Thursday, 16 June 2016


बरस आता तू....


खरं म्हणजे या दिवसांमध्ये  एव्हाना मी तुझ्यावर तीन चार लेख लिहीले असते. पण तू अजून आलाच नाहीस. तुझ्या येण्याचा गंध , तुझा शिडकावा तनमनाला फुलवणारा...     का असा अंत बघतोयस ? मला मान्य आहे आम्ही सगऴ्यांनीच खुप चुका केल्यात त्याची इतकी मोठी शिक्षा नको देऊस. आता तर म्हणे तुझं येणं लांबलय. हवामान खात्यावर विश्वास ठेवावा असं त्यांच भाकित नसतच. पण तू माझा विश्वास गमवू नकोस प्लीज. गेली दोन वर्ष खरचं खूप वाईट गेलीत. पण या वर्षी नाही.
सगळीकडे कोरडं, उदास वाटतय. तू आल्याचा सारखा भास होतोय. समोरच्या घरावरचे पत्रे चिंब भिजलेत की काय असं रोज सकाळी खिडकी उघडल्यावर वाटतय. सगळे डोंगर भकास, कोरडे, पिवळे पडलेत. या सगळ्यामध्ये आणि माझ्या मनामध्ये चैतन्य फुलवण्यासाठी तुला यावच लागेल. तू आल्यानंतर नाकं मुरडणा-यांकडे तू वक्ष देऊ नकोस. तुझी किंमत आता सगळ्यांनाच कळलीय. मला तर तू कधीही आलास तरी आवडतोस. वेळ अवेळ हे आपल्या नात्यातलं गणित नाहीच, नाही का? 
मुक्त मनाने तू केलेली उधळण कशी विसरता येईल. संथ लयीत तुझं येणं, त्यानंतरचा तुझा आवेग, बरसून चिंब करण्याचं तुझं कसब, कधी कधी आता पुरे हं असं म्हणायला लावणारा तुझा खोडकरपणा, तुझ्या येण्यानी नव्याने काहीतरी करण्यासाठी मिळणारी उर्मी... ओ हो.... खरचं मी तुला खूप मिस करतीय. बहुतेक तुलाही हे कळत असेल, पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते ती वेळ आल्याशिवाय काही होत नाही. पण मला काय वाटतं... आता ती वेळ आलीय. सगळीकडे बरसून, सगळ्यांना तृप्त करून टाक. तू येणार म्हणून किती छान छान गाणी ऐकली पण नाहीत अजून. कांदा भजी नाही, आल्याचा चहा नाही, मक्याचं कणीस नाही. बोअर झालयं खूप. तुझं येणं सगळ्याच दृष्टीनी खूप आवश्यक आहे. वर्षभराचा ओलावा या तीन - चार महिन्यात द्यायचाय तुला. आत्ता उषीर करतोस, मग नको त्या वेळी येऊन सगळा घोळ करतोस. मग सगळे तुला नाव ठेवतात. मला नाही आवडत ते. तुझी काय चूक ? चुका बाकीचे करतातआणि बोल मात्र तुला. आता हे काही नकोच. ठरलं तर.... येतोयस ना ? 

Wednesday, 20 April 2016


कैरीची फोड, लागते गोड..............




हिरवीगार, आंबट, तिखट - मीठ लावलेली मस्त कैरीची फोड. आहाहा... नुसतं म्हणलं तरी तोंडाला पाणी सुटतं. बाजारातून विकत आणून कैरी खाणं हे म्हणजे सणावारी केळ्याची शिकरण खाण्यासारखं वाटतं. कैरी ही काय विकत आणून खायची गोष्ट आहे का ? त्यात माझ्यासारख्या ग्रामीण भागात राहीलेल्यांसाठी तर हास्यास्पदच वाटतं. म्हणजे आमच्या भोरला एस. टी स्टॅंडवर उतरून रिक्षेनी जाणं जितक गमतीदार तितकंच कैरी विकत आणून खाणं. आमच्या गावात रीक्षानी वगैरे फिरायचे लाड नव्हते बरं का. भोरमधले कोणीच रीक्षानी गावात फिरायचे नाही. एस. टी. तून उतरलं की पायी पायी घरी जायचं. आता मात्र परिस्थिती बदललीय. पण आजही मला भोरला उतरून रीक्षा करणं मजेशीरच वाटतं. या भोरमध्येच या दिवसात चोरून  कै-या खाणं हा आमचा आवडीचा छंद असायचा.
हे सगळ मला एकदम आठवलं याच कारण आमच्या समोरच्या एका आज्जींनी मला हाक मारून चक्क चार  कै-या तोडून दिल्या. वर म्हणाल्या, ''तुला हवं तेव्हा कै-या घेऊन जात जा.'' मी मनात म्हणलं साला हे काय जिणं झालं. कै-या अशा सहजतेनी मिळाल्या तर त्याची काय गोडी? झाडाच्या मालकीणीचं लक्ष नसताना हळूच दुपारच्या झोपेच्या वेळी मस्तपैकी कै-या चोरून, घरात आईच्या नकळत तिखट- मीठ- मसाला चोरून , कै-या पाण्यानी न धुता तशाच फोडून खाण्यात कसलं सॉलिड थ्रिल होतं. 

मी आणि माझा भाऊ तर फारच धमाल करायचो. शेजारच्यांच्या झाडाच्या कै-या चौरून आणण्यासाठी आम्ही एक स्पेशल आकडी बनवली होती. किती हे कष्ट....  या बाबतीत देव अगदी आमच्या बाजूनी होता.   झाडं    दुस-याचं पण कै-या मिळायच्या आम्हाला. ते गाणं नाही का, ''बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी?'' तसच काहीसं.  झाड पूर्णपणे आमच्या घराच्या पत्र्यावर झुकलेलं असायचं. त्यामुळे शेजारच्या आजी झोपी गेल्या की आमचे उपद्व्याप सुरू. चुकून कधी त्यांना आवाजानी जाग आली की मग आम्ही मेलोच. त्यात हा सगळा प्रकार आईला कळला की तिच्याकडून मिळणारे धपाटे वेगळेच. पण हे सगळे कष्ट करून जेव्हा फळ (कैरी)मिळायचं तेव्हा तो थकवा अगदी कुठच्या कुठे पळून जायचा. 
शत्रू जितका बलाढ्य तितकं युध्द आणखीन मजेशीर होतं. आमच्या बाबतीत तसच व्हायचं. कैरी काढून आमच्या झोळीत पडताना चुकून त्यांच्या अंगणात पडली आणि आजी आल्या की आम्ही अगदी निरागसतेचा आव आणून त्यांच्याकडे बघायचो. एक कैरी त्यांच्या अंगणात आणि एक आमच्या पत्र्यावर अशा परिस्थितीत त्यांनी पकडलं तर अगदी प्रामाणिकपणे आमची कैरी त्यांच्याकडे टाकायचो. तो प्रामाणिकपणा इतका टोकाचा होता की, ती कैरी बरोबर त्यांच्या गटारीत कशी पडेल अशी फेकायचो. शत्रू बलाढ्य असल्यानी तोही हार मानायचा नाही. ती गटारात पडलेली कैरी सुध्दा त्या आजी उचलून घ्यायच्या. दिवसा हा सगळा प्रकार जरा अवघड वाटू लागला मग आम्ही रात्री कैरीची शिकार करायला बसायचो. आईचा डोळा चुकवून करावी लागणारी ही शिकार आजही उत्साह निर्माण करते. आमचा बलाढ्य शत्रू आज नाही, त्यामुळे अजिबात न घाबरता सगळं वर्णन केलं हा. तसंही आम्ही काय त्यांना घाबरायचो नाही म्हणा, वयाचा मान ठेवून वागायचो झालं. 

आमची पिढी खरच खूप नशीबवान आहे. या अशा थ्रिलिंगच्या गोष्टी आम्ही खूप अनुभवल्या. आत्ताच्या मुलांना यातली गंमत कशी कळणार ? कॅंडी क्रशच्या लेव्हल वाढवणं हेच आत्ताच्या पिढीचं थ्रिल....

Thursday, 25 February 2016


क्षणिक काजवे...... 


उजेडाची फसवी निशाणी
आणि काळोखाचेही भासच....
ही कविता वाचत असताना मनात विचार आले, खरचं सुख आणि दुःख हे सुध्दा काजवेच नाही का? क्षणिक , तात्पुरतं सगऴं. पण आपण सगळेच किती गुंततो यात. सुखाचा एखादा क्षण आनंदाच्या लहरी घेऊन येतो. त्या लहरीत हा क्षणही संपणार आहे याचं भानच रहात नाही. सुखाचे क्षण किती पटकन सरतात. अर्थात आपल्या मनाचा खेळच सगळा. वेळ आपल्या गतीनीच धावतो. सुख ही भावना म्हणजे नेमकं काय? आपल्या मनासारखं झालं की सुख. हे खरं सुख आहे हे कसं ओळखायचं. याचं काही परिमाण नाही. ते व्यक्तिनिहाय बदलत रहातं.  मग मनात प्रश्न येतो, आपल्याला वाटणारं सुख हे तरी कुठे चिरकाल टिकणारं आहे? 

दुःखाचा एखादा क्षण होत्याचं नव्हतं करतो. मनानी त्या गोष्टीला किती महत्त्व दिलय यावर सगळ अवलंबून आहे. त्या क्षणी अगदी धरणी दुभंगुन तिनी आपल्या कुशीत घ्यावं असं वाटतं. शरीर, मन अगदी गऴून जातं. साधा आवाज कोलाहल वाटतो. माणसं नकोशी वाटतात आजुबाजुला. अगदी सहज दिलेली प्रतिक्रियासुध्दा खिजवते.  सगळ संपल असच वाटायला लागतं. . आता पुन्हा पालवी फुटणारच नाही. असं वाटत असतानाच जगण्याचं एखादं खुप छान कारण सापडतं. मग काय पुन्हा उभारी. 
यालाच जीवन म्हणतात. सगऴ इतकं क्षणिक. हे सगऴ कितीही कळत असलं तरी आनंद आणि वेदना व्हायची ती होणारच.  सुखात असताना येणा-या क्षणांचा प्रश्नच नाही. ते हवेहवेसेच वाटतात. पण दुःखातल्या क्षणांना आपल्या पातळीवर शह देण्यासाठी त्यांना म्हणावं....   

चमकते क्षणिक काजवे मग
की तेही वाटेवरचे आभासच.....

Friday, 12 February 2016


मला वेड लागले.....


१४ फेब्रुवारी जवळ येतोय. माझ्या आवडत्या विषयावर बोलण्याचा दिवस. आता सगळीकडे वातावरण गुलाबी व्हायला सुरूवात झालीय. नव्यानी प्रेम करणारे, प्रेमात पडलेले आणि प्रेम जुनं झालेले असे सगळेच पुढच्या दोन , तीन दिवसात एकदम फुलऑन जागे होतील. व्हॅलेंटाईन डे साजरा करावा की नाही, या वादात आपण नको पडायला. या मताशी मी सहमत आहे की प्रेम करण्यासाठी कोणत्या एका दिवसाची वाट बघण्याची गरज नाही. पण तरीही ते व्यक्त करण्यासाठी एखादा दिवस निवडला तर काय हरकत आहे ? महत्त्वाचं आहे प्रेम व्यक्त करणं. 
आशाताई बगेंची एक मस्त कथा वाचली. प्रेमाचा वेगळा अर्थ सांगणारी. ती वाचुन प्रेमाचा अजुन एक अर्थ समजला. संकुचित अर्थानी प्रेम या भावनेकडे बघताच येणार नाही.  एका विशिष्ट नात्यात अपेक्षित प्रेम मिळालं नाही तरी वेगळ्या नातेसंबंधातून ते मिळवता येतं. फ्रेमच्या बाहेर जाऊन, निरपेक्ष असं काहीतरी.    दुस-याबरोबर स्वतःला घडवणारं प्रेम. या प्रेमाचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे अपेक्षा ठेवण्याची इच्छाच होत नाही. कारण हे प्रेम कोणत्याही फ्रेममधलं नाही. अगदी निरपेक्ष असं जगात काहीच नसतं. पण या नात्यात त्या मानानी त्रास कमी होतो. आपल्याला हवं ते मिळालं तर आयुष्याची मजाच निघुन जाईल. कारण मग काहीतरी हवयं या इच्छेचा प्रवास संपेल. आपण आहोत तोपर्यंत इच्छा आकांक्षांचा हा प्रवास चालु रहातोच. त्या त्या वेळी पूर्ण न झालेल्या इच्छा कधीतरी डोकं वर काढतातच. त्यापेक्षा या इच्छांवर स्वार व्हायचं, आपण करत असलेल्या कामामधून. आजुबाजुला अशा अनेक गोष्टी, व्यक्ति असतात ज्या आपल्या त्या इच्छेपेक्षा कितीतरी पट महत्त्व द्याव्यात अशा असतात. कारण जगायचं तर आनंदानी असं एकदा ठरवलं की मग जगावर न रागवता प्रेम करावं अशा अनेक गोष्टी मिळतात. 
मला वेड लागले प्रेमाचे.... असा भाव एकाच व्यक्तिपुरता ठेवला तर अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येऊ शकत. असं कोणी मिळालं आणि अपेक्षांची पुर्तता झाली तर प्रश्नच नाही. पण  ब-याचदा असं होत नाही. पहिलं प्रेम, दुसरं प्रेम, तिसरं प्रेम असं काही नसतं . प्रेम हे प्रेम असतं, आपण गल्लत करतो ते एका ठराविक दृष्टीने त्याकडे बघुन. रस्त्यावरच्या कुत्र्याच्या छोट्याशा पिलाला थंडी वाजत असेल तर त्याच्या अंगावरून प्रेमानी हात फिरवणं, ज्यांना दोन वेळेस अन्न मिळत नाही अशा आपल्याच समाजातील काही लोकांसोबत सण साजरे करणं (फोटो काढुन घेण्यासाठी नाही), वृध्दाश्रमातल्या आजी आजोबांना वेळ देणं (देणग्या नाही), ओझं घेऊन जाणा-या एखाद्या कष्टक-याला मदत करणं, सगळ्यांकडे माणुसकीच्या नात्यानी पहाणं, आपण करत असलेल्या कामावर प्रेम करणं , आपलं एखाद्यावर प्रेम आहे का नाही याचा विचार न करता त्याला त्रास न देता त्याच्या सुखात आनंद मानणं याला प्रेमच म्हणतात ना ? मग असं प्रेमाचं वेड लागलं तर काय हरकत आहे ? हरिवंश राय बच्चन यांची ही कविता असं प्रेम करणा-यांसाठी आणि करू इच्छिणा-यांसाठी 
 प्यार किसी को करना लेकिन, कह कर उसे बताना क्या,
अपने को अर्पण करना पर, और को अपनाना क्या.
ले लेना सुगंध सुमनों की, तोड उन्हे मुरझाना क्या,
प्रेम हार पहनाना लेकिन,प्रेम पाश फैलाना क्या.
त्याग अंक में पले प्रेम शिशु,उनमें स्वार्थ बताना क्या,
दे कर हृदय हृदय पाने की, आशा व्यर्थ लगाना क्या....

Sunday, 24 January 2016


         
आई   होण्याआधी, झाल्यावरही...



एक  सिरिअल म्हणून व्हॉट्सअॅप वर  सगळीकडेच खुप टिंगल केली गेली अशी सिरिअल म्हणजे होणार सून मी....  याविषयी अनेकांची वेगवेगळी मतं असतील. काहींना ती सिरिअल, त्यामधली पात्रं खूप आवडतही असतील. माझ्या  आजच्या ब्लॉगचा विषय तो नाही.  पण परवाच्या एपिसोडमध्ये एक कमाल सीन दाखवला. खरच कमाल. आपली बायको आपल्या बाळाला जन्म देत असताना वेदना होणारा नवरा सिरिअलमध्ये दिसला. खुप बरं वाटलं. 
हे  एक निमित्त झालं . पण त्या निमित्तानी डोक्यात विचार सुरू झाले.   बाळ हे दोघांच असतं . पण निसर्गनियमानुसार भोगावं लागतं आईला. अर्थात हे भोग ती आनंदाने भोगते. हे भोग आहेत, दुःख आहे असं तिला कधी वाटतच नाही. आपल्या जीवातून दुसरा जीव जन्माला घालणं ही अदभुत गोष्ट आहे. हे वरदान फक्त स्त्रियांनाच मिळालं आहे. त्यासाठी परमेश्वराचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. 
मुलाची चाहुल लागल्यापासून त्याला जन्म देईपर्यंत आई कितीतरी दिव्यं पार करत असते. तिचं आयुष्यच बदलून जातं. स्वतःसाठी काहीतरी करणारी ती आपल्या पिलासाठी जगू लागते. आई कितीही आधुनिक विचारांची असली तरी आपल्या होणा-या मुलाबाबत ती तितकीच सेंटी असते, किंबहुना तिने असलं पाहिजे. शिक्षण, नोकरी या धबडग्यात लग्न, संसार, मुलं होणं या आनंदापासून आपण वंचित रहात नाही आहोत ना ? याचा विचार आत्ताच्या पिढीनी करायला हवा. या संदर्भातले सगळे प्रॉब्लेम्स योग्य वेळी,  योग्य गोष्टी न केल्यानी होतायत असा निष्कर्ष पुढे येतोय. नोकरी आणि करिअर हे महत्त्वाचं आहेच. पण आई होण्याचा आनंद त्यापेक्षा कितीतरी मोलाचा आहे. स्वतःपुरतच जगण्यात काय अर्थ? समाजाला एक आदर्श, सुजाण, सुशिक्षित नागरिक देणं हीसुध्दा आपली जबाबदारी आहे. विशेषतः बुध्दिजीवी पिढीची नितांत गरज आहे. त्यामुळेच दात आहेत तिथे चणे नाहीत , चणे आहेत तिथे दात नाहीत अशी अवस्था झालीय. 
एकीकडे हा प्रश्न आहे, तर दुसरीकडे कमी होत चाललेली आपुलकी. मुलं जर दोघांच आहे, किंबहुना सगळ्या घराचं आहे तर त्या आईची काळजीदेखील सगळ्यांनी घेतली पाहिजे. विशेषतः तिच्या जोडीदारानी. या दिवसांमध्ये होणारी भावनिक आंदोलनं, चिडचिड, वेदना, अवघडलेपणा समजुन घेतला पाहिजे. ही वेदना शेअर करता येत नाही. पण मी तुझ्यासोबत आहे असा आधार तरी देता आला पाहिजे. कारण या वेदना फक्त ती आईच जाणू शकते. भक्कम मानसिक आधारानी ती ही वेदना सहन करते. सिरिअलमध्ये दाखवलेला श्री फारच अति आदर्श वागतो. पण आपल्या बायकोच्या बाळंतपणात तिची वेदना शेअर करणं अति वाटत नाही. किंबहुना ते आवश्यक वाटतं. खात्या, पित्या घरच्या गरोदर स्त्रियांचे लाड होत असतीलही. पण आजही मोलमजुरी करून बाळाला जन्म देणा-या कुपोषित माता आहेतच. आजही मुलीची गर्भ असेल तर गर्भपात करून घे असं म्हणणारे बाप आहेतच की. त्यांच्या नशीबात दोन वेळचं अन्न सुध्दा नाही, तर प्रेमळ आणि इतकी काळजी घेणारा नवरा शक्यच नाही. स्त्रिच्या या नव्या पर्वाच्या सुरूवातीला त्यानी तिच्याजवळ असणं must आहे. तिला होणारा त्रास त्याला समजणं गरजेचं आहे. निरोगी बाळाला जन्म देण्यासाठी पोषक आहाराची जितकी गरज आहे तितकीच पोषक मानसिकतेची सुध्दा आहेच. तिच्या मनाला होणारा आनंद होणा-या बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. 
ही फेज अजून ज्यांच्या आयुष्यात यायची आहे त्यांनी याचा विचार करावा. ज्यांच्या आयुष्यात ही फेज येऊन गेलीय, त्यांनी आपल्या बाळाच्या आईची काळजी घ्यायला हवी.  निदान उरलेल्या आयुष्यात तरी पोषक मानसिकता जपण्याचा प्रयत्न करायला हवा. तरच आत्ताची पिढी अधिक संवेदनशील, सजग आणि सुजाण होईल. 

Saturday, 28 November 2015

 हरवलेली माणुसकी .....


खरं तर लिहिण्याचा मूड कायम असतो. रोज काही ना काही तरी असं घडतच की त्यावर आवर्जून लिहावं असं वाटतं. पण priorities या नावाखाली आपल्याला काय हवय ते करणच आपण सोडून देतो. वेळ ही एक अशी गोष्ट आहे जेव्हा ती आपल्याकडे असते तेव्हा तिची किंमत कळत नाही .  जेव्हा ती   निघून जाते तेव्हा कितीही साक्षात्कार झाला तरी त्याचा उपयोग नसतो.  म्हणून आज ब-याच दिवसांनी वेळेचा सदुपयोग करत तुमच्याशी संवाद साधतीय. 
जग बदलतय असं आपण सगळेच नेहमी म्हणतो. आपणही बदलतोय हे मात्र लक्षात येत नाही. जगाप्रमाणे वागून आपण आपलं असं काही ठेवत नाही. खरं म्हणजे असं करायची काही गरज नाही. आपण जसे आहोत तसेच रहायला काय हरकत आहे. मला तर असं वाटतं आपण वेगळं काही वागायला गेलो तरच गडबड होते. 
जग बदलतय हा अनुभव आपल्या सगळ्यांना  रोजच्या जगण्यात येतोय. काल लोकलमध्ये एक घटना घडली जी मनाला चटका लावून गेली, बरच काही शिकवून गेली.  लोकलमध्ये दहा वर्षांपूर्वी जितकी गर्दी होती त्या मानानी कितीतरी पट गर्दी वाढलीय. ऑफिसच्या वेळांमध्येच नाही तर अगदी कधीही गर्दी असतेच हल्ली. जग बदलतय ना .... अजून एक ठळकपणे जाणवणारा बदल म्हणजे एकमेकांशी तुटलेला संवाद. मोबाईल नामक यंत्रात आपण सगळे इतके गुंतलोय की समोर कोणी बसलय याची जाणीवच नाही. त्यामुळे समोरच्याला होणारा त्रास वाचण्याचा प्रश्नच उरला नाहीये. आपल्याला जागा मिळालीय ना मग झालं तर. एखादा पेशंट उभा असला तरी त्याचा चेहेरा वाचण्यासाठी वेळ आहे कोणाला. आपल्याला मिळालेल्या जागेवर बसणे आणि मोबाईलमध्ये तोंड खुपसणे हेच महत्त्वाचं काम. स्टेशन आलं की उतरून जायचं. पण बदलणा-या या जगात संवादाचा अभाव ही खटकणारी गोष्ट आहे. बर , सहप्रवाशाशी बोलायला जावं तर ते कितपत आवडेल या शंकेनी गप्प बसलेलं बरं असं वाढत चाललय. एखाद्याला काही प्रॉब्लेम असेल तो विचारणं आणि तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे नाक खुपसण्यासारखं झालय. 
संवाद वाढायला हवा हे प्रकर्षानी जाणवलं ती घटना आता सांगते. एक मध्यम वयाची बाई आपल्या दोन मुलांना घेऊन लोकलमधून प्रवास करत होती. डोक्यावर स्कार्फ होता. चेहेरा अगदी नॉर्मल होता. ती आजारी असेल अशी शंकाही आली नाही. नेहमीच्या धबडग्यात बायका चढत होत्या, उतरत होत्या. थोडी जागा झाली की तिथे बसण्यासाठी झुंबड उडत होती. खरं तर मला बसायला जागा हवी होती,  पण त्या बाईला बसायला जागा मिळाली. त्यावेळी तिचा थोडा राग आला. कारण मी बसणार इतक्यात ती बाई बसली. त्याच डब्यात तिची आई लांबून सूचना देत होती,  ''नीट बस, स्कार्फ नीट लाव.''  मला काही कळेना , हा काय प्रकार आहे. शेवटी न राहवून मी विचारलं तेव्हा ती बाई म्हणाली, ''कालच माझी दोन ऑपरेशन्स झाली. एक पोटाचं आणि दुसरं डोक्याचं. नगरच्या पुढे शेवगावला मला जायचं आहे. मुलांच्या शाळा बुडू नयेत म्हणून नव-यानी माहेरी राहू दिलं नाही. '' मी अक्षरशः चाट पडले. काय धीराची आहे ही बाई. सो कॉल्ड नाजुक बायकांनी आदर्श घ्यावा अशी. मला असं वाटलं, अगदी क्षुल्लक आजाराचा बाऊ करण्याची सवय लागलीय का आपल्याला ? 
परिस्थिती माणसाला कोणत्याही दुःखाशी दोन हात करायला शिकवते. त्या व्यक्तिला आपल्या  फक्त मॉरल सपोर्टची गरज असते. पण जग बदलतय या नावाखाली ही माणुसकी दाखवायला आपण कमी पडतोय की
 काय ? 

Thursday, 1 October 2015


अतूट नातं......



खूप दिवस झालेत तुमच्याशी बोलून. रोज शेअर करावं असं काही ना काही असतच. पण गेल्या काही दिवसात नाही जमलं. खुप व्यस्त वगैरे नव्हते. पण तरी नाही वाटलं लिहावं असं .  तुमच्या माझ्यामधला अतूट धागा हा ब्लॉग आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळेच कदाचित मी न बोलताही आपल्यातली कनेक्टिव्हीटी तशीच होती. जशी माझ्या आणि त्याच्यामधली.... ओळखलं असेलच तो कोण ते . बरोबर... पाऊस. आज मला हवा तसा तो आला. अगदी अचानक. कोणत्याही अटीशिवाय , कोणत्याही हानिशिवाय. फक्त आनंद देण्यासाठी. 
रोजच्या आयुष्यातही हल्ली,  उगाच आनंद देण्याचं प्रमाण खूपच कमी झालय. मध्यंतरी तो असा काही रूसला होता की विचारू नका. असं वाटलं , आता येतोय की नाही. खरं तर त्याला रुसण्याचा पूर्ण हक्क आहे. काय विचित्र वागलोय आपण सगळेच. तो मात्र मला हवा तसा. समोरचा कसाही वागला तरी आपण आपल्याला जे योग्य वाटेल तसच वागावं असं सांगणारा. कोणताही राग मनात न ठेवता तो आज बरसला. मनाची काहिली दूर केली. स्वच्छ आणि मोकळा झाला बरसून, अगदी मला हवा तसा. 
अचानक एखादी मनासारखी गोष्ट घडावी तसा आला तो. अगदी दुपारपर्यंत येण्याची चाहूलही न देता मस्त बरसला, मला हवा तसा. अनेकांची धांदल उडवणारा खोडकर, धरणीला तृप्त करणारा मेघदूत, मरगळ घालवणारा आनंददायी अशी किती नावं देऊ त्याला. माझ्या मनात तर तो कायमच भरून असतो. मनाविरूध्द काहीही घडलं की मग त्याला हक्कानी बोलवते. मनात बरसून तो माझं बिनसलेलं पार घालवून टाकतो. बाहेर कितीही वादळं असली तरी मनातला हा पाऊस कुठल्यातरी कोप-यात असाच ठेवायला हवा. कारण बाहेरचं कोणीच मनातली वादऴं, अप्रिय, राग येईल असं दूर करू शकत नाही. बरोबर ना ? कारण प्रत्येक नात्याला लिमिटेशन्स आहेत. कितीही आणि काहीही वाटलं तरी दुस-यासाठी फार काही करता येत नाही आणि कोणी आपल्यासाठी काही करू शकत नाही. या सत्याचा सामना झाला की मनातला पाऊस मस्त बरसतो. आपल्याला हवा तसा. कधी रिमझिम, कधी कोसळणारा, कधी सगळ वाहून नेणारा..... जसा आज तो आला, अगदी मला हवा तसा.