Monday, 5 January 2015


लोकमान्य.........  एक युगपुरूष 



माणसाच्या आयुष्यात भारावून जाण्यासारखे अनेक क्षण येतात. काही वेळा हे क्षण आपलं आयुष्य बदलवून टाकतात. मग हे भारावलेपण एखादी व्यक्ति, एखादं पुस्तक, एखादी घटना किंवा एखादी कलाकृतीमुळे येऊ शकतं.  संवेदनशील माणसं अधिक भारावून जातात. असच भारावलेपण कालपासून मी अनुभवते आहे..... 
लोकमान्य ..... एक युगपुरूष हा सिनेमा पाहिल्यापासून  टिळकांचे ते डोळे......ते संवाद.... तो काळ..... डोळ्यांसमोरून हालतच नाहीये. आज दिवसभर रोजची काम करताना माझा चिन्मय मांडलेकर झाला होता. (सिनेमा पहा मग कळेल) चित्रपटाचं परीक्षण करण्याइतकी मी तज्ज्ञ नाही. पण एक नक्की.... कोणताही सिनेमा आपल्या मनावर दीर्घकाऴपर्यंत छाप सोडतो तो उत्तम सिनेमा.... या सिनेमात टिळकांची भूमिका करणा-या सुबोध भावेनी त्याच्या मुलाखतीत एक विलक्षण गोष्ट सांगितली होती , टिळकांच्या डोळ्यात त्याला रोंमॅंटिसिझम दिसला होता . पण तो रोंमॅंटिसिझम देशाप्रती होता.... देशबांधव सुखात रहावे यासाठी होता.... अगदी हाच भाव हा सिनेमा पहाताना जाणवला.
लोकमान्य टिळक या महान व्यक्तिमत्वाला आपण काहीच ओळखत नाही याची खंत वाटली... आणि खरं सांगु लाज सुध्दा. आपल्या मुलांनी आपल्याला टिळकांविषयी काही विचारलं तर एक दोन गोष्टी सोडल्या तर आपण काहीच सांगु शकत नाही. टिळकच कशाला कित्येक क्रांतिकारकांची, देशभक्तांची नावं आपल्याला माहिती नाहीत. आज मिळणा-या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपलं घरदार पणाला लावलं अशा लोकांचं आपण स्मरणदेखील करत नाही.... निदान त्यांच्या विचारांना आपल्या मनात जिवंत तरी ठेवलं पाहिजे. मनात विचार जिवंत राहीले ना की कृती आपोआप घडेल.... कारण कृतीचा कर्ता करविता मनच तर आहे. फार छोट्या गोष्टींचा जास्त विचार करून ध्येयच विसरतो........ 
किती अडचणींचा सामना करून, आपल्या आप्तेष्टांपासून दूर राहून, हालअपेष्टा सहन करून स्वातंत्र्य मिळालय आपल्याला, अगदी आयतच. पण रोजच्या अगदी क्षुल्लक संकटांनी आपण किती घाबरतो. मला कल्पना आहे, आपापल्या परीनी आपलं दुःख मोठं असत. पण त्यावर मात करता आली पाहिजे. 

1 comment:

  1. Pahila pahije!! Mastach lihilays Vinu 👌 as usual!!

    ReplyDelete