क्षणिक काजवे......
उजेडाची फसवी निशाणी
आणि काळोखाचेही भासच....
ही कविता वाचत असताना मनात विचार आले, खरचं सुख आणि दुःख हे सुध्दा काजवेच नाही का? क्षणिक , तात्पुरतं सगऴं. पण आपण सगळेच किती गुंततो यात. सुखाचा एखादा क्षण आनंदाच्या लहरी घेऊन येतो. त्या लहरीत हा क्षणही संपणार आहे याचं भानच रहात नाही. सुखाचे क्षण किती पटकन सरतात. अर्थात आपल्या मनाचा खेळच सगळा. वेळ आपल्या गतीनीच धावतो. सुख ही भावना म्हणजे नेमकं काय? आपल्या मनासारखं झालं की सुख. हे खरं सुख आहे हे कसं ओळखायचं. याचं काही परिमाण नाही. ते व्यक्तिनिहाय बदलत रहातं. मग मनात प्रश्न येतो, आपल्याला वाटणारं सुख हे तरी कुठे चिरकाल टिकणारं आहे?
दुःखाचा एखादा क्षण होत्याचं नव्हतं करतो. मनानी त्या गोष्टीला किती महत्त्व दिलय यावर सगळ अवलंबून आहे. त्या क्षणी अगदी धरणी दुभंगुन तिनी आपल्या कुशीत घ्यावं असं वाटतं. शरीर, मन अगदी गऴून जातं. साधा आवाज कोलाहल वाटतो. माणसं नकोशी वाटतात आजुबाजुला. अगदी सहज दिलेली प्रतिक्रियासुध्दा खिजवते. सगळ संपल असच वाटायला लागतं. . आता पुन्हा पालवी फुटणारच नाही. असं वाटत असतानाच जगण्याचं एखादं खुप छान कारण सापडतं. मग काय पुन्हा उभारी.
यालाच जीवन म्हणतात. सगऴ इतकं क्षणिक. हे सगऴ कितीही कळत असलं तरी आनंद आणि वेदना व्हायची ती होणारच. सुखात असताना येणा-या क्षणांचा प्रश्नच नाही. ते हवेहवेसेच वाटतात. पण दुःखातल्या क्षणांना आपल्या पातळीवर शह देण्यासाठी त्यांना म्हणावं....
चमकते क्षणिक काजवे मग
की तेही वाटेवरचे आभासच.....
No comments:
Post a Comment