Thursday, 9 July 2015


Be Natural...... 



परवा एक वेगळा विचार ऐकला. खरं म्हणजे आपण सगळेच हा विचार नेहमी अनुभवतो. पण दुसरं कोणीतरी म्हणलं की अंतर्मुख होऊन विचार करायला लागतो. ''निसर्ग आपल्याला आवडतो, पण आपण नैसर्गिक वागत नाही. '' हाच तो विचार. किती खरं आहे ना हे. निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर मन शांत होतं. कसले मुखवटे, कसलाही खोटेपणा नसलेलं एक जग अनुभवायला मिळतं. निसर्गातल्या कितीतरी गोष्टी आपल्याला भुरळ घालतातच , पण जगायलाही शिकवतात. तत्वज्ञान न     कळणा-या तुमच्या माझ्या सारख्या... मी माझ्याच म्हणायला हवं. कारण तुम्हाला सामान्य म्हणायचं धाडस होत नाहीये. पण निसर्गाबद्दल बोलताना तरी मनमोकळं बोलावं , नाही का ? म्हणून जे मनात आलं ते बोलले. तर मुळ मुद्दा असा की, तत्वज्ञान न कळणा-यांनी निसर्गाला गुरू करावं. बरेचसे प्रश्न चुटकीसरशी सुटतील. 
बघा ना.. निसर्गात झाडावरून गळणारं पान कधीतरी रडताना पाहिलय का ? त्याचं हिरवेपण संपल्यावर ते झाडापासून अलगद , तक्रार न करता वेगळं होतं. पुन्हा मातीत मिसळून त्याच झाडावर पुन्हा उगवण्यासाठी.  ते झाडही कधी पान गळून पडल्याचा शोक करत बसत नाही. कारण झाडावरल्या उरलेल्या पानांना त्याला जोपासायच असतं. आपण मात्र आपल्याला सोडून गेलेल्या माणसांबद्दल किती दुःख करत बसतो. कित्येक वर्ष हे दुः ख उगाळत बसतो. निसर्गासारखं वागता आलं पाहिजे. म्हणजे जवळच्या माणसांचा दुरावा त्रास देणारच. पण आत्मक्लेष करून  न घेणं , हे तरी केलच पाहिजे. 
कित्येक वेळा लावलेलं रोप काळजी घेऊनही उगवत नाही. पण मातीत मिसळणारं ते रोप तक्रार करत नाही. आपण मात्र मी  एवढी मेहेनत करूनही यश मिळालं नाही म्हणून नाराज होतो. मातीत मिसळून पुन्हा उगवण्याची जिद्द निसर्गाकडून घ्यायलाच हवी. 
निसर्गातला कोणताही अविष्कार डोळ्यांना हवाहवासा वाटतो. त्याचं भरभरून कौतुक करताना आपल्याला संकोच वाटत नाही.  किती सहजपणे  आपण निसर्गावरच प्रेम  व्यक्त करतो. पण हेच सगळं आपल्या माणसांच्या जगात अलाऊड नाही. कोणी छान दिसतं असेल तर त्याचं कौतुक करणं यात काय वाईट आहे ?  ते नैसर्गिकच आहे. अर्थात मनातली शुध्द भावना तितकीच महत्त्वाची. म्हणजे एखाद्या फुलपाखराकडे बघताना जितकी निरागसता मनात असते, तितकीच असली पाहिजे. काही व्यक्ती मनापासून आवडतात. ते नैसर्गिक रीतीने सांगितलं तर भलताच गैरसमज होऊन नाती तुटतात. असं होता कामा नये. आवडणं ही नैसर्गिक भावना आहे. ओरबाडणं हे अनैसर्गिक. 
अंधाराकडून उजेड आणि उजेडाकडून अंधार हा निसर्गाचा नियम आहे. त्याप्रमाणे आयुष्यातही सुख, दुःख येणारच. कोणत्याही परिस्थितीत आपलं मानसिक संतुलन ढळू न देता आनंदात राहीलं पाहिजे.  हे सगळ बोलणं कितीही सोप्प असलं तरी तसं वागणं अवघड आहे. पण निसर्ग आवडतो असं म्हणणा-या प्रत्येकानी असं वागण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. हिरवी झाडं, खळाळून वाहणारी नदी, थंडगार वारा, पाऊस, कोसळणारे धबधबे, रंगीबेरंगी फुलपाखरं, प्राणी  - पक्षी , दरी - डोंगर असा निसर्ग न आवडणारा एक तरी माणूस असेल का ? अर्थातच नाही. त्यामुळेच निसर्ग आवडतो असं नुसतं न म्हणता त्याच्यासारख वागता आलं पाहिजे.

Monday, 15 June 2015

मना तुझे मनोगत .........




आज आशा बगे यांची एक खुप छान कथा वाचली.  ''अनोळखी ''  आशा बगे यांच्या सगळ्या कथा अगदी आपल्या जीवनात घडाव्यात इतक्या सहज आणि तरल आहेत. त्यांच्या कोणत्याही कथेत मुख्यत्वे स्त्रीच्या मनोव्यापाराचा विचार केला जातो.  कदाचित म्हणून मला त्या जास्त आवडत असतील. ''अनोळखी'' कथेनी माझ्या आवडत्या विषयाचा वेध घेतला.  आपलं मन एखाद्या डोहासारखं असत. कितीतरी वेळा मनात आलेले विचार योग्य की अयोग्य हे कळतच नाही. त्यांना थांबा म्हणलं तर ते थांबत नाहीत. कित्येकदा उगाच कातर, हळवं होत हे मन. आपल्या आजुबाजुला सगळ असूनही एकटं पाडतं. आणि अशा वेळी कोणतीही साधी गोष्ट मनाला खूप लागते. मनाच्या या डोहात माकडासारखे उड्या मारणारे काही विचार अस्वस्थ करून गेले. 
रोज आपल्याला भेटणारे सगळे अचानक अनोळखी असल्यासारखे वागतात. अर्थात हा सुध्दा मनाचा खेळच असावा. कारण ज्यावेळी तीव्रतेने आपल्या मनात आग लागलेली असते , नेमकं त्याच वेळी कोणालाच वेळ नसतो. एरवी उगाच डोकं खाणारे सगळे कुठे गायब होतात काय माहिती? कित्येकदा आपलं ओळखीचं , सुरक्षित जग अनोळखी वाटू लागतं. पुन्हा एकदा पूर्णपणे अनोळखी जगात जाण्यासाठी कंबर कसली जाते. कारण अनोळखी आणि ओळखीच्या जगाला सामोरं जाण्यावाचून दुसरा पर्यायच नसतो आपल्याला. 
आपण आपलं एकटच आयुष्य जगायचं असेल तर प्रेम या भावनेला काही अर्थच उरत नाही. प्रेमही व्यवहार पाहून करायचं असतं. काय वाईट दिसेल ? काय चांगलं दिसेल ? काय चौकटीत बसेल ? यावर सगळ अवलंबून आहे. अगदी मनाच्या तळातून    वाटणा-या अनेक गोष्टींना अर्थच नसतो. आपण जन्म दिलेल्या आपल्या मुलांवरसुध्दा प्रेम करताना विचार करायचा असतो म्हणे. आमच्या ओळखीच्या एक आजी कायम सांगायच्या, ''आपल्या मुलांना समोरचं ताय द्याव, पण बसायचा पाट देऊ नये.''  बापरे... किती व्यवहारी प्रेम. पण काही वेळा अनुभवच माणसाला शहाणपण शिकवतो. आपल्या आजुबाजुला असणारी माणसांची फौज, ओळखी, अनोळखी सगळेच एका मर्यादेपर्यंतच असतात. म्हणजे एखाद्याला आपल्याबद्दल किंवा आपल्याला एखाद्याबद्दल कितीही वाटत असलं तरी प्रत्येकाच्या काही मर्यादाअसतात. मुलावर आईचं किती प्रेम असतं. पण तेच मुलं मोठं झालं की आईनी मन्या, पिल्या असं म्हणलेलं त्याला आवडत नाही. हल्ली मुलांना आपले पालक शाळा - कॉलेजात आलेले आवडत नाहीत. आमच्या लहानपणी आई शाळेत येत नाही म्हणून वाईट वाटायचं. म्हणजे आपल्याच मुलांवर प्रेम करायची पण एक मर्यादा आहे. ही मर्यादा ओळखली पाहिजे. तसं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपल्याला लहान वाटणारं आपलं पिल्लू आता मोठ्ठ झालेलं असत. बहुतांश नात्यांमध्ये ही मर्यादा येतेच. तिचा स्वीकार करणं यातच खरं शहाणपण आहे. नाहीतर आपल्याच अपेक्षांच्या ओझ्याखाली आपल्यालाच गुदमरायची वेळ येते. 
तुटून आणि लुटून प्रेम करणं ही शंभरातल्या एखाद्या माणसाची गरज असू शकते. बाकीच्यांना फक्त व्यवहार हवा असतो. मग आपले शंभर टक्के उगाच वीस - तीस टक्के वाल्यांना का द्यायचे ? त्यापेक्षा खरच गरज आहे अशा ठिकाणी आपलं असणं हेच चांगल. हे सगळ कितीही म्हणलं तरी आपल्याला हव्या असणा-या गोष्टींमध्ये गुंतणं हा स्वभाव मन सोडायला तयार नाही. अशा वेळी मनाला विचारावसं वाटत, ''मना तुझे मनोगत मला कधी कळेल का ? ''

Monday, 8 June 2015

माझा दादू......




आजही तो दिवस आठवतो जेव्हा तो माझ्या आयुष्यात आला. माझ्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी. तो आला आणि माझं जग बदललं. आता मागे वळून पहाताना तो दिवस आजही चेहे-यावर आनंद आणतो. किती खुष होते मी त्या दिवशी, जेव्हा माझं बाळ माझ्या हातात होतं. माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस होता तो.  मला मुळातच छोट्या पिल्लांची खूप आवड. त्यात आपल्याच हातात इवल्याशा त्याला पाहून मी अक्षरशः वेडी झाले होते. त्याचं पहिल्यांदा पालथं पडणं, चालणं, बोलणं, शाळेचा पहिला दिवस , स्टेजवर पहिल्यांदा उभं रहाणं हे सगळं मी खूप एन्जॉय केलं. त्यासाठी बांधिलकीची नोकरी केली नाही. 
मला चांगल आठवतय . तो शाळेत जाताना त्याच्याबरोबर पावसाच्या डबक्यात पाय आपटताना मीदेखील लहान व्हायचे. त्याच्या बोबड्या बोलांनी मला कितीतरी सुख दिलं. माझं पिल्लू आज माझ्या खांद्यापेक्षा मोठ्ठ झालय.त्याच्या जन्माच्या वेळी जी हुरहुर मनात होती तीच आत्ता आहे. त्याचं कारण ,आज त्याचं जग बदलेल असा दिवस आहे. अर्थात त्याच्या जगाबरोबर माझंही.  आज त्याचा दहावीचा निकाल लागला. त्याला  89 टक्के पडले. ते मार्क्स किती आहेत? त्याचं करियर कसं असेल ? याबाबत मला आत्ता अजिबात टेन्शन  नाही. फक्त एकच इच्छा आहे , त्यानी चांगला माणूस व्हावं. आपल्या संवेदना जागृत ठेवून जगावं. कारण करियर, पैसा या गोष्टी मिळतातच. पण संवेदना जागृत ठेवणं गरजेचं आहे. कारण संवेदनशील माणूस कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. 
आज तो खुप खुष आहे. त्याला चांगले मार्क्स पडलेत. सगळेच खुष आहेत. त्याच्या आयुष्यात त्याला खुप समाधान मिळो. तो सदैव आनंदी राहो . हाच माझा आशिर्वाद आणि शुभेच्छा. आज पुन्हा एकदा माझ्यापासून लांब गेलेल्या माझ्या सगळ्या जिवलगांची आठवण येतीय. मला खात्री आहे ते सगळे जिथे आहेत तिथून त्याला आशिर्वाद देत असणार.... प्रणव पुन्हा एकदा अभिनंदन... खुप मोठा हो. बदललेल्या या नव्या जगात तुला कणखरपणे उभं रहाता यावं ही सदिच्छा.....


Thursday, 4 June 2015


आला पाऊस..... 



काल रात्रीपासूनच तुझी मी वाट पहात होते. जेव्हा मला अगदी असह्य हुरहुर लागते तेव्हा तुझी आठवण येते. का ते माहिती नाही? तुझे नि माझे नाते काय ? हे जाणून घ्यावसंही वाटत नाही. कारण तू माझ्या मनात कधीही बरसू शकतोस. माझी परवानगी न घेता. कारण वेळेचं बंधन तुला मला नाहीच. कालपर्यंत होणारी जीवाची घालमेल तू कशी क्षणार्धात संपवलीस. जादुगार आहेस तू. वठलेल्या तनामनाला पालवी देणारा. सृजनाची पेरणी करणारा. तू आलास की तुझ्याविषयी काहीतरी बोलावसं वाटतच. मग सकाळीच घरातली कामं टाकून तुझं कौतुक करत बसले मी. तू आलास की माझं असच होतं. 
पाऊस सुरू झाला की हे असं काहीतरी होतं. एक मैत्रिण कायम चिडवते मला, '' या कवींना आणि लेखकांना पाऊस आला की काय होतं काय माहित ?  मला तर या पावसाचा राग येतो. चिकचिक, घाण. सगळे ड्रेस खराब होतात.''  पण तिचं या कानानी ऐकून त्या कानानी सोडून देते मी. कारण पाऊस खरच नवनिर्मितीची प्रेरणा घेऊनच येतो. 
पावसाची नुसती सुरूवात झाली की लगेच विविध भारतीला ''काली घटा छाये मेरा जिया तरसाये '' हे गाणं लागलं. अरे वा.... बाहेर  पाऊस बरसत असताना असलं सॉलिड गाणं ऐकताना काय मस्त वाटलं. लगेच व्हॉटस अॅप चे मेसेज बदलले. Happy Rainy Morning .... या पावसानीना सगळं बदलूनच जातं. सगळ्या वाईट , अप्रिय गोष्टींचा निचरा होऊन पाणी पुन्हा एकदा वहात होतं. पाण्याचं डबक जसं वाईट तसच मनातल्या विचारांच साचलेपणही वाईटच. पाऊस पडला की सगळच स्वच्छ होतं. पुन्हा एकदा नव्यानी जगायला शिकवतो पाऊस. आपण फार लहान गोष्टी मनाला लावून घेऊन आपलं जगण अवघड करतो. पाऊस या मनोवृत्तीला बदलतो. कोणताही भेदभाव न करता सगळीकडे बरसतो. हवेत गारवा आणतो. आपल्यालाही रागाच्या काही क्षणांना थंड करण्याची कला पावसाकडून शिकली पाहिजे. रागात राग मिसळून काहीच मिळत नाही. त्यापेक्षा त्या रागावर प्रेमाचा शिडकाव केला तर पुढचे मोठे प्रश्न टळतील. नीट विचार केल्यानंतर आपल्यालाही पटत, उगाच चिडलो होतो आपण इतके. काही वेळा त्या त्या वेळेची परिस्थिती असते ती. ती वेळ गेली की सगळं नॉर्मल होतं. पण त्या वेळी असा विचार करणं कठीण असतं.  पावसाला आज हे छान जमलय. काल होणारी जीवाची काहिली कशी संपवूनच टाकली त्यानी.  पाऊस नसताना धुळीचे नुसते लोट उठत होते. पण पाऊस पडताच  सगळं कस शांत झालं. पाऊसच प्रेमाचा धडा शिकवतो. पाऊस आला की हवा ढगाळ आणि कुंद असली तरीही हवेत एक तजेला असतो. आयुष्यात असा ढगाळपणा हवाच नाही का ? 
तृप्त झाली शांत धरणी
मधुस्मिते हिरव्या कुरणी
रुसट चुंबनासम ओल्या सरी येती जाती
भुईसवे आभाळाची जुळे आज प्रीती

Sunday, 3 May 2015

निसर्गासारखा नाही रे सोयरा...........



आपल्याला निसर्गाकडून शिकण्यासारखं खुप काही आहे. आपलं कर्तव्य निरपेक्षपणे बजवणे ही गोष्ट आपल्याला निसर्ग शिकवतो. म्हणजे बघा ना झाड कधी अशी फुशारकी मिरवतं का , बघा मी किती लोकांना सावली देतो. पाऊस कधी असं म्हणतो का  की , माझ्यामुळेच ही सृष्टी हिरवीगार आहे. सूर्य कधीतरी विकेंडला थंड हवेच्या ठिकाणी जातो का ? पण आपण माणसं मात्र आपल्या जवळच्या माणसांसाठी जरी काही केलं तरी हजार वेळा बोलून दाखवतो आणि परतफेडीची अपेक्षा करतो. इतकच कशाला आपला शब्द ऐकला जातो तोवर सगळी नाती प्रिय वाटतात. जेव्हा आपला अपमान होतो किंवा आपल्या मनाप्रमाणे वागलं जात नाही तेव्हा हीच आपली माणसं आपली वाटेनाशी होतात. निसर्गात मात्र असं होत नाही. याचा अनुभव नुकताच घेतला. 
माझ्या घराच्या छोट्याश्या गच्चीत एका पारव्याच्या जोडीनी  त्यांच्या प्रेमाचा पुरावा झाडाच्या एका कुंडीत ठेवला. सगळे सरपटणारे प्राणी, चिमण्या , पक्षी यांना आमच घर comfortable आणि सुरक्षित वाटतं की काय  काय माहित. जुनी लोकं म्हणतात ना, घर फक्त आपलच नसतं. त्याचा प्रत्यय येतो मला नेहमी. त्या पारव्याच्या जोडीतला बाबा,  आई आणि अंड्यांची सोय करून निघून गेला. आई मात्र त्या अंड्यांच रक्षण करत होती. त्यात मध्येच पाऊस पडायचा, कधी ऊन. कावळे दादा टपून होतेच. पण ती माऊली नेटानी आपल्या अंड्यातल्या पिल्लांचा सांभाळ करत होती. गच्चीत सगळीकडे पिसं आणि घाण झाली होती. बरं ती पिल्लं अंड्यातून बाहेर आल्याशिवाय काहीच करता येत नव्हतं. मी खिडकीचा पडदा देखील हळूच उघडत होते. कपडे वाळत घालताना सुध्दा अलगद घालत होते. जरा खुट्ट झालं की ती आई मात्र लगेच आपले पंख पसरत होती. अगदी डोळ्यात तेल घालून आपल्या पिल्लांचा सांभाळ करत होती. तिच्या स्वतःच्या भूकेसाठी ती काय करायची काय माहित ? का मि. पारवा तिला काही आणून द्यायचे माहिती नाही. 
फायनली त्या अंड्यातून दोन गोंडस पिल्लं बाहेर आली. मी पहिल्यांदाच जवळून लाईव्ह इतकी गोडं पिल्लं पाहिली होती. मग तर मी बाळ बाळंतिणीला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही असं ठरवलं. तिचं तिच्या पिल्लांवरचं प्रेम पाहून मलाच भरून यायचं. अगदी कमी वेळातच त्या पिल्लांनी  आपले पंख फडफडवायला सुरूवात केली. मी रोज त्यांच्याकडे आणि त्यांच्या आईकडे बघायची. उगाच माझ्या आईपणाशी कम्पेअर करायची. माझं पिल्लू पहिल्यांदा पालथं पडलं, रांगायला लागलं, चालायला लागलं ते सगळे क्षण आठवून डोळ्यात पाणी आलं. त्या आईला पण असच वाटत असेल का असं वाटत होतं. ती आई आपल्या पिल्लांसाठी खायला आणायला बाहेर जायची तेव्हा उगाच मी त्यांच रक्षण करायची. त्यांना गरज होती का ? किंवा मी रक्षण करू शकतीय का ? याचा विचार न करता, मनानी सगळ करायची. ती आली की मी हुश्श करायची. 
काही दिवसांनी ती पिल्लं उडून गेली. आई पण दिसेना. मी बेचैन झाले. कुंडीत आणि गच्चीभर त्यांनी घाण करून ठेवली होती. पण त्या घाणीपेक्षा आई आणि पिल्लं कुठे गेली हेच मी शोधत होते. माणसं जितकी मी,  माझं करतात तितकं निसर्गातले सजीव करत नाहीत. आपल्या मुलांनी आपल्या म्हातारपणाची काठी व्हावं अशी अपेक्षा करत नाहीत. पिल्लं सुध्दा आई वडिलांच्या ईस्टेटीवर डोळा ठेवत नाहीत. आपलं कर्तव्य चोख पार पाडतात. परिणाम निसर्गावर सोडून देतात. या जिवंत अनुभवातून आपणच आपल्या अपेक्षांमुळे दुःखी होतो हे जाणवलं. निसर्ग नियम पाळला तर दुःखी होण्याचं कारण नाही. सुख आणि दुःख आपल्याचं कर्माचं फळ असतं. आपण जसं पेरतो तसं उगवतं. निसर्गातले सजीव कर्म करून फऴ निसर्ग देईल तसं स्वीकारतात. आपण मात्र फळ आपल्याच मनाप्रमाणे मिळावं असा हट्ट करतो. ईश्वर काय , निसर्ग काय त्यांच्या पदरचं काही देत नाहीत. आपल्या अकाऊंटमध्येच काही नसेल तर चेक बाऊंस होणारच ना? कोणत्याही गोष्टीत आपलं contribution किती आहे याचा विचार करून फळाची अपेक्षा केली पाहिजे. म्हणजे माझ्याच बाबतीत असं का ? हा प्रश्न पडणार नाही. निसर्ग नियमानुसार जे योग्य असतं तेच घडत यावर एकदा विश्वास बसला  की,  '' निसर्गासारखा नाही रे सोयरा.  गुरू, सखा बंधु , माय बाप  '' यावरही विश्वास बसतो. 

Monday, 27 April 2015


संवाद मनाशी.....




मित्र. मैत्रिणींनो मी तुम्हाला ब-याच दिवसांनी भेटतीय. खरं तर मी खुप मिस केलं तुम्हाला.  मला माहितीय तुम्ही सुध्दा माझ्या लेखाची वाट पहात होतात. कारण आपल्यामधल्या संवादाचं हे एकच महत्त्वाचं माध्यम आहे. पण या ब्ल़ॉगवर काहीही लिहिताना एक मनाशी नक्की केलयं. मारून मुटकून काहीही लिहायचं नाही. अगदी मनाला वाटेल ते, मनात येईल ते आणि मनाला भावेल तेच लिहायचं. गेल्या काही दिवसांत मनात काही आलच नाही असं नाही. पण का कोणास ठाऊक खूप शांत रहावसं वाटलं. मध्येच एकदा एक लेख लिहायला घेतला पण तो मनाला भावला नाही. मी तुमच्याशी यापूर्वी सुध्दा शेअर केलय की  मन, प्रेम आणि पाऊस  हे माझे आवडते विषय आहेत. त्यातल्या '' मन '' या एका विषयावर गेल्या काही दिवसांमध्ये खुप काही ऐकलं , अनुभवलं. 
आपल्या आयुष्यातली सुख, दुःख  तीव्र किंवा सौम्य प्रमाणात जाणवणं हे आपल्या मनावर अवलंबुन आहे. . एखादी किरकोळ गोष्ट मनाला लागून गेली की त्याचे परिणाम आत आणि बाहेर दिसतात. काही वेळा अगदी मोठ्ठ संकटदेखील आपल्या मनाच्या कणखरपणामुळे अणू, रेणूसारखं भासतं. त्यावेळी आश्चर्य वाटतं. अरे हे सगळं आपण कसं सहन केलं. तेच आपलं मन एखादा छोटासा अपमान सहन करू शकत नाही. काय आहे हा सगळा प्रकार? मनाच्या लहरीपणामुळे आपण वहावत जातो. कित्येकदा चुकीचे वागतो, समोरच्याला दुखावतो, स्वतः दुखावले जातो, काही वेळा खुप काही गमावतो, काही वेळा खुप काही मिळवतो. आपल्या आयुष्यातल्या ब-याचशा गोष्टी आपल्या मनाच्या सांगण्यानुसार आपण करतो. मग या मनालाच जिंकता आलं तर....
बहिणाबाई चौधरींनी केलेलं मनाचं वर्णन अनुभवानंतर पटतं. ''मन लहरी लहरी त्याचं न्यारं रे तंतर, आता व्हतं भुईवर गेलं गेलं आभायात.. ''मनातल्या विचारांचा विचार करता येत नाही हो. भयानक उड्या मारायला लावत ते आपल्याला. त्याचा गुणधर्म बदलणं इतकं सोप्प नाही. आपण मनाचं ऐकतो. पण आपल्या मनाला गुलाम बनवणं कठीण आहे.  आपलं बोलणं, वागणं, आपल्या महत्वाकांक्षा, नातेसंबंध जपणं, आपलं समाधान, असमाधान, काम करण्यासाठी मिळणारी उर्जा, आपल्याला होणारे आजार, मनात येणारे विकार हे सगळ या अदृश्य अशा मनावर अवलंबून आहे. आपल्याच मनाचा आणि संवेदनांचा आपण विचारच करत नाही. सगळ फार वरवर विचार करून सोडून देतो. कित्येकदा आपण कृती करतो, बोलतो आणि म्हणतो माझ्या हे मनात नव्हतं. पण असं नसतं. आपले विचार, आचरण, कृती हे सगळं मनावरच अवलंबून असतं. म्हणूनच मन शांत, स्वच्छ, एकाग्र करता यायला हवं. अनित्य अशा सुख दुःखांचा आपल्या मनावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आपल्या मनासारखं झालं म्हणजे सुख आणि मनाविरूध्द झालं म्हणजे दुःख. बरं ही परिस्थिती कधीच कायम टिकत नाही. हे सगळं कळत असतानाही आपण किती आत्मक्लेष करून घेतो. या सगळ्यात वर्तमान बिघडवून घेतो. काय चूक काय बरोबर हे आपलं मन आपल्याला सांगत असतं. त्याची हाक ऐकणं गरजेचं आहे. बाहेर सगळ्यांशी संवाद साधता साधता आपल्याच मनाशी संवाद साधणं बंद होतं. तो संवाद साधला पाहिजे. मनाला सतत वर्तमानात जगायला शिकवता आलं पाहिजे. तरच आनंदी रहाण्याची इच्छा पूर्ण होईल. नाहीतर जे नाही त्याचा शोक करण्यात आयुष्य कधी संपेल कळणारच नाही.  

Tuesday, 24 March 2015


ग्रामीण रूग्णालय....



सगळीकडे औषधाचा वास, अस्ताव्यस्त पडलेली औषधं , पेशंटसची खुप गर्दी, त्या गर्दीतले वेगवेगळे वास, वसावसा अंगावर ओरडणारे कर्मचारी, स्वच्छता या गोष्टीचा आनंद.... या वर्णनावरून तुम्हाला कळलच असेल  मी कशाबद्दल बोलतीय.  मी लहानपणी पाहिलेल्या सरकारी दवाखान्याचं हे वर्णन आहे. माझी आई नर्स होती त्यामुळे या वातावरणाचा मी कित्येकदा अनुभव घेतलाय. इतके वर्ष अशा वातावरणात काम करूनही ती इतकी गोड आणि संवेदनशील कशी राहीली हे मोठ कोडच आहे. हे सगळ पाहूनच मी तिला कायम म्हणायची, ''मी कधीच मेडिकल लाईनला जाणार नाही.'' पण ती कायम म्हणायची , ''या पेशाकडे सेवा म्हणून बघितलस ना तर असं म्हणणार नाहीस.'' 
आईच्या या बोलण्याचा प्रत्यय मी परवा घेतला. सध्या स्वाईन फ्लूची जबरदस्त साथ आहे. त्यामुळे साधा ताप, घसादुखी झाली तरी टेन्शन येतं. मी तर घसादुखी आणि तापानी हैराण झाले होते. मला स्वाईन फ्लू झालाय की काय असच वाटायला लागल मला. सुरूवातीला घरगुती उपाय केले. पण बरं वाटेना म्हणून डॉक्टरकडे जाव लागल. स्वाईन फ्लू नव्हता झाला. पण तरीही काळजी घेतलेली बरी म्हणून त्यांनी मला सरकारी दवाखान्यात जायला सांगितलं. कारण स्वाईन फ्लूचं औषध तिथेच मिळतं. 
बापरे... माझ्या अंगावर काटा आला. म्हणलं परत तेच सगळे वास, आरडा ओरडा.. पण मी तिथे गेल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला. माझी आई ज्या सेवाभावी वृत्तीने पेशंटकडे बघायची तीच वृत्ती, तीच काळजी मला तिथे अनुभवायला मिळाली. आईची प्रचंड आठवण आली. शिस्तीत केसपेपर करणे, मग डॉक्टरांनी तपासणे, योग्य ती औषधं , इंजेक्शन्स देणे हे सगळं छान चाललेलं होतं. थोडी गडबड, बेशिस्त होती. पण याला ती यंत्रणा जबाबदार नव्हती. गर्दी नसताना गर्दी करणं ही आपल्या लोकांना लागलेली सवय आहे. बसमध्ये, लोकलमध्ये  चढताना सुध्दा हा अनुभव येतो. उगाच ढकला ढकली.. मुळ मुद्दा हा आहे की त्या सरकारी दवाखान्यात एक वेगळा , आशादायी अनुभव आला. मला स्वाईन फ्लूची शक्यता असल्याने मला स्पेशल ट्रीटमेंट होती. मी लाईनमध्ये उभी होते. पण डॉक्टरांनी मला पुढे यायला सांगितलं.  तिथल्या वाघमारे  डॉक्टरांनी अगदी ठामपणे मला काहीही झालं नाहीये असं सांगितलं. ते म्हणाले, ''सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवा हो. तुम्ही अजिबात अॅंटिबायोटिक्स घेऊ नका. मी देतो त्याच गोळया घ्या. एक इंजेक्शन घ्या. ''
त्यांच ते आश्वासक बोलणं धीर देणारं होतं. लगेच तिथल्या नर्सनी इंजेक्शन दिलं. पुन्हा एकदा आईची आठवण झाली. तिनी इंजेक्शन दिलं की पेशंट म्हणायचे, ''बाई तुमचा हात लई हलका आहे बगा.'' मला पण त्या नर्स बाईंना असच म्हणावसं वाटलं. कारण इंजेक्शन कधी दिलं हे कळल सुध्दा नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती औषधं फुकट होती. इंजेक्शनचं अगदी नाममात्र शुल्क होतं.  तिथलं कफ सिरप तर कमाल आहे. सगळयात चांगली गोष्ट तिथले डॉक्टर लोकांशी आपुलकीनी बोलत होते. त्यांचा मोबाईल नंबर सगळ्यांना देत होते. मला काहीही वाटलं तर कधीही कॉल करा असं सांगत होते. औषधं देणारे,  केस पेपर करून देणारे नीट बोलत होते. शंका विचारली तर चिडत नव्हते. उलट थो़डं बरं वाटल्यानंतर त्या डॉक्टरांना फोन न केल्याची कृतघ्नता माझ्याकडूनच झाली. 
हे सगळ शेअर करण्यामागे एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपण सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवायला पाहिजे. सरकारी यंत्रणा चांगल्या आहेत. त्या योग्य पध्दतीनी चालवल्या गेल्या पाहिजेत. सरकारी दवाखान्यात गरीबांनीच जावं. तिथे चांगली ट्रीटमेंट मिळत नाही. हे गैरसमज आहेत.  मला हे मान्य आहे की अगदी प्रायव्हेट इतकी पॉश जागा नसेल तिथे. पण दर आठवड्याला नवीन औषधांचा स्टॉक सरकारी दवाखान्यात येतो. या यंत्रणेत त्रुटी असतीलही. पण थोड्या बदलाने त्या नक्कीच कमी होऊ शकतील. गरज आहे या बदलाची. 
या अनुभवावरून माझं एक मत नक्की झालय. पूर्वग्रह मनात न ठेवता व्यक्ति, संस्था, यंत्रणा यांचा विचार करायला हवा.