Monday, 30 June 2014

मनी मानसी आलेली एक स्वरचित कविता.




मी स्वार्थी फार............

सगळे जण म्हणतात मला, मी खुप समजुतदार
कसल आलय काय अहो, मी तर स्वार्थी फार|
काही नको असं म्हणत, सगळच हवं मला
सगळ्यांच प्रेम मिळावं, स्वार्थ माझा भला|
कविता, नाटक, सिनेमा, नाच. गाण्यांचे वेड इतके
स्वार्थी मन माझे, ओढ घेई सारखे|
वाचन आहे प्राण माझा, लेखन जीव असे
स्वार्थ मनात सारखा, चांगले पुस्तक हवे|
निसर्ग शांत मन मोहनी, सारखा त्याचा ध्यास
स्वार्थीपणाने मी मागते, निसर्गाचा सहवास|
खाणं, पिणं, कपडे छान, वीक पॉईंट माझा
स्वार्थापणाने घेते कब्जा, मिळेल जेव्हा ज्याचा|
अजूनही एक बरं का खूप आवडत मला
तुझं प्रेम मिळवणं, हा तर स्वार्थ पहिला|
तुझ्याकडे येते तेव्हा , घडते पंढरीची वारी.
हाही एक स्वार्थच, ही भक्ती आहे का खरी? |
देवळातही जाते मी स्वार्थी हेतू साधून
सारख्या मागण्या करून , त्याला सोडते भंडावून|
कुणी काही म्हणा, मी स्वार्थी फार
कसली आलीय अहो, मी समजुतदार||

Sunday, 29 June 2014



 द्वैत खरे की अद्वैत..........

काल एका वेगळ्या विषयावर एका अध्यात्मिक मित्राशी मस्त  गप्पा झाल्या. द्वैत खरे की अद्वैत. फार गंमत वाटली यावर बोलताना. भक्ती ही उत्कट प्रेमाची पुढची पायरी. असं सांगितलं जातं.  ज्या व्यक्तिवर आपलं मनापासून प्रेम असतं, त्याच्या जागी ईश्वराला ठेवलं की झाली भक्ती. काही संत सांगतात, व्यसनी किंवा हट्टी माणसं भक्तीमार्गासाठी चांगली. त्यांचं व्यसन आणि हट्ट काढून त्याच्या जागी देव असला की  झालं काम.
या सगळ्यात मूळ विषय मागेच राहिला. मी म्हणत होते की, प्रेम काय किंवा भक्ति काय समोर कोणीतरी हवं ना. तर तो म्हणाला, जे आपल्यामध्येच आहे त्याचा शोध बाहेर कशाला घ्यायचा ? परमेश्वर आपल्यामध्येच वसलेला आहे. त्यामुळे त्यासाठी बाहेर कुठे शोधायची गरज नाही.
नंतर एक गोष्ट आठवली. मिलिंद बोकिल यांच्या 'एकम' या कादंबरीचं अभिवाचन आम्ही करतो. त्यामध्ये असलेल्या मनस्वी लेखिकेलादेखील आपल्यामध्येच असलेल्या सगळ्यांची ओळख होते. त्यानंतर तिला जाणवतं की,' मी सगळ्यांमध्ये होते आणि सगळे माझ्यात. मुळात एकटेपणा असं काही नाहीये. आपण एकटेपणामुळे  ब-याचदा उगाच खंतावत बसतो.' किती सुंदर आहे हा विचार. प्रत्येकाला सोबतीची गरज असते. पण सोबत कोणीही नाही या विचारानी वाईट वाटून घ्यायची गरज नाही.
आपल्याला आवडणारी व्यक्ति आपल्यामध्येच  आहे. ही कल्पना खूप सुखावह आहे. बाहेर शोध घेण्यापेक्षा , वाट बघण्यापेक्षा आपल्यामध्येच असणा-या त्याच्याशी  किंवा तिच्याशी संवाद साधणं ही किती भारी गोष्ट होईल. विरहातलं प्रेम अनुभवण्यासाठी काय सॉलिड आयडिया आहे ही. तो समोर असतानादेखील जे बोलता येणार नाही, ते अशा माध्यमातून व्यक्त होता येईल. त्यासाठी भेट व्हायलाच पाहिजे असं नाही.
सुधीर मोघ्यांची एक मस्त कविता आहे,
नसताना तू जवळी असण्याचा भास तुझा भासातही भिडणारा हा दाहक श्वास तुझा.
कुठूनी ये इतुकी धग , विझलेल्या गतस्मृतीस. वेदनेस संजीवक करणारा ध्यास तुझा..
वाह वा. किती सुंदर भावना आहे ही.
उत्कट प्रेमाचा अविष्कार असो की भक्ती,  व्दैत आणि अद्वैताच्या या संकल्पना मनाला किती आधार देतात. द्वैत असेल तर व्यक्त होणं शक्य आहेच. पण अव्दैतामध्ये सुध्दा भेटीचा आनंद मिळू शकतो. अनुभव घेऊन पाहूयात का?...

Tuesday, 24 June 2014



ये रे ये रे पावसा..........

जून महिन्याचा शेवटचा आठवडा आला पण...... पाऊस नाही आला. आत्ता खरं तर खूप मस्त पाऊस पडावा असं वाटतय. नको तेव्हा किती बरसला हा. अगदी भर उन्हाळ्यात,  मे महिन्यात ढगांची दाटी काय, वीजांचा कडकडाट काय. सगळ्या पावसाच्या कविता, गाणी तेव्हाच मनात दाटून आली. पण आत्ता  तर पाऊस पडण्याचा, सरींमध्ये चिंब भिजण्याचा, मस्त रोमॅंटिक होण्याचा, पावसाच्या कविता करण्याचा - ऐकवण्याचा, आल्याचा गरम चहा पिण्याचा, गरम कांदा भजी खाण्याचा हा सीझन. पण पावसाची चिन्हच दिसत नाहीयेत.
शाळेच्या पहिल्या दिवशी पालकांची आणि मुलांची धांदल उडवणारा पाऊस पोर्शन पुढे चाललाय तरी अजून आला नाही. वर्तमानपत्रामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी पावसानेदेखील  लावली हजेरी.......... अशा  फोटोओळीचा टिपिकल फोटो  बघण्याची किती सवय झाली. पावसाळ्यात घालायचे कपडे, त्वचेची घ्यायची काळजी, काय खा, काय खाऊ नका असे लेख हे सगळं  तसचं पडलय वर्तमानपत्रांच्या कॉम्प्युटरमध्ये. पाऊस आला रे आला की या लेखांचा मारा वाचकांवर करण्यासाठी शस्त्रांना धार लावतो तसे लेख तयार आहेत. काही वर्तमानपत्रांमध्ये हे लेख आले ....पण
पाऊस .......... तोच नाहीये.
अजून एक गंमत.... पावसाळी बूट, रेनकोट, छत्र्या सगळ आलय बाजारात. पण हे सगळ वापरण्यासाठी आवश्यक असणारा पाऊस काही आलेला नाही. बाहेर प्रचंड उन आहे. दुकानात  बघितलं तरी घाम फुटतोय असे रेनकोट मात्र आलेत. पण पाऊस .... तोच नाहीये.
ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या आता सासवड पार करून पुढे चालल्या आहेत. तरीही पाऊस अजून पडला नाही. वारक-यांना भिजवणारा पाऊस का पडत नाहीये. पाऊस पडल्यानी थोडी गैरसोय होते हे मान्य आहे. पण वारीत पाऊस हवाच ना.
रेडिओवरसुध्दा पावसाची गाणी लावण्यासाठी सगळा स्टॉक तयार आहे. पाऊस हा एकच विषय घेऊन त्यावर विशेष कार्यक्रम करण्यासाठी संहिता तयार आहे. पण पाऊस ...... तोच नाहीये. रंगमंचीय कार्यक्रम सादर करण्यासाठी गाणी तयार आहेत. निवेदिकेच्या पावसाच्या कविता तयार आहेत पण पाऊस ...... तोय नाहीये.
पावसावर आपल्या सगळ्यांच्याच आशा आहेत. कारण शेतीप्रधान असलेल्या आपल्या देशात पाऊस नसेल तर मोठ्या आपत्तीला सामोरं जावं लागेल. म्हणून पावसाला म्हणावसं वाटतं.....
मी कधीच नव्हतं म्हटलं.....
तू अवेळी येऊ नकोस
वेळेचं बंधन
भावात्मक येण्याला असतं
तू तर कायमचा मनात कोरून आहेस....
वेळ - अवेळ हे गणित तुझं माझं नाहीच.......

Monday, 23 June 2014

व्यक्त व्हा......

बोलणं ही माणसाची खूप महत्त्वाची गरज आहे. खूप जड भाषेत बोलायचं तर व्यक्त होणं असं म्हणूया. मग ते माध्यम कोणतही असो, बोलणं, लेखन, कविता, चित्र, हावभाव किंवा प्रतिसाद. या सगळ्यातून आपण आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतो. प्रत्येक जण आपापल्या पध्दतीप्रमाणे रिअॅक्ट होतो.
मनात असूनही न बोलणा-या माणसांच मला आश्चर्य वाटतं. का व्यक्त होत नाहीत लोक? फार तर काय होईल. समोरच्याला आवडणार नाही. पण ब-याचदा व्यक्त न झाल्यानी प्रॉब्लेम होतात. कित्येक प्रश्न संवादाच्या अभावानी तसेच रहातात. बोलल्यानी प्रश्न सुटतात असं नाही. पण निदान मार्ग दिसतो.
आता तर संवादाची कित्येक माध्यमं आहेत. फोन, मोबाईल, व्हॉटस् अप, ई मेल, फेस बुक अशा कितीतरी माध्यमांमधून आपण व्यक्त होऊ शकतो. एखाद्या जिवलग व्यक्तिशी झालेलं कडाक्याचं भांडण एका सॉरीमुळे संपुष्टात येतं. पण...... हा पण आडवा येतो. आपल्या बोलण्यानी गैरसमजाचे बांध फुटणार असतील तर काय हरकत आहे. ते म्हणतात ना झालेल्या गैरसमजावर बोललं तर आयुष्याला स्वल्पविराम मिळेल. पण मौन बाळगलं तर पूर्णविराम. म्हणून बोला.... व्यक्त व्हा...
कोणीतरी असं असाव ज्याला आपण आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगू शकू. अगदी कोणीच नसेल तर लिहा, कविता करा, स्वतःशी बोला. पण आत साचलेलं सगळं बाहेर आलं पाहिजे. अडसर दूर होऊन नदी जशी खळाळत वहाते तसं मन स्वच्छ राहिलं पाहिजे. तरच आपण स्वतःच्या आणि आपल्या जवळच्या माणसांच्या बाबतीत सकारात्मक काम करू शकू.
मला मान्य आहे की काही गोष्टी सांगता येत नाहीत. पण निदान त्या मनात ठेऊ नयेत. चांगल्या  गोष्टी मनात ठेवल्या तरच भविष्यात चांगल्या विचारांची पेरणी होईल. शब्दांशिवायसुध्दा संवाद साधता येतो. कित्येकदा आपल्या जवळ वर्षानुवर्ष सहाणा-या माणसांना असा संवाद कळत नाही. पण असे जिवलग आयुष्याच्या प्रवासात भेटतात. त्यावेळी तरी या संवादातला आनंद घेतला पाहिजे,  मन शुध्द आणि स्वच्छ ठेवून. 

Wednesday, 18 June 2014

प्रेम.........
आज पुन्हा एकदा ' प्रेम' या विषयावर बोलावसं वाटतय. पुन्हा एकदा का, मला नेहमीच या विषयावर बोलावस वाटतं. कारण मला असं वाटतं या जगात प्रत्येक माणसाला याच एका बेसिक गोष्टीची सगळयात जास्त गरज आहे. मग ते कोणत्याही माध्यमातून मिळूदे.

आपलं मन आनंदी आणि प्रसन्न असेल तरच आपण अगदी रोजची कामंदेखील करू शकतो. ते आनंदी रहाण्यासाठी प्रेम आवश्यक आहे. हे प्रेम वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या लोकांकडून मिळतं. फक्त आपला हट्ट असतो की , मला असच हवं, तसंच हवं. पण नीट विचार केला तर असं वाटतं, आनंद आणि प्रेम मिळवण्यासाठी फार धडपड करण्याची गरज नाही. आपल्या मनात ते भरून वहात असेल ना, तर ते समोरूनही मिळतं. फक्त आपण ठराविक अशा कोणत्याही अट्टाहासाला चिकटता कामा नये.

कित्येक वेळा असं वाटतं की आपल्यावर मनापासून प्रेम करणारं कोणी नाहीये. अगदी आपला पोटचा मुलगा सुध्दा. अशा वेळी आपल्या आजुबाजुच्या लोकांनी केलेलं प्रेम समजून घेण्याची क्षमता मन हरवून बसतं. म्हणून प्रेम बाहेर शोधण्यापेक्षा ते आपल्या आतच आहे हे आधी समजून घ्यावं लागेल. ब-याचदा आपला मूड खूप चांगला असेल तर समोरच्या माणसाच्या मोठ्या गोष्टीदेखील आपण विसरून जातो. ''त्यात काय गं एवढं, ठीक आहे. बडे बडे शेहेरो मे ऐसी छोटी छोटी बाते होती रेहेती है.'' वगैरे म्हणून सोडून देतो. तेव्हा का नाही असं वाटत की , समोरच्याचं माझ्यावर प्रेम नाहीये. कारण आपण आपल्या मनाचं ऐकतो. बुध्दि काहीही सांगत असली तरी मनाचं ऐकतो. बुध्दिनी विचार करणा-या लोकांना हे पटणार नाही. पण मनाचं ऐकलं की आपल्याला समाधान मिळतं. त्याला  भरकटू न देणं हे बुध्दिचं काम आहे हे मान्य. मन शुध्द आणि निर्मळ असेल तर ते बुध्दिला पटेल असंच वागेल. फक्त अशा शुध्द मनाची लोकं मिळणं आता दुर्मिळ झालय. 

Sunday, 15 June 2014

वेगळं काही तरी.....

आज खूप दिवसांनी मनामध्ये एका सुंदर भावनेनी जन्म घेतला. ती होतीच मनात. फक्त जाणीव आज झाली. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात मन फार महत्त्वाचं आहे. आपल्या मनाचं ऐकावं असं म्हणतात. ब-याचदा आपण दुस-यांसाठी, समाजासाठी, आपल्या घरातल्यांसाठी मनाचं ऐकत नाही. मला काय वाटतय यापेक्षा समोरच्याला काय वाटतय याचा विचार करतो. संवेदनशील माणसांना कळेल मी काय म्हणतीय ते.
एखादं नातं आपल्याला नको असताना समाजासाठी वागवतो आपण. मनापासून काय वाटतय याला फारस महत्त्व देत नाही. कृत्रिम वागु लागतो. अगदी कोणतही नात असुदे ते मनापासून निभावण्याची गरज आहे. नाहीतर त्यामध्ये यांत्रिकता येते. मतभेद, मनभेद असतातच हो. पण मनं खूप जास्त दुरावली तर कठीण होऊन बसत सगळ.
अगदी लहानपणापासून ज्यांच्यावर मनापासून प्रेम केलं असे आपले सगळे आप्त कालांतरानी विचित्र का वागतात ? मनापासून केलेलं सगळ चुकीचं असतं का मग ? आणि होतं काय , आधीचं मनापासून केलेलं सगळ विसरतात लोक. नंतर आपल्याकडून जे चुकतं तेच लक्षात रहातं. मोठ्यांनी मोठ्या मनानी हे सगळ विसरायला हवं ना. का होत नाही असं?
अगदी नुकताच आलेला अनुभव आहे. ज्या आपल्याच नातेवाईंबद्दल आपल्या मनात नितांत आदर असतो ते लोक विचित्र वागताना पाहिलं की वाईट वाटतं. मी अमुक केलं, तमुक केलं आणि त्यांना याची जाणीव नाही. असं काहीतरी बोलतात लोक. जाणीव आहे का नाही हे तेच ठरवून मोकळे होतात. आपलं मन शांत करताना आपण दुस-याचं मन दुखवतोय हे त्यांना कळत नाही. बरं त्यांना प्रतिउत्तर देऊन गप्प बसवणं हे योग्य नाही असं आपल मन सांगत. कारण शब्दानी शब्द वाढतो, दुसरं काही नाही. आधीच दुरावलेली मनं आणखीन दुरावतात.
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ?
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातात कसा हो यावा, आधार कसा शोधावा ?