या जन्मावर शतदा
प्रेम करावे...
आज प्रेमदिन आहे आणि
आज काही लिहावं वाटू नये असं होऊचं शकत नाही. ‘पीनेवालो को पिने का बहाना चाहिये’
तस आहे. प्रेम या भावनेवर लिहिण्यासाठी कोणत्या दिवसाची गरज काय? पण तरी आज
प्रेमदिनाच्या दिवशी काही तरी लिहावं असं मनात आलं. प्रेम या भावनेवर प्रेम करावं
असं मला नेहमी वाटत. व्यक्तीवर केलेल्या प्रेमाला खूप मर्यादा आहेत. मुळात
संपूर्णपणे आपली वाटावी अशी व्यक्ती मिळणच दुरापास्त. फार कमी नशीबवान लोकांना असं
प्रेम मिळतं. पण असं प्रेम मिळाल नाही तर .... आयुष्यात इतर अनेक गोष्टी आहेत
ज्यावर आपण प्रेम करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या स्वत:च्या जीवनावर,
जगण्यावर प्रेम करणं.
काल एक खूप छान
गोष्ट समजली. चित्रकार जेव्हा चित्र काढतो तेव्हा तो त्याच्या मनातले विचार
चित्रातून मांडत असतो. चित्रकाराच्या मन:स्थितीचं, विचारांचं चित्रण त्या चित्रात
असतं. खर तर प्रत्येक कलाकृतीचं तसच आहे. पण चित्राच्या बाबतीत काल एक खूप छान
गोष्ट समजली. जी आपल्या जीवनात लागू पडते. माझ्या एका चित्रकार मित्रानी सांगितलं,
‘जेव्हा एखाद चित्र up to
the mark होत नाही किंवा अगदी
साध्या भाषेत बिघडतं तेव्हा ते चित्रं दुरुस्त करणं फार कमी चित्रकारांना जमत.
बऱ्याचदा कॅनवास फेकून देण्याकडे कल असतो.’ आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडतात
ज्यामुळे आयुष्याचा कॅनवास फेकून द्यावासा वाटतो. पण खरा चित्रकार बनून त्या
बिघडलेल्या चित्रावर काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण कॅनवास फेकून देणं
तुलनेनी सोपं आहे. एकदा असं बिघडलेलं चित्र पुन्हा एकदा डोळ्यांना आनंद देणारं
झालं की त्या चित्राची किंमत काय असेल हे आपण सांगूच शकत नाही.
प्रेमदिनाच्या
निमित्तानी हा संदेश मनात कायम मनात ठेवायला हवा. जीवन एकदाच मिळतं, काही कारणांनी
ते अगदी नकोसं झालं तरी त्यामध्ये हवेपणाचे रंग भरणं आपलच काम आहे. स्वत:वर,
आपल्या जीवनावर प्रेम करण्यानी हे सहज शक्य होईल. कारण प्रेमात खूप ताकद असते.
अगदी नव्हत्याचं होतं करण्याची. अनेक वेळा आपल्या मध्ये असणाऱ्या ताकदीचा
आपल्यालाच अंदाज नसतो. कारण आपलं स्वत:वर प्रेमच नसतं. सगळ्या जगाची काळजी घेता
घेता आपण आपल्याकडे कसं दुर्लक्ष करू लागतो ते कळतच नाही. आज प्रेमदिनाच्या
निमित्तानी जगावर प्रेम करता करता स्वत:कडे लक्ष देऊया का?
एकदम सही..
ReplyDeleteछान. जीवनाला दिलेली चित्राची उपमा उत्तम
ReplyDeleteमस्त ग नेहमीप्रमाणे
ReplyDelete