Saturday, 28 November 2015

 हरवलेली माणुसकी .....


खरं तर लिहिण्याचा मूड कायम असतो. रोज काही ना काही तरी असं घडतच की त्यावर आवर्जून लिहावं असं वाटतं. पण priorities या नावाखाली आपल्याला काय हवय ते करणच आपण सोडून देतो. वेळ ही एक अशी गोष्ट आहे जेव्हा ती आपल्याकडे असते तेव्हा तिची किंमत कळत नाही .  जेव्हा ती   निघून जाते तेव्हा कितीही साक्षात्कार झाला तरी त्याचा उपयोग नसतो.  म्हणून आज ब-याच दिवसांनी वेळेचा सदुपयोग करत तुमच्याशी संवाद साधतीय. 
जग बदलतय असं आपण सगळेच नेहमी म्हणतो. आपणही बदलतोय हे मात्र लक्षात येत नाही. जगाप्रमाणे वागून आपण आपलं असं काही ठेवत नाही. खरं म्हणजे असं करायची काही गरज नाही. आपण जसे आहोत तसेच रहायला काय हरकत आहे. मला तर असं वाटतं आपण वेगळं काही वागायला गेलो तरच गडबड होते. 
जग बदलतय हा अनुभव आपल्या सगळ्यांना  रोजच्या जगण्यात येतोय. काल लोकलमध्ये एक घटना घडली जी मनाला चटका लावून गेली, बरच काही शिकवून गेली.  लोकलमध्ये दहा वर्षांपूर्वी जितकी गर्दी होती त्या मानानी कितीतरी पट गर्दी वाढलीय. ऑफिसच्या वेळांमध्येच नाही तर अगदी कधीही गर्दी असतेच हल्ली. जग बदलतय ना .... अजून एक ठळकपणे जाणवणारा बदल म्हणजे एकमेकांशी तुटलेला संवाद. मोबाईल नामक यंत्रात आपण सगळे इतके गुंतलोय की समोर कोणी बसलय याची जाणीवच नाही. त्यामुळे समोरच्याला होणारा त्रास वाचण्याचा प्रश्नच उरला नाहीये. आपल्याला जागा मिळालीय ना मग झालं तर. एखादा पेशंट उभा असला तरी त्याचा चेहेरा वाचण्यासाठी वेळ आहे कोणाला. आपल्याला मिळालेल्या जागेवर बसणे आणि मोबाईलमध्ये तोंड खुपसणे हेच महत्त्वाचं काम. स्टेशन आलं की उतरून जायचं. पण बदलणा-या या जगात संवादाचा अभाव ही खटकणारी गोष्ट आहे. बर , सहप्रवाशाशी बोलायला जावं तर ते कितपत आवडेल या शंकेनी गप्प बसलेलं बरं असं वाढत चाललय. एखाद्याला काही प्रॉब्लेम असेल तो विचारणं आणि तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे नाक खुपसण्यासारखं झालय. 
संवाद वाढायला हवा हे प्रकर्षानी जाणवलं ती घटना आता सांगते. एक मध्यम वयाची बाई आपल्या दोन मुलांना घेऊन लोकलमधून प्रवास करत होती. डोक्यावर स्कार्फ होता. चेहेरा अगदी नॉर्मल होता. ती आजारी असेल अशी शंकाही आली नाही. नेहमीच्या धबडग्यात बायका चढत होत्या, उतरत होत्या. थोडी जागा झाली की तिथे बसण्यासाठी झुंबड उडत होती. खरं तर मला बसायला जागा हवी होती,  पण त्या बाईला बसायला जागा मिळाली. त्यावेळी तिचा थोडा राग आला. कारण मी बसणार इतक्यात ती बाई बसली. त्याच डब्यात तिची आई लांबून सूचना देत होती,  ''नीट बस, स्कार्फ नीट लाव.''  मला काही कळेना , हा काय प्रकार आहे. शेवटी न राहवून मी विचारलं तेव्हा ती बाई म्हणाली, ''कालच माझी दोन ऑपरेशन्स झाली. एक पोटाचं आणि दुसरं डोक्याचं. नगरच्या पुढे शेवगावला मला जायचं आहे. मुलांच्या शाळा बुडू नयेत म्हणून नव-यानी माहेरी राहू दिलं नाही. '' मी अक्षरशः चाट पडले. काय धीराची आहे ही बाई. सो कॉल्ड नाजुक बायकांनी आदर्श घ्यावा अशी. मला असं वाटलं, अगदी क्षुल्लक आजाराचा बाऊ करण्याची सवय लागलीय का आपल्याला ? 
परिस्थिती माणसाला कोणत्याही दुःखाशी दोन हात करायला शिकवते. त्या व्यक्तिला आपल्या  फक्त मॉरल सपोर्टची गरज असते. पण जग बदलतय या नावाखाली ही माणुसकी दाखवायला आपण कमी पडतोय की
 काय ? 

Thursday, 1 October 2015


अतूट नातं......



खूप दिवस झालेत तुमच्याशी बोलून. रोज शेअर करावं असं काही ना काही असतच. पण गेल्या काही दिवसात नाही जमलं. खुप व्यस्त वगैरे नव्हते. पण तरी नाही वाटलं लिहावं असं .  तुमच्या माझ्यामधला अतूट धागा हा ब्लॉग आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळेच कदाचित मी न बोलताही आपल्यातली कनेक्टिव्हीटी तशीच होती. जशी माझ्या आणि त्याच्यामधली.... ओळखलं असेलच तो कोण ते . बरोबर... पाऊस. आज मला हवा तसा तो आला. अगदी अचानक. कोणत्याही अटीशिवाय , कोणत्याही हानिशिवाय. फक्त आनंद देण्यासाठी. 
रोजच्या आयुष्यातही हल्ली,  उगाच आनंद देण्याचं प्रमाण खूपच कमी झालय. मध्यंतरी तो असा काही रूसला होता की विचारू नका. असं वाटलं , आता येतोय की नाही. खरं तर त्याला रुसण्याचा पूर्ण हक्क आहे. काय विचित्र वागलोय आपण सगळेच. तो मात्र मला हवा तसा. समोरचा कसाही वागला तरी आपण आपल्याला जे योग्य वाटेल तसच वागावं असं सांगणारा. कोणताही राग मनात न ठेवता तो आज बरसला. मनाची काहिली दूर केली. स्वच्छ आणि मोकळा झाला बरसून, अगदी मला हवा तसा. 
अचानक एखादी मनासारखी गोष्ट घडावी तसा आला तो. अगदी दुपारपर्यंत येण्याची चाहूलही न देता मस्त बरसला, मला हवा तसा. अनेकांची धांदल उडवणारा खोडकर, धरणीला तृप्त करणारा मेघदूत, मरगळ घालवणारा आनंददायी अशी किती नावं देऊ त्याला. माझ्या मनात तर तो कायमच भरून असतो. मनाविरूध्द काहीही घडलं की मग त्याला हक्कानी बोलवते. मनात बरसून तो माझं बिनसलेलं पार घालवून टाकतो. बाहेर कितीही वादळं असली तरी मनातला हा पाऊस कुठल्यातरी कोप-यात असाच ठेवायला हवा. कारण बाहेरचं कोणीच मनातली वादऴं, अप्रिय, राग येईल असं दूर करू शकत नाही. बरोबर ना ? कारण प्रत्येक नात्याला लिमिटेशन्स आहेत. कितीही आणि काहीही वाटलं तरी दुस-यासाठी फार काही करता येत नाही आणि कोणी आपल्यासाठी काही करू शकत नाही. या सत्याचा सामना झाला की मनातला पाऊस मस्त बरसतो. आपल्याला हवा तसा. कधी रिमझिम, कधी कोसळणारा, कधी सगळ वाहून नेणारा..... जसा आज तो आला, अगदी मला हवा तसा. 

Tuesday, 11 August 2015

उदासीत या............


उदासीत या कोणता रंग आहे? तुला ठाव नाही ,मला ठाव नाही....
तुला शब्द भेटायचे घोळक्यानी... मला मौन भेटायचे नेहमी

संदीप खरेनी लिलिलेलं आणखी एक मस्त गाणं. अगदी आपल्या सगळ्यांच्या मनःस्थितीचं वर्णन करणारं. कित्येकदा मनाची अशी अवस्था  होते. मनातल्या भावनांचा जो रंग असतो तोच सगळीकडे दिसतो. परिस्थिती बदललेली असते का ? माणसं विचित्र वागत असतात का ? का सगळे आपल्या मनाचे खेळ असतात?  बाहेरून विचार करणारी माणसं वेड्यात काढतात. सगळं काही छान असताना उगाच उदास व्हायला झालय काय ? असं हिणवतात. एका दृष्टीनी ते खरं पण असतं. कारण वरकरणी कोणतंही कारण नसताना ही उदासी का येते ?
एरवी सुरेल गाण्यांमध्ये रमणारं मन तिथेही रमत नाही. आजुबाजुची सगळी माणसं, त्यांचे आपल्याबद्दलचे विचार खोटे वाटायला वाटतात. सगळे नाटकी प्रेम आणि सहानुभूती का दाखवतायत ते कळत नाही. असं वाटतं. असं असेलच असंही नाही. पण त्यावेळी मनाला समजावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते ऐकत नाही. उदासीचा हा रंगच आवडायला लागतो. मनाच्या तळात काहीतरी असतं पण ते कळत नाही. व्यक्त होता येत नाही. शब्द सापडत नाहीत. 
कोणाशी कसही वागलं तरी प्रश्न का निर्माण  होतात ? आणि असे प्रश्न ज्यांची उत्तरं आपल्याकडे नसतात. ही हतबलता जास्त त्रासदायक वाटते. एकदा कारण कळलं की मग उपाय सापडवणं सोपं जातं. पण मनाच्या कप्प्याच्या कड्या नकळतपणे का लावल्या जातायत ? कोंडमारा का वाढतोय ? एका बिंदूवर सहन न होणारा कोंडमारा मन स्विकारतच नाही. मग व्यक्त व्हावसं वाटतं. पण कोणी समोर नको वाटतं. स्वतःशी बोलावस वाटतं. पण असं कसं स्वतःशीच बोलणार?
 येतं स्वतःशी बोलता. कारण समोर असलेल्या कोणाशीही बोलून उदासीचा हा रंग फिका होत नाही. काहीही कारण नसेल तर उदासी कमी व्हायला फार त्रास होत नाही. कारण उदासी मनातलीच असते. मनानी वेगळ्या आणि हव्याश्या गोष्टींचा ध्यास घेतला की ही उदासी पऴून जाते.   कारण असेल आणि ते सापडलं  तर काय उदासी दूर होतेच होते.  ब-याचदा अशी उदासी आल्यावर मनाला स्थिर ठेवणं अवघड जातं. पण तरी आपल्या प्रश्नांची उत्तरं आपणच शोधावीत. समोरून कोणी कितीही प्रयत्न केले तरी त्यावेळी ते नकोसे वाटतात. काही वेळा काहीही न करता बरं वाटतं. पण एक नक्की मनाला काय वाटतं तेच करावं. त्यातूनच सापडतो मार्ग... आपल्याला हवा असलेलाच मिळेल असं नाही. कारण नेमकं काय हवय हे कुठे कळत ???

Thursday, 9 July 2015


Be Natural...... 



परवा एक वेगळा विचार ऐकला. खरं म्हणजे आपण सगळेच हा विचार नेहमी अनुभवतो. पण दुसरं कोणीतरी म्हणलं की अंतर्मुख होऊन विचार करायला लागतो. ''निसर्ग आपल्याला आवडतो, पण आपण नैसर्गिक वागत नाही. '' हाच तो विचार. किती खरं आहे ना हे. निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर मन शांत होतं. कसले मुखवटे, कसलाही खोटेपणा नसलेलं एक जग अनुभवायला मिळतं. निसर्गातल्या कितीतरी गोष्टी आपल्याला भुरळ घालतातच , पण जगायलाही शिकवतात. तत्वज्ञान न     कळणा-या तुमच्या माझ्या सारख्या... मी माझ्याच म्हणायला हवं. कारण तुम्हाला सामान्य म्हणायचं धाडस होत नाहीये. पण निसर्गाबद्दल बोलताना तरी मनमोकळं बोलावं , नाही का ? म्हणून जे मनात आलं ते बोलले. तर मुळ मुद्दा असा की, तत्वज्ञान न कळणा-यांनी निसर्गाला गुरू करावं. बरेचसे प्रश्न चुटकीसरशी सुटतील. 
बघा ना.. निसर्गात झाडावरून गळणारं पान कधीतरी रडताना पाहिलय का ? त्याचं हिरवेपण संपल्यावर ते झाडापासून अलगद , तक्रार न करता वेगळं होतं. पुन्हा मातीत मिसळून त्याच झाडावर पुन्हा उगवण्यासाठी.  ते झाडही कधी पान गळून पडल्याचा शोक करत बसत नाही. कारण झाडावरल्या उरलेल्या पानांना त्याला जोपासायच असतं. आपण मात्र आपल्याला सोडून गेलेल्या माणसांबद्दल किती दुःख करत बसतो. कित्येक वर्ष हे दुः ख उगाळत बसतो. निसर्गासारखं वागता आलं पाहिजे. म्हणजे जवळच्या माणसांचा दुरावा त्रास देणारच. पण आत्मक्लेष करून  न घेणं , हे तरी केलच पाहिजे. 
कित्येक वेळा लावलेलं रोप काळजी घेऊनही उगवत नाही. पण मातीत मिसळणारं ते रोप तक्रार करत नाही. आपण मात्र मी  एवढी मेहेनत करूनही यश मिळालं नाही म्हणून नाराज होतो. मातीत मिसळून पुन्हा उगवण्याची जिद्द निसर्गाकडून घ्यायलाच हवी. 
निसर्गातला कोणताही अविष्कार डोळ्यांना हवाहवासा वाटतो. त्याचं भरभरून कौतुक करताना आपल्याला संकोच वाटत नाही.  किती सहजपणे  आपण निसर्गावरच प्रेम  व्यक्त करतो. पण हेच सगळं आपल्या माणसांच्या जगात अलाऊड नाही. कोणी छान दिसतं असेल तर त्याचं कौतुक करणं यात काय वाईट आहे ?  ते नैसर्गिकच आहे. अर्थात मनातली शुध्द भावना तितकीच महत्त्वाची. म्हणजे एखाद्या फुलपाखराकडे बघताना जितकी निरागसता मनात असते, तितकीच असली पाहिजे. काही व्यक्ती मनापासून आवडतात. ते नैसर्गिक रीतीने सांगितलं तर भलताच गैरसमज होऊन नाती तुटतात. असं होता कामा नये. आवडणं ही नैसर्गिक भावना आहे. ओरबाडणं हे अनैसर्गिक. 
अंधाराकडून उजेड आणि उजेडाकडून अंधार हा निसर्गाचा नियम आहे. त्याप्रमाणे आयुष्यातही सुख, दुःख येणारच. कोणत्याही परिस्थितीत आपलं मानसिक संतुलन ढळू न देता आनंदात राहीलं पाहिजे.  हे सगळ बोलणं कितीही सोप्प असलं तरी तसं वागणं अवघड आहे. पण निसर्ग आवडतो असं म्हणणा-या प्रत्येकानी असं वागण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. हिरवी झाडं, खळाळून वाहणारी नदी, थंडगार वारा, पाऊस, कोसळणारे धबधबे, रंगीबेरंगी फुलपाखरं, प्राणी  - पक्षी , दरी - डोंगर असा निसर्ग न आवडणारा एक तरी माणूस असेल का ? अर्थातच नाही. त्यामुळेच निसर्ग आवडतो असं नुसतं न म्हणता त्याच्यासारख वागता आलं पाहिजे.

Monday, 15 June 2015

मना तुझे मनोगत .........




आज आशा बगे यांची एक खुप छान कथा वाचली.  ''अनोळखी ''  आशा बगे यांच्या सगळ्या कथा अगदी आपल्या जीवनात घडाव्यात इतक्या सहज आणि तरल आहेत. त्यांच्या कोणत्याही कथेत मुख्यत्वे स्त्रीच्या मनोव्यापाराचा विचार केला जातो.  कदाचित म्हणून मला त्या जास्त आवडत असतील. ''अनोळखी'' कथेनी माझ्या आवडत्या विषयाचा वेध घेतला.  आपलं मन एखाद्या डोहासारखं असत. कितीतरी वेळा मनात आलेले विचार योग्य की अयोग्य हे कळतच नाही. त्यांना थांबा म्हणलं तर ते थांबत नाहीत. कित्येकदा उगाच कातर, हळवं होत हे मन. आपल्या आजुबाजुला सगळ असूनही एकटं पाडतं. आणि अशा वेळी कोणतीही साधी गोष्ट मनाला खूप लागते. मनाच्या या डोहात माकडासारखे उड्या मारणारे काही विचार अस्वस्थ करून गेले. 
रोज आपल्याला भेटणारे सगळे अचानक अनोळखी असल्यासारखे वागतात. अर्थात हा सुध्दा मनाचा खेळच असावा. कारण ज्यावेळी तीव्रतेने आपल्या मनात आग लागलेली असते , नेमकं त्याच वेळी कोणालाच वेळ नसतो. एरवी उगाच डोकं खाणारे सगळे कुठे गायब होतात काय माहिती? कित्येकदा आपलं ओळखीचं , सुरक्षित जग अनोळखी वाटू लागतं. पुन्हा एकदा पूर्णपणे अनोळखी जगात जाण्यासाठी कंबर कसली जाते. कारण अनोळखी आणि ओळखीच्या जगाला सामोरं जाण्यावाचून दुसरा पर्यायच नसतो आपल्याला. 
आपण आपलं एकटच आयुष्य जगायचं असेल तर प्रेम या भावनेला काही अर्थच उरत नाही. प्रेमही व्यवहार पाहून करायचं असतं. काय वाईट दिसेल ? काय चांगलं दिसेल ? काय चौकटीत बसेल ? यावर सगळ अवलंबून आहे. अगदी मनाच्या तळातून    वाटणा-या अनेक गोष्टींना अर्थच नसतो. आपण जन्म दिलेल्या आपल्या मुलांवरसुध्दा प्रेम करताना विचार करायचा असतो म्हणे. आमच्या ओळखीच्या एक आजी कायम सांगायच्या, ''आपल्या मुलांना समोरचं ताय द्याव, पण बसायचा पाट देऊ नये.''  बापरे... किती व्यवहारी प्रेम. पण काही वेळा अनुभवच माणसाला शहाणपण शिकवतो. आपल्या आजुबाजुला असणारी माणसांची फौज, ओळखी, अनोळखी सगळेच एका मर्यादेपर्यंतच असतात. म्हणजे एखाद्याला आपल्याबद्दल किंवा आपल्याला एखाद्याबद्दल कितीही वाटत असलं तरी प्रत्येकाच्या काही मर्यादाअसतात. मुलावर आईचं किती प्रेम असतं. पण तेच मुलं मोठं झालं की आईनी मन्या, पिल्या असं म्हणलेलं त्याला आवडत नाही. हल्ली मुलांना आपले पालक शाळा - कॉलेजात आलेले आवडत नाहीत. आमच्या लहानपणी आई शाळेत येत नाही म्हणून वाईट वाटायचं. म्हणजे आपल्याच मुलांवर प्रेम करायची पण एक मर्यादा आहे. ही मर्यादा ओळखली पाहिजे. तसं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपल्याला लहान वाटणारं आपलं पिल्लू आता मोठ्ठ झालेलं असत. बहुतांश नात्यांमध्ये ही मर्यादा येतेच. तिचा स्वीकार करणं यातच खरं शहाणपण आहे. नाहीतर आपल्याच अपेक्षांच्या ओझ्याखाली आपल्यालाच गुदमरायची वेळ येते. 
तुटून आणि लुटून प्रेम करणं ही शंभरातल्या एखाद्या माणसाची गरज असू शकते. बाकीच्यांना फक्त व्यवहार हवा असतो. मग आपले शंभर टक्के उगाच वीस - तीस टक्के वाल्यांना का द्यायचे ? त्यापेक्षा खरच गरज आहे अशा ठिकाणी आपलं असणं हेच चांगल. हे सगळ कितीही म्हणलं तरी आपल्याला हव्या असणा-या गोष्टींमध्ये गुंतणं हा स्वभाव मन सोडायला तयार नाही. अशा वेळी मनाला विचारावसं वाटत, ''मना तुझे मनोगत मला कधी कळेल का ? ''

Monday, 8 June 2015

माझा दादू......




आजही तो दिवस आठवतो जेव्हा तो माझ्या आयुष्यात आला. माझ्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी. तो आला आणि माझं जग बदललं. आता मागे वळून पहाताना तो दिवस आजही चेहे-यावर आनंद आणतो. किती खुष होते मी त्या दिवशी, जेव्हा माझं बाळ माझ्या हातात होतं. माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस होता तो.  मला मुळातच छोट्या पिल्लांची खूप आवड. त्यात आपल्याच हातात इवल्याशा त्याला पाहून मी अक्षरशः वेडी झाले होते. त्याचं पहिल्यांदा पालथं पडणं, चालणं, बोलणं, शाळेचा पहिला दिवस , स्टेजवर पहिल्यांदा उभं रहाणं हे सगळं मी खूप एन्जॉय केलं. त्यासाठी बांधिलकीची नोकरी केली नाही. 
मला चांगल आठवतय . तो शाळेत जाताना त्याच्याबरोबर पावसाच्या डबक्यात पाय आपटताना मीदेखील लहान व्हायचे. त्याच्या बोबड्या बोलांनी मला कितीतरी सुख दिलं. माझं पिल्लू आज माझ्या खांद्यापेक्षा मोठ्ठ झालय.त्याच्या जन्माच्या वेळी जी हुरहुर मनात होती तीच आत्ता आहे. त्याचं कारण ,आज त्याचं जग बदलेल असा दिवस आहे. अर्थात त्याच्या जगाबरोबर माझंही.  आज त्याचा दहावीचा निकाल लागला. त्याला  89 टक्के पडले. ते मार्क्स किती आहेत? त्याचं करियर कसं असेल ? याबाबत मला आत्ता अजिबात टेन्शन  नाही. फक्त एकच इच्छा आहे , त्यानी चांगला माणूस व्हावं. आपल्या संवेदना जागृत ठेवून जगावं. कारण करियर, पैसा या गोष्टी मिळतातच. पण संवेदना जागृत ठेवणं गरजेचं आहे. कारण संवेदनशील माणूस कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. 
आज तो खुप खुष आहे. त्याला चांगले मार्क्स पडलेत. सगळेच खुष आहेत. त्याच्या आयुष्यात त्याला खुप समाधान मिळो. तो सदैव आनंदी राहो . हाच माझा आशिर्वाद आणि शुभेच्छा. आज पुन्हा एकदा माझ्यापासून लांब गेलेल्या माझ्या सगळ्या जिवलगांची आठवण येतीय. मला खात्री आहे ते सगळे जिथे आहेत तिथून त्याला आशिर्वाद देत असणार.... प्रणव पुन्हा एकदा अभिनंदन... खुप मोठा हो. बदललेल्या या नव्या जगात तुला कणखरपणे उभं रहाता यावं ही सदिच्छा.....


Thursday, 4 June 2015


आला पाऊस..... 



काल रात्रीपासूनच तुझी मी वाट पहात होते. जेव्हा मला अगदी असह्य हुरहुर लागते तेव्हा तुझी आठवण येते. का ते माहिती नाही? तुझे नि माझे नाते काय ? हे जाणून घ्यावसंही वाटत नाही. कारण तू माझ्या मनात कधीही बरसू शकतोस. माझी परवानगी न घेता. कारण वेळेचं बंधन तुला मला नाहीच. कालपर्यंत होणारी जीवाची घालमेल तू कशी क्षणार्धात संपवलीस. जादुगार आहेस तू. वठलेल्या तनामनाला पालवी देणारा. सृजनाची पेरणी करणारा. तू आलास की तुझ्याविषयी काहीतरी बोलावसं वाटतच. मग सकाळीच घरातली कामं टाकून तुझं कौतुक करत बसले मी. तू आलास की माझं असच होतं. 
पाऊस सुरू झाला की हे असं काहीतरी होतं. एक मैत्रिण कायम चिडवते मला, '' या कवींना आणि लेखकांना पाऊस आला की काय होतं काय माहित ?  मला तर या पावसाचा राग येतो. चिकचिक, घाण. सगळे ड्रेस खराब होतात.''  पण तिचं या कानानी ऐकून त्या कानानी सोडून देते मी. कारण पाऊस खरच नवनिर्मितीची प्रेरणा घेऊनच येतो. 
पावसाची नुसती सुरूवात झाली की लगेच विविध भारतीला ''काली घटा छाये मेरा जिया तरसाये '' हे गाणं लागलं. अरे वा.... बाहेर  पाऊस बरसत असताना असलं सॉलिड गाणं ऐकताना काय मस्त वाटलं. लगेच व्हॉटस अॅप चे मेसेज बदलले. Happy Rainy Morning .... या पावसानीना सगळं बदलूनच जातं. सगळ्या वाईट , अप्रिय गोष्टींचा निचरा होऊन पाणी पुन्हा एकदा वहात होतं. पाण्याचं डबक जसं वाईट तसच मनातल्या विचारांच साचलेपणही वाईटच. पाऊस पडला की सगळच स्वच्छ होतं. पुन्हा एकदा नव्यानी जगायला शिकवतो पाऊस. आपण फार लहान गोष्टी मनाला लावून घेऊन आपलं जगण अवघड करतो. पाऊस या मनोवृत्तीला बदलतो. कोणताही भेदभाव न करता सगळीकडे बरसतो. हवेत गारवा आणतो. आपल्यालाही रागाच्या काही क्षणांना थंड करण्याची कला पावसाकडून शिकली पाहिजे. रागात राग मिसळून काहीच मिळत नाही. त्यापेक्षा त्या रागावर प्रेमाचा शिडकाव केला तर पुढचे मोठे प्रश्न टळतील. नीट विचार केल्यानंतर आपल्यालाही पटत, उगाच चिडलो होतो आपण इतके. काही वेळा त्या त्या वेळेची परिस्थिती असते ती. ती वेळ गेली की सगळं नॉर्मल होतं. पण त्या वेळी असा विचार करणं कठीण असतं.  पावसाला आज हे छान जमलय. काल होणारी जीवाची काहिली कशी संपवूनच टाकली त्यानी.  पाऊस नसताना धुळीचे नुसते लोट उठत होते. पण पाऊस पडताच  सगळं कस शांत झालं. पाऊसच प्रेमाचा धडा शिकवतो. पाऊस आला की हवा ढगाळ आणि कुंद असली तरीही हवेत एक तजेला असतो. आयुष्यात असा ढगाळपणा हवाच नाही का ? 
तृप्त झाली शांत धरणी
मधुस्मिते हिरव्या कुरणी
रुसट चुंबनासम ओल्या सरी येती जाती
भुईसवे आभाळाची जुळे आज प्रीती