Tuesday, 13 February 2018


या जन्मावर शतदा प्रेम करावे...




आज प्रेमदिन आहे आणि आज काही लिहावं वाटू नये असं होऊचं शकत नाही. ‘पीनेवालो को पिने का बहाना चाहिये’ तस आहे. प्रेम या भावनेवर लिहिण्यासाठी कोणत्या दिवसाची गरज काय? पण तरी आज प्रेमदिनाच्या दिवशी काही तरी लिहावं असं मनात आलं. प्रेम या भावनेवर प्रेम करावं असं मला नेहमी वाटत. व्यक्तीवर केलेल्या प्रेमाला खूप मर्यादा आहेत. मुळात संपूर्णपणे आपली वाटावी अशी व्यक्ती मिळणच दुरापास्त. फार कमी नशीबवान लोकांना असं प्रेम मिळतं. पण असं प्रेम मिळाल नाही तर .... आयुष्यात इतर अनेक गोष्टी आहेत ज्यावर आपण प्रेम करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या स्वत:च्या जीवनावर, जगण्यावर प्रेम करणं.
काल एक खूप छान गोष्ट समजली. चित्रकार जेव्हा चित्र काढतो तेव्हा तो त्याच्या मनातले विचार चित्रातून मांडत असतो. चित्रकाराच्या मन:स्थितीचं, विचारांचं चित्रण त्या चित्रात असतं. खर तर प्रत्येक कलाकृतीचं तसच आहे. पण चित्राच्या बाबतीत काल एक खूप छान गोष्ट समजली. जी आपल्या जीवनात लागू पडते. माझ्या एका चित्रकार मित्रानी सांगितलं, ‘जेव्हा एखाद चित्र up to the mark होत नाही किंवा अगदी साध्या भाषेत बिघडतं तेव्हा ते चित्रं दुरुस्त करणं फार कमी चित्रकारांना जमत. बऱ्याचदा कॅनवास फेकून देण्याकडे कल असतो.’ आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडतात ज्यामुळे आयुष्याचा कॅनवास फेकून द्यावासा वाटतो. पण खरा चित्रकार बनून त्या बिघडलेल्या चित्रावर काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण कॅनवास फेकून देणं तुलनेनी सोपं आहे. एकदा असं बिघडलेलं चित्र पुन्हा एकदा डोळ्यांना आनंद देणारं झालं की त्या चित्राची किंमत काय असेल हे आपण सांगूच शकत नाही.
प्रेमदिनाच्या निमित्तानी हा संदेश मनात कायम मनात ठेवायला हवा. जीवन एकदाच मिळतं, काही कारणांनी ते अगदी नकोसं झालं तरी त्यामध्ये हवेपणाचे रंग भरणं आपलच काम आहे. स्वत:वर, आपल्या जीवनावर प्रेम करण्यानी हे सहज शक्य होईल. कारण प्रेमात खूप ताकद असते. अगदी नव्हत्याचं होतं करण्याची. अनेक वेळा आपल्या मध्ये असणाऱ्या ताकदीचा आपल्यालाच अंदाज नसतो. कारण आपलं स्वत:वर प्रेमच नसतं. सगळ्या जगाची काळजी घेता घेता आपण आपल्याकडे कसं दुर्लक्ष करू लागतो ते कळतच नाही. आज प्रेमदिनाच्या निमित्तानी जगावर प्रेम करता करता स्वत:कडे लक्ष देऊया का?

Sunday, 17 December 2017


अज्ञात प्रवास...

आज खूप दिवसांनी तुमच्याशी बोलायचं ठरवलं. तस रोज काही ना काही डोक्यात, मनात चालू असतच. पण वेऴेच तंत्र जमेना राव. रोज मनात येणा-या विचारांना वाट करून देण्यासाठीच हे माध्यम निवडलं आणि त्यासाठीच वेळ मिळत नाहीये. खरचं माणसाचं आयुष्य किती चमत्कारिक असतं नाही. ज्यासाठी आटापिटा करतो, अट्टाहास करतो ते तेव्हा न मिळता, आयुष्याच्या अगदी वेगळ्या वऴणावर मिळतं. आपण आपल्या मनानी एखादी गोष्ट मिळावी असं ठरवतो. त्यासाठी प्रयत्न देखील करतो. पण बराच प्रवास केल्यानंतर हे लक्षात येतं की बहुतेक हे काही आपल्याला मिळणार नाही. ''मग कोल्ह्याला द्राक्ष आंबट'' या म्हणीप्रमाणे त्या गोष्टीचा नाद सोडून देतो. ती गोष्ट मिळावी म्हणून सुरू केलेल्या प्रवासात हव्या - नकोशा खूप गोष्टी वाट्याला येतात. पण त्या त्या वेळी मनाला समजावून सांगितलं जातं की, wait.... अच्छे दिन आने वाले है. कधी कधी हा प्रवास इतका लांबतो की मुक्कामाच्या ठिकाणाचा विसर पडतो. त्या सुंदर गोष्टीची वाट बघणं कमी कमी होतं. आहे त्या परिस्थितीत आपण किती सुखात आणि छान राहू  शकतो यावर मन विचार करू लागतं. आहे तेच सगळ आवडायला लागतं. हव्या असणा-या गोष्टीशी तुलना करून समोर येणा-या अनेक बाबी स्वीकारल्या जातात. काही वेळा जाणीवपूर्वक,  ब-याचदा नाईलाजानी. मग एकदा स्वीकारलं की ते पुढे न्यावच लागत. काहींना वाटतं , अरे तेव्हा तर आनंदानी स्वीकारलं होतं. मग आता काय झालयं ? 
पण मन ही चीज काय बनवलीय देवानी.. त्याच्या विरूध्द आपण फार काळ गोष्टी दामटवून नेऊ शकत नाही. मन आपल्याला त्याच्या मनासारख वागायला सतत प्रवृत्त करतं. समाधान हे मानण्यावर आहे. पण ते कोणाच्या मानण्यावर ? ब-याचदा दुस-यांच्या. सगळे नियम, अटी, संवेदना, भावना प्रत्येक जण स्वतःच्या मनाप्रमाणे ठरवतो. पण हे सगळं दुस-याला मान्य असेलच असं नाही. मी म्हणेन तसं.. अशी भूमिका घेणा-यांना हे नाही पटणार. समाज.. समाज म्हणून आपण ज्याचा उदो उदो करतो, तो समाजही घडी घडी बदलतो. स्वतःच्या सोयीप्रमाणे अर्थ लावतो. मग मन विचारतं... हा अधिकार मला का नाही? 
या विचार मंथनात चुकीच्या व्यक्ती, चुकीचे विचार, चुकीच्या कृती होण्याची शक्यता जास्त असते. कारण मनाचा शोध चालू असतो. त्याच्या मनासारखं मिळेपर्यंत हा शोध संपत नाही. कित्येकदा त्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागेल की काय असही होतं. चूक, बरोबर या व्यक्तीसापेक्ष संकल्पना आहेत. हे कितीही पटलं तरी अमका चुकला किंवा त्याचा तो विचार चूक आहे असं आपण सगळे सर्रास म्हणतोच की. आपल्या वागण्यानी सो क़ॉल्ड समाजाची घडी बिघडू नये यासाठी मनाचा सुरक्षित प्रवास सुरू होतो. आपल्यासाठी समाज का समाजासाठी आपण. समाजाला रूचेल असं आयुष्य म्हणजे नक्की कोणाचं. कारण समाजानी तर देवांनाही सोडलं नाही. विचारांना वेग देत देत मनाचा प्रवास सुरूच.... 
अचानक... मुक्कामाचं ठिकाण येतं. अगदी हवं तस. मग मन सांगत, अरेच्चा हेच ते. असच तर हवं होतं. असच जगायचं होतं. चमत्कार घडावा असं होतं सगळं. सुखद अनुभूतींनी मन भारावून जातं. प्रवासात झालेल्या चुका, केलेल्या चुका, चांगल्या गोष्टी, भेटलेली माणसं, घटना सगळ आठवून केलेल्या प्रवासाची निष्फळता जाणवते. कशासाठी मांडला हा पसारा ? असं वाटू लागतं. वास्तव आणि कल्पना यांची जुगलबंदी सहन होत नाही. मिळालेल्या मुक्कामाच्या ठिकाणी मन विसावा घेत पुन्हा एकदा लढण्याचं बळ मिळवतं. सुरू होतो पुन्हा एक अज्ञात प्रवास. खूपसा हवासा.....

Wednesday, 16 August 2017


प्रेमाचा नवा अर्थ.....



आज सकाळी  आकाशवाणी पुणे केंद्रावर माझ्या आवडत्या विषयावर 'चिंतन' लागलं होतं. खरं तर चिंतनमध्ये नेहमी तत्वज्ञान, अध्यात्म या विषयांवर वैचारिक सादरीकरण असतं. अर्थात मला आवडणारा विषयही वैचारिक बैठक असणाराच आहे. पण तो चिंतनमध्ये येईल असं वाटलं नव्हतं. तो विषय म्हणजे अर्थातच प्रेम. मी खूपदा हे बघितलय जेव्हा मनामध्ये विचारांच काहूर उठलेलं असतं तेव्हा देव त्यावर उत्तर म्हणून काहीतरी पाठवतोच. आजही तेच झालं. प्रेम करणा-या माणसाला प्रेम मिळतच असं नाही. अशी लोकं खूप नशीबवान असतात, ज्यांच्या प्रेमाला प्रतिसाद मिळतो. या सगळया विचारांच्या गर्तेत असतानाच एक छान विचार मिळाला. प्रेमाच्या प्रतिसादाची अपेक्षा न करता प्रेम करता आलं तर... विचार वाटतो तितका सोपा नाही. पण अशक्य नाही. कारण कोणावरही बळजबरी करून प्रेमाला प्रतिसाद मिळवता येत नाही, मग ते नातं कोणतही असो. प्रेम मिळवणं ही प्रत्येक जीवाची गरज आहे. आपल्यावर कोणीतरी माया करतय, कोणीतरी आपली काळजी घेतय ही भावनाही जीवाला समाधान देऊन जाते. मग ते मिळवण्याचा प्रयत्न करणं ही अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. पशुपक्ष्यांपासून सगळे जीव प्रेमाच्या आणि मायेच्या शोधात आहेत. फक्त प्रेमाच्याच नाही तर प्रतिसादाच्या प्रतिक्षेत आहेत. प्रतिसाद न मिळाल्यास नाराज होणं हेही स्वाभाविकच आहे. 

मग प्रेमाला प्रतिसाद न मिळाल्यास प्रेम करणं बंद करायचं का ? मुळीच नाही. अपेक्षा न ठेवता प्रेम करायचं . कारण प्रेम करणं ही आपली नैसर्गिक गरज आहे. समोरच्याला त्रास न देताही ते करता येतं. हे सगळ बोलायला खूप सोपं आहे. पण करायला तितकच अवघड. प्रेम या संकल्पनेला चौकटीत अडकवल्यानी अपेक्षित प्रतिसादाची वाट बघून आपण चूक करतो. आई मुलावर प्रेम करते तेही अपेक्षेनीच. पण मुलानी प्रतिसाद नाही दिला तरी तिचं प्रेम कमी होत नाही. अगदी अशीच भावना इतरही नात्यांमध्ये आणता आली तर. विचार करून पहा... प्रेमातून अपेक्षा वजा केली की उरतो फक्त आनंद . हा आनंद मिऴवण्यासाठी आपल्याला कोणाचीही गरज नाही. कारण बळजबरी लादून, त्रास देऊन, त्रागा करून काहीच मिळत नाही. त्यापेक्षा प्रेम करणं आणि मिळवणं ही ज्यांची गरज आहे, त्यांनी फक्त प्रेम करावं... अपेक्षा न ठेवता. 

Friday, 2 June 2017


आता तू माझं ऐक....



मनातल्या विचारांवर मात करणं तितकं सोप नाही. कारण हेच मन समोरच्या व्यक्तीबाबत, परिस्थितीबाबत मत तयार करून मोकळं होतं.   कित्येकदा अगदी प्रेमात वागणारी अचानक विचित्र वागु लागतात. त्याची नेमकी कारणं कऴत नाहीत. कारण मनाचं कसं असतं, त्याला जशी सवय लावावी तसं ते adjust होतं. त्याला बिच्चा-याला खरच काही कळत नाही. त्यातल्या त्यात अति संवेदनशील मन     असणा-यांच जरा कठीणच आहे. एखादी व्यक्ती आपल्याशी नीट, पहिल्यासारखी बोलत नाहीये असं लक्षात आलं की, मन विचारांच्या प्रवासाला निघतं. ब-याचदा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधून मिऴत नाहीत. काही वेळा काळ हेच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. पण हे सगळ मनाला समजावून सांगण काही सोप नाही. 
परिस्थितीवर मात करणं एक वेळ सोपं. पण दुस-याच्या विचित्र वागण्यामुळे होणा-या त्रासावर मात करणं खूप कठीण. कारण परिस्थिती बदलणं आपल्या एकट्याच्या हातात आहे. समोरच्या व्यक्तीनी कसं वागावं हे आपल्या हातातच नाही. मला असं वाटतं, खरचं ज्यांना आपली  काळजी वाटते त्यांना आपलं मन, भावना कळतातच. अगदी आपलं चुकत असलं तरी अशी माणसं आपल्या विचित्र वागण्याकडे लक्ष देत नाहीत. आपल्या मनःस्थितीचा विचार करून , आपल्याला बरं वाटावं म्हणून जे करायचं ते करतात. पण नीट विचार केला तर असही वाटतं, खरच असं असतं? म्हणजे आपल्या मनातलं दुःख, नाराजी दूर करणं कोणाला जमू शकतं? किंवा कोणाला खरच त्याचं इतकं पडलेल असतं? 
त्रास कमी होऊन आनंदी तर रहायच आहे. पण कोणी मदत करत नाहीये. अशा वेळी त्रास होतो. पण एक मात्र खरं की, अशा परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मदत न करणारे आपले नाहीत हा साक्षात्कार तरी होतो. मग मनाचा प्रवास सुरू होतो एका वेगळ्या दिशेनी. ही उदासी, एकटेपणा दूर करण्यासाठी मनाला वेगळ्या कामात गुंतवलं की ते ऐकतं. अर्थात ते येड्यागबाळ्याचं काम नाही. कारण मनाला असं नेहमीच वाटतं की, कोणीतरी गोंजारावं, समजूत काढावी . पण मनानी आपल्यावर राज्य करण्याआधी आपणच त्याच्यावर स्वार झालं की मग त्याची थोडी पंचाईत होते. हे सगळं म्हणलं तर अतिशय सोपं आहे, नाही तर अशक्य. पण आपला जन्म अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठीच झालाय बॉस. कारण दुःखी, कष्टी रहाणं हे काही आपल्यासारख्यांना शोभत नाही. चला तर मनाला वेगळ्या कामांमध्ये गुंतवून त्याची पंचाईत करण्याचा प्रयत्न करू या. पाहू तरी जमतंय का? 

Saturday, 20 May 2017

स्त्रीचा सन्मान....


स्त्रीचा सन्मान कसा करावा ? माझ्या मनातल्या या प्रश्नाचं उत्तर मला नुकतच मिळालं. आर्मी मध्ये काम करणा-या एका तरूणानी सांगितलं ,'' स्त्री कोणत्याही नात्यात असो मग ती पत्नी, प्रेयसी, मैत्रीण, बहीण, आई, काकू, मामी, आजी, मावशी, मुलगी अगदी कोणीही . तिला आपल्यासोबत असताना Queen असल्याचा Feel आला पाहिजे.'' अगदी थोडक्यात पण किती मार्मिक उत्तर आहे हे. स्त्रीनी ज्याप्रमाणे सगळी नाती निभावणं गरजेचं आहे, तितकाचं महत्त्वाचा आहे तिचा सन्मान... मग नातं कोणतही असो. तिच्या विचारांचा केलेला आदर पुरूषांच्या कृतीतून दिसणं आवश्यक आहे. 
काळ कितीही बदलला तरी, निदान माझ्या पिढीतल्या स्त्रियांना तरी मनासारखं वागून Queen असल्याचा Feel घेता येत नाही. कारण आम्ही धड ना आधुनिक , ना परंपरावादी. कित्येकदा अगदी साध्या साध्या गोष्टी करतानाही  विचार करावा लागतो. अगदी ताजं उदाहरण, मुंबई - पुणे एक्सप्रेसमध्ये दारात मस्तपैकी बसावं असं वाटलं तर माझ्या चिरंजीवांनी लगेच टोकलं, ''आई, असं काय बसतेस ? त्यापेक्षा उभी रहा.'' (मनात म्हणलं, मामाचा भाच्चा आणि नव-याचा मुलगा बोलला.) त्याच्या जागी तो योग्यही असेल, पण पुन्हा प्रश्न येतो तो Feel घेण्याचा. गोष्ट अगदी साधी असते, पण मनासारखं वागणं जमत नाही. माझ्या आईच्या पिढीतल्या बायका तर या Feel चा विचारही करत नसाव्यात. समर्पित होणं ही त्या पिढीची खासियत. त्यात काय झालं वडिलांच, नव-याचं, मुलाचं ऐकलं म्हणून. आपल्या भल्यासाठीच असतं ना सगळं? हे तिच्या पिढीकडून मिळालेले संस्कार. त्यांच्याही भल्याचं आम्ही मुलींनी काही सांगितलं तर ऐकलं जातच अस नाही. पण हे सगळं बोलायचा प्रश्नच नाही. कारण हा feel असं जे मी म्हणतीय ना, त्याचं गांभीर्यच त्या पिढीला कळलेलं नाही. आणि ते समजावून सांगणं आमच्या पिढीला कळलेलं नाही. नंतर कटकट नको त्यापेक्षा तो, ते काय म्हणतात तसं करूया असं म्हणण्यातच शहाणपणा वाटू लागतो. पण या भावनांचा स्फोट नको तिथे होतो आणि मग अरे ही अशी विचित्र काय बोलतेय ? असंही समोरच्याला वाटू शकतं. मनात चाललेल्या या विचारांसरशी एक गोष्ट जाणवली, आयुष्य खरच खूप साधं , सोप्प असतं. सन्मान दिला तर नक्की मिळतो. हा सन्मान देण्यासाठी मनात आधी प्रेमाची भावना असावी लागते. 
 पण परवा सहज या प्रश्नाचं उत्तरं मिळालं.  ''Queen असल्याचा Feel ''.. wow... ब्लॉग वाचणा-या माझ्या प्रिय मित्रांनो, भावांनो हा Feel देता आला की तुम्ही आपोआप king सारखं Feel करालं.. काय मगं Feeling लक्षात आली ना ?....

Friday, 5 May 2017

अलवार तुझी चाहुल ......



अलवार तुझी चाहुल , का धडधडते हे ऊर ..... तू येणार असलास की असच होतं. तुझ्या येण्याची चाहुल लागताच मन अगदी कातर होतं. तुला कसं कळतं रे मला तुझी आठवण येतीय हे ? मातीच्या मोहमयी सुगंधावरूनच कळत.. आता तू येणार. कदाचित माझ्या आजुबाजुला कुठेतरी तू बरसूनही गेला असशील. अजून मला चिंब भिजवलं नाहीयेस. पण उन्हाच्या या काहिलीमध्ये तुझ्या येण्याची चाहुलच खूप काही देऊन जाते. 
आज दुपारीच मळभ दाटून आलं होतं. जस मनात वादळी विचारांच.. कडवट भावनांच.. नकारात्मक आठवणींच येतं अगदी तसच. पण हे मळभ आलं की मनातून कुठेतरी साद येते, आता तू येणार. जेव्हा जेव्हा विचारांच हे मळभ येतं तेव्हा तेव्हा तू हमखास येतोसच. कारण तुझ्या माझ्या नात्याला वेळेचं गणित नाही. हे नातं आहे भावनेचं. मला त्रास होतोय, मनात काहुर उठलय हे तुला कसं कळतं? पण दर वेळी मनातलं हा त्रास तुझ्या येण्यानी मावळतो. पुन्हा एकदा जगण्याची इच्छा निर्माण होते, नुसत्या तुझ्या चाहुलीनी. आज आकाशात ढगांचा गडगडाट ऐकला आणि म्हणलं, 'आला माझा जीवलग'. अगदी आजच नाही आलास तरी तुझ्या येण्याची चाहुल आली. तू येणार असलास की त्याच्या आधी किंवा नंतर शुभ घडणार असल्याची चाहुल लागते. माझ्यासाठी तर तू खुप लकी आहेस. 
थंडगार वा-याची झुळूक अंगावर घेताना, शरीराबरोबरच मनालाही थंडावा मिळतो. जगरहाटीच्या काहिलीनी तापलेलं मन तुझ्या अस्तित्वामुळे शांत होतं. ही किमया फक्त तूच करू शकतोस. पाठीमागचं अमंगल मनातून काढून टाकतोस आणि वर्तमानात जगायला शिकवतोस. 

ओलेत्याने दरवळले, अस्वस्थ फुलांचे घोस
ओलांडून आला गंध, नि:स्तब्ध मनाची वेस

या ओळी गुणगुणायच्या आहेत. येतोयस ना ?.......

Sunday, 9 April 2017


सुंदर मी होणार.....



स्त्री आणि सौंदर्य हे एक सर्वमान्य असं समीकरण आहे. सहज रस्त्यानी जातानाही एखादी सुंदर मुलगी किंवा स्त्री दिसली तर तिच्याकडे वळून वळून बघितलं जातं. अर्थात हे खुप Natural आहे. पण स्त्रीची फक्त तितकी ओळख नक्कीच नाही. सिनेमांमध्ये तर सुंदर अभिनेत्रीच हवी असते. मला अनेकदा प्रश्न पडतो, माझ्यासारख्या  किंवा माझ्या आजुबाजुला असणा-या  सामान्य स्त्रिया अभिनेत्री का नसतात ? सतत मेकअप, सुंदर फिगर, रेशमी जुल्फे वगैरे कसं maintain होतं? कामाच्या रगाड्यात eye brows करायला जाणं होत नाही आमच्यासारख्या कितीतरी जणींना. मग असं साध सोप का नाही दाखवलं जात? ना कजरे की धार ... ना मोतीयों के हार.. ना कोई किया सिंगार.. फिर भी कितनी सुंदर हो... असं गाण आहे, पण त्या गाण्यातली अभिनेत्री नखशिखांत नटलेली आहे. अपवाद म्हणून काही सिनेमे आहेत, ज्यामध्ये अभिनेत्रींना अजिबात मेकअप केलेला नाही. पण ते अपवादच आहेत.  या सगळ्यात भर म्हणून स्त्री आणि तिचं सौंदर्य खुलवणा-या हजारो जाहिराती आपण दररोज बघतोच. सौंदर्याच्या पलिकडे असणारं काही असतं अशी जाहिरात नाही पहायला मिळत. 
'नाम शबाना' हा सिनेमा मला यासाठी खुप आवडला. बाकी कितीतरी अशक्य गोष्टी त्यामध्ये होत्या. पण जमेची बाजू म्हणजे सिनेमाची अभिनेत्री तापसी पन्नू . सामान्य म्हणावी अशी. आपल्या ध्येयाकडे लक्ष असणारी तरूणी. अभिनय, साधेपणा खूप आवडला  आणि मुख्य म्हणजे तिला आमच्या जीवनाशी सहज relate करता येत होतं. आजकालच्या तरूणांकडे असणारा जोश योग्य ठिकाणी वापरला गेला तर किती चांगलं काम उभ राहू शकत हे सांगणारा हा सिनेमा.  नट्टा पट्टा करून, कमी कपडे घालून आपल्या so called सौंदर्याची जाहिरात करण्यापेक्षा करण्यासारखं बरच काही आहे हे सांगणारा हा सिनेमा. आयुष्यात घडलेल्या वाईट प्रसंगामुळे खचून न जाता, ध्येय ठेवून जगण्याची उमेद वाढवणारी तापसी खूप आवडली. त्या संपूर्ण सिनेमात तिचं सौंदर्य हा मुद्दा डोक्यातही येत नाही. असं नाही की ती सुंदर नाही. पण त्याकडे लक्षच जात नाही. पण पावसात न भिजता, कमी कपडे न घालता, प्रणयाचे प्रसंग न दाखवता, मेकअप न करताही ती खूप सुंदर दिसते... म्हणजे सामान्य तरूणीसारखी. भेदक नजर, ध्येयाप्रती असणारी निष्ठा, आत्मविश्वास आणि जिद्द सगळच लई भारी. मला असं वाटतं की असे अधिकाधिक सिनेमे यावेत. म्हणजे शरीरप्रदर्शन, मेकअप म्हणजेच सौंदर्य ही व्याख्या बदलायला मदत होईल.