Thursday, 9 February 2017

अस्तानंतर असते सुरूवात ....



           माझ्या अतिशय आवडीच्या विषयावर बोलण्याचा, लिहिण्याचा दिवस जवळ येतोय. अगदी बरोबर व्हॅलेंटाईन डे ...  काही जणं म्हणतील , त्यासाठी ठराविक दिवसाची काय गरज आहे? प्रेम तर कधीही व्यक्त करता येतं.प्रेम म्हणजे प्रियकर प्रेयसीचच नाही बरं का...   पण नीट विचार केला तर लक्षात येतं की प्रेम व्यक्त करायला  आपण खरंच उत्सुक असतो का ? किंवा आपल्याला यासाठी वेळ आहे का? किंवा काहींना वाटेल,  प्रेम आहे मग ते व्यक्त करण्याची काय गरज ? इतक्या सगळ्या प्रश्नांना एक प्रतिप्रश्न,  मग प्रेम व्यक्त करायला जर एखादा स्पेशल दिवस असेल तर काय हरकत आहे ? कारण धावपळीच्या आजच्या काळात सगळेच स्पेशल दिवस इव्हेंट झालेत.
           गेल्या काही दिवसात प्रेम या भावनेची चीड यावी असं काही पाहिलं, वाचलं, अनुभवलं. मग वाटलं, खरं प्रेम म्हणून जो टाहो आपण फोडत होतो ती चूक होती का? अगदी निरपेक्ष नसावं पण प्रेम आहे याची जाणीव करून देणारं खरं प्रेम या जगात अस्तित्वातच नाही का ? कारण सगळीकडे स्वार्थमिश्रित प्रेमच आहे असं वाटायला लागलं होतं. काहीतरी हवं असल्याशिवाय लोक स्नेह वाढवत नाहीतआणि ते काम होताच अनोऴखी होतात. असल्या लोकांना न ओळखता येणं ही चूकच म्हणायला पाहिजे. कारण माणसं  ओऴखता न येणं ही त्या माणसांची चूक असूच शकत नाही. ती चूक आपलीच. बरं हीच चूक पुन्हा पुन्हा घडत असेल तर अंतरंग तपासायलाच हवं. काही वेळा बिचारं मनं इतकं थकून जातं की विचार करण्याची ताकदच संपून जाते. असं वाटतं , जाऊदे जे आहे तेच बरोबर आहे. मनाचा, विचारांचा हा आजार फार धोकादायक. अशा वेळी अनेक लोक गृहित धरून गैरफायदा घेण्याची दाट शक्यता असते. विचारांची ही क्षीणता मन बधीर करून टाकते. अगदी लहान सहान बाबतीत विश्वास उडून गेल्याचं एक भयंकर फिलींग हऴुवार मनाला पोखरत रहातं. 
            पण प्रत्येक गोष्टीला अंत ठरलेला असतो. या फेजलाही तो असतोच. झालेली पडझड, पानगळती विसरून पुन्हा नव्याने आशेची पालवी फुटतेच. सगळ संपलय असं काही नसतं, तो असतो मनाचा खेळ. आशा बगे या माझ्या आवडत्या लेखिकेच्या कथेतलं हे वाक्य खूप प्रेरणादायी आहे.. ''ज्यात पुन्हा काही सुरू करण्याची ताकद असते तो खरा अस्त...''  असा अस्त झाल्यानंतर झालेली सुरूवात कसली विलोभनीय असते. पावसाने सारी घाण, कचरा वाहून जावा,  तसं जखमा, त्याचे व्रण हे सगळं संपून जातं. पुन्हा एकदा नव्यानी, आनंदानी जगण्याची उमेद घेऊन येणारी ही सुरूवात.. पुन्हा एकदा प्रेम, विश्वास, श्रध्दा  या हऴुवार भावनांवर प्रेम करायला लावणारी ही सुरूवात... मनाला माहिती असतं की या सुरूवातीला अस्त आहेच पण त्या अस्तानंतरही असेल एक आशादायी सुरूवात.... प्रेमाच्या या महिन्यात प्रेम या विषयावर लिहावसं वाटलं त्या आशादायी विचाराला दिलसे थॅंक्स.  कारण आपलं ब्रीदवाक्य ठरलय बॉस... जगायचं तर आनंदानी.... 

3 comments: