कल्पनेचा कुंचला......
पाहिले न मी तुला , तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले...... पाहिले न मी तुला......
वा वा वा.......काही काही गाणी ना अगदी वेड लावतात बघा.... ही अशी गाणी कितीही वेळा ऐकली तरी पोट भरत नाही. गाण्याची सुरावट जितकी लक्षात रहाते ना, तितकेच गाण्याचे शब्द सुध्दा.... एकमेकांना न पहाता मन गुंतवण्याची कल्पना.... किती छान. कारण समोर असताना जीव गुंतला तर नवल नाही. पण कधीही एकमेकांना न पहाता जीव गुंतणं हे काही वेगळच नाही का? अर्थात कल्पनेच्या जगात काहीही अशक्य नाही.
पण कल्पना ही भावना विचारात घेऊनही, वास्तवात जगता येईल का ? तुम्ही म्हणाल , कुछ तो गडबड है.... पण नाही हो. असं होऊ शकत. म्हणजे वास्तवातही कल्पनेच्या जगात रमता येतं आणि आपल्याजवळ अमुक एक गोष्ट नाही या गोष्टीपासून मिळणारं दुःख कमी करता येतं.
म्हणजे बघा, देवाला आपण कधी पाहिलय का ? पण आपण तो असल्याचा आनंद घेतोच ना ? नेवैद्य दाखवून विठ्ठलाला घास भरवणारे नामदेव विरळाच. पण आपणसुध्दा देवाला नेवैद्य दाखवून , हा प्रसाद देवाचा आहे असं मानून समाधान मिळवतोच ना. आनंदमयी अशा भगवंताचं सान्निध्य नामानी मिळवतोच ना.
न अनुभवलेला स्पर्श, वस्तू, व्यक्ति, सुगंध, रंग याची अनुभूती घेता येते. कित्येक वेळा आपल्या मनात चालू असलेल्या गाण्याचे सूरसुध्दा ऐकू येतात. कल्पनेनी जगाची सफर करून येतो आपण. अंध व्यक्ति आपल्या मनाच्या डोळ्यांनीच कल्पना करून अनुभूतीचा आनंद मिळवतात. त्यामुळे अनुभूतीचा आनंद मिळवण्यासाठी ती वस्तू पहायलाच हवी असं नाही. समोर असताना त्याचा आनंद घेता येईल यात काही शंकाच नाही. किंवा हा आनंद नक्कीच जास्त प्रमाणात असेल. पण कल्पना करूनही याचा आनंद घेता येतो.
भाषा विषयांच्या पेपरमध्येसुध्दा कल्पनारम्य निबंधाचा एक विषय हमखास असतोच. कारण क्रिएटिव्हीटीचा उगम कल्पनेत होतो. एखाद्या कलाकृतीची, व्यवसायाची, यशाचं शिखर गाठण्याची कल्पनाच केली नाही तर तिथपर्यंतचा प्रवास कसा निश्चित करता येईल ? कल्पनेत स्वप्न बघून, वास्तवात प्रयत्नांची जोड दिली तर .. अशक्य अशी गोष्टच नाही. सगळ्या महान लोकांनी कल्पना, स्वप्नं वास्तवात उतरवण्यासाठी जीवापाड मेहनत केली म्हणूनच या कल्पना साकार होऊ शकल्या. पण कल्पनाच केली नसती तर.....
आपण कित्येक वेळा म्हणतो बघा.... कल्पना करायला काय हरकत आहे ? हो नक्कीच काहीच हरकत नाही. कल्पनेच्या जगात रमायलाही काही हरकत नाही. सगळ्या कवींनी, गीतकारांनी आपल्या कल्पनेतल्या जगातूनच आपल्याला उत्तमोत्तम काव्य दिली आहेत. जरी तू.. कळले तरी ना कळणारे....दिसले तरी ना दिसणारे.. विरणारे मृगजळ एक क्षणात....... या काव्यात मृगजळ असले, कल्पना असली तरी तो जीवापाड प्रेम करतोच ना.... विरहाचा सल कमी करण्यासाठी ही कल्पना किती छान आहे .... जरा घन झुरू दे ना, वारा गुदमरू दे ना , तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना ! ….. भगवंत आणि आपलं नातं सांगणारी ही कल्पना किती छान आहे ... काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल . ससुल्याला शाळेत , सिनेमात , सर्कशीत नेण्याची ही कल्पना म्हणजे.... कोणास ठाऊक कसा ? पण सिनेमात गेला ससा ! किती छान रमतो आपण कल्पनेच्या या जगात...
मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तू साठी जगतो . वस्तू ही सत्य नसल्यानी तिचं स्वरूप अशाश्वतच असतं अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंदही अशाश्वत.... खरा आनंद हा वस्तूमध्ये नसून तिच्या पलिकडे आहे. वास्तवातलं जग आणखी सुंदर बनवण्यासाठी.... चला तर चितारूया एक चित्र कल्पनेच्या कुंचल्यानी....
उत्सव वेदनेचा............
डोळ्यांमध्ये जमते पाणी , कशासाठी कळत नाही.... ऊर भरल्या उसाशाला ....कुठेच वाट मिळत नाही......... प्रवीण दवणे यांच्या अलगुजमधल्या या ओळी..... काही वेळा अशी मनःस्थिती आपली सुध्दा होते. डोळे भरून येतात.... का? कुणासाठी ? काहीच कळत नाही. व्यवहारी जगातले नियम या भावनांना समजू शकत नाहीत. सगळ काही व्यवस्थित असणारी ही व्यक्ति नेमक्या कोणत्या कारणानी व्याकुळ झालीय तेच कळत नाही. पाडगावकरांच्या या ओळी मनात रूंजी घालतात..... कुठुनी हे येति सूर लावितात मज हुरहुर, फडफडतो तडफडतो प्राणविहग पंजरी.......
अमुक एक कारण नसत या उदासीला..... ही उदासी आपलीच, आपल्या मनातली... काही वेळा , काही गोष्टी आपल्या मनातच ठेवलेल्या ब-या.... कारण कोणालाही या भावना कळणं अशक्यच असतं. कोणत्याही मोठ्या संकटांशी सामना करणारे आपण असे गलीतगात्र का झालोय? हेच मुळी कळत नाही....
पण एकदम एक विचार डोक्यात चमकून जातो.. जगण्यासाठी आवश्यक असणारी उर्जा मिळवण्यासाठीच अडचणी असतात ना....... जेव्हा सगळं संपून गेलय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नव्यानी काहीतरी सुरू करण्याची.... खरं आहे हे..... वेदना तर आहेच...... ती रहाणारच..... पण या वेदनेचा उत्सव करता आला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीला अंत आहे.... सुखाचे क्षण जसे फार काळ रहात नाहीत ... तसंच ही उदासी पण संपेल... काहीतरी मिळवायचय हा ध्यास ही उदासी घालवण्यासाठी उपयोगी पडतो. कदाचितच..... पण प्रयत्न करायला काय हरकत आहे.... कारण न लढता जगण्यापेक्षा लढून जगलेलं बरं.... काय सांगाव ज्या कारणानी आपण दुःखी झालोय ते कारणच आपल्या जगण्याचा आधार बनेल... ध्यासही असा असावा जो वेदनेला संजीवन देईल....
आठवणी दाटतात...........
आठवणी दाटतात ! धुके जसे पसरावे
जे घडले ते सगळे सांग कसे विसरावे...........
विविध भारतीला हे जुनं मराठी गाणं लागलं होतं. ''आठवण'' हा शब्द उच्चारताच कितीतरी आठवणी जाग्या होतात........... आठवण ही फार छान देणगी दिलीय देवानी आपल्याला. भूतकाळात घडून गेलेल्या चांगल्या वाईट आठवणी पुन्हा एकदा त्याच प्रसंगाची, घटनेची अनुभूती देतात.
अगदी लहानपणणापासून आत्तापर्यंत घडलेल्या ब-या वाईट प्रसंगांच्या आठवणी मनाला दुःख आणि आनंद देतात. काही आठवणी नकोशा वाटतात, तर काही हव्याशा.... आपली माणसाची जात ना मोठी चतुर... चांगलं ते हवं आणि वाईट मात्र नको.... नाण्याला दोन बाजू असतात वगैरे हे सगळं बोलतो आपण. पण वाईट किंवा मनाला वेदना देणा-या आठवणी नको असतात आपल्याला. या अशा आठवणींमधून सुध्दा बरचं काही शिकायला मिळतं. त्या वाईट आठवणी नकोत म्हणून त्या वस्तू, त्या जागा, ते रस्ते सगळं टाळतो आपण. असं करूनही ती आठवण काही पाठ सोडत नाही. मग त्यापासून पळून काय फायदा.....
हव्याश्या आठवणी मनाला तरल अनुभूती देतात. लहानपणीच्या खट्याळ, तरूण वयातल्या गोड गुलाबी , पहिल्यांदा मिळालेला पगार, पहिल्यांदा आपल्या पैशानी घेतलेल्या गोष्टी, मैत्रिणींची पत्रं... मी तर आजही माझ्या एका मैत्रिणीचं, मेघनाचं पत्र जपून ठेवलय. ते पत्र पुन्हा पुन्हा वाचते मी वेड्यासारखं.... किती छान आठवणी आहेत शाळेमधल्या..... आम्हा बायकांच्या बाबतीत एक गोड आठवण म्हणजे............ लग्न ..... नाही हो.......... काहीही काय ? ती काय सुखद आठवण आहे का ? या आठवणीपेक्षा आई झाल्याचा क्षण ही आठवण फारच छान........मुलं कितीही मोठं झालं तरी ती आठवण येताच नकळतपणे, '' माझं पिल्लू गं ते ''.... असे शब्द बाहेर पडतात...... या सुखद आठवणी हव्याशा वाटतात.
गोंदवलेकर महाराज त्यांच्या प्रवचनात सांगतात, एकच वस्तू एकाला सुखरूप वाटते तर दुस-याला दुःखरूप वाटते. म्हणजे ती मुळात ती सुखरुप नाही आणि दुःखरूपही नाही. जी गोष्ट आज सुखरूप वाटते, ती उद्या वाटेलच असं नाही. संकट आलं की पूर्वीच्या गोष्टी, नाती, आठवणी गोड लागत नाहीत. हा सगळा कल्पनेचाच खेळ नाही का ?
जरी हा कल्पनेचा खेळ असला तरीदेखील चांगल्या वाईट आठवणी येतातच. त्या मनाला सुख दुःख देतातच. आपल्या आयुष्यातून आठवणच वजा केली तर काय उरतं ? काहीच नाही. वर्तमानकाळात जगणं हे खरं तर आयडियल आहे. पण आपण मनुष्य आहोत. त्यामुळे भूत, वर्तमान आणि भविष्य अशा तिन्ही काळांची सफर करणं अगदी सहाजिक आहे. या सफरीत येणा-या आठवणींना असं म्हणावसं वाटतं.....
आठवणींनो उघडा डोळे, आसवांचे अमृत प्याले
आठवणींनो नयनी बघु द्या, सुखाचे ते क्षण जे निमाले......
प्रवास ....... वाट बघण्याचा
आज पुन्हा एकदा माझ्या आवडत्या विषयावर लिहिता येईल असं काहीतरी वाचनात आलं.... राधा कृष्णाच्या नात्याबद्दल आपण सगळ्यांनीच खूप काही ऐकलं आणि वाचलं आहे. मी नुकतीच एक गोष्ट ऐकली.... उध्दव राधेला भेटून कृष्णाकडे परत निघाला होता. तेव्हा त्याने तिला विचारलं, ''कृष्णाला काही निरोप आहे का ? '' तेव्हा आधी राधा काकुळतीला येऊन म्हणाली,'' हो आहे ना निरोप. त्याला मला भेटायला सांग....'' उध्दवाची पाठ फिरताच राधा त्याला हाक मारून म्हणाली, ''नको , त्याला म्हणावं की मला कधीच भेटू नकोस. कारण तू भेटलास की तुझी वाट बघण्याची मजा निघून जाईल. त्याच्या प्रतिक्षेतले हे दिवस कधीच संपू नयेत. कारण तो भेटला तर माझं त्याच्याशी असणारं अनुसंधान संपेल... त्यापेक्षा तो भेटला नाही तरच बर....''
ही कथा ऐकली आणि मन सुन्न झालं. असं प्रेम करणं किती वरच्या पातळीवरचं आहे. प्राणाहून प्रिय अशा आपल्या प्रिय व्यक्तिला भेटण्यापेक्षा त्याची वाट बघण्यात रमणारी राधा किती वेगळी आहे ..... विरह प्रेमाची तीव्रता वाढवतो या एका संकल्पनेवर आधारलेलं हे जगावेगळ प्रेम..... ''तू नसता मजसंगे वाट ही उन्हाची, संगतीस एकाकी वेदना मनाची !'' ही उन्हाची वाट एकट्यानी चालत जाण्याइतकं धैर्य हवं , नाही का ?
प्रत्येकाचं प्रेम वेगवेगळ्या गोष्टींवर असत... कोणाचं पैशावर प्रेम, कोणाचं नोकरीवर, कोणाचं ध्येयावर प्रेम, कोणाचं व्यक्तिवर, कोणाचं कवितेवर प्रेम, कोणाचं गाण्यावर... अचाट प्रेम केल्यानी आणि वेडं लागल्यानीच आपण ज्या गोष्टीवर प्रेम करतो ती मिळते... वेडे लोकच इतिहास लिहितात असं म्हणतात ना.... पण राधेचा दृष्टिकोन ठेवून वेड्यासारखं प्रेम केलं तर इच्छित गोष्ट मिळण्यापेक्षा प्रवासातला आनंद लुटता येईल नाही का ? कारण प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंदच अधिक असतो. एखादं नाटक बसवताना किंवा कार्यक्रमाची आखणी करतानासुध्दा हा अनुभव येतो. नाटकाच्या प्रयोगापेक्षा तालमीतला आनंदच जास्त असतो. कारण एकदा नाटकाचा प्रयोग झाला की दुस-या दिवशी प्रॅक्टिस नसते...... म्हणून वाट बघण्यातच मजा आहे....त्या प्रवासातच मजा आहे.... एक वेगळीच गोष्ट आज जाणवली , कारण ब-याच वेळा हवं ते मिळवण्याच्या गडबडीत प्रवासातली मौज अनुभवायच राहूनच जातं.
इच्छित स्थळी गेल्यावर हवं ते ध्येय मिळेलच. पण ते लवकर मिळत नाही म्हणून आक्रोश न करता ..... प्रवासातला आनंद घेऊया का ?
लोकमान्य......... एक युगपुरूष
माणसाच्या आयुष्यात भारावून जाण्यासारखे अनेक क्षण येतात. काही वेळा हे क्षण आपलं आयुष्य बदलवून टाकतात. मग हे भारावलेपण एखादी व्यक्ति, एखादं पुस्तक, एखादी घटना किंवा एखादी कलाकृतीमुळे येऊ शकतं. संवेदनशील माणसं अधिक भारावून जातात. असच भारावलेपण कालपासून मी अनुभवते आहे.....
लोकमान्य ..... एक युगपुरूष हा सिनेमा पाहिल्यापासून टिळकांचे ते डोळे......ते संवाद.... तो काळ..... डोळ्यांसमोरून हालतच नाहीये. आज दिवसभर रोजची काम करताना माझा चिन्मय मांडलेकर झाला होता. (सिनेमा पहा मग कळेल) चित्रपटाचं परीक्षण करण्याइतकी मी तज्ज्ञ नाही. पण एक नक्की.... कोणताही सिनेमा आपल्या मनावर दीर्घकाऴपर्यंत छाप सोडतो तो उत्तम सिनेमा.... या सिनेमात टिळकांची भूमिका करणा-या सुबोध भावेनी त्याच्या मुलाखतीत एक विलक्षण गोष्ट सांगितली होती , टिळकांच्या डोळ्यात त्याला रोंमॅंटिसिझम दिसला होता . पण तो रोंमॅंटिसिझम देशाप्रती होता.... देशबांधव सुखात रहावे यासाठी होता.... अगदी हाच भाव हा सिनेमा पहाताना जाणवला.
लोकमान्य टिळक या महान व्यक्तिमत्वाला आपण काहीच ओळखत नाही याची खंत वाटली... आणि खरं सांगु लाज सुध्दा. आपल्या मुलांनी आपल्याला टिळकांविषयी काही विचारलं तर एक दोन गोष्टी सोडल्या तर आपण काहीच सांगु शकत नाही. टिळकच कशाला कित्येक क्रांतिकारकांची, देशभक्तांची नावं आपल्याला माहिती नाहीत. आज मिळणा-या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपलं घरदार पणाला लावलं अशा लोकांचं आपण स्मरणदेखील करत नाही.... निदान त्यांच्या विचारांना आपल्या मनात जिवंत तरी ठेवलं पाहिजे. मनात विचार जिवंत राहीले ना की कृती आपोआप घडेल.... कारण कृतीचा कर्ता करविता मनच तर आहे. फार छोट्या गोष्टींचा जास्त विचार करून ध्येयच विसरतो........
किती अडचणींचा सामना करून, आपल्या आप्तेष्टांपासून दूर राहून, हालअपेष्टा सहन करून स्वातंत्र्य मिळालय आपल्याला, अगदी आयतच. पण रोजच्या अगदी क्षुल्लक संकटांनी आपण किती घाबरतो. मला कल्पना आहे, आपापल्या परीनी आपलं दुःख मोठं असत. पण त्यावर मात करता आली पाहिजे.
मन..........
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो..... चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो.... आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो...... सलीलचं हे गाणं सारख आठवतय आज.... छे.... नववर्षाची अशी बोअर सुरूवात..... काम असलं म्हणजे खूप आणि नसलं म्हणजे काहीच नाही.... काय आहे हे ? मला ना खुप काम करायची सवय झालीय..... म्हणजे ते स्वतःच असेल असं नाही.... लष्करच्या भाक-याच फार असतात. (आमच्या अहोंच्या मते).... मला आनंद मिळतो ते खरच.... पण आजचा दिवसच जाम बोअर गेला. आज मला माझ्या सो कॉल्ड लष्करच्या भाक-या पण नाही भाजता आल्या.
सकाळपासूनच एक - दोन फोन कॉल्स नी जाम डोक आऊट केलं.... म्हणजे मी करून घेतलं. हे मात्र जाणवलं आज .....आपणच आपला मुड घालवतो आणि परतदेखील आणतो. बाहेरचा माणूस या सगळ्याला जबाबदार नसतो. आपण उगाचच समोरच्याला ब्लेम करतो. बाह्य परिस्थितीचा फार परिणाम करून घेतो आपण. काही गरज नसते त्याची. फक्त याचा साक्षात्कार फार उषीरा होतो. माणूस म्हणजे हे सगळ होणारच. पण तरीही .......... फार भडकून काही होत नाही... दोन घास आपल्यालाच कमी जातात. ज्या कारणामुळे डोकं फिरलय ते कारणच मार्ग सुचवत... पण विचारांच्या भोव-यात गुंतण्याआधी मन शांत करायला हवं..... स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी बाहेरचं कोणी नाही तर आपणच प्रयत्न करायला लागतो. त्यात आम्ही बायका जरा जास्तच संवेदनशील असतो. नाही त्या गोष्टींचा उगाचच विचार करत बसतो.
माझ्या ओऴखीचे एक काका आहेत , ते नेहमी म्हणतात, समर्थांचा दासबोध वाचा.... आनंदी रहाण्याची गुरूकिल्ली आहे ती.... खरच आहे........ माणसानी आपलं वर्तन कसं ठेवावं आणि कसं ठेवू नये याबद्दल समर्थ रामदास स्वामीनी नि:संदिग्ध, खूप सविस्तर आणि मोलाचं मार्गदर्शन त्यांच्या काव्यात केलं आहे. त्यांनी वारंवार मनाला संबोधित केलं आहे खरं.... पण इथे मन हे केवळ एक रूपक असून लेखन सगळ्या मानवजातीला उद्देशून केलं आहे. समर्थ सांगतात असं जगता आलं तर.....
मना मानसीं दु:ख आणूं नको रे।
मना सर्वथा शोक चिंता नको रे॥
विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी।
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी -
समर्थांच्या या श्लोकावर विचार करता करता मनावरची मरगळ नाहीशी झाली.... खरच हे मन म्हणजे ना........