Monday, 13 February 2017



प्रेमाचा प्रवास ......






आज प्रेमाचा दिवस... तसा रोजच असतो तो. पण प्रेम म्हणजे काय हे कळायला हवं. नाहीतर बाह्य गोष्टींना भुलून प्रेम केलं जातं पण ते अल्पायुषी ठरू शकत. काही वेळा ज्या व्यक्तीवर प्रेम केलय ती सोडून जाते, विसरते किंवा जगातून निघून जाते. काहीही असो. व्यक्तीवर केलेलं प्रेम काळाच्या मर्यादेत  केलं जातं. कोणी कितीही प्रिय असलं तरी प्रेम करण्यालासुध्दा मर्यादा आहेत. आज व्हॅलेंटाईन डे आहे म्हणूनच हे सांगावसं वाटतं की, व्यक्तीवर प्रेम केलं तर त्याला मर्यादा आहेत हे लक्षात घेतलच पाहिजे. कारण नंतर होणा-या त्रासापेक्षा याचा आधीच विचार केलेला बरा. 
मग काय ? .... प्रेम करायचच नाही का ? जरूर करायचं. पण व्यक्तीवर नाही, प्रेम या भावनेवर. तसं असेल तर ते प्रेम टिकवणं आपल्या मनावर अवलंबून रहातं. समोरचं कोण कस वागतय याला महत्त्वच उरत नाही. अजून एक वाटतं, खरच ज्याला आपल्या प्रेमाची गरज आहे त्यांना ते द्यावं. प्रेमाचं दानही सतपात्री असावं. कारण नको त्याला जेवायला दिल्यानी अजीर्ण होणारच. त्यापेक्षा खरच ज्यांना गरज आहे त्यांना ते द्यावं. 
कालच हा अनुभव आम्ही घेतला. माझ्या कॉलेजमधल्या मुलींना घेऊन काल आम्ही वानप्रस्थाश्रम या वृध्दाश्रमात गेलो होतो. कॉलेजचा कोणता प्रकल्प म्हणून नाही. आजी आजोबांना कडकडून भेटायला. आत्ताच्या मुलांना मोठ्यांविषयी आदर , प्रेम, जिव्हाळा नाही हे विधान काल मुलींनी खोटं ठरवलं. अगदी योगायोगानी व्हॅलेंटाईन डे च्या आदल्या दिवशी ही भेट झाली. आपल्या घरापासून लांब राहीलेल्या या आजी आजोबांना आपल्या प्रेमाची, स्पर्शाची किती गरज आहे हे प्रकर्षानी जाणवलं. एकटेपणा फार वाईट असतो. विशेषतः वृध्दपणी सोबतीची गरज असते. आपला जीवनसाथी मरेपर्यंत साथ देईलच असं सांगता येत नाही. कारण जन्म आणि मृत्यूवर माणसाची सत्ता नाही. जोडीदार नसला तरी मुलं आहेत ही आशा असते. त्यांनी आपल्याला सांभाळावं ही अपेक्षा असते. पण अपेक्षा हेच दुःखाचं मूळ. अपेक्षाभंग होतो आणि या आजी आजोबांची रवानगी वृध्दाश्रमात केली जाते.
काल मुली आणि आजी आजोबा अक्षरशः रडले. मुलींनी केलेले कार्यक्रम बघून आजी आजोबांना त्यांच्या नातवंडांची आठवण आली. मुलींनाही आजी आजोबांच्या सहवासानी भरून आलं. निघताना फार वाईट अवस्था झाली होती. लहान मुलं आईचा पदर धरून ठेवतं तसं आजी आजोबा सोडतच नव्हते. आमचाही पाय निघत नव्हता. आजी आजोबांसाठी मुलींनी खाऊ आणला होता. उभं आयुष्य आपल्या संसारासाठी खर्च केलेल्या आजी आजोबांना याचं खूप नवल वाटलं. मुलींनी त्यांना प्रेमानी खाऊ भरवलासुध्दा. डोऴ्यात पाणी आणि मनात आठवणी घेऊन आम्ही निघालो. आजी आजोबांनाही माहिती होतं की हे प्रेम औटघटकेचं आहे. तरी त्यांनी या सगळ्याचा आनंद घेतला. काही आजी आजोबा अजिबात मिक्स होत नव्हते. सुरूवातीला वाईट वाटलं. पण नंतर मनात विचार केला की, त्यांची तरी काय  चूक ? प्रेम या भावनेवरचा त्यांचा विश्वासच उडाला असेल. त्यांच मन त्यांच्याच लोकांनी इतकं दुखावलं आहे की, आता पुन्हा नव्यानी गुंतण त्यांना नको असेल. 
भरभरून प्रेम करणं यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. फक्त ते कोणावर करावं हे लक्षात घ्यायला हवं. ज्यांना गरज आहे त्यांनाच ते द्यावं. अशा अनेक जागा आहेत जिथे आपण आपल्या प्रेमाची बरसात करू शकतो. व्यक्तीवर केलेलं प्रेम अल्पायुषी ठरण्याची भीती असते. पण प्रेम या भावनेवर प्रेम केलं तर त्याला अंत नाही. चला तर मग.... निघायचं प्रेमाच्या प्रवासाला.... 


No comments:

Post a Comment