प्रवास समजुतीचा....
नुकतीच एक खूप छान गोष्ट ऐकली. दोन मित्र असतात. त्यातला एक मित्र शिकारीसाठी जातो आणि तिथेच हरवतो.दुसरा मित्र त्याला शोधायला बाहेर पडतो. तिथे एक कुरूप चेटकीण असते. तिनेच त्या मित्राला डांबून ठेवलेलं असतं. ती दुस-या मित्राला म्हणते, जर तू माझ्याशी लग्न केलस तरच मी तुझ्या मित्राला सोडेन. मित्र प्रेमासाठी तो हो म्हणतो. लग्न झाल्यावर त्याला सजवलेल्या पलंगावर एका टोकावर चेटकीण आणि एका टोकावर एक अतिशय सुंदर स्त्री दिसते. ती चेटकीण त्याला म्हणते , तुझ्यापुढे दोन पर्याय आहेत. एक मी दिवसभर सुंदर असेन आणि रात्री कुरूप. दुसरा पर्याय मी दिवसभर कुरूप दिसेन आणि रात्री सुंदर. तुला काय आवडेल ते सांग. मित्र विचारात पडतो. काहीही निवडलं तरी नुकसान त्याचच होणार असतं. म्हणून तो म्हणतो, तुला जे हवं ते मला चालेल. माझं काही म्हणणं नाही. त्याच्या या उत्तरानी चेटकीण खुष होते आणि सुंदर स्त्री बनून त्याचं आयुष्यही सुंदर करते. गोष्टीचा मतितार्थ हा आहे की, प्रत्येक स्त्रीला तिच्या मनासारखं जगायला मिळालं तर ते हवं असतं.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट मला फारच आवडली. महिला दिन म्हणजे आमचा गौरव दिन वगैरे असला तरी तिला तिच्या मनासारखं वागण्याची संधी आजही कितपत मिळते? ही शंका आहेच. अगदी लहान सहान गोष्टीतही सगळ्यांचा विचार करण्यातच बरचस आयुष्य निघून जातं. त्यात स्त्रीला त्यागाची मूर्ती बनवून तिच्या मनासारखं वागण्याबाबत तिची गोची करून ठेवली आहे. कालांतरानी मन मारण्याची इतकी सवय होऊन जाते की, मनासारखं काही केलं तरी guilty वाटायला लागतं. परिस्थिती पूर्वी इतकी बिकट नाही. पण ग्रामीण आणि निमशहरी भागात आजही स्त्रियांना साध्या साध्या गोष्टीही मनासारख्या करता येत नाहीत. स्त्रीवाद वगैरे नाहीये माझ्या मनात कारण स्त्रीनी पुरूषावर कुरघोडी करून स्वतःला सिध्द करणे म्हणजे स्त्रीचा विकास नाही. तर दोघांनी एकमेकांना समजून घेऊन प्रगती करणे म्हणजे विकास. कामाचं ठिकाण असो की घर, एकमेकांना साथ देणं फार महत्त्वाचं असतं. पडती बाजू कोण घेतो हे महत्त्वाचं नाही. समजून घेऊन पुढचा प्रवास करणं मह्त्त्वाचं आहे. स्त्रियांनीदेखील समानतेच्या नुसत्या गप्पा न मारता ख-या अर्थाने मुक्तपणे, आत्मनिर्भरतेनी काम करण्याची गरज आहे. स्त्री आणि पुरूष म्हणजे, प्रकृती आणि पुरूष. निसर्गानीदेखील या दोघांना समान महत्त्व दिलं आहे. मग आपण तरी भेदभाव का करायचा ? स्त्री - पुरूष भेदाच्या पलिकडे जाऊन माणूस म्हणून एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. स्त्री म्हणून तिच्याकडे असणारे plus points आणि पुरूष म्हणून असणारे plus points मिऴून एक चांगला समाज घडवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एकच सांगावसं वाटतं, उंच भरारी घेण्याच्या स्वप्नामध्ये साथ हवीय. फक्त मागे कोणीतरी आहे हा आधार हवाय. विश्वास हवाय सोबत असण्याचा. मला वाटतं ही गरज फक्त स्त्रीचीच नाही तर प्रत्येकाची आहे. स्त्री आणि पुरूष कोणीच श्रेष्ठ - कनिष्ठ असं काहीही न मानता, समजून घेऊन प्रवास केला तर अपेक्षित साध्यापर्यंत सहज पोहोचता येईल.
जनप्रियत्व .....
अपेक्षा हे सगळ्या दुःखांच मूळ असं म्हटलं जातं. पण तरी आपण त्या ठेवतोच. अपेक्षेप्रमाणे झालं तर आनंद होतो. पण अपेक्षेप्रमाणे झालं नाही तर वाईट वाटतं. हा माणसाचा स्वभाव असतो. एखाद्या व्यक्तिवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास दाखवला आणि ती व्यक्ती अपेक्षेप्रमाणे वागली नाही तर त्रास होतो. पण नीट विचार केला तर लक्षात येतं की, अपेक्षा आपली असते. ती व्यक्ती तिच्या स्वतःच्या अपेक्षेप्रमाणेच वागते. त्यामुळे त्रास तरी करून का घ्यायचा ? अपेक्षित सुख - दुःखापेक्षा , अनपेक्षित सुख दुःखात माणसाची खरी कसोटी लागते. अनपेक्षित सुखाचा काही प्रॉब्लेम नसतो. कारण ते हवहवसं वाटतं. पण अनपेक्षित दुःखानी माणूस कोलमडतो. या सगळ्यातून सही सलामत सुटणं वाटतं तितकं सोप नाही.
या समस्येवर देखील प्रेमानी मात करता येते. तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे ? पण या सगळ्यावर रामबाण औषध म्हणजे प्रेमच. प्रेमानी जग जिंकता येतं. संतांकडून जनप्रियत्व शिकावं. कारण जो लोकांना आवडतो तोच देवाला आवडतो असं म्हटलं जातं. जो निःस्वार्थी असेल त्यालाच जनप्रियत्व येईल. आपल्यापुरते न पहाता जगण्याचा प्रयत्न केला की हे सहज जमेल. प्रेमाची उत्कट अवस्था म्हणजे भक्ती. अशी भक्ती ज्याच्या मनात असेल त्याला असं वागणं सहज शक्य आहे. ज्या व्यक्तीवर, भावनेवर आपलं प्रेम आहे तेच प्रेम आपल्या वागण्या - बोलण्यातही हवं. प्रत्येक माणूस कशावर ना कशावर प्रेम करतोच ना... कोणाचं व्यक्तीवर प्रेम, कोणाचं पैशावर, कोणाचं प्रतिष्ठेवर प्रेम तर कोणाचं कर्तृत्वावर, कोणाचं जातीवर प्रेम तर कोणाचं धर्मावर, कोणाचं स्वतःमधल्या सूडाच्या भावनेवर प्रेम तर कोणाचं स्वतःमधल्या क्षमाशील वृत्तीवर , कोणाचं निसर्गावर प्रेम तर कोणाचं देवावर, कोणाचं कलेवर प्रेम तर कोणाचं कामावर.... मग तेच प्रेम , तीच भावना सर्वत्र दिसायला लागली की अपेक्षा, दुःख, द्वेष, सूड या भावनांना काही अर्थ तरी उरतो का?
आपलं कशावरच प्रेम नसेल तर मग कठीण आहे... सॉरी सोप्प आहे. मग आपण हवे नकोपणाच्या पुढे गेलोय असं म्हणायला हरकत नाही. मग आपल्या नजरेत सगळीकडे समता नांदायलाच हवी. अपेक्षा, दुःख , वेदना या गोष्टींच्या पुढे नेणारी अवस्था आहे ही. प्रेमात असाल किंवा प्रेमात नसाल काही प्रॉब्लेम नाही. जनप्रियत्व मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. संतांसारखं जनप्रियत्व मिळवण्यासाठी आपल्या विचारांमध्ये परिवर्तन येण्याची गरज आहे. आपण तरी सगऴ्यांचं भलं व्हावं असा विचार करावा. समोरच्यानी काय करायचं हा त्याचा प्रश्न आहे. जशास तसे न वागता मला हवे तसे म्हणजे प्रेमानी वागायला काय हरकत आहे ? कारण प्रत्येकाला वाटतं की समोरच्यानी चांगलं वागावं, मी मात्र हवं तसं वागेन... This is not fair boss...
प्रेम (कशावरही आणि कोणावरही) करणा-यांना अपेक्षाभंगाच्या दुःखाचा सामना करणं सोप आहे. प्रेम न करणा-यांचा प्रश्नच नाही. कारण त्यांना या दुःखाचा सामना करण्याची वेळ येतच नाही. साधं, सोप्प जगण्याचा प्रयत्न, आनंद आणि समाधान नक्कीच देईल. प्रयत्न करूया ?
प्रेमाचा प्रवास ......
आज प्रेमाचा दिवस... तसा रोजच असतो तो. पण प्रेम म्हणजे काय हे कळायला हवं. नाहीतर बाह्य गोष्टींना भुलून प्रेम केलं जातं पण ते अल्पायुषी ठरू शकत. काही वेळा ज्या व्यक्तीवर प्रेम केलय ती सोडून जाते, विसरते किंवा जगातून निघून जाते. काहीही असो. व्यक्तीवर केलेलं प्रेम काळाच्या मर्यादेत केलं जातं. कोणी कितीही प्रिय असलं तरी प्रेम करण्यालासुध्दा मर्यादा आहेत. आज व्हॅलेंटाईन डे आहे म्हणूनच हे सांगावसं वाटतं की, व्यक्तीवर प्रेम केलं तर त्याला मर्यादा आहेत हे लक्षात घेतलच पाहिजे. कारण नंतर होणा-या त्रासापेक्षा याचा आधीच विचार केलेला बरा.
मग काय ? .... प्रेम करायचच नाही का ? जरूर करायचं. पण व्यक्तीवर नाही, प्रेम या भावनेवर. तसं असेल तर ते प्रेम टिकवणं आपल्या मनावर अवलंबून रहातं. समोरचं कोण कस वागतय याला महत्त्वच उरत नाही. अजून एक वाटतं, खरच ज्याला आपल्या प्रेमाची गरज आहे त्यांना ते द्यावं. प्रेमाचं दानही सतपात्री असावं. कारण नको त्याला जेवायला दिल्यानी अजीर्ण होणारच. त्यापेक्षा खरच ज्यांना गरज आहे त्यांना ते द्यावं.
कालच हा अनुभव आम्ही घेतला. माझ्या कॉलेजमधल्या मुलींना घेऊन काल आम्ही वानप्रस्थाश्रम या वृध्दाश्रमात गेलो होतो. कॉलेजचा कोणता प्रकल्प म्हणून नाही. आजी आजोबांना कडकडून भेटायला. आत्ताच्या मुलांना मोठ्यांविषयी आदर , प्रेम, जिव्हाळा नाही हे विधान काल मुलींनी खोटं ठरवलं. अगदी योगायोगानी व्हॅलेंटाईन डे च्या आदल्या दिवशी ही भेट झाली. आपल्या घरापासून लांब राहीलेल्या या आजी आजोबांना आपल्या प्रेमाची, स्पर्शाची किती गरज आहे हे प्रकर्षानी जाणवलं. एकटेपणा फार वाईट असतो. विशेषतः वृध्दपणी सोबतीची गरज असते. आपला जीवनसाथी मरेपर्यंत साथ देईलच असं सांगता येत नाही. कारण जन्म आणि मृत्यूवर माणसाची सत्ता नाही. जोडीदार नसला तरी मुलं आहेत ही आशा असते. त्यांनी आपल्याला सांभाळावं ही अपेक्षा असते. पण अपेक्षा हेच दुःखाचं मूळ. अपेक्षाभंग होतो आणि या आजी आजोबांची रवानगी वृध्दाश्रमात केली जाते.
काल मुली आणि आजी आजोबा अक्षरशः रडले. मुलींनी केलेले कार्यक्रम बघून आजी आजोबांना त्यांच्या नातवंडांची आठवण आली. मुलींनाही आजी आजोबांच्या सहवासानी भरून आलं. निघताना फार वाईट अवस्था झाली होती. लहान मुलं आईचा पदर धरून ठेवतं तसं आजी आजोबा सोडतच नव्हते. आमचाही पाय निघत नव्हता. आजी आजोबांसाठी मुलींनी खाऊ आणला होता. उभं आयुष्य आपल्या संसारासाठी खर्च केलेल्या आजी आजोबांना याचं खूप नवल वाटलं. मुलींनी त्यांना प्रेमानी खाऊ भरवलासुध्दा. डोऴ्यात पाणी आणि मनात आठवणी घेऊन आम्ही निघालो. आजी आजोबांनाही माहिती होतं की हे प्रेम औटघटकेचं आहे. तरी त्यांनी या सगळ्याचा आनंद घेतला. काही आजी आजोबा अजिबात मिक्स होत नव्हते. सुरूवातीला वाईट वाटलं. पण नंतर मनात विचार केला की, त्यांची तरी काय चूक ? प्रेम या भावनेवरचा त्यांचा विश्वासच उडाला असेल. त्यांच मन त्यांच्याच लोकांनी इतकं दुखावलं आहे की, आता पुन्हा नव्यानी गुंतण त्यांना नको असेल.
भरभरून प्रेम करणं यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. फक्त ते कोणावर करावं हे लक्षात घ्यायला हवं. ज्यांना गरज आहे त्यांनाच ते द्यावं. अशा अनेक जागा आहेत जिथे आपण आपल्या प्रेमाची बरसात करू शकतो. व्यक्तीवर केलेलं प्रेम अल्पायुषी ठरण्याची भीती असते. पण प्रेम या भावनेवर प्रेम केलं तर त्याला अंत नाही. चला तर मग.... निघायचं प्रेमाच्या प्रवासाला....
अस्तानंतर असते सुरूवात ....
माझ्या अतिशय आवडीच्या विषयावर बोलण्याचा, लिहिण्याचा दिवस जवळ येतोय. अगदी बरोबर व्हॅलेंटाईन डे ... काही जणं म्हणतील , त्यासाठी ठराविक दिवसाची काय गरज आहे? प्रेम तर कधीही व्यक्त करता येतं.प्रेम म्हणजे प्रियकर प्रेयसीचच नाही बरं का... पण नीट विचार केला तर लक्षात येतं की प्रेम व्यक्त करायला आपण खरंच उत्सुक असतो का ? किंवा आपल्याला यासाठी वेळ आहे का? किंवा काहींना वाटेल, प्रेम आहे मग ते व्यक्त करण्याची काय गरज ? इतक्या सगळ्या प्रश्नांना एक प्रतिप्रश्न, मग प्रेम व्यक्त करायला जर एखादा स्पेशल दिवस असेल तर काय हरकत आहे ? कारण धावपळीच्या आजच्या काळात सगळेच स्पेशल दिवस इव्हेंट झालेत.
गेल्या काही दिवसात प्रेम या भावनेची चीड यावी असं काही पाहिलं, वाचलं, अनुभवलं. मग वाटलं, खरं प्रेम म्हणून जो टाहो आपण फोडत होतो ती चूक होती का? अगदी निरपेक्ष नसावं पण प्रेम आहे याची जाणीव करून देणारं खरं प्रेम या जगात अस्तित्वातच नाही का ? कारण सगळीकडे स्वार्थमिश्रित प्रेमच आहे असं वाटायला लागलं होतं. काहीतरी हवं असल्याशिवाय लोक स्नेह वाढवत नाहीतआणि ते काम होताच अनोऴखी होतात. असल्या लोकांना न ओळखता येणं ही चूकच म्हणायला पाहिजे. कारण माणसं ओऴखता न येणं ही त्या माणसांची चूक असूच शकत नाही. ती चूक आपलीच. बरं हीच चूक पुन्हा पुन्हा घडत असेल तर अंतरंग तपासायलाच हवं. काही वेळा बिचारं मनं इतकं थकून जातं की विचार करण्याची ताकदच संपून जाते. असं वाटतं , जाऊदे जे आहे तेच बरोबर आहे. मनाचा, विचारांचा हा आजार फार धोकादायक. अशा वेळी अनेक लोक गृहित धरून गैरफायदा घेण्याची दाट शक्यता असते. विचारांची ही क्षीणता मन बधीर करून टाकते. अगदी लहान सहान बाबतीत विश्वास उडून गेल्याचं एक भयंकर फिलींग हऴुवार मनाला पोखरत रहातं.
पण प्रत्येक गोष्टीला अंत ठरलेला असतो. या फेजलाही तो असतोच. झालेली पडझड, पानगळती विसरून पुन्हा नव्याने आशेची पालवी फुटतेच. सगळ संपलय असं काही नसतं, तो असतो मनाचा खेळ. आशा बगे या माझ्या आवडत्या लेखिकेच्या कथेतलं हे वाक्य खूप प्रेरणादायी आहे.. ''ज्यात पुन्हा काही सुरू करण्याची ताकद असते तो खरा अस्त...'' असा अस्त झाल्यानंतर झालेली सुरूवात कसली विलोभनीय असते. पावसाने सारी घाण, कचरा वाहून जावा, तसं जखमा, त्याचे व्रण हे सगळं संपून जातं. पुन्हा एकदा नव्यानी, आनंदानी जगण्याची उमेद घेऊन येणारी ही सुरूवात.. पुन्हा एकदा प्रेम, विश्वास, श्रध्दा या हऴुवार भावनांवर प्रेम करायला लावणारी ही सुरूवात... मनाला माहिती असतं की या सुरूवातीला अस्त आहेच पण त्या अस्तानंतरही असेल एक आशादायी सुरूवात.... प्रेमाच्या या महिन्यात प्रेम या विषयावर लिहावसं वाटलं त्या आशादायी विचाराला दिलसे थॅंक्स. कारण आपलं ब्रीदवाक्य ठरलय बॉस... जगायचं तर आनंदानी....
मन का बोलाविते......
मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना... काय असतं या मनाचं गणित ? जे आहे त्यात न रमता जे होऊन गेलय त्यामध्ये मन का रमतं ? सगळ्या वेदनांचं मूळ हेच आहे हे समजूनही मनाला समजावण्यात नेहमी कमी का पडतो माणूस. नेमकी विचारधारा निश्चित न झाल्यानी असेल का हे सगळं? पण होतं काय.... एका विचारावर ठाम राहून पुढे जायचं ठरवताच तो विचार, त्याचा पाया किती तकलादू आहे हे लक्षात येतं. मग पुन्हा सुरू होतो मनाचा शोध मनःशांतीसाठी.
कोणत्याही विचारांचा प्रभाव तात्पुरता टिकणं याला आपल्याच मनाचा कमकुवतपणा म्हणावं का ? पण या जगात कायमस्वरूपी काहीच नाही म्हणे. मग अशा शाश्वत सुखाची, आनंदाची अपेक्षा करणच चूक आहे का ? सगळ छान, आनंददायी चाललेल असतानाच अचानक आपल्याच विचारांमुळे त्या आनंदावर पाणी पडतं. ही त्या त्या वेळची मनःस्थिती असते बहुतेक. मग अशा तात्पुरत्या नाराजीवर उपाय आपणच शोधावा लागतो.
मनावर नियंत्रण ठेवावं म्हणे. कसं ठेवायचं ते नियंत्रण? कारण मनच तर पळत मनाविरूध्द. त्याचं ते पळणच गोड वाटू लागतं. पण नंतर जेव्हा दमछाक होते तेव्हा कळतं. या मनाचं न ऐकलेलचं बरं. सगळं तत्वज्ञान कोळून प्यायलेलं हे मन त्या तत्वज्ञानाला न जुमानता आपल्या तालावर नाचायला भाग पाडतं. खरं, शाश्वत, कायमस्वरूपी असं काहीच नाही हे समजूनही त्या शाश्वत सुखाची, प्रेमाची अपेक्षा का करतय हे मन? नेमकं काय हवय हे कळलं असत तर किती बरं झालं असतं नाही ? निदान ते मिळवण्याचा प्रयत्न तरी करता आला असता. आज हवसं वाटणारं सगळ उद्या तसं नसणार आहे. हे माहिती असूनही हवेपणा, नकोपणा का संपत नाही ? साक्षीभावानी पहायला कधी जमणारे ? पण मनाला हे माहितीय की, असं काहीतरी घडेल की आलेलं मळभ ओसरून समाधानाची बरसात नक्की होईल. कारण आपलं स्टेटस ठरलय बॉस, जगायचं तर आनंदानीच.....
मन की बात....
माझा हा ब्लॉग म्हणजे माझ्या मनातल्या भावनांच प्रतिबिंब. तिथं डेडलाईन नाही की जिलब्या पाडणं नाही (बऴेच लिहिलेला लेख म्हणजे जिलब्या पाडणं). म्हणूनच आज तुमच्याशी काहीतरी बोलावसं वाटतय. माझ्या एका friend cum guide नी माझ्यातल्या लेखिकेला जागवलं. आत्ताच्या चाललेल्या नोटाबंदीवर तू लिहायला पाहिजेस असं सुचवलं. मग काय माझ्यातली लेखिका जागी झाली आणि मी ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्या भेटीलाआले.
नोटाबंदीच्या निर्णयावर लिहिण्याइतकं माझं ज्ञान पुरेसं आहे की नाही हे माहिती नाही. पण हा ब्लॉग म्हणजे माझी 'मन की बात' आहे. व्हॉटस् अॅपचे सगळे विचारवंत आणि प्रसारमाध्यमं यांच्यामुळे ज्ञानात बरीच भर पडली आहे. एक व्यक्ती आणि तिनी घेतलेला निर्णय सगळ्यांना आवडेल अशी आशा करणं चुकीचं आहे. पण मला असं वाटतं आपली बुध्दी आणि अर्थात मन याला विचारून आपली मतं मांडायला हवीत. विरोध करणं तसं फारच सोपं आहे. पण मग त्यावर पर्याय सुचवता येतात का विरोध करणा-यांना? आत्ताच्या सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतलाय, पण खरं तर तो नोटाबदलाचा निर्णय आहे. घरातलं एखादं कार्य असेल तर त्यामध्ये कितीतरी गोंधळ होतो. कितीही काटेकोर नियोजन केलं तरी ' नक्टीच्या लग्नाला सतराशे विघ्न 'असं होतच की. मग प्रचंड लोकसंख्या असलेल्या या देशाला बदलणं इतकं का सोपं आहे ? कुटुंबप्रमुखाला विरोध करत राहीलं तर ते कुटुंब संकटांचा सामना करू शकेल का ? 'wait and watch' अशी भूमिका का घेत नाही आपण? आपल्याला जे कळलय ते दुस-यांपर्यंत पोहोचवायला हवं. नोटाबदलाच्या निर्णयात आपण काय भूमिका बजावू शकतो? याचा विचार करायला हवा. सुशिक्षितांनी फेसबुक आणि व्हॉटस् अॅप पेक्षा प्रत्यक्ष मदतीसाठी वेळ द्यायला हवा. कारण या माध्यमांचा वापर सगळेच करत असतील असं नाही. विशेषतः सुशिक्षित असूनही अशिक्षितासारखं वागणा-यांनी थोडं सबुरीनं घ्यायला हवं. ज्या लोकांमध्ये या निर्णयामुळे संभ्रम निर्माण झाला आहे त्यांना प्रत्यक्ष मदत करायला हवी. इतका मोठा निर्णय आहे, त्याची अंमलबजावणी व्हायला काही वेळ तर द्या ना राव.
लग्न झाल्यावर हे सगळे लोक आपलेच आहेत हे माहिती असूनही त्या मुलीला सासरच्या घरात रूऴायला काही तरी वेळ लागतो. हे तर फक्त एका व्यक्ती आणि कुटुंबापुरतं झालं. नोटाबदलण्याच्या निर्णयाबाबत सगळ्या देशासाठी एक व्यक्ती कशी पुरी पडू शकते? या निर्णयाचे सकारात्मक बदल आपण बातम्यांमधून वाचतोय. आपण निवडून दिलेल्या मतावर आपला इतकाही विश्वास नाहीये का ? म्हणजे आपला आपल्यावरच विश्वास नाही असं म्हणावं लागेल. आपल्याच नवीन घरात रहायला गेल्यानंतर सगऴं स्थिरस्थावर होईपर्यंत थोडाफार गोंधळ होतोच. पण घर आपलच असतं आणि घर बदलण्याचा निर्णयही आपलाच. मग तोच समजुतदारपणा आता दाखवुया.
कमी पैशातही किती छान जगता येतं. लग्नकार्यासाठी कल्पकतेनी प्रेझेंटस देता येतात. एका प्लेटमध्ये पाणीपुरी खाता येते. गाडीवर न जाता मस्तपैकी चालत जाऊन एकमेकांशी संवाद साधता येतो. बाहेर कुठेही न जाता आपल्याच घरात खूप मजा करता येते याचा साक्षात्कार होऊ शकतो. या दोन महिन्यातच सगळं जग खरेदी करण्याचा वेडेपणा करायचाच कशाला ? श्रध्दा और सबुरी हा साईबाबांचा संदेश कोणत्याही परिस्थितीत. महत्त्वाचा ठरतो.
संत तुकाराम महाराजांचा हा संदेश खूपच मोलाचा वाटतो. किती पैसा कमावला म्हणजे माणूस श्रीमंत
समजावा ? नीतीधर्माचे आचरण करता यावे, मुलाबाळांचे संगोपन करता याव, आईवडिलांची काळजी करता यावी, अब्रूने जगता यावं इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. मग काय आपण सगळे भारतीय आहोत ना श्रीमंत ?
मना तुझे मनोगत मला कधी कळेल का ? .......
'कळत नकऴत' सिनेमामधलं 'मना तुझे मनोगत मला कधी कळेल का ?' हे गाणं ऐकलं आणि मीही माझ्या मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये आता अमुक तमुक आपलं मनोगत व्यक्त करतील असं सांगितलं जातं. ते खरच मनोगत असतं का ? ब-याचदा समोरच्याला काय आवडेल हेच बोलाव लागतं. आपल्या मनातलं अगदी खरं बोलण्याची संधी किती वेळा मिळते ? खरं तर आपल्या मनासारखं वागणारी लोक भाग्यवानच म्हणायला हवी. कारण बाकीच्यांच्या मनाचा विचार करून आपल्या मनाला वळवणं हेच खूपदा वाट्याला येतं. मग ते बिचारं मन एखाद्या दिवशी बंड करून उठतं. अरे काय चाललय काय ? ऐकून घेतं म्हणून किती अति करायचं.
लहान सहान गोष्टीतही मनाचं मनोगत न ऐकता जगरहाटीचा विचार करून मनाला समजावलं जातं. सगळे आनंदी तर आपण आनंदी ही आदर्शवादी भूमिका नक्कीच चांगली. पण या आदर्शवादाचाही कधीतरी उबग येतो. अनेक गोष्टी मनाविरूध्द करण्याची मनाला इतकी सवय लागून जाते की मनाचं मनोगत ऐकू येईनासं होतं. मग काही वेळा आतून एक प्रश्न विचारला जातो, तुला नक्की हे हवय का ? त्याचं उत्तर द्यायलाही ते तयार नसतं. कारण उत्तर नकारात्मक असेल आणि त्याचा परिणाम दुस-याच्या मनाविरूध्द होणार असेल तर... त्यापेक्षा नकोच मनाशी संवाद. नाही तरी त्याचं मनोगत ऐकून कृती घडणारे कुठे.
गम्मत म्हणजे आजुबाजुची माणसं सांगतात , 'ऐकावं जनाचं, करावं मनाचं '. पण खरचं मनाचं ऐकून त्या सगळ्यांशी वागायच ठरवलं तर कितीतरी लोकांना दुखवावं लागेल. कारण दुस-याकडून अपेक्षा ठेवल्याच जातात, त्या पूर्ण झाल्या नाही की मनाला त्रास होतो. अपेक्षा पूर्ण झाल्या की मन खुष होईल, पण घडी बिघडेल का ? संबंध तुटतील का? नात्यांच काय मग? अशा विचारांनी त्या मनाचं न ऐकलेलं बर असं वाटतं. काही प्रॅक्टिकली विचार करणारे लोक म्हणतात, 'मन आणि बुध्दि जे सांगेल ते ऐकावं.' पण ब-याचदा मन आणि बुध्दिची युती होतच नाही. समाज समाज म्हणून जे म्हणलं जातं, त्यात वावरताना बुध्दिच वरचढ ठरते. मन बिचारं माघार घेतं. मनातले मांडे मनातच खावे लागतात.
जगरहाटी वगैरे ठीक आहे. पण त्या मनाचंही ऐकलं पाहिजे थोडं. कारण जग साथ सोडून जाणार आहे. पण मन.... ते आपल्यासोबतच रहाणार शेवटच्या श्वासापर्यंत . अगदी मनातल्या साथीदारासारखं. कारण आपलं मन जपणारे आपणच. आपल्याला जपणारं आपलं मनच. बाकीचे सगळे व्यवहार. म्हणूनच आता तरी मनाचं मनोगत ऐकण्याची बुध्दि मनानी द्यावी. गा-हाणं देवापुढे मांडतात. पण तोही मनातलाच ना?