Monday, 14 May 2018


नातं घट्ट करणारी..स्पेस


नातं कितीही घट्ट असलं तरी प्रत्येक व्यक्तीला आपापली स्पेस हवी असते. काही काळापूर्वी स्पेस हा प्रकार फॅड वाटत होता. अगदी मला सुद्धा. पण आजूबाजूची गर्दी वाढत गेली तसं जाणवलं की, स्वत:चा वेळ मिळत नाहीये. स्वत:शी संवाद होत नाहीये. कुठेतरी खूप काहीतरी निसटून गेल्यासारखं वाटत होतं. पण नेमकं काय? सगळं अगदी मनासारखं असताना सुद्धा रितेपणा का जाणवतो? नीट विचार केल्यावर मला जाणवलं की, स्वत:ला वेळ देणं ही गोष्ट missing आहे.
एरवी एकटेपणाला घाबरणारे आपण एकटेपणा हवा असा वाटू लागतं. घरी, बाहेर, कामाच्या ठिकाणी सगळीकडे गर्दी. रस्त्यानी निघालं तर कोणी ना कोणी ओळखीचं भेटतचं. कधी कधी याचाही वैताग येतो. जेव्हा असं वाटतं असतं की कोणी ओळखीचं भेटू नये तेव्हा नेमकी खूप लोक रस्त्यात दिसतात आणि विचारतात, काय आज एकदम निवांत? आणि गाडी नाही का आज, चक्क चालत? अशा वेळी असं वाटत, please यार थोडी स्पेस द्या ना.
लोकलमध्येही कित्येकदा असं होत की असं वाटत नेहमीच्या लोकलच्या डब्यात न बसता वेगळ्या ठिकाणी बसावं म्हणजे ओळखीच कोणी भेटणार नाही आणि शांतपणे डोळे मिटून बसता येईल. पण नेमकं तेव्हाच बऱ्याच महिन्यांनी भेटणारी मैत्रीण सगळी स्पेस व्यापून टाकते.
कामाच्या ठिकाणीही नेमकं जेव्हा असं वाटतं की आज शांतपणे बसावं तेव्हा अचानक नको ती टार्गेट्स उपटतात. लक्ष देऊन मनापासून (मनाविरुद्ध) काम करावं लागतं. असं काम केल्याची acting करता येत नाही. स्वतःसाठी जो वेळ देण्याचं निश्चित केलेलं असतं त्या वेळात काम करावं लागल्यानी मनातल्या मनात झालेली चिडचिड गिळण्यापलीकडे काही नसतं.
का हवी असते ही स्पेस? शांत व्हायला... स्वत:शी संवाद साधायला... कारण so called प्रेमळ माणसांमध्ये ही काही वेळा जीव गुदमरतो. हे सगळं का होतं? हे नाही कळतं. अपेक्षा एकच असते, निदान जवळचे असे आपण ज्यांना समजतो त्यांनी तरी समजून घ्यावं. ही स्पेस कायम हवी असते असं नाही. किंबहुना मनाची ही अवस्था अगदी थोडा वेळ टिकते. पण तेवढा वेळ हवा असतो. संगीतात सुद्धा ताल देताना कालाला किती महत्त्व आहे हे आपण जाणतोच. भरतकाम किंवा विणकाम करतानाही कापडावरील काही भाग रिकामा ठेवला जातो. त्यामुळेच त्या डिझाईनचं सौंदर्य वाढतं.  थोडी स्पेस जरूर असावी. तिचा अतिरेक होऊ देऊ नये. नाही तर एकटेपणा वाढेल. एकमेकांना समजून घेतलं तर आयुष्य किती सुंदर असेल नाही?                  

Sunday, 15 April 2018


बाळा आम्हाला माफ कर.... 

सगळं बरं चाललय असा फील येताच मन हेलावून टाकणारं, मनस्ताप देणारं आणि हतबलतेची भावना वाढवणारं काहीतरी घडतं. आपल्या आजुबाजुला त्रासदायक असं बरच काही घडतच असतं. पण जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा एखाद्या घटनेबाबत मनस्ताप करून घेण्यापलिकडे आपण काहीच करू शकत नाही.  माणूस म्हणून लाज वाटावी आणि त्यासाठी आपण काहीच करू शकत नसावं ही हतबलता अशी भावना या क्षणी जोर धरून आहे. हो मी असिफाबद्दल बोलतीय. आत्ता हे लिहिताना सुध्दा डोळ्यात पाणी येतय. काय झालं असेल त्या पिल्लूला ते सगळं सहन करताना ? काय चुकलं होतं तिचं? आपल्या शरीराशी कोणी असं घाणेरडं काहीतरी करतय हे कळल तरी असेल का तिला? ती एवढीशी पोर काय प्रतिकार करणार अशा हीन लोकांचा. 
ती एक असहाय्य मुलगी होती म्हणून तिच्या बाबतीत असं घडलं. ज्या नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला त्यांना काय सुख मिळालं असेल त्या अपरिपक्व शरीरातून? स्त्रीच्या शरीराचा भोग घेताना पुरुष म्हणून मिळणारं समाधान तर नक्कीच नाही. मग ही वृत्ती कुठून आली असेल ? एका कोवळ्या जीवाचा असा बाजार मांडताना जनाची जाऊदे मनाची लाज वाटायला हवी होती यांना. काही वेळा मुलींच्या कपड्यांवरून असं बोललं जातं की, आजकाल मुली कमी कपडे वापरतात, नको त्या फॅशन्स करतात.  मग मुलांनी - पुरूषांनी त्रास दिला की ओरडतात. पण असिफाच्या बाबतीत काय झालं होतं? हेच काय कोणतीही चूक नसताना तिच्या वाट्याला हे का आलं मग? 
असिफासाठी आता खूप मोर्चे निघतील. लोक हळहळतील. सोशल मिडियावर, पेपरमधून लेख येतील. पण असिफा तर गेली. काहीही कारण नसताना. हा सगळा प्रकार कुठे घडला यापेक्षा हे सगळं करणा-यांच्या मानसिकतेचा संताप येतोय. कारण माणसाचं मन बेडर झालं की देऊळ काय आणि घर काय . त्याला काही फरक पडत नाही. पवित्र अशा धार्मिक उत्सवात दारु पिऊन झिंगणारे आपल्यासाठी नवीन नाहीत. त्यामुळे धर्म, जात, ठिकाण या सगळ्यापेक्षा हे घाणेरडं कृत्य करणा-यांच्या हीन मानसिकतेचा राग येतोय. 
या हरामखोरांना अशी शिक्षा व्हायला हवी ही यापुढच्या काळात असा विचार मनात आला तरी हातपाय चळाचळा कापायला हवेत. काय होईल माहित नाही. काही दिवस चर्चा, वर्षभरानी काहीतरी शिक्षा. दरवर्षी याच दिवशी मोर्चा. यापलिकडे काय होणार? कधी कधी वाटतं,  हिंदी सिनेमात दाखवतात तसं सामान्य लोकांच्या ताब्यात द्या यांना. ज्या वेदना त्या छोट्या जीवानी सहन केल्या त्या या राक्षसांना सुध्दा करूदेना. ती परत येणार नाही. तिच्या आई बाबांना कितीही संताप आला तरी दडपणांमुळे ते काय करू शकतील माहिती नाही. ही अस्वस्थता मात्र त्रास देत राहील. एकच म्हणावसं वाटतं, असिफा, बाळा, अश्रू ढाऴण्यापलिकडे आणि संताप व्यक्त करण्यापिलकडे तुझ्यासाठी आम्ही काहीही करू शकत नाही. प्लीज , बाळा आम्हाला माफ कर. 

Saturday, 24 February 2018

हवाहवाई.....



आज मी खूप ऱडले... कोणाला कळेल असं नाही... आतल्या आत...नेहमी आनंदी रहा असं म्हणणारी मी आजची घटना डील करू शकले नाही. आज माझी सर्वात आवडती अभिनेत्री गेली.. हो.. श्रीदेवी गेली.. काही लोक नकळत आपल्या आयुष्याचा भाग होतात. प्रत्यक्षपणे involved असतातच असं नाही. श्रीदेवीचं आणि माझं असंच काहीसं नातं होतं. अगदी पाचवीत असल्यापासून मी तिची फॅन आहे. काही वेळा तिच्या आवाजावरून तिची टिंगल करणा-या माझ्या अनेक मैत्रिणींना मी गप्प केलं आहे. 
ती या जगात  नाही हे जेव्हा मला कळलं तेव्हा खूप पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटलं. इतक्या सगऴ्या अभिनेत्रींमध्ये मला तीच का आवडते माहिती नाही .अगदी सुरूवातीच्या काळातले तिचे सिनेमे असो की इंग्लिश विंग्लिश असो सिनेमात श्रीदेवी आहे म्हणून मला तो आवडायचा. तिचे डोळे, तिचा चेहरा, तिचा डान्स सगळच लाजवाब. सौंदर्य आणि अभिनय याचा ती सुंदर मिलाफ होती. काही वेळा मला चिडवायचे सुध्दा, खरं तर एखादा हीरोदेखील आवडायला हरकत नव्हती. पण श्रीदेवीइतकं मला कधीच कोणीही आवडलं नाही. 
मला आठवतय पाचवीपासून मी तिचे वेगवेगवळे फोटोज जमा केले होते. आम्हा मैत्रिणींमध्ये डिलही व्हायचं. माझ्या एका मैत्रिणीला अमीर खान खूप आवडायचा. मला श्रीदेवी. मग माझ्याकडे अमीर खानचे फोटो असतील तर मी तिला द्यायची आणि तिच्याकडे श्रीदेवीचे असतील तर ती मला द्यायची. पण त्यामध्ये २ अमीर तर ४ श्रीदेवी असं असायचं. आत्ताही हे सगळं लख्ख आठवतय. मला ती आवडायची , पण तिला प्रत्यक्ष भेटावं असं कधी नाही वाटलं. तिचा सदमा हा सिनेमा मी ८ वेळा पाहिलाय. ''हरिप्रसादको पट्टा मिलेगा''  म्हणणारी निरागस श्रीदेवी आणि सिनेमाच्या शेवटी ट्रेनमध्ये बसून जाणारी सुंदर श्रीदेवी.. लाजवाब अभिनय... अर्थात या सगळ्यात कमल हसनचाही वाटा आहे. 
वैयक्तिक आयुष्यात इतकी दुःखी असणारी ही अभिनेत्री पडद्यावर किती Full of life होती. परवाच तिचा चांदनी पुन्हा एकदा पाहिला. भुरळ पाडणारं  नैसर्गिक सौंदर्य, निरागसपणा, तितकाच खोडकरपणा, आर्मीमधला तिचा सूड घेण्याची इच्छा असणारा चेहरा, सदमा मधला भाबडेपणा, हवाहवाई म्हणून तिनी केलेली जादू, चालबाजमधला डबल रोल अशी कितीतरी  रूपं धडाधड डोळ्यासमोर तरळून गेली. 
पण एक बरं वाटलं श्रीदेवीला खितपत राहून मृत्यू आला नाही. सतत हसणारी श्रीदेवी हसतमुखानीच गेली. ''ना जाने कहा से आयी है ना जाने कहाको जायेगी... दिवाना हमे बनायेगी ये लडकी'' असं तिचे रसिक आजही म्हणतील. पण तिचं तिनी खरं केलं..'' किसीके हात ना आयेगी ये लडकी... ''
तिची आठवण माझ्यासारख्या असंख्य रसिकांच्या मनात कायम रहाणार आहे. त्या  आठवणींच्या रूपात ती जिवंतच असणार आहे.... 

Tuesday, 13 February 2018


या जन्मावर शतदा प्रेम करावे...




आज प्रेमदिन आहे आणि आज काही लिहावं वाटू नये असं होऊचं शकत नाही. ‘पीनेवालो को पिने का बहाना चाहिये’ तस आहे. प्रेम या भावनेवर लिहिण्यासाठी कोणत्या दिवसाची गरज काय? पण तरी आज प्रेमदिनाच्या दिवशी काही तरी लिहावं असं मनात आलं. प्रेम या भावनेवर प्रेम करावं असं मला नेहमी वाटत. व्यक्तीवर केलेल्या प्रेमाला खूप मर्यादा आहेत. मुळात संपूर्णपणे आपली वाटावी अशी व्यक्ती मिळणच दुरापास्त. फार कमी नशीबवान लोकांना असं प्रेम मिळतं. पण असं प्रेम मिळाल नाही तर .... आयुष्यात इतर अनेक गोष्टी आहेत ज्यावर आपण प्रेम करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या स्वत:च्या जीवनावर, जगण्यावर प्रेम करणं.
काल एक खूप छान गोष्ट समजली. चित्रकार जेव्हा चित्र काढतो तेव्हा तो त्याच्या मनातले विचार चित्रातून मांडत असतो. चित्रकाराच्या मन:स्थितीचं, विचारांचं चित्रण त्या चित्रात असतं. खर तर प्रत्येक कलाकृतीचं तसच आहे. पण चित्राच्या बाबतीत काल एक खूप छान गोष्ट समजली. जी आपल्या जीवनात लागू पडते. माझ्या एका चित्रकार मित्रानी सांगितलं, ‘जेव्हा एखाद चित्र up to the mark होत नाही किंवा अगदी साध्या भाषेत बिघडतं तेव्हा ते चित्रं दुरुस्त करणं फार कमी चित्रकारांना जमत. बऱ्याचदा कॅनवास फेकून देण्याकडे कल असतो.’ आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडतात ज्यामुळे आयुष्याचा कॅनवास फेकून द्यावासा वाटतो. पण खरा चित्रकार बनून त्या बिघडलेल्या चित्रावर काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण कॅनवास फेकून देणं तुलनेनी सोपं आहे. एकदा असं बिघडलेलं चित्र पुन्हा एकदा डोळ्यांना आनंद देणारं झालं की त्या चित्राची किंमत काय असेल हे आपण सांगूच शकत नाही.
प्रेमदिनाच्या निमित्तानी हा संदेश मनात कायम मनात ठेवायला हवा. जीवन एकदाच मिळतं, काही कारणांनी ते अगदी नकोसं झालं तरी त्यामध्ये हवेपणाचे रंग भरणं आपलच काम आहे. स्वत:वर, आपल्या जीवनावर प्रेम करण्यानी हे सहज शक्य होईल. कारण प्रेमात खूप ताकद असते. अगदी नव्हत्याचं होतं करण्याची. अनेक वेळा आपल्या मध्ये असणाऱ्या ताकदीचा आपल्यालाच अंदाज नसतो. कारण आपलं स्वत:वर प्रेमच नसतं. सगळ्या जगाची काळजी घेता घेता आपण आपल्याकडे कसं दुर्लक्ष करू लागतो ते कळतच नाही. आज प्रेमदिनाच्या निमित्तानी जगावर प्रेम करता करता स्वत:कडे लक्ष देऊया का?

Sunday, 17 December 2017


अज्ञात प्रवास...

आज खूप दिवसांनी तुमच्याशी बोलायचं ठरवलं. तस रोज काही ना काही डोक्यात, मनात चालू असतच. पण वेऴेच तंत्र जमेना राव. रोज मनात येणा-या विचारांना वाट करून देण्यासाठीच हे माध्यम निवडलं आणि त्यासाठीच वेळ मिळत नाहीये. खरचं माणसाचं आयुष्य किती चमत्कारिक असतं नाही. ज्यासाठी आटापिटा करतो, अट्टाहास करतो ते तेव्हा न मिळता, आयुष्याच्या अगदी वेगळ्या वऴणावर मिळतं. आपण आपल्या मनानी एखादी गोष्ट मिळावी असं ठरवतो. त्यासाठी प्रयत्न देखील करतो. पण बराच प्रवास केल्यानंतर हे लक्षात येतं की बहुतेक हे काही आपल्याला मिळणार नाही. ''मग कोल्ह्याला द्राक्ष आंबट'' या म्हणीप्रमाणे त्या गोष्टीचा नाद सोडून देतो. ती गोष्ट मिळावी म्हणून सुरू केलेल्या प्रवासात हव्या - नकोशा खूप गोष्टी वाट्याला येतात. पण त्या त्या वेळी मनाला समजावून सांगितलं जातं की, wait.... अच्छे दिन आने वाले है. कधी कधी हा प्रवास इतका लांबतो की मुक्कामाच्या ठिकाणाचा विसर पडतो. त्या सुंदर गोष्टीची वाट बघणं कमी कमी होतं. आहे त्या परिस्थितीत आपण किती सुखात आणि छान राहू  शकतो यावर मन विचार करू लागतं. आहे तेच सगळ आवडायला लागतं. हव्या असणा-या गोष्टीशी तुलना करून समोर येणा-या अनेक बाबी स्वीकारल्या जातात. काही वेळा जाणीवपूर्वक,  ब-याचदा नाईलाजानी. मग एकदा स्वीकारलं की ते पुढे न्यावच लागत. काहींना वाटतं , अरे तेव्हा तर आनंदानी स्वीकारलं होतं. मग आता काय झालयं ? 
पण मन ही चीज काय बनवलीय देवानी.. त्याच्या विरूध्द आपण फार काळ गोष्टी दामटवून नेऊ शकत नाही. मन आपल्याला त्याच्या मनासारख वागायला सतत प्रवृत्त करतं. समाधान हे मानण्यावर आहे. पण ते कोणाच्या मानण्यावर ? ब-याचदा दुस-यांच्या. सगळे नियम, अटी, संवेदना, भावना प्रत्येक जण स्वतःच्या मनाप्रमाणे ठरवतो. पण हे सगळं दुस-याला मान्य असेलच असं नाही. मी म्हणेन तसं.. अशी भूमिका घेणा-यांना हे नाही पटणार. समाज.. समाज म्हणून आपण ज्याचा उदो उदो करतो, तो समाजही घडी घडी बदलतो. स्वतःच्या सोयीप्रमाणे अर्थ लावतो. मग मन विचारतं... हा अधिकार मला का नाही? 
या विचार मंथनात चुकीच्या व्यक्ती, चुकीचे विचार, चुकीच्या कृती होण्याची शक्यता जास्त असते. कारण मनाचा शोध चालू असतो. त्याच्या मनासारखं मिळेपर्यंत हा शोध संपत नाही. कित्येकदा त्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागेल की काय असही होतं. चूक, बरोबर या व्यक्तीसापेक्ष संकल्पना आहेत. हे कितीही पटलं तरी अमका चुकला किंवा त्याचा तो विचार चूक आहे असं आपण सगळे सर्रास म्हणतोच की. आपल्या वागण्यानी सो क़ॉल्ड समाजाची घडी बिघडू नये यासाठी मनाचा सुरक्षित प्रवास सुरू होतो. आपल्यासाठी समाज का समाजासाठी आपण. समाजाला रूचेल असं आयुष्य म्हणजे नक्की कोणाचं. कारण समाजानी तर देवांनाही सोडलं नाही. विचारांना वेग देत देत मनाचा प्रवास सुरूच.... 
अचानक... मुक्कामाचं ठिकाण येतं. अगदी हवं तस. मग मन सांगत, अरेच्चा हेच ते. असच तर हवं होतं. असच जगायचं होतं. चमत्कार घडावा असं होतं सगळं. सुखद अनुभूतींनी मन भारावून जातं. प्रवासात झालेल्या चुका, केलेल्या चुका, चांगल्या गोष्टी, भेटलेली माणसं, घटना सगळ आठवून केलेल्या प्रवासाची निष्फळता जाणवते. कशासाठी मांडला हा पसारा ? असं वाटू लागतं. वास्तव आणि कल्पना यांची जुगलबंदी सहन होत नाही. मिळालेल्या मुक्कामाच्या ठिकाणी मन विसावा घेत पुन्हा एकदा लढण्याचं बळ मिळवतं. सुरू होतो पुन्हा एक अज्ञात प्रवास. खूपसा हवासा.....

Wednesday, 16 August 2017


प्रेमाचा नवा अर्थ.....



आज सकाळी  आकाशवाणी पुणे केंद्रावर माझ्या आवडत्या विषयावर 'चिंतन' लागलं होतं. खरं तर चिंतनमध्ये नेहमी तत्वज्ञान, अध्यात्म या विषयांवर वैचारिक सादरीकरण असतं. अर्थात मला आवडणारा विषयही वैचारिक बैठक असणाराच आहे. पण तो चिंतनमध्ये येईल असं वाटलं नव्हतं. तो विषय म्हणजे अर्थातच प्रेम. मी खूपदा हे बघितलय जेव्हा मनामध्ये विचारांच काहूर उठलेलं असतं तेव्हा देव त्यावर उत्तर म्हणून काहीतरी पाठवतोच. आजही तेच झालं. प्रेम करणा-या माणसाला प्रेम मिळतच असं नाही. अशी लोकं खूप नशीबवान असतात, ज्यांच्या प्रेमाला प्रतिसाद मिळतो. या सगळया विचारांच्या गर्तेत असतानाच एक छान विचार मिळाला. प्रेमाच्या प्रतिसादाची अपेक्षा न करता प्रेम करता आलं तर... विचार वाटतो तितका सोपा नाही. पण अशक्य नाही. कारण कोणावरही बळजबरी करून प्रेमाला प्रतिसाद मिळवता येत नाही, मग ते नातं कोणतही असो. प्रेम मिळवणं ही प्रत्येक जीवाची गरज आहे. आपल्यावर कोणीतरी माया करतय, कोणीतरी आपली काळजी घेतय ही भावनाही जीवाला समाधान देऊन जाते. मग ते मिळवण्याचा प्रयत्न करणं ही अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. पशुपक्ष्यांपासून सगळे जीव प्रेमाच्या आणि मायेच्या शोधात आहेत. फक्त प्रेमाच्याच नाही तर प्रतिसादाच्या प्रतिक्षेत आहेत. प्रतिसाद न मिळाल्यास नाराज होणं हेही स्वाभाविकच आहे. 

मग प्रेमाला प्रतिसाद न मिळाल्यास प्रेम करणं बंद करायचं का ? मुळीच नाही. अपेक्षा न ठेवता प्रेम करायचं . कारण प्रेम करणं ही आपली नैसर्गिक गरज आहे. समोरच्याला त्रास न देताही ते करता येतं. हे सगळ बोलायला खूप सोपं आहे. पण करायला तितकच अवघड. प्रेम या संकल्पनेला चौकटीत अडकवल्यानी अपेक्षित प्रतिसादाची वाट बघून आपण चूक करतो. आई मुलावर प्रेम करते तेही अपेक्षेनीच. पण मुलानी प्रतिसाद नाही दिला तरी तिचं प्रेम कमी होत नाही. अगदी अशीच भावना इतरही नात्यांमध्ये आणता आली तर. विचार करून पहा... प्रेमातून अपेक्षा वजा केली की उरतो फक्त आनंद . हा आनंद मिऴवण्यासाठी आपल्याला कोणाचीही गरज नाही. कारण बळजबरी लादून, त्रास देऊन, त्रागा करून काहीच मिळत नाही. त्यापेक्षा प्रेम करणं आणि मिळवणं ही ज्यांची गरज आहे, त्यांनी फक्त प्रेम करावं... अपेक्षा न ठेवता. 

Friday, 2 June 2017


आता तू माझं ऐक....



मनातल्या विचारांवर मात करणं तितकं सोप नाही. कारण हेच मन समोरच्या व्यक्तीबाबत, परिस्थितीबाबत मत तयार करून मोकळं होतं.   कित्येकदा अगदी प्रेमात वागणारी अचानक विचित्र वागु लागतात. त्याची नेमकी कारणं कऴत नाहीत. कारण मनाचं कसं असतं, त्याला जशी सवय लावावी तसं ते adjust होतं. त्याला बिच्चा-याला खरच काही कळत नाही. त्यातल्या त्यात अति संवेदनशील मन     असणा-यांच जरा कठीणच आहे. एखादी व्यक्ती आपल्याशी नीट, पहिल्यासारखी बोलत नाहीये असं लक्षात आलं की, मन विचारांच्या प्रवासाला निघतं. ब-याचदा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधून मिऴत नाहीत. काही वेळा काळ हेच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. पण हे सगळ मनाला समजावून सांगण काही सोप नाही. 
परिस्थितीवर मात करणं एक वेळ सोपं. पण दुस-याच्या विचित्र वागण्यामुळे होणा-या त्रासावर मात करणं खूप कठीण. कारण परिस्थिती बदलणं आपल्या एकट्याच्या हातात आहे. समोरच्या व्यक्तीनी कसं वागावं हे आपल्या हातातच नाही. मला असं वाटतं, खरचं ज्यांना आपली  काळजी वाटते त्यांना आपलं मन, भावना कळतातच. अगदी आपलं चुकत असलं तरी अशी माणसं आपल्या विचित्र वागण्याकडे लक्ष देत नाहीत. आपल्या मनःस्थितीचा विचार करून , आपल्याला बरं वाटावं म्हणून जे करायचं ते करतात. पण नीट विचार केला तर असही वाटतं, खरच असं असतं? म्हणजे आपल्या मनातलं दुःख, नाराजी दूर करणं कोणाला जमू शकतं? किंवा कोणाला खरच त्याचं इतकं पडलेल असतं? 
त्रास कमी होऊन आनंदी तर रहायच आहे. पण कोणी मदत करत नाहीये. अशा वेळी त्रास होतो. पण एक मात्र खरं की, अशा परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मदत न करणारे आपले नाहीत हा साक्षात्कार तरी होतो. मग मनाचा प्रवास सुरू होतो एका वेगळ्या दिशेनी. ही उदासी, एकटेपणा दूर करण्यासाठी मनाला वेगळ्या कामात गुंतवलं की ते ऐकतं. अर्थात ते येड्यागबाळ्याचं काम नाही. कारण मनाला असं नेहमीच वाटतं की, कोणीतरी गोंजारावं, समजूत काढावी . पण मनानी आपल्यावर राज्य करण्याआधी आपणच त्याच्यावर स्वार झालं की मग त्याची थोडी पंचाईत होते. हे सगळं म्हणलं तर अतिशय सोपं आहे, नाही तर अशक्य. पण आपला जन्म अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठीच झालाय बॉस. कारण दुःखी, कष्टी रहाणं हे काही आपल्यासारख्यांना शोभत नाही. चला तर मनाला वेगळ्या कामांमध्ये गुंतवून त्याची पंचाईत करण्याचा प्रयत्न करू या. पाहू तरी जमतंय का?