे अशा प्रेमळ माणसांचं प्रेम या मुलींना मिळणार नाही. त्यामुळे या नाजुक विषयावर अतिशय नाजुकपणे मुलांशी संवाद साधला पाहिजे. फक्त मुलींनाच नाही तर मुलांनादेखील हे सांगणं गरजेचं आहे. थोड्या जाणत्या मुलांना, मुलीला कुठे स्पर्श करायचा आणि कुठे नाही हे अगदी स्वच्छपणे सांगितलं पाहिजे. तसंच आपल्या स्वतःच्या बाबतीत काय काळजी घेतली पाहिजे हेदेखील सांगितलं गेलं पाहिजे. हे सगळ लिहित असताना एक जाणवलं अगदी आमच्या पिढीतल्या आई वडिलांनी तरी कुठे हा मोकळेपणा जपला होता? पण आता तरी हे बोललं पाहिजे. 
महिलांच्या बाबतीत स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण उपयोगी ठरेल. मात्र या लहानग्यांच्या बाबतीत पाशवी वृत्तीच्या मनांना प्रशिक्षण आणि त्यांची उत्तम प्रकारे मशागत करणं गरजेचं आहे. कारण शिक्षा देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत. कारण जुलमाचा राम राम किती दिवस टिकतो?  बलात्का-यांना कायदा काय करू शकतो हे माहिती आहे. त्यामुळे कायद्याच्या बडग्यानी फरक पडेल का ? एखादी गोष्ट करणं किंवा न करणं हे एकदा मनानी घेतलं की कोणत्याही कायद्याची आणि शिक्षेची गरज उरणार नाही. 
 अजून एका गोष्टीवर नियंत्रण ठेवल पाहिजे, ते म्हणजे टी.व्ही.वर दाखविल्या जाणा-या कार्यक्रमांवर. एखादी कौटुंबिक सिरियल बघत असताना मध्येच एखाद्या पॉर्नस्टारची विचित्र जाहिरात दाखवण्यात येते. ही जनजागृती आहे. पण भलतीच जागृती होते या सगळ्यानी. या सगळया साधनांची गरज आहे हे मान्य. पण ते दाखवण्याची जागा किती चुकीची आहे. एवढचं काय वर्तमानपत्रात सुध्दा या जाहिराती मुख्य पानावर दिल्या जातात. काही गोष्टी कितीही ख-या आणि आवश्यक असल्या तरी त्या कोणत्या माध्यमातून आणि कशा दाखवल्या जातात हे महत्त्वाचं आहे. यातच भर म्हणून की काय गुगलवर काहीही टाईप केलं तरी धडाधड सगळी माहिती दिसते, व्हिडिओ दिसतात. या सगळ्याचा परिणाम मनावर होणारच. ज्या गोष्टी हळुवारपणे करण्याची गरज आहे. किंबहुना असं म्हणता येईल की, ज्या गोष्टी करून समाधान मिळणार आहे. त्या गोष्टी अशा ओरबाडणं चूक आहे हे पटवून देता आलं पाहिजे. हा विषय अतिशय नाजुक आहे. अत्यंत सावधानतेनी तो हाताळला पाहिजे. माणसानी प्रगती केली आहे पण त्यामुळे तो आपलं समाधान हरवून बसला आहे. असं म्हणण्याची वेळ येऊ नये. कारण प्रगती झालीच पाहिजे. पण त्याचबरोबर आपलं माणूसपण टिकवता आलं पाहिजे. ज्या देशात स्त्रीचा अपमान होतो तो देश कधीच प्रगती करू शकत नाही असं म्हणतात. आपला देश तर महासत्ता होऊ पहातो आहे. मग अशा या विकसित देशात भावनांच्या विकासाचे वारे कधी आणि कसे वहाणार?

Friday, 15 August 2014

मुख्य आकर्षण............



आज मी दोन शब्द वाचून हैराण झाले खूप. रस्त्यावर चौकाचौकात फ्लेक्स लावले होते. त्यामध्ये लिहिलं होतं, ''मुख्य आकर्षण'' हेच हेच ते दोन शब्द. गोकुळाष्टमी, दहीहंडीचे फ्लेक्स हो. बरं मुख्य आकर्षण म्हणून काय ते बघायला जावं तर असं वाटतं होतं की गोपालकृष्णाचं मोहक, खोडकर, लोभस रूप म्हणजे मुख्य आकर्षण. पण साफ नाराजी होत होती. सगळीकडे अमुक फेम, तमुक फेम तारकांचे एक से एक शॉलिड फोटो. 
मी म्हणलं दहीहंडीमध्ये मुख्य आकर्षण हे फेम तारकांचे फोटो का बरं ? म्हणजे आमचे गोविंदा मेहेनत करून दहीहंडी फोडणार. संयोजक अण्णा, आप्पा, दादा, तात्या, साहेब वगैरे जे कोणी असतील ते पैसे लावणार. मध्येच या बाया बापड्यांना का बरं आणतात ? या नसल्या तर दहीहंडी फुटणार नाही की काय ? बरं दहीहंडी फुटेपर्यंत या थांबतात का तरी? मोठ्या कर्णकर्शश्श आवाजातले डीजे, बेधुंद बेताल नृत्य आणि या फेम तारका म्हणजे दहीहंडी का ? 
बरं परवा एक चांगली बातमी कळली होती. गोविंदांच्या वयाच्या आणि दहीहंडीच्या उंचच्या उंच थराबद्दल.  तेव्हा मनात आलं चला बरं झालं.... निदान लहान मुलांना आणि पर्यायाने त्यांच्या पालकांना होणारा मनस्ताप कमी होईल. हे थरच्या थर वर जाताना थरथराट होतो. पण काऴजाचा ठोका चुकवणारा हा थरथराट, डीजेचा ठणठणाट अंगावर येतो. पण हे सगळ नसेल तर या फेम तारकांची मागणी आणि पुरवठा आपोआप कमी होईल. म्हणजे अण्णा, तात्या , आप्पा वगैरेंचे पैसे वाचणार. पण कसलं काय  परत वयाची अट १२ वर्ष केली. थराची अट शिथिल केली. त्यामुळे पुन्हा एकदा फेम तारका फॉर्मात. मला या फेम शब्दाची गंमत वाटते. आपल्या अभिनयानी परिचय व्हावा असं नसत का काही ? एखादी सिरियल, किंवा सिनेमाचं नाव लिहिल्याशिवाय या ओळखू सुध्दा येत नाहीत. मग हे कसलं मुख्य आकर्षण ? 
'हा दहीहंडी उत्सव आपल्या संस्कृतीचा भाग आहे'   चॅनेलवरून अशी भाषणबाजी करणा-यांना या सगळ्याचं गांभीर्य नाहीये का ? आपलं म्हणणं खरं करण्यासाठी कुणाच्याही जीवाशी खेळ होऊ नये. दहीहंडी झाली की गणेशोत्सव, नवरात्र आहेच. पैशाचा विनियोग चांगल्या कामासाठी होणं गरजेचं आहे. खरा आनंद काय हे समजलं ना तर फार बरं होईल. आनंदाचे सण आहेत हे मित्रांनो . आनंदानी साजरे करूया..... 

Wednesday, 13 August 2014

मला राग येतो......


आता अगदी एक लई भारी गाणं हिट होतय मित्रांनो.  राग येतो, मला राग येतो असं काहीतरी आहे. मला पण राग येतो. कशाचा? माणसांचा नाही येत. माणसांच्या वृत्तीचा येतो. तुम्ही म्हणाल हे काय नवीन ? पण खरच माणसाचा दोष नसतो. कारण कित्येक वेळा माणसं परिस्थितीप्रमाणे वागतात. म्हणजे त्या त्या परिस्थितीमध्ये जे योग्य वाटत तशीच वागतात, प्रत्येकाच्या बुध्दिनुसार, आवाक्यानुसार . फक्त मला राग याचा येतो की. तशीच परिस्थिती पुन्हा येते तेव्हा तरी आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे. 
माझ्या परिचयात अशी किती तरी मोठी, विद्वान माणसं आहेत ज्यांना आपल्या मोठेपणाचं दुस-यावर ओझं टाकण्याची सवय आहे. खर तर  सगळ्यांना त्यांच्या मोठेपणाविषयी आदर असतो. पण सारखं मी , माझं , मला असं करून ही माणसं आपलं मोठेपण घालवून बसतात. मोठेपणा ही दाखवायची गोष्ट नसून दुस-यांनी अनुभवायची आहे.
अजून एक गोष्ट म्हणजे दुस-याला सतत नावं ठेवणा-यांची मोठी पलटणच आहे आयुष्यात. काय मिळवतात ही माणसं असं वागून ? आपली नजर आणि मन स्वच्छ ठेवून जगाकडे कधी बघणार आपण ? मराठीत त्याला गॉसिपिंग  की काय ते म्हणतात. नका आपला वेळ वाया घालवू या सगळ्यात. कोण कसं वाईट आहे? कुणाचं काय चुकतय ?  कोण कोणाशी बोलतयं ? कोण कोणाच्या घरी जातय ? आज काय मग अगदी नट्टा पट्टा, काय आज अगदी लंकेची पार्वती ? एक ना अनेक प्रश्न असतात यांच्या मनात. बरं हे सगळ प्रांजळ हेतूनी विचारलं तर काही वाटत नाही. पण मनात सतत एक जबरदस्त संशय, असूया, हेवा असतो. या सगळ्यानी आपलं स्वतः चं मन कलूषित होतं. बाकी काही नाही. बरं हे सगळ जिच्याबद्दल किंवा ज्याच्याबदद्ल बोलायचं ना त्याच्या माघारी बोललं जातं. त्याचा काहीच उपयोग होत नाही. वेळ मात्र वाया जातो. 
मुलांना आणि नव्या पिढीला समजून न घेता त्यांना सतत उपदेश करणा-यांचा पण मला राग येतो. त्यांच्या भावविश्वात गेल्यावरच त्यांचे ताण कळू शकतील. जे लोक आमच्या वेळी असं नव्हतं, तसं नव्हतं असं म्हणतात ना, त्यांनी एक दिवसभर मुलांच्या शाळेत जाऊन बसावं. एवढी छोटी पिल्लं ती, पण त्यांना किती ताण असतो. इंग्लिश मिडियम असो की मराठी. किती पसारा झालाय शिक्षणाचा. आता काही प्रश्न मला या लोकांना विचारावासे वाटतात, तुमच्या वेळी होती का स्कूल बस ? शाळा घरापासून  एक किंवा दोन तासांच्या अंतरावर आहे हा अनुभव तुम्ही घेतलाय ? तुमच्या शाळेत  सारखे सारखे प्रोजेक्टस होते का ? तुमची आई कामावर जायची का ? घराच कुलुप उघडून घरी एकटं बसण्याची वेळ तुमच्यावर आलीय ? आपली बक्षीस पहायला सुध्दा घरी कोणी नाही हा अनुभव घेतलाय ? शाळेला सुट्टी असूनही शिबीरांमध्ये तुमचा जीव घुसमटलाय ? खूप प्रलोभनं आहेत आजुबाजुला. ही तर वरवर जाणवणारी टेन्शन्स आहेत. तरूणांच्या बाबतीत सुध्दा तसच काहीसं आहे. न रागवता, जरा विचार करायला हवा या सगळ्याचा. 
या निमित्ताने अजून एक  राग व्यक्त करावासा वाटतो , निराश होणं योग्य नाही. अनेक वेऴा आपल्या मनाविरूध्द घटना घडतात. काही माणसं आपल्याशी अनाकलनीय विचित्र वागतात. अपयश येतं. आजारपण येतं. आपल्या जवळची माणसं आपल्याला सोडून जातात. पण पुन्हा एकदा ईश्वरावर श्रध्दा आणि सकारात्मक विचार असतील तर या निराशेतला फोलपणा जाणवतो. कारण सुखाचा काय किंवा दुःखाचा काय कुठलाच काळ रहात नाही. मग काळजी कशाला करायची ? 
मित्र मैत्रिणींनो, तुम्ही सगळे जिवलग आहात म्हणून माझा राग व्यक्त केला... नाही तर,  मला  राग येतो ? अजिबात नाही..........

Thursday, 7 August 2014

तरूण आहे......




काल माझ्या बॅचमेटस मैत्रिणींनी एक भन्नाट विषय डोक्यात घुसवला. सहज बोलता बोलता एक जण स्वतः अगदी आजीबाईच्या जमान्यात असल्यासारखी बोलली. माझं थोड ऑबजेक्शन होतं. मी म्हणलं, काय गं म्हातारी झालीस का ? तर म्हणे, स्वीकारायलाचं हवं ना  , वगैरे , वगैरे. मी म्हणलं कशाला म्हातारं व्हायचं उगाच ? वय होईनाकी कितीही... मन तरूण हवं. 
या सगळया विषयातून एक गोष्ट जाणवली, खूप वेळा आपण उगाच मोठ्ठं होऊन ब-याच गोष्टींचा आनंद घेतच नाही. आपलं वय खूप झालय असं वाटून अनेक गोष्टी मनमोकळेपाणानी करतच नाही. हो लिहिताना अजून एक गोष्ट आठवली. आमच्या कलापिनी संस्थेत आमचे डॉ. परांजपे जेव्हा सुजाण पालक मंचाच्या कार्यक्रमात पालकांना मोकळ हसायला सांगतात, तेव्हा बरेच जण कसनुसं हसतात. वर हात करून  टाळ्या वाजवायला सांगितल्या, तर टाळी वाजवल्याचा उगाच अभिनय करतात. काही गोष्टी मनाला तरूण करत असतील तर त्यातला आनंद घ्यायला लोक का कचरतात ?
माझं असं म्हणणं नाही की, आपल्याला न शोभणा-या गोष्टी करा. काय ते वासरात पाय मोडून घुसणे का काय ते. तसं नका करू. मोठ्यांनी मोठ्यांसारखच वागलं पाहिजे. पण निदान प्रौढ झाल्यासारखं नका वागू. हसावसं वाटलं हसा. बोलावस वाटलं बोला. त्याला वयाचा काय संबंध ? 
आपल्यापेक्षा लहान असणा-यांच्या सहवासात रहायला हवं. मग हे मोठेपण गळून पडतं. त्यांच्यात त्यांच्यासारखं होऊन गेलात ना तर खूप मज्जा येते. मी मोठा आहे मग काय हा बालिशपणा ? असा विचार नका करू. त्यानी काय होतं माहितीय का ?  आपण 
ब-याचदा आपली नवीन स्वीकारण्याची क्षमता हरवतो. काय ही हल्लीची गाणी, काय हे सिनेमे, काय या हिरॉईन असे 'कुरकुरे' नका होऊ. त्यापेक्षा कधीतरी 'कुरकुरे' खा . आत्ताची गाणीसुध्दा चांगली आहेत . मुलांच्या दृष्टिकोनातून बघायला हवं. आत्ताच्या मुलांना ताल, ठेका, लाऊड म्युझिक आवडतं. कारण ती प्रचंड हायपर आहेत. त्यांना त्यांच्या या क्षमतेला साजेसच ऐकावसं  वाटतं. पण आत्ताच्या काऴात  सुध्दा अर्जित सिंगची गाणी ऐकायला मस्त वाटतच की. राधा मंगेशकर आत्ताच्या पिढीतली असूनही 'मीरा सूर कबीरा' सारखे दर्जेदार कार्यक्रम करतेच की. स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते, संदीप खरे, डॉ. सलिल कुलकर्णी, संजीव अभ्यंकर, सावनी शेंडे, कवयित्री स्पृहा जोशी, अजय - अतुल, शंकर महादेवन, भाग मिल्खा भाग मधला फरहान अख्तर, सारेगमपची सगळी  वादक टीम, धृपद गायक उदय भवाळकर, चेतन भगत, तरूण पॉलिटिशियन्स अरे बापरे ... अहो ही यादी संपणारच नाही. हे सगळे कल्पक आणि महान आहेतच ना ? पण हे सगळं तरूण वयापेक्षा तरूण मनानी बघायला हवं ना.  'अनवट' सिनेमातलं जुनं 'तरूण आहे रात्र अजून' हे गाणं शंकर महादेवननी चिरतरूण केलयं. उगाच नावं ठेवण्यात काय अर्थ आहे. 
आत्ताच्या पिढीला समजून घेण्यासाठी स्वीकारार्हता वाढवायला हवी. आपली मतं त्यांना पटवून देण्यासाठी त्यांची मत ऐकायला हवीत. नव्या जुन्याचा संगम झाला तरच नवीन काहीतरी चांगलं घडेल. आपल्या आधीची पिढीसुध्दा आशिकी, दिल, दिवाना, कयामत से कयामत तक या सिनेमांना कुठे 'लाईक' करायची ? कधी तरी आपणही आपले मोठेपणाचे मुखवटे उतरवायला हवेत. जी माणसं येणा-या काळाशी आनंदानी जुळवून घेऊन पुढे जातात त्यांना' कुरकुरे'  व्हावं लागत नाही. असा कुरकुरेपणा सोडा .... नाही तर मुलं म्हणतील.... आता माझी सटकली.... त्यापेक्षा अनवट चालीत आपण म्हणूया... तरूण आहे मन अजूनी....... 

Monday, 4 August 2014

मैत्री............




काल 3 ऑगस्टच्या दिवशी मैत्रीदिनाच्या निमित्तानी तुम्ही तत्वज्ञानाच्या अनेक मेसेजेसचं प्राशन केलं असेलच. बघा, माझी भाषा सुध्दा किती जड झालीय या सगळ्या तमाम मेसेजेसमुऴे. काही मेसेज तर मला कळलेच नाहीत. तुमचंही तसच झालं का
 हो ? मैत्री हे नातं किती सहज, सोपं आहे. अगदी प्रेमापेक्षा श्रेष्ठ. हो थोड धाडस करतीय आज. कारण एखाद्या व्यक्तिवर भरभरून केलेलं प्रेम काही वेळा निराशा पदरी घालतं. पण मैत्रीमध्ये असं कधीच होत नाही. 
अगदी बालवाडीपासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या जीवाभावाच्या मित्र मैत्रिणींना आठवून बघा. प्रत्येक वळणावर त्यांनी दिलेली मोलाची साथ किती महत्त्वाची असते. कधी आपण चुकलो तर जो आपल्याला डोस देतो, तो खरा मित्र. आपलं भलं चिंतणारा, आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारा, आपली सुख - दुःखात साथ देणारा मित्र भेटणं हे भाग्याचं लक्षण आहे. 
मैत्री दिनाच्या निमित्ताने माझ्या शाळेतले सगळे मित्र मैत्रीणी झरझर डोळ्यासमोर आले. आमच्या वर्गात कधीही विचित्र स्पर्धा नव्हती. आमच्या वर्गातला एक मुलगा खूप हुशार होता. तो दहावीत बोर्डात आला. पण आम्हाला कधीच असूया वाटली नाही. मला आठवतय, आम्ही मुली त्याचं अभिनंदन करायला त्याच्या घरी गेलो, तेव्हा लाजून तो आत पळून गेला होता. असाच अजून एक मित्र ऑफ तासाला प्रभू तू दयाळू गाणं म्हणणारा. आम्ही मुली तर अभ्यासापेक्षा नाट्यवाचन, स्पर्धा, गॅदरिंग, गाणं यामध्ये रमायचो. आमच्यातही हुशार मुली होत्याच. प्रत्येक  मित्र मैत्रिणीची एक वेगळी आठवण आहे. ते सगळ सांगत बसले तर वेळ पुरणार नाही. या सगळ्यांची आज खूप आठवण येतीय. अगदी त्यावेळी बोललो नव्हतो इतकं भरभरून बोलावस वाटतय. कारण आमच्या भोरला मुलामुलींनी मोकळेपणानी बोलण्याची सोय निदान त्यावेळी तरी नव्हती. आज व्हॉटस अप वर आम्ही सगळे गप्पा मारतो. पण त्यावेळी फार बोलायचो नाही. आता आठवलं तरी हसू येतं. 
नंतर कॉलेजमध्ये फार मोठा ग्रुप नाही होऊ शकला. आम्ही चारचौघी गटून असायचो. महिन्यातून एकदा मिळणा-या दहा रूपयांचा चहा प्यायचो. खूप गप्पा मारायचो. नाटकाचा एक ग्रुप होता. पण ते सिनिअर होते सगळे.  कॉलेजपेक्षा माझं मन शाळेत जास्त रमत. आजही भोरच्या एसटीतून जाताना, ''हे आमचं राजा रघुनाथराव विद्यालय'' असं पालूपद दर वेळी माझ्या मुलाला ऐकायला लागतं. 
मैत्री म्हणजे नेमकं काय हो ? पुन्हा संदीप खरेच या भावना व्यक्त करण्यासाठी धावून येतो. खर तर ही कविता प्रेमी जन आपल्या अॅंगलनी घेतील. पण मला ही निरपेक्ष, निखळ मैत्रीच वाटते. संदीप म्हणतो, ''नात्याला या नकोच नाव. दोघांचाही एकच गाव. वेगवेगळे प्रवास तरीही, समान दोघांमधले काही, ठेच लागते एकाला, का ?  रक्ताळे दुस-याचा पाय.'' ही एकरूपता इतकी होते, की काही सांगायची गरज उरत नाही. अशी नाती बनवायला हवीत मित्रांनो. तरच ख-या अर्थानी आपण जगायला शिकू. फेसबुकवर श्री श्री रविशंकरांचं मैत्रीबद्लचं हे विधान मनाला एकदम भावलं. ''तुम अपने मित्र से क्या चाहते हो, केवल मित्रता और कुछ 
नही. '' चला तर,  दोस्तहो जपूया अशी निरपेक्ष मैत्री ?