Tuesday, 24 March 2015


ग्रामीण रूग्णालय....



सगळीकडे औषधाचा वास, अस्ताव्यस्त पडलेली औषधं , पेशंटसची खुप गर्दी, त्या गर्दीतले वेगवेगळे वास, वसावसा अंगावर ओरडणारे कर्मचारी, स्वच्छता या गोष्टीचा आनंद.... या वर्णनावरून तुम्हाला कळलच असेल  मी कशाबद्दल बोलतीय.  मी लहानपणी पाहिलेल्या सरकारी दवाखान्याचं हे वर्णन आहे. माझी आई नर्स होती त्यामुळे या वातावरणाचा मी कित्येकदा अनुभव घेतलाय. इतके वर्ष अशा वातावरणात काम करूनही ती इतकी गोड आणि संवेदनशील कशी राहीली हे मोठ कोडच आहे. हे सगळ पाहूनच मी तिला कायम म्हणायची, ''मी कधीच मेडिकल लाईनला जाणार नाही.'' पण ती कायम म्हणायची , ''या पेशाकडे सेवा म्हणून बघितलस ना तर असं म्हणणार नाहीस.'' 
आईच्या या बोलण्याचा प्रत्यय मी परवा घेतला. सध्या स्वाईन फ्लूची जबरदस्त साथ आहे. त्यामुळे साधा ताप, घसादुखी झाली तरी टेन्शन येतं. मी तर घसादुखी आणि तापानी हैराण झाले होते. मला स्वाईन फ्लू झालाय की काय असच वाटायला लागल मला. सुरूवातीला घरगुती उपाय केले. पण बरं वाटेना म्हणून डॉक्टरकडे जाव लागल. स्वाईन फ्लू नव्हता झाला. पण तरीही काळजी घेतलेली बरी म्हणून त्यांनी मला सरकारी दवाखान्यात जायला सांगितलं. कारण स्वाईन फ्लूचं औषध तिथेच मिळतं. 
बापरे... माझ्या अंगावर काटा आला. म्हणलं परत तेच सगळे वास, आरडा ओरडा.. पण मी तिथे गेल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला. माझी आई ज्या सेवाभावी वृत्तीने पेशंटकडे बघायची तीच वृत्ती, तीच काळजी मला तिथे अनुभवायला मिळाली. आईची प्रचंड आठवण आली. शिस्तीत केसपेपर करणे, मग डॉक्टरांनी तपासणे, योग्य ती औषधं , इंजेक्शन्स देणे हे सगळं छान चाललेलं होतं. थोडी गडबड, बेशिस्त होती. पण याला ती यंत्रणा जबाबदार नव्हती. गर्दी नसताना गर्दी करणं ही आपल्या लोकांना लागलेली सवय आहे. बसमध्ये, लोकलमध्ये  चढताना सुध्दा हा अनुभव येतो. उगाच ढकला ढकली.. मुळ मुद्दा हा आहे की त्या सरकारी दवाखान्यात एक वेगळा , आशादायी अनुभव आला. मला स्वाईन फ्लूची शक्यता असल्याने मला स्पेशल ट्रीटमेंट होती. मी लाईनमध्ये उभी होते. पण डॉक्टरांनी मला पुढे यायला सांगितलं.  तिथल्या वाघमारे  डॉक्टरांनी अगदी ठामपणे मला काहीही झालं नाहीये असं सांगितलं. ते म्हणाले, ''सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवा हो. तुम्ही अजिबात अॅंटिबायोटिक्स घेऊ नका. मी देतो त्याच गोळया घ्या. एक इंजेक्शन घ्या. ''
त्यांच ते आश्वासक बोलणं धीर देणारं होतं. लगेच तिथल्या नर्सनी इंजेक्शन दिलं. पुन्हा एकदा आईची आठवण झाली. तिनी इंजेक्शन दिलं की पेशंट म्हणायचे, ''बाई तुमचा हात लई हलका आहे बगा.'' मला पण त्या नर्स बाईंना असच म्हणावसं वाटलं. कारण इंजेक्शन कधी दिलं हे कळल सुध्दा नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती औषधं फुकट होती. इंजेक्शनचं अगदी नाममात्र शुल्क होतं.  तिथलं कफ सिरप तर कमाल आहे. सगळयात चांगली गोष्ट तिथले डॉक्टर लोकांशी आपुलकीनी बोलत होते. त्यांचा मोबाईल नंबर सगळ्यांना देत होते. मला काहीही वाटलं तर कधीही कॉल करा असं सांगत होते. औषधं देणारे,  केस पेपर करून देणारे नीट बोलत होते. शंका विचारली तर चिडत नव्हते. उलट थो़डं बरं वाटल्यानंतर त्या डॉक्टरांना फोन न केल्याची कृतघ्नता माझ्याकडूनच झाली. 
हे सगळ शेअर करण्यामागे एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपण सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवायला पाहिजे. सरकारी यंत्रणा चांगल्या आहेत. त्या योग्य पध्दतीनी चालवल्या गेल्या पाहिजेत. सरकारी दवाखान्यात गरीबांनीच जावं. तिथे चांगली ट्रीटमेंट मिळत नाही. हे गैरसमज आहेत.  मला हे मान्य आहे की अगदी प्रायव्हेट इतकी पॉश जागा नसेल तिथे. पण दर आठवड्याला नवीन औषधांचा स्टॉक सरकारी दवाखान्यात येतो. या यंत्रणेत त्रुटी असतीलही. पण थोड्या बदलाने त्या नक्कीच कमी होऊ शकतील. गरज आहे या बदलाची. 
या अनुभवावरून माझं एक मत नक्की झालय. पूर्वग्रह मनात न ठेवता व्यक्ति, संस्था, यंत्रणा यांचा विचार करायला हवा. 

Tuesday, 10 March 2015


माझा शत्रू.... 


आत्ता पाऊस पडतोय. पण आश्चर्य म्हणजे मी आज पावसावर नाही बोलणारे तुमच्याशी. आज मी अगदी नुकतीच  एक लढाई केली आणि त्यात मी जिंकले , त्याबद्दल बोलायचय मला. माझ्या घरातल्या स्वयपाकघरात होती ती लढाई. मी कोणता नवीन पदार्थ बनवला ? नाही हो.... पाणी प्यायला म्हणून गेले तेव्हा बघते तर काय .. चक्क माझा शत्रू टाईल्सवर दिसला मला. आता तो होता की ती ते मला माहिती नाही. पण माला खुप किळस,  राग, भीती अशा सगळ्या भावना जाग्या होतात त्या शत्रूला पाहिल्यावर. त्या शत्रूचं नाव म्हणजे ''पाल'' . होय हो. मला खुप भीती वाटते पालीची. आत्तापर्यंत अनेकदा या शत्रूशी दोन हात करायची वेळ आलीय. पण ते काम माझे मिस्टर करतात. मी त्यांना मॉरल सपोर्ट देते ,  मागे उभी राहून. ''अहो, असा कुंच्याचा फटका मारा तिच्यावर... असं काय करताय, आत पळेल ती. मग माझी  पंचाईत होईल. तिला बाहेरच्या बाहेर अशी ढकलून द्या.. '' वगैरे वगैरे म्हणत. पण आज हा बाका प्रसंग आला तेव्हा आमचे अहो नेमके घरी नव्हते. मग काय माझ्या भीतीनी धसक्याची जागा घेतली. अशा वेळी नेमकं कोणी घरी पण येत नाही. आमच्या आई म्हणतात, '' पालीला  काय घाबरायचं ? जशी आली तशी जाते ती.'' पण माझा या सासुवचनावर अजिबात विश्वास नाही. म्हणजे ती पाल बाहेर जाईपर्यंत मला चैनच पडत नाही.
आमच्या भोरला अशा पाली पाहिल्या की अजिबात भीती वाटत नव्हती. कारण ते नित्याचं झालं असावं. पण फ्लॅट सिस्टिममुळे ही सवयच गेलीय पार. त्यात आमचे चिरंजीव म्हणत होते, ''आई, जाऊदे तू लक्षच देऊ नकोस.'' असं म्हणून तो कॉम्प्युटरवर गेम खेळत बसला. असा राग येत होता मनातून. ''अरे तुला आईची काही काळजी आहे की नाही ? ''असं काहीसं मी पुटपुटले. तर मुळ मुद्द्याकडे येते. ती पाल एकटी होती तोवर मला इतकी भीती वाटली नाही. मग काचेच्या तावदानावर तिचा बॉयफ्रेंड पण आला. लांबून दोन किळसवाण्या पाली इतकचं कळत होतं. पण ज्या पध्दतीनी ते एकमेकांना बिलगून बसले होते, त्यावरून तो तिचा बॉयफ्रेंडच असावा. त्यांच बराच वेळ चाललं होतं प्रेमप्रकरण. माझा जीव इथे वरखाली होत होता. अरे बाबांनो, आपापल्या घरी जाऊन करा ना काय करायचय ते. असं मी त्यांना सांगत होते. काही वेळानी त्यांनी मिठीचा विळखा सोडला. पावसाळी हवेनी त्यांना पण रोमॅंटिक केलं होतं बहुतेक. माझा त्यावर आक्षेप नाही. पण  स्वतःच्या घरी करावं ना जे काय ते ... उगाच  दुस-यांना ताप. फायनली ते वेगळे होऊन चालायला लागले. मी म्हणलं , ''ए बाबा, तिला घेऊन जा. इथे काय तिचं काम आता ? ''पण त्यांची हालचाल पुन्हा मंदावली. माझ्या मदतीला कोणीही येणार नाही, याची मला जाणीव झाली. मी स्वतःलाच म्हणलं, ''अगं , काय हे नुकताच महिला दिन साजरा केलास ना ? हो पुढे आणि कर शत्रुचा बंदोबस्त.'' एकवेळ एखाद्याच्या श्रीमुखात भडकावणं सोप्प. पण पालीला हाकलणं म्हणजे जरा.. पण तरी मी शस्त्राला धार लावली. म्हणजे हातात झाडू घेतला. काचेच्या त्या बाजूला असलेल्या तिच्या बॉयफ्रेंडला काचेच्या बाहेरच ठेवलं. मग या बाजूची खिडकी बंद केली. हुश्श... अशा रीतीनी मी माझ्या लढाईत जिंकले. जाळी आणि खिडकीची काच यामध्ये ती अडकली बहुतेक. माझ्या मुलानी तिला झाडूनी छडी देण्याचा प्रयत्न पण केला.  पण आता ती घरात येऊ शकणार नाही याची खात्री झाली. बापरे... केवढं मोठं हे धाडस. तुमच्यापैकी काही हसतील मला. पण ज्यांना पालीची भीती, किळस, राग जे काही आहे ते वाटतं ना , त्यांना पटेल माझं म्हणणं. 
या प्रसंगातली मजा मी आत्ता लिहिताना अनुभवतीय. पण त्यावेळी भीतीनी गाळण उडाली होती. एक जाणवलं, संकट लहान असो की मोठं. आपल्याला एकट्याला त्याला सामोरं जायचय हे कळलं ना की आपण प्रयत्न करतो. कोणीतरी मदत करेल या आशेवर राहीलो की आपण आपले प्रयत्नच थांबवतो. एकुणात काय , आपल्या प्रॉब्लेम्सवर कोणीतरी सोल्युशन काढेल या आशेवर रहाण्यापेक्षा आपणच आपले प्रयत्न करायला हवेत , हा विचार पटलाच नाही तर  आज मी अनुभवला. 

Saturday, 7 March 2015

फिरूनी नवी जन्मेन मी....  




आज जागतिक महिला दिन. गमतीत सांगायचं झाल तर आमचा पोळा. आजच्या दिवशी स्त्री, तिचा सन्मान, तिची सुरक्षितता याविषयी वारेमाप लेख आणि चर्चा ऐकायला येतील. आज शिवजयंतीसुध्दा आहे, त्यामुळे कार्यक्रमांचा पाऊसच पडेल. डीजेनामक कर्णकर्कश्श यंत्रांच्या मालकांची आज दिवाळी. शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या प्रयत्नांपैकी एक टक्का प्रयत्न केले ना तर सुराज्य निर्माण होईल. पण या सगळ्यात वेळ खर्च करण्यापेक्षा डीजे लावून नाचलेलं चांगलं नाही का ? आर्थिक गणितांचा विचार केला तर या सगळ्या खर्चातून कितीतरी विधेयकं कामं उभी राहू शकतात. असे विचार पटतच नाहीत का कोणाला? प्रवाहाविरूध्द जाऊन काही शिवप्रेमींनी असे प्रयोग केले तर... असो.....  
महिला दिन साजरा करावा का नाही ? या वादात मला पडायचं नाही. कारण या जगात अशा कित्येक गोष्टी चालू आहेत , ज्याला मी काहीच करू शकत नाहीये. त्यातली एक मला प्रचंड त्रास देणारी गोष्ट म्हणजे स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून दाखवल्या जाणा-या जाहिराती. मध्येच एक जाहिरात पाहिली ज्यामध्ये एक  मुलगी तोकडे कपडे घालूनही मुलांना त्यांच्या नजरेतली बेशरमी लपवायला सांगते. थोडं विचित्र वाटलं . कदाचित जुन्या पण संस्कारी विचारांचा पगडा असेल. पण असे विचित्र कपडे घातल्यानी आपण पुढारलेल्या किंवा पुरोगामी विचारांच्या आहोत असं असतं का? वेशभूषा कशी असावी हे  स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. फक्त या स्वातंत्र्यानी, '' आ बैल मुझे मार ''असं होत नाहीये ना याचा विचार व्हावा.  वाईट नजरा निस्तनाभूत करण्यासाठी आपला एक कटाक्ष पुरे असतो. लाजून झुकणा-या नजरेतच जळजळीत निखारे सुध्दा असतात. आता कुठे, कोणाला आणि कसं सरळ करायचं हे आपणच ठरवायला हवं.  ''चलता        है ''संस्कृती नको. त्यामुळेच बलात्कार हा अंगावर घाव घालणारा शब्द हल्ली बोथट वाटायला लागलाय. आपल्या मनाविरूध्द  आपल्याला हात लावण्याची हिम्मत    करणा-याला शासन देण्याची ताकद  आपल्यात असते. फक्त ती वापरली पाहिजे. 
एक पुरोगामी विचारांची स्त्री कुटुंबालाच नाही तर समाजाला पुढे घेऊन जाऊ शकते. त्यासाठी स्त्री असण्याचा अभिमान तर हवाच. पण परमेश्वरानी दिलेलं स्त्रीत्व जपता आलं पाहिजे. समाजरथ पुढे जाण्यासाठी स्त्री आणि पुरूष ही दोन्ही चाकं महत्त्वाची आहेत. एकटी स्त्री किंवा एकटा पुरूष समाज विकसित करण्यासाठी असमर्थ आहे. त्यामुळे मुक्त कोणापासून व्हायचं हे आधी पक्क ठरवायला हवं. पुरूषापासून मुक्ति हवीय का ?  मला वाटतं नाही. मुक्ती हवीय परंपरेच्या जोखडातून , जाचक रुढींमधून, रोज असणा-या अत्याचाराच्या टांगत्या तलवारीपासून.  स्त्रीला दुय्यम वागणूक देणारी मानसिकता बदलली पाहिजे, मग ती स्त्रियांकडून असो की पुरूषांकडून. तिला तिचं आयुष्य तिच्या पध्दतीनी जगण्याची मुभा दिली पाहिजे. आजही कितीतरी कमावत्या स्त्रिया आपला पगार आपल्या मनाप्रमाणे वापरू शकत नाहीत. स्त्री मुळातच काटकसरी आणि योग्य विनिमयाची पुरस्कर्ती असते. त्यामुळे वायफळ खर्च ती करत नाही. पण तरीही तिच्या पगारावर तिचा अधिकार नसतो.  मोठ्या पातळीवर बदल होतायत. स्त्री पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून चाललीय. पण आजही कितीतरी मध्यमवर्गीय कुटुंबात मुलींना त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षण, नोकरी करण्याचा अधिकार नाही. स्त्री पुरूष समानता याचा मला समजलेला अर्थ म्हणजे स्त्री आणि पुरूषांनी एकमेकांना समजून घेऊन विकसित होणं. विधात्यानी स्त्रीला सहनशील बनवलय म्हणून तिनी सहन करायचं आणि पुरूषांनी अन्याय करायचा असं नाही. किंवा स्त्री मुक्तीच्या नावावर स्त्रियांनी स्वैराचार करायचा असंही नाही. समानता म्हणजे समजून घेऊन उन्नती करणं. 
बोलण्यासारखं खुप आहे. अन्याय, अत्याचार, असमानता हे सगळं संपवण्यासाठी विचारांची उच्च पातळी गाठून समजून घेतलं गेलं पाहिजे.. अर्थात स्त्री आणि पुरूष दोघांकडूनही. चलो फिर,  दो कदम आप चलो... दो कदम हम चलेंगे... 

Friday, 6 March 2015


रंग माझा वेगळा........        



रंगाच्या  या सणाला, असे काहीसे बोलुया,
प्रेमाच्या रंगामध्ये,  सारे रंगुन जाऊया.....
 आजच्या रंगीबेरंगी दिवसाच्या  तुम्हाला  काव्यमय शुभेच्छा. प्रेम आणि उत्साह घेऊन येणारा हा दिवस  मनातली कटुता संपवून एका वेगळ्या रंगात रंगण्याच्या आहे. अर्थात त्या रंगाचं नाव प्रेम आहे. कारण हा एकच रंग वाईट भावनांवर विजय मिळवतो. मनातला सगळा द्वेष, राग, मत्सर ,  ''प्रेम '' या एका भावनेनी अक्षरशः निष्प्रभ ठरतात. 
मनातल्या सगळ्या भावनांना वेगवेगळे रंग असतात. या रंगांची रंगपंचमी आपल्या मनात कायमच चाललेली असते. प्रत्येक प्रसंगी आपलं मन आपल्याला वेगवेगळ्या रंगांची अनुभूती देतं. एखाद्याचा राग येणं खुप चांगलं. तुम्ही म्हणाल, हे काय नवीन ? पण खरच आपण ज्या व्यक्तिवर प्रेम करतो ना त्याच्यावरच हक्कानी रागवतो. त्यामुळे रागाचा रंग चांगला. पण त्याचा अतिरेक नको. प्रेमाच्या वर्षावानी राग कुठच्या कुठे निघून जातो. आपलं इतक छोटसं आयुष्य , त्यात राग या भावनेला कशाला उगाच थारा द्यायचा. काही लोक अभिमानानी सांगतात, एकदा मला एखाद्याचा राग आला किंवा माझ्या ब्लॅक लिस्टला त्याचं नाव गेलं की संपलं. मला नेहमी हा प्रश्न पडतो,  इतक्या सुंदर आयुष्यात कोणी कोणावर इतकं रागवू कसं शकतं? कारण  आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात माणूस आज आहे तर उद्या नाही अशी अवस्था आहे. अशा वेळी भलतेच निग्रह करून आणि तेच मनात धरून काय फायदा ? त्यापेक्षा, '' जाने भी दो यारो'' असं म्हणलं ना तर सगळं सोप्प होतं. 
मत्सर ही भावना आम्हा स्त्रियांमध्ये जरा जास्तच. अगदी समोरचीच्या साडीपासून गाडीपर्यंत अनेक गोष्टींवर आम्ही जेलस होतो. काही प्रमाणात हा रंगसुध्दा चांगला. कारण जेलसीमुळे  आपण तिच्यापेक्षा अजून चांगलं काय करू शकतो हा विचार तरी करतो आपण. जेलसीच नसेल तर आपल्यात सुधारणा कशी होणार. त्या मत्सराचा अतिरेक नको , हे वेगळं सांगायला नकोच. काही वेळा या मत्सरापोटी अनावश्यक गोष्टी आणि भावनांची अडगळ निर्माण होते. ती होऊ देता कामा नये. आपल्याला आपल्यात सुधारणा व्हावी हा हेतू असला पाहिजे. कारण उगाच भलत्या विचारांना थारा दिला तर नुकसान आपलच होतं. 
द्वेष या भावनिक रंगाचा फायदा होऊ शकतो बरं का ? कारण द्वेषातूनच काहीतरी करून दाखवण्याची इर्षा निर्माण होते. प्रगती होण्यासाठी आतून पेटुन उठण्याची गरज आहेच की.  काहीतरी मिळवायचं आहे हे आधी ठरवायला लागतं . त्यासाठी द्वेषाची भावना मदत करते.  पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडायची नाही हे मात्र नक्की.
मनातल्या भावनांच्या सगळ्या रंगांची आपल्या जीवनात गरज आहेच. त्या कोणत्याही भावनेचा अतिरेक होऊ द्यायचा नाही हे काम प्रेम करतं. मनात प्रेमाचा रंग गहिरा हवा. हे प्रेम एका व्यक्तिपुरतं मर्यादित नसावं. तसं प्रेम तर सगळेच करतात. पण आपापसात प्रेम निर्माण होऊ शकलं तर बरेचसे प्रश्न मिटतील. सगळं गुडी गुडी हवं असं नाही. सगळे रंग आवश्यक आहेतच. तसं नसेल तर आयुष्य बेचव, बेरंग होईल. फक्त लोणच्यानी भाजीची जागा घेतली की घोळ होतो. काळा रंग इतका अशुभ मानतात. पण एका गवळणीत म्हणटल्याप्रमाणे, ''आवड तुला नाही काळ्याची , केसाचा रंग का काळा? गो-या गालावरी शोभे  सांगा, तीळ का काळा ? '' म्हणजे  काळा रंग सोंदर्यात भर घालतो ना ?  या सगळ्या रंगांची उधळणच आपलं आयुष्य रंगीबेरंगी करतं.
 तसं म्हणलं तर प्रॉब्लेम्स कोणाला नाहीत ? पण या सगळ्यावर मात करून जगण्यातला आनंद शोधला पाहिजे. प्रत्येकाला या ओळी आपल्यासाठीच लिहिल्या गेल्यात असं वाटलं पाहिजे, त्या म्हणजे,  '' रंगुनि रंगात सा-या रंग माझा वेगळा '' 

Sunday, 1 March 2015


आज मौसम बडा बेईमान है.....


आज मौसम कितना खुश गवार हो गया, खत्म सभी का इंतजार हो गया ; 
बारिश की  बुंदे गीरी कुछ इस तरहसे; लगा जैसे आसमान को जमीन से प्यार हो गया
काल संध्याकाळपासून कोसळणारा हा पाऊस किती छान शब्दबध्द केलाय. व्हॉटस अप चे काही मेसेजेस खरच खुप छान असतात. फेब्रुवारी महिन्यात पडणा-या पावसाला उन्हसाळा वगैरे म्हणून झालय. किंवा अगदी बरेच विनोद करून झालेत या पावसावर. पण पावसाला काही बोललं ना की वाईट वाटतं. सृजनाची निर्मिती करणारा पाऊस हवासाच वाटतो. मला हे मान्य आहे की असा अवेळी पडलेला पाऊस नुकसान घेऊन येईल कदाचित. लोकं आजारी पडतील. पण तरीही पाऊस छानच असतो.. नाही का ?
अवेळी पडलल्या पावसानी काही पूर्वनियोजित कार्यक्रमांचा फज्जा उडवला. अगदी सकाळपासून ढग दाटून आलेले असले तरीदेखील तो पावसाळ्यासारखा बरसेल असं वाटलं नव्हतं. पण संध्याकाळी मातीचा सुगंध मन भरून गेला. बघता बघता सगळा आसमंत ओला चिंब झाला. मनातल्या आठवणी ढगांसारख्या दाटून आल्या. पावसाच्या सरींप्रमाणे या आठवणी बरसू लागल्या. पावसाळ्यामध्ये सृजनाची, नवनिर्मितीची  फार मोठी ताकद आहे. जमिनीवर तो बरसतो तेव्हा सृष्टी सुंदर दिसते. आजुबाजुचं वातावरण पाहून, तन - मनाला पालवी फुटते.   2015 मधला हा पहिला पाऊस.. 
धुंद आणि कुंद अशा या रोमॅंटिक हवेमध्ये विं. दा. करंदीकरांची ही कविता आठवली, 
''  हिरवे हिरवे रान मोकळे,ढवळ्या पवळ्या त्यावर गायी.
प्रेम करावे अशा ठिकाणी, विसरूनी भीती विसरूनी घाई.
प्रेम करावे मुके अनामिक, प्रेम करावे होऊनिया तृण,
प्रेम करावे असे परंतु, प्रेम करावे हे कळल्याविन. ''
वाहवा... अगदी एखाद्या हिरव्यागार, सुंदर डोंगरावर गेल्यासारखं वाटलं. 
या पावसात काय जादू आहे तेच कळत नाही. त्याचा कितीही राग आला तरी रागवता येत नाही. तो अवेळी आला तरी त्याचं स्वागतच करावसं वाटतं. त्याला कोणी रागानी काही बोललं तर वाईट वाटतं... कारण पाऊस हा वठलेल्या तना - मनाला पुनरूज्जिवीत करतो. त्याला बोल लावलेले कसे सहन होतील ? आणि सगळा राग त्याच्यावरच का ? हल्ली माणसं तरी कुठे शहाण्यासारखं वागतायत ? मनात येईल तसंच वागतात ना ? मग निसर्गालाच सगळे नियम का ? माणसानी वागाव नियमाप्रमाणे. अशा वेळी मात्र, '' दुनिया बदल गयी है '' असं ऐकवलं जातं ना? मग आमच्या पावसाची पण मर्जी बदललीय, असं म्हणलं तर. 
असा अवेळी पाऊस पडणं म्हणजे विनाशाकडे वाटचाल वगैरे सगळं मान्य आहे. पण हा विनाश टाळण्यासाठी काय करावं लागेल याचा विचार करूया ना... उगाच पावसाला नावं का ठेवायची ? जे आहे त्याचा आनंद घेत घेत... काय असायला हवं याचा विचार करून कृती करूया.